‘हाम हिंदू छू’

बंजारा हिंदूंचे विराट दर्शन

विवेक मराठी    04-Feb-2023   
Total Views |
गोद्री (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे 25 ते 30 जानेवारी 2023दरम्यान अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना-नायकडा समाजाचा ऐतिहासिक महाकुंभ सोहळा पार पडला. या निमित्ताने दबलेल्या समाजाविषयी चिंतन झाले. याशिवाय देशभरात विखुरलेल्या या समाजाचे अतिविराट दर्शन झाले. समाजात धर्मजागृती निर्माण करणारा हा अनुपम सोहळा होता, हेच या ‘महाकुंभा’चे फलित होय.
 
banjara
‘हे हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे’ हा संघाचा मूलभूत विचार आहे. आज आपला हिंदू समाज अनेक प्रकारच्या सामाजिक व्याधींनी ग्रासला आहे. भयाण दारिद्य्र आहे. निरक्षरता आणि उपेक्षा आहे. ख्रिश्चन मिशनरी समाजाच्या दुर्बलतेचा फायदा उचलत आहेत. बळजबरीने हिंदू समाजाला बाटविले जात आहे. ‘हिंदू’ची व्याप्ती मर्यादित करण्याचा डाव रचला जात आहे. गाव-खेड्यात राहणार्‍या बंजारा समाजाच्या 3 हजार तांड्यांवर ख्रिश्चनीकरण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाच राज्यांतील 11 हजार तांड्यांपैकी साडेतीन हजार तांड्यांमध्ये चर्च दिसून आली आहेत. ही समस्या गंभीर होऊ नये, म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्मजागरण समितीच्या पुढाकारातून, पूजनीय धोंडीराम महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या जळगाव जिल्ह्यातील गोद्री या छोट्याशा गावात 25 ते 30 जानेवारी 2023दरम्यान अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा, लबाना-नायकडा समाजाचा महाकुंभ पार पडला. हा कुंभ चार अर्थांनी ऐतिहासिक ठरला - हा कुंभ महत्त्वाच्या पण दुर्लक्षित अशा गावात झाला, या कुंभात समाजाच्या धर्माविषयी व उत्थानाविषयी झालेले चिंतन, समाजाचा लाभलेला प्रचंड प्रतिसाद आणि देशभरातल्या संत-महंताची लाभलेली उपस्थिती.
 
 
vivek
 
या पाच दिवसांत धर्मसभा, पारंपरिक नृत्य, कथा आणि लोकगीते यांची रेलचेल पाहायला मिळाली. 24 जानेवारी 2023 रोजी कुंभस्थळ ते धर्मस्थळापर्यंत (गोद्री) अश्व असलेल्या 11 रथांमधून मान्यवर संतांची मिरवणूक काढण्यात आली. शोभायात्रेवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. महिलांनी वेषभूषेत लेंगी नृत्य सादर केले. या यात्रेत लाखो भाविक सहभागी झाले होते. सुमारे 500 एकरांवर महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते, तर देशभरातील विविध पीठांच्या, मठांच्या, आखाड्यांच्या सातशेहून अधिक संतांनी या कुंभास भेट दिली. हा कुंभ यशस्वी करण्यासाठी तीन हजार स्वयंसेवकांनी दिवसरात्र मेहनत घेतली. शिवाय पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. लाखो महिलांची व पुरुषांची निवास-भोजनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. तहानभूक विसरून सर्व जण राबत होते. स्वच्छाग्रही लेबल्सचे जर्किन घातलेले काही महिला-पुरुष दिसत होते.
 
 
banjara
 
याचि देही, याचि डोळा
 
पाच दिवस चालेला हा सोहळा याची देहि याचि डोळा अनुभवताना समाजबांधवांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. सुमारे 10 लाखाहून अधिक लोकांनी महाकुंभाचे दर्शन घेतले. जय सेवालाल, जय श्रीराम, हाम हिंदू छू अशा जयघोषांनी वातावरण दुमदुमून गेले. महिला-पुरुष बेभान होऊन पारंपरिक नृत्याचा नजराणा पेश केला.
वेगवेगळ्या राज्यांत विविध नावांनी ओळखला जाणारा बंजारा समाज या कुंभात एकत्र आला होता. महाराष्ट्रातील बंजारा, लमाण, कर्नाटकातील लबाडा, पंजाबमधील शीख बंजारा, तेलंगणातील लमाणा, गोरख्या यांसह विविध राज्यांतील बंजारा समाजबांधव त्या त्या प्रदेशातील भाषा, संस्कृती, परंपरा, कपडेलत्ते घेेऊन पारंपरिक वेषात सहभागी झाले होते. नायक/नायकडा (तांड्याचा नायक), पुजारी (संत सेवादास महाराज, देवीचा पुजारी), कारभारी (तांड्याचा नियोजन करणारा), डावो (सुज्ञ नागरिक), डावसान (तटस्थ नागरिक) हे आपल्या समूहातील आहेरे-नाहीरे, गरीब, श्रीमंत, शेतकरी, नोकरदार यांना सोबत घेऊन बस, रेल्वे, टेम्पो आदी मिळेल त्या वाहनाने गोद्रीत एकवटला होता. या कुंभास जणू काही बंजारा समाजाच्या आखाड्याचे रूप प्राप्त झाले होते. बंजारा समाजाने दाखविलेले हे विराट रूप राष्ट्रद्रोही व धर्मद्रोही शक्तींना दिलेले सणसणीत उत्तर आहे.
 
