रुजवू मराठी फुलवू मराठी

विवेक मराठी    24-Feb-2023   
Total Views |
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा, यासाठी प्रत्येक मराठी माणूस आग्रही दिसतो खरा. पण मराठी माणूसच एका वाक्यातील किती शब्द अचूक मराठीत बोलतो याची खात्री करून घ्यायला हवी. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल न मिळेल, तोवर आपल्या भाषेवर प्रेम करणं आणि ती भाषा अचूक वापरून व्यक्त करणं, हाच मराठी भाषेचा गौरवदिन ठरेल.

vivek
 
एका स्नेह्यांच्या मुलाचा मला फोन आला.
 
“आमच्या कॉलेजमध्ये मराठी डे सेलेब्रेट करणार आहेत. मला कॉम्पीअरिंग करायचंय. स्क्रिप्टसाठी हेल्प हवीय. अ‍ॅटलीस्ट इंट्रो आणि कन्क्लुजन तरी दे, रेस्ट आय विल मॅनेज.”
मी विचारलं की “कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे?”
 
तो म्हणाला, “ऑडिअन्समध्ये कॉलेजचा स्टाफ आणि स्टुडंट्सच असतील. डायसवर डिपार्टंमेंट हेड्स आणि कुणी मराठी एक्स्पर्ट असतील साहित्तिक काइंड ऑफ. मग एलोक्यूशन काँटेस्ट असेल, इमिजिएटली प्राइज डिस्ट्रिब्यूशन. हार्डली कपल ऑफ अवरचा प्रोग्राम असेल. जरा इलेवन्थ अवरच सांगतोय, पण प्लीज दे नं..”
 
कार्यक्रमानंतर त्याचा आभार मानण्यासाठी फोन आला. “प्रोग्राम फँटास्टिक झाला. सगळे डिग्नीटरीज एक्सलंट बोलले. ऑडियन्सचा रिस्पॉन्स अमेझिंग होता. मे बी नंतर रिफ्रेशमेंट आहे हे माहीत होतं, सो लास्ट मिनटपर्यंत पब्लिक सीटला ग्लूड होती.”
 
 
माझी टाळ्याला ग्लूड झालेली जीभ सोडवत मी म्हटलं, “तुला जमलं एकूण मराठीत बोलायला!”
तो म्हणाला, “कमऑन, मराठीतच बोलतोय की अ‍ॅट प्रेझेंट!”
 
मी म्हटलं, “तू बोलतो आहेस ती मिंग्लिश आहे रे बाबा, मराठीची मावसबहीण.”
 
तो म्हणाला, “मग ओरिजिनल मराठी एक्झॅक्टली कोणती? ओह! ते शुद्ध-अशुद्ध डिबेट ज्यावरून होतं, ती का?”
म्हटलं, “बरोबर, त्या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. प्रमाण आणि बोलीभाषा. बोलीभाषा हे मराठीचं लेणं म्हणता येईल आणि प्रमाणभाषा ही वेगवेगळ्या बोली बोलणार्‍या मराठी समाजाला एकत्र ओवते. तेव्हा कुठे आपण एका माळेचे मणी होतो.”
तो जरा विचारात पडला असावा. “किती बोलीभाषा आहेत?”
 
 
पुढे स्वत:च म्हणाला, “बघ, गूगल सेज - बोलीभाषांचे एरियावाइज प्रकार म्हणजे कोंकणी, कोल्हापुरी, कारवारी, अहिराणी, मराठवाडी. इव्हन वर्‍हाडी, बेळगावी, मालवणी, झाडीबोली, बागलाणी, नंदुरबारी, बंजारा, आगरी. लोकेशनवाइज खालल्यांगी, वरल्यांगी, ताप्तांगी, डोंगरांगी. आदिवासींची गोंड, भिल्ल, वारली, पावरी, कोरकू, कोलामी, कातकरी, माडिया. अजूनही असतील. ओ माय गॉड!
 
 
माझे कॉलेजचे काही फ्रेंड्स वेगवेगळ्या एरियातून आलेत. त्यांचे अ‍ॅक्सेंट वेगळे असतात ते त्यांच्या बोलीभाषेनुसार. राइट?”
“बरोबर. ललित लिहिताना, फेसबुकसारख्या माध्यमावर लिहिताना कधी बोलीभाषा वापरली तर आणखी मजा येते. तो भाव जास्त ताकदीने पोहोचू शकतो.”
 
 
“आय सी. मग प्रमाणभाषेचा यूज काय?” त्याला कळेना.
 
