भविष्यवेधी आणि आश्वासक‘डॉक्ट्रीन’

विवेक मराठी    13-Mar-2023   
Total Views |

'doctrine'
म्यानमारमधील नागा बंडखोरांवरील कारवाईपासून सर्जिकल स्ट्राइकपर्यंत हवाई दलाने आपली क्षमता सिद्ध केली आहे. यापुढेही भारतीय हवाई दल देशाच्या सेवेसाठी सज्ज आहे, हा विश्वास नवे डॉक्ट्रीन देईल. अत्यंत निगुतीने, विचारपूर्वक तयार केलेले हे नव्वद पानी डॉक्ट्रीन म्हणजे भारतीय हवाई दलाच्या समग्र भविष्यवेधी सिद्धतेविषयी आश्वासकता निर्माण करणारा दस्तऐवज आहे. या नव्या दस्तऐवजाची वैशिष्ट्ये कोणती? त्यातून नक्की साधायचे उद्दिष्ट कोणते? इत्यादी अनेक मुद्दे या तत्त्वप्रणालीशी निगडित आहेत. एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्याशी या निमित्ताने केलेली बातचीत या मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकणारी आहे.
 
भारतीय हवाई दलाने नुकताच आपला सुधारित तत्त्वप्रणाली दस्तऐवज (डॉक्ट्रीन) प्रसृत केला आहे. देशाच्या सीमांचे संरक्षण करण्याचे आव्हान सशस्त्र दलांसमोर असते. मात्र हे आव्हान सतत बदलत असते. जगभरात शस्त्रास्त्रांपासून तंत्रज्ञानापर्यंत सातत्याने बहुपेडी बदल होत असतात. त्यांची दखल घेऊन आपली भविष्यवेधी योजना बनविणे आणि त्यात कालसुसंगत बदल करीत राहणे हे त्यामुळेच गरजेचे असते. त्यातच जगभर होणार्‍या युद्धांमधून अथवा सशस्त्र संघर्षांमधून अनेक धडे मिळत असतात. त्यांमुळेही युद्धसज्जता, युद्धाच्या खेळी, व्यूहनीती याबाबतच्या जाणिवांच्या कक्षा रुंदावत असतात. साहजिकच अगोदरच्या समजुतींमध्ये, प्रचलित संकल्पनांमध्ये बदल करावा लागतो. अर्थात या सगळ्याचा विचार केवळ सखोलतेनेच करावा लागतो असे नाही, तर तो समग्रतेनेदेखील करावा लागतो. अशा सजगतेतूनच नव्या आव्हानांसाठी सज्जता येत असते. भारतीय हवाई दलाने प्रसृत केलेल्या सुधारित तत्त्वप्रणालीकडे त्या दृष्टीने पाहिले पाहिजे. मुळात अशा तत्त्वप्रणालीची आवश्यकता काय? यापूर्वी असे दस्तऐवज प्रसृत करण्यात आले होते का? त्यात कालानुरूप कोणते बदल होत गेले? आताचा सुधारित दस्तऐवज आणि अगोदरचे दस्तऐवज यांमध्ये फरक कोणते? नव्या दस्तऐवजाची वैशिष्ट्ये कोणती? त्यातून नक्की साधायचे उद्दिष्ट कोणते? इत्यादी अनेक मुद्दे या तत्त्वप्रणालीशी निगडित आहेत. एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्याशी या निमित्ताने केलेली बातचीत या मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकणारी ठरली.
 
 

'doctrine'
 
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) 
 
एअर मार्शल गोखले हे भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख होते. 1968 साली ते भारतीय हवाई दलात रुजू झाले. लढाऊ विमानांचे वैमानिक म्हणून काही हजार तासांचे उड्डाण करण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. हवाई दलाशी निगडित अनेक विषयांचे ते केवळ साक्षीदारच नव्हे, तर शिल्पकार राहिलेले आहेत. सियाचेनसारख्या प्रदेशातील हवाई दलाच्या कारवाईत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग राहिला आहे. 1971च्या बांगला देश युद्धापासून ऑपरेशन पराक्रमपर्यंत अनेक यशस्वी मोहिमांमध्ये एअर मार्शल गोखले यांनी अतुलनीय कामगिरी बजावली आहे. वायुसेना पदकाचे आणि अतिविशिष्ट सेवा पदकाचे ते मानकरी आहेत. तेव्हा या विषयावरील त्यांचा अधिकार सर्वश्रुत. साहजिकच त्यांच्याशी भारतीय हवाई दलाच्या या सुधारित तत्त्वप्रणालीशी संबंधित मुद्द्यांवर केलेली मुलाखत केवळ या दस्तऐवजाबाबतच नव्हे, तर एकूणच हवाई दलाची सामर्थ्यस्थळे, भविष्यातील आव्हाने आणि त्यांना तोंड देण्यासाठीची देशाची सिद्धता अशा विविध मुद्द्यांना स्पर्श करणारी ठरली.
 