या कुंभात आलेली माणसे साधी होती. त्यांना राष्ट्रद्रोही शक्तींविषयी जाण होती. त्यातील एक नाव म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील उकंडराव जानू राठोड होय. मी त्यांना विचारले, “तुम्ही या कुंभात कशासाठी आलात?” थेट बंजारा भाषेत उत्तर देत ते म्हणाले, “उठोरे गोरभाई जागो बंजारा घर में फुटवेरी लगाव नारा कत चल गो भीमारो छोरा.” (जागे व्हा, बंजारा बांधवांनो! आपल्या धर्मामध्ये फूट पडत आहे. आपल्या भीमारो (सेवादास महाराजांना) विसरू नका.)


vivek

banjara 
तेलंगण राज्यातील गौरापूर जि. आदिलाबादहून अंदू बस्सी मतुरे आणि चतरासिंग गोविंदा पडवाल हे पदरमोड करून लमाण व गोरखा समाजातील 50 व्यक्तींना महाकुंभास घेेऊन आले होते. अंदू बस्सी मतुरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या - “पोहरादेवीला समाज जसा एकवटतो, तसे गोद्रीत आम्ही एकवटलो आहोत. हजार किलोमीटरचा प्रवास करून कोणतीही अपेक्षा न ठेवता महाकुंभात सहभागी झाल्याचा आम्हास आनंद झाला आहे.”
पंजाबच्या अमृतसर परिसरातून आलेले वीरेंद्रसिंग महाकुंभाच्या या यात्रेत भेटले. वीरेंद्रसिंग म्हणाले, “मुझे खुशी है की हमारे समाज कोई तो ख्याल कर रहा है, हम बटवारा नहीं होने देेंगे, इसलिए हम 50 आदमी इस महाकुंभ में शामील हुए है!”
या महाकुंभात मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, छत्तीसगड, राजस्थान, गुजरातसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या असंख्य समाजबांधवांशी माझे बोलणे झाले आहे. सर्वांच्या भावना एकसारख्या होत्या. गावगाड्याबाहेरचा समाज एकत्र आला, एकमेकांशी संवाद साधतोय, याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येत होता.

vivek
 
‘हाम हिंदू छू’
 
या महाकुंभात सलग पाच दिवस धर्मसभा झाली. या सभेत विविध धर्मपीठांच्या, आखाड्यांच्या, मठांच्या संतपुरुषांनी मार्गदर्शन केले. ‘हाम हिंदू छू, राष्ट्रद्रोही अन धर्मद्राही शक्तीन दकाळो. बंजारा समाजजेर गौरवाशाली परंपरा धोकाम आई छ..’ (आम्ही हिंदू आहोत. राष्ट्रद्रोही अन धर्मद्रोही शक्ती तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे आमच्या बंजारा समाजास धोका निर्माण झाला आहे) असा धर्मसभेतून सूर निघाला. या धर्मसभेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बाबा रामदेव, स्वामी गोविंदगिरी महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी, अखिल भारतीय धर्मजागरण प्रमुख शरदराव ढोले, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री विनायक देशपांडे, पू. महामंडलेश्वर प्रणवानंद सरस्वती महाराज (इंदोर), पू. नवोत्तमस्वामी महाराज, पू. महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज, महंत विश्वेश्वरानंदजी (नारायण मठ), पू. बाबा हरनामसिंगजी, पू. अखिलेश्वरानंदजी महाराज, पू. मुरारी बापूजी, पू. जितेंद्रनाथजी, पू. गोपाल चैतन्य महाराज, पू. बाबूसिंग महाराज, पू. सुरेशजी महाराज आदींनी उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरसद्वारे धर्मसभेला उद्बोधन केले.
 

