शिवाजी ही चलेगा!

विवेक मराठी    24-Feb-2023   
Total Views |
महापुरुषांच्या जीवनाचा आदर्श घेऊन स्वत:च्या जीवनामध्ये त्यांची रुजवण करावी, म्हणजेच महापुरुषांच्या मार्गाने चालावे अशी आपली सामाजिक जीवनपद्धती आहे. समाजमनाची जडणघडण करण्यासाठी छत्रपती शिवरायांना आदर्श मानून त्यांची जयंती, पुण्यतिथी संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जाते. या वर्षी महाराष्ट्राच्या सीमा पार करून थेट दिल्ली-आग्य्रात हा जयंती सोहळा साजरा केला गेला. एका अर्थाने महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी ही आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. मात्र या आनंदाला नख लावण्याचे काम काही नतद्रष्ट मंडळींनी केले. अशा मंडळींना उच्चरवाने सांगावे लागेल की, ‘शिवाजी ही चलेगा!’.

vivek
 
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेप्रमाणे जयंती 19 फेब्रुवारी रोजी राज्यभर मोठ्या प्रमाणावर साजरी झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध गडकिल्ल्यांवरून आपआपल्या गावात शिवज्योत घेऊन जाणारी तरुणाई जागोजागी दिसून आली. जगाच्या पाठीवर एकमेव छत्रपती शिवाजी महाराज असे आहेत, जे महाराष्ट्रातील सर्व वयोगटातील नागरिकांना आपल्या हृदयस्थानी पूज्य वाटतात. त्यामुळे तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे ही शिवजयंती साजरी केली जाते. या वर्षी महाराष्ट्र शासनाने शिवनेरी किल्ल्यावर तीन दिवस शिवजयंती महोत्सव आयोजित केला होता. त्याचप्रमाणे ज्या आग्य्राच्या सदरेत औरंगजेबाने छत्रपतींचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, तेथेच या वर्षी भव्यदिव्य शिवजयंती उत्सव झाला. एकूणच पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी सर्व शिवभक्त व राष्ट्रीय विचारांनी भारावलेले नागरिक पुढाकार घेत आहेत.
 
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अशी व्यापक स्वरूपात का होते? आपल्या देशात महापुरुषांची मांदियाळी आहे, तरीही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात का साजरी होत असते? याचे उत्तर शोधायचे, तर असे म्हणता येईल की, छत्रपती शिवाजी महाराज हे अनेकांचे प्रेरणास्थान आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हिंदू पदपादशाहीचे उद्गाते आहेत. आपले सत्त्व आणि तत्त्व विसरून गेलेल्या समाजाला जागृत करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आदर्श राजा कसा असावा याचा वस्तुपाठ शिवछत्रपतींनी प्रस्तुत केला. हा देश माझा आहे, देशाची संस्कृती माझी आहे, देशातील सर्व लोक माझे बांधव आहेत, त्यांच्या उत्कर्षासाठी मी सतत प्रयत्न केला पाहिजे, माझ्या देशावर, माझ्या संस्कृतीवर जर कोणी आक्रमण केले तर ते मी सहन करता कामा नये, त्याच्याविरुद्ध संघर्ष केला पाहिजे, मी कुणाचे स्वातंत्र्य हिरावून घेणार नाही, त्याच वेळी मी पारतंत्र्यातदेखील राहणार नाही.. हे शिवविचारांचे आणि शिवकार्याचे सार आहे. हा शिवविचार एका जाती-प्रांतापुरता मर्यादित नाही. हा विचार राष्ट्रीय आहे, तसाच वैश्विकही आहे. देव-धर्म-देशाला अग्रस्थान देणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श नसतील, तर कोणाला आदर्श मानावे? राष्ट्रीय पातळीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असताना काही मंडळींना पोटशूळ सुरू झाला आहे. या पोटशूळामुळे काही ठिकाणी आगळीक झाली आहे. महाराष्ट्रात धुळे येथे आणि दिल्लीतील जेएनयूमध्ये या घटना घडल्या असून त्यांचा निषेध केला पाहिजे.
 