 
 
'doctrine'
 
मुळात डॉक्ट्रीनसारख्या दस्तऐवजाचा अर्थ काय, हे प्रथम पाहिले पाहिजे. हे डॉक्ट्रीन वाचणार्‍याला हवाई दलाच्या उपयोगितेतील बारकाव्यांचे आणि त्यायोगे हवाई दलाच्या क्षमतांचे अधिक चांगल्या पद्धतीने आकलन व्हावे, हा या दस्तऐवजाचा खरा हेतू. साहजिकच त्या दस्तऐवजाचे सामर्थ्य हे त्या दलाच्या सर्व स्तरांना दृष्टी देण्यात होते आणि आहे. जरी ’इंडियन आर्म्ड फोर्सेस जॉइंट डॉक्ट्रीन’ (2017), ‘लँड वॉरफेअर डॉक्ट्रीन (2018) आणि ’इंडियन मेरीटाइम डॉक्ट्रीन’ (प्रथम 2009 आणि सुधारित 2015) हे तत्त्वप्रणालींचे दस्तऐवज तयार करण्यात आले असले, तरी भारतीय हवाई दलाने यात बाजी मारली आहे आणि एअर मार्शल गोखले यांना त्याचा अभिमान वाटतो. या डॉक्ट्रीनच्या वाटचालीचा प्रवास सांगताना गोखले यांनी सांगितले - ‘’भारतीय हवाई दलाने प्रथम असा दस्तऐवज तयार केला तो 1995 साली. तो अर्थातच या पद्धतीचा पहिलाच दस्तऐवज होता आणि रँड कॉर्पोरेशन या संस्थेचा त्यात सहभाग होता. त्या डॉक्ट्रीनमध्ये युद्धाचा सिद्धान्त (थियरी ऑफ वॉर), हवाई सामर्थ्याची वैशिष्ट्ये आदी मुद्द्यांचा समावेश करण्यात आला होता. अर्थात तो दस्तऐवज गोपनीय होता, मात्र त्यानंतर सुधारित दस्तऐवज हळूहळू सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आला.
 
 
 
1995नंतर 2007 साली पहिली सुधारित आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर 2012 साली आणि आता 2022 सालचे डॉक्ट्रीन म्हणजे सर्वांत अलीकडची आवृत्ती. सुरुवातीस जरी हा दस्तऐवज गोपनीय असला, तरी कालांतराने असे लक्षात आले की या दस्तऐवजावर सार्वत्रिक चर्चा व्हायला हवी, या विषयातील जाणकारांची त्यावरील मतमतांतरे लक्षात घ्यायला हवी आणि साहजिकच काही भाग गोपनीय तर काही भाग सर्वांसाठी खुला, अशी या दस्तऐवजाची वाटचाल राहिली आहे” असे गोखले यांनी सांगितले. सरासरी दहा वर्षांनी नवी सुधारित आवृत्ती तयार करण्यात आली आहे, असे आढळेल. याचे मुख्य कारण म्हणजे एवढ्या कालावधीत केवळ युद्धाच्या संकल्पनाच बदलतात असे नाही, तर तंत्रज्ञानात कमालीचा बदल होतो, त्याचा परिणाम युद्धाची व्यूहनीती आखण्यावर होतो, तेव्हा त्या दृष्टीने आपल्या क्षमतांकडे पाहणे आणि आवश्यक तेथे त्यात बदल करण्याचा वेध घेणे आणि परिणामत: हवाई दलाला नेहमी अद्ययावत आणि सिद्ध ठेवणे हा त्याचा उद्देश. 2022चे प्रसृत करण्यात आलेले डॉक्ट्रीन उण्यापुर्‍या नव्वद पृष्ठांचे आहे. मात्र त्यातील आशय अधिक महत्त्वाचा. हा दस्तऐवज तयार करण्यासाठी अनेक स्तरांवर फार सखोल विचार होत असतो. केवळ युद्धनीती ठरविण्याच्या दृष्टीने नाही, तर अनेक आनुषंगिक बाबींसाठी याचा उपयोग होत असतो. ‘हवाई दलाचे सामर्थ्य वाढवायचे, तर केवळ तंत्रज्ञान पुरेसे नसते; त्याचा वेध घेतानाच मनुष्यबळ, प्रशिक्षण आदींचाही विचार त्यात अनुस्यूत असतो. बदलत्या परिप्रेक्ष्यात याचा सतत वेध घ्यावा लागतो. आणि म्हणूनच डॉक्ट्रीन म्हणजे अंतिम दस्तऐवज नव्हे, त्यात सतत सुधारणा होत असतात” असे गोखले आवर्जून सांगतात.
 