banjara 
समाजहिताचे तीन प्रस्ताव पारित
या कुंभातील धर्मसभेत बंजारा समाजहितासाठी व रक्षणासाठी तीन प्रस्ताव पारित करण्यात आले - पू. बालाजी, जगदंबा माता, भगवान श्रीकृष्ण यांची मंदिरे प्रत्येक तांड्यात उभी राहतील, प्रत्येक कुटुंब सकाळ-संध्याकाळ मंदिरात आरतीला जाईल व आपल्या परंपरेचे रक्षण करेल, घरात हिंदू महापुरुषांची छायाचित्रे ठेवतील; गोरमाटी भाषेचे जतन व संवर्धन व्हावे आणि महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगण राज्यांत धर्मांतरविरोधी कायदा त्वरित लागू करण्यात यावा, असे तीन प्रस्ताव ठेवण्यात आले. या सर्व प्रस्तावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
बंजारा लोककलेचे दर्शन
दर्‍याखोर्‍यात वावरणार्‍या बंजारा समाजात वेगळी लोकसंस्कृती पाहायला मिळते. या महाकुंभात समाजबांधवांनी आपल्या लोककलेचे दर्शन घडविले. महिलांनी परंपरेने चालत आलेली मौखिक गाणी गायली. हलगीच्या तालावर आणि गाण्यावर महिला-पुरुषांनी लोकनृत्याचा सामूहिक आविष्कार सादर केला. पारंपरिक वेषभूषेत, केशभूषेत बंजार समाजाचे आगळेवेगळे दर्शन घडले. बंजारांच्या लोककथा व आध्यात्मिक कथा आणि कृष्णलीला गोरमाटी भाषेत सादर करण्यात आल्या.
 
 
प्रदर्शनातून उलगडला बंजारा इतिहास
 
 
बंजारा समाजाला मोठा इतिहास आहे. या समाजाची काही वैशिष्ट्ये आहेत. ही वैशिष्ट्ये समाजाला माहीत व्हावीत यासाठी बंजारा समाज संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात भाषा, कलाकृती, पोशाख, आभूषणे, नृत्य, संगीत, भांडी, दगडी वस्तू, बैलगाडी आदी वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. विविध साधुसंतांसह संघाचे वरिष्ठ पदाधिकारी, सरकारी कर्मचारी व अधिकारी यांच्यासह पाच लाखाहून अधिक लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिल्याची माहिती प्रदर्शन सजावट प्रमुख पंकज साखरे यांनी दिली.
 
 
बचत गटांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन
 
 
या महाकुंभाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत 200 बचत गटांच्या उत्पादनांच्या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. पापड, लोणचे, आयुर्वेदिक तेल व औषधे, गोआधारित उत्पादने, भरड धान्यांवर आधारित विविध उत्पादने आदीसह खानदेशी खानपानाचे प्रदर्शन पाहायला मिळाले.
 
 
खापावरची पुरणपोळी तयार करणार्‍या जळगाव जिल्ह्यातील श्री स्वामी समर्थ महिला बचत गटाच्या अध्यक्षा पुष्पा राजेंद्र पाटील म्हणाल्या, “या कुंभाच्या निमित्ताने माझ्या उत्पादनांचे मार्केटिंग करण्यास संधी मिळाली. विविध राज्यांतून आलेले लोक पाहता आले. अनेकांनी खापावरच्या पुरणपोळीचा आस्वाद घेतला. खानदेशी खाद्यपदार्थाची ही चव अनेकांना आवडली.”
 
 
पोलीस प्रशासन तणावमुक्त
 
 
जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदा महाकुंभ आयोजित करण्यात आला होता. हा कुंभ शांततेत पार पडावा, यासाठी संयोजकांसह पोलीस प्रशासनावर ताण होता. पोलिसांनी चोख बंदोबस्तही ठेवला होता. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, दुर्गा वाहिनीच्या स्वयंसेविका स्वप्रेरणेने कार्यरत होते. त्यामुळे पोलिसांवर अतिरिक्त ताण जाणवला नाही.
 
 
महिला होमगार्ड रंजना सोनवणे म्हणाल्या, “महाकुंभास देशभरातील साधुसंत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार असल्याने पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आम्हाला सतत सूचना देत होते. आठ-दहा दिवस आम्ही गोद्रीमध्ये ठाण मांडून होतो. गणेशोत्सव, नवरात्र, निवडणुका, शिवजयंती, यात्रा या प्रसंगी काम करताना तणाव जाणवतो. पण महाकुंभात कसलाच तणाव जाणवला नाही. आमच्या काही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी खाजगीत गोद्री महाकुंभाच्या निमित्ताने प्रथमच कामातून आनंद जाणवला असल्याची बोलकी प्रतिक्रिया दिली.” महाकुंभाचे यश लक्षात येणारी देणारी प्रतिक्रिया संघाचे असंख्य कार्यकर्ते, पोलीस कर्मचारी यांच्या चेहर्‍यावर उमटल्याचे चित्र पाहायला मिळाले.
 
एकूणच या महाकुंभाच्या निमित्ताने बंजारा समाजाच्या प्रचंड शक्तीच्या व एकतेच्या दर्शनाबरोबरच हिंदुत्वाचा जागरही झाला.
 
 

विकास पांढरे

सध्या सा.विवेकमध्ये उपसंपादक, एम.ए.बीएड पर्यंतचे शिक्षण. वयाच्या १६ व्या वर्षापासून सोलापूर 'तरुण भारत' मध्ये वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ. पुढे दैनिक तरूण भारत, सुराज्य,पुढारीमध्ये वार्ताहर व उपसंपादक. कृषी,साहित्य, व वंचित समाजाविषयी सातत्याने लिखाण.