 
vivek
 
धुळे शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीवर दगडफेक केली गेली आणि त्यात स्त्रिया व लहान मुले जखमी झाली. दगडफेक करणारे स्वाभाविकपणे छत्रपती शिवाजीराजांचे विरोधक आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.प्रसारमाध्यमांनी हल्लेखोरांना अज्ञात म्हटले असले, तरी हे अज्ञात हल्लेखोर कोण आहेत हे सर्वांना माहीत आहेच. अशी दगडफेक करणारे गट सक्रिय होत असताना राज्य सरकार शांतपणे बघत बसण्यापेक्षा काही करताना दिसत नाही, या गोष्टीचे आश्चर्य वाटते आहे. केवळ शिवजयंतीच्या मिरवणुकीवर ही दगडफेक झाली नसून हिंदू समाजाच्या अस्मितेवर आणि श्रद्धांवर केलेला हल्ला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. ही गोष्ट शासनाने दुर्लक्ष करावी अशी नसून तातडीने कारवाई करून योग्य संदेश देण्याची आहे. महाराष्ट्र राज्य शासन लवकरच अज्ञातांचा बुरखा फाडून त्यांचा चेहरा उघडा पाडेल.
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी अशीच घटना दिल्लीतील जेएनयूमध्ये झाली. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यापीठ मागील काही वर्षांपासून शिक्षण, संशोधनापेक्षा वेगळ्याच कारणांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. अनेक विद्यार्थी संघटना प्रशासनाला वेठीस धरून आपला विचार प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेक आंदोलने करून देशहितासाठी कायद्यांना विरोध करत असतात. अशा संघटनांनी जेएनयूमध्ये आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला विरोध केला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा फेकण्यात आली. हार-फुले उधळून टाकण्यात आले. हे दुष्कर्म करणार्‍या संघटनेचे नाव आहे ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’. ही विद्यार्थी संघटना डाव्या विचारसरणीच्या प्रभावाखाली असून शिवजयंतीला विरोध करताना ‘शिवाजी नहीं चलेगा’ अशा घोषणा देण्यात आल्या. शिवजयंती साजरी करणार्‍या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. दिल्लीत घडलेल्या या घटनेची आणि दिल्या गेलेल्या घोषणेची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. जे जे राष्ट्रविरोधी आहे, समाजाला तोडणारे आहे, ते ते डाव्या विचारसरणीच्या संघटना आग्रहाने करत असतात. त्यामुळे त्यांना हिंदू समाजाची अस्मिता जागृत करणारे शिवछत्रपती पचनी पडणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे, हे एक वेळ समजून घेता येईल. मात्र विरोध करताना दिलेली घोषणा आणि त्यामागची भूमिका कोणती आहे, त्याचा अर्थ काय होतो हेही समजून घेतले पाहिजे. ‘शिवाजी नहीं चलेगा’ असे म्हणत असताना काय काय नाकारले जाते? छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख देव, देश आणि स्वधर्म यातूनच होते. आपल्या संस्कृतीची पाठराखण म्हणजेच शिवविचार होय. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे राष्ट्रीय विचार, आचार आणि संस्कार होत. त्यामुळे शिवाजी नहीं चलेगा असे म्हणताना वरील सर्व गोष्टींना विरोध केला जातो. तीन शब्दांची ही घोषणा म्हणजे देशाचा वारसा नाकारणे. वर म्हटल्याप्रमाणे जे राष्ट्रीय विचारांचे आहे, त्याला विरोध करत राहणे हा डाव्यांच्या जगण्याचा ऑक्सिजन आहे. त्यामुळे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला केलेला विरोध स्वाभाविक आहे. त्यामुळे जेएनयूमध्ये दिली गेलेली घोषणा विसरता कामा नये आणि आपल्या कृतीतून दाखवून द्यावे लागले की, ‘शिवाजी ही चलेगा!’.
 
 
शिवाजी ही चलेगा असे म्हणताना, जागतिक पातळीवर आपल्या भारताला अव्वल स्थान प्राप्त होताना सर्वांच्या स्मरणात आणि कृतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असायला हवेत. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे धगधगता राष्ट्राभिमान आणि शिवरायांनी आपल्या कृतीतून साकार केलेला सामाजिक एकतेचा आदर्श होय. हा आदर्श आता समाजजीवनात प्रकट होताना दिसतो आहे. केंद्रात आणि राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारे लोक नेतृत्व करत आहेत. त्यांनी आपल्या कृतीतून शिवविचार प्रखरपणे मांडायला हवा. कारण आजच्या काळात शिवविचार हाच तारक मंत्र आहे आणि म्हणूनच सर्व पातळ्यांवर एकच स्वर उमटला पाहिजे, ‘शिवाजी ही चलेगा’. हा ज्वलंत शिवविचार अमलात आणताना शिवद्रोही व्यक्ती, संस्था, संघटना यांच्या बाबतीतही गंभीरपणे विचार केला पाहिजे.

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001