 
“बोलीभाषेत शासकीय कारभार कसा करणार? मालवणीतल्या बातम्या बाकीच्यांना कळतील का? खान्देशातल्या शिक्षकाकडे तपासायला आगरीतली उत्तरपत्रिका आली, तर! सगळे फलक झाडीबोलीमध्ये लिहिले, तर इतरांना कसे कळतील?” मी विचारलं.
“इंटरव्ह्यूमध्ये कँडिडेट कोंकणी ऑर बंजारामध्ये रिप्लाय करत असेल, तर त्याला सिलेक्ट कसं करणार?” त्यालाही मुद्दा कळला.
 
 
“तेच. म्हणून हा गोंधळ टाळायला, सगळ्यांना एकत्र ठेवायला प्रमाणभाषा हवी की नाही!”
 
“हवी. मग यात अर्ग्यू करण्यासारखं काय आहे?”
 
“एक गट म्हणतो ’बोलीभाषा अशुद्ध आणि प्रमाणभाषा शुद्ध असते.’ दुसरा म्हणतो ’शुद्ध-अशुद्ध असं काही नसतं. काय म्हणायचंय ते समजलं की झालं.”
 
तो म्हणाला, “करेक्ट. आता माझी मिंग्लिश तुला समजली की इझीली.”
 
 
मी म्हटलं, “समजणं एवढाच हेतू असावा का भाषेचा! एका शब्दाचे अनेक अर्थ असणं हे भाषेचं सौष्ठव असतं. प्रत्येक बोलीभाषेलाही स्वत:चा गोडवा असतो. ’इतभर तौसा नी हातभर बी’, ’चार आनानी कोंबडी नी बारा आनाना मसाला’, ’कामाची म्हनून केली अन् कनगी घेऊन पान्याले गेली’ या मालवणी, अहिराणी, वर्‍हाडी म्हणींमध्ये अर्थ, ठसका, गंमत सगळं आहे की नाही?”
 
त्यावर त्याचं म्हणणं, “मग शुद्ध-अशुद्ध इश्यू आला कुठून? ग्रामरमधून?”
 
मी म्हटलं, “शुद्ध-अशुद्ध हे शब्द अपमानकारक वाटतात, त्याऐवजी चूक किंवा बरोबर हे शब्द वापरायला हवे. मराठी लेखनविषयक 14 नियमांना म. शासनाने 1962 साली मान्यता दिली. 1972मध्ये नवीन नियमांची भर घातली. काळानुसार त्यात बदल जरूर व्हावेत, पण नियम सरसकट नाकारून भाषेची गुणवत्ता कशी टिकेल? बोलीभाषेचेही नियम असतातच की. फक्त ते असे नोंदवलेले नाहीत. ते पाळून ती भाषा बोलली तरच ती अचूक असते. गंमत म्हणजे प्रमाण भाषेला नावं ठेवणारे आपला मुद्दा पोहोचावा म्हणून बोलीभाषेतला एखाददुसरा शब्द वगळता प्रमाण भाषेतच लिहीत किंवा बोलत असतात.”
“इट्स फनी. पण भाषेची प्युरिटी फक्त ग्रामरवर अवलंबून नाही नं, वर्ड्सवरपण आहे. पण टेक्निकल मराठी वर्ड कुठून आणू? जसे सॉफ्टवेअर, हार्डवेअर!” त्याचा प्रश्न बरोबर होता.
 
 
“जिथे योग्य प्रतिशब्द नाही, तिथे उगीच मराठी वापरण्यात अर्थ नाही. सॉफ्टवेअरला ’मृदू प्रणाली’ म्हणणं हा वेडेपणा आहे. मात्र इतर भाषेतले काही सोपे शब्द जसे रूढ झाले, तसे राहू द्यावेत. आता कप-बशीमधला कप मराठी नाही की ’ह्ये बेस झालं’मधला बेस. ते मुळात बेस्ट आहे. पण वीर सावरकरांनी अनेक इंग्लिश, फारसी शब्दांना सुलभ आणि अचूक प्रतिशब्द दिलेत - धाव, झेलबाद, कर्णधार, षटक, चित्रपट, पटकथा, महापौर, नगरपालिका, दिनांक असे कितीतरी.
 
 
याउलट तू जेव्हा मिंग्लिश बोलतोस, तेव्हा साधे सोपे मराठी शब्दसुद्धा आठवायचा कंटाळा येऊ लागतो. मग ते वापरातून नष्ट व्हायला लागतात. भाषा हळूहळू अस्तंगत होते अशाने. भाषा प्रवाही हवी म्हणत भेसळीचं समर्थन करणार्‍यांना तो प्रवाह गढूळ हवाय की नितळ!”
 
तो म्हणाला, “मग ही रिस्पॉन्सिबिलिटी कुणाची? आम्हाला इंग्लिश मिडियमला तुम्हीच घातलं नं! आजी बघते त्या मराठी चॅनेल्सवर प्रोग्रामची नावं बघ. ग्रेट भेट, गुड मॉर्निंग महाराष्ट्र, लिटिल चॅम्प्स, रिपोर्ताज, ग्रँड फिनाले. पॉलिटिशियन्सनी मराठीतून पाट्या लिहिणं कंपल्सरी केलं, पण नावं मात्र रिटेल शोरूम, जनरल स्टोअर्स, हायस्कूल, हेअर कटिंग सलून, मेडिकल्स, स्पा, ब्यूटी पार्लर, स्टेशन, रेसिडेन्सी.”
 
देवनागरी लिपीला मराठी स्क्रिप्ट म्हणत असला, तरी त्याचा मुद्दा योग्य होता.
 
 
“जागतिकीकरणानंतर तुम्हाला - म्हणजे ‘जेन झी’ला सोयीचं व्हावं, म्हणून मुलांनी इंग्लिश माध्यमात शिकावं असं पालकांना वाटतं. इंग्लिशवर टीका केली, तरच आपला मराठीचा अभिमान सिद्ध होईल असंही कित्येकांना वाटतं. प्रगतीसाठी इंग्लिशचा स्वीकार करायलाच हवा, त्याचबरोबर प्रत्येकाला किमान आपापल्या भागातली बोलीभाषा प्रमाण भाषेसह आली पाहिजे. ग्रामीण भागात काही प्रगतिशील शिक्षकांनी सुरुवातीला बोलीभाषेची मदत घेऊन मुलांना शिकवलं आणि नंतर त्यांना अगदी इंग्लिशचीही गोडी लावली आहे.
 
 
मराठी तर आपलीच भाषा आहे. ती जतन करण्यासाठी ती वाचत, ऐकत, बोलत राहणं एवढं तर आपण नक्कीच करू शकतो नं, कारण मराठीचं अस्तित्व हेच आपलंसुद्धा अस्तित्व आहे. मराठी भाषेशी आपली नाळ जुळलेली आहे.
 
 
आजच्या ग्लोबल जगात जपानी, फ्रेंच, जर्मन, मँडेरीन कितीतरी भाषा शिकायला धडपडतायत लोक. मग कोणत्याही माध्यमात शिकलं तरी आपलीच मातृभाषा नीट शिकायला अडचण का वाटावी! इच्छा हवी फक्त.
महत्त्वाचं आहे ते भाषेवर प्रेम करणं आणि ते भाषा अचूक वापरून व्यक्त करणं.”
त्याने म्हटलं, “मी नक्की ट्राय.. सॉरी.. प्रयत्न करीन चांगलं मराठी बोलण्याचा. बाकीच्या गप्पा मारायला आता आमच्या नव्या घरी ये नं एकदा.”
‘’येईन” म्हटलं, “पण पत्ता सांगून ठेव.”
तो म्हणाला, “न्यू फ्लायओव्हरवरून गार्डनसाइडने ये, थर्ड लेन आली की लेफ्ट टर्न घे, जस्ट कॉर्नरची बिल्डींग... अर्रर्रर्र सॉरी सॉरी..
 
 
नव्या पुलावरून अं.. बागेकडे ये. तिसर्‍या गल्लीत अं.. डावीकडे कोपर्‍यावरचं घर... हुश्श!”
 
फार अवघड नव्हतं हे. नाही का! मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल न मिळेल, तोवर आपल्या परीने असे छोटे प्रयत्न करत राहू या.
 
 
मला खात्री आहे की वेळ लागेल, पण चेंज.. आपलं.. बदल नक्की होईल. पुलं म्हणत तसं ”भ्रष्टाचार एकदम जाणार नाही. तो हप्त्याहप्त्याने जाईल.”
 
मोहिनी मोडक
। 9850387853

मोहिनी महेश मोडक

 वेब सर्व्हिसेस पुरवणाऱ्या अकोलास्थित कंपनीच्या संचालिका आहेत. नेटवर्क इंजीनिअरिंग कोर्सेसची प्रशिक्षक म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. सध्या त्या ब्लॉगिंग, डिजिटल मार्केटिंग यासारखे विविध कोर्सेस ऑनलाइन पद्धतीने शिकवतात.
त्या पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात द्विपदवीधर
असून त्यांनी वृत्तपत्रातून स्तंभलेखन, प्रासंगिक लेखन व दिवाळी अंकांसाठी लेखन केले आहे.
त्या समाजमाध्यमांच्या अभ्यासक व ब्लॉगर आहेत, तसेच
विविध सामाजिक, साहित्यिक व व्यावसायिक संघटनांमध्ये त्या सक्रिय आहेत.