'doctrine' 
 
यापूर्वीच्या डॉक्ट्रीनच्या आवृत्ती आणि आताची 2022 सालची सुधारित आवृत्ती यांतील सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे हवाई दलाने अंतराळाला दिलेले महत्त्व. त्यासाठी या डॉक्ट्रीनमध्ये ’एरोस्पेस पॉवर’ असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. त्याखेरीज ज्यावर भर देण्यात आला आहे, तो घटक म्हणजे ’नो वॉर नो पीस’ अशा परिस्थितीत हवाई सामर्थ्याची भूमिका. आधुनिक तंत्रज्ञानावर या डॉक्ट्रीनमध्ये भार देण्यात आला आहेच आणि केवळ लढाऊ विमाने किंवा क्षेपणास्त्रे या अनुषंगाने नव्हे, तर सायबर, इलेक्ट्रॉनिक युद्धनीती, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स अशांवर या डॉक्ट्रीनमध्ये भार देण्यात आला आहे, हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य. हे करतानाच भारतात खासगी-सार्वजनिक भागीदारीतून संशोधनाला आणि विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचाच अर्थ ‘स्वयंपूर्णता’ हे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. गोखले म्हणाले, ‘’तंत्रज्ञानाची घोडदौड इतकी वेगाने होत आहे की डॉक्ट्रीन तयार करताना तिचा वेध घेणे क्रमप्राप्तच. गेल्या दहा-एक वर्षांत जगभरात झालेली युद्धे किंवा संघर्ष, भारताला युद्धांमधून मिळालेले अनुभव आणि झालेले बोध, जागतिक भूराजकीय परिस्थितीत आलेले परिवर्तन या सर्व पार्श्वभूमीवर सुधारित डॉक्ट्रीनची गरज होतीच. 1991 सालचे आखाती युद्ध असो किंवा 1999चे कारगिलचे मर्यादित युद्ध असो, आता रशिया-युक्रेन युद्ध असो.. ही सर्व युद्धे धडे देत असतात, काही शिकवत असतात. युद्ध जिंकण्यासाठी हवाई सामर्थ्याचा उपयोग कसा प्रभावीपणे होतो, हे इराक युद्धाने दाखवून दिले होते; तर रशिया-युक्रेन युद्धाने पुरवठा साखळी विसकळीत झाल्याने स्वावलंबनाची किती नितांत आवश्यकता आहे, याचा धडा दिला आहे. शिवाय लढाऊ विमानांबरोबरच क्षेपणास्त्रे, ड्रोन यांचे वाढते महत्त्वदेखील या युद्धाने अधोरेखित केले आहे. या सगळ्या कारवाईला अचूकतेची, त्वरेची जोड द्यायची, तर अंतराळ म्हणजेच उपग्रह आदी व्यवस्थांची निकडदेखील पुरेशी स्पष्ट झाली आहे. या सगळ्या आकलनाचे प्रतिबिंब डॉक्ट्रीनमध्ये पडलेले दिसेल. अर्थात ’हवाई सामर्थ्याला सक्षम करणारा घटक’ (एनेबलर) म्हणून भारतीय हवाई दलाने पूर्वीपासूनच अंतराळाचा विचार केला आहे, असे सांगून गोखले यांनी म्हटले की, ‘’इमेजिंग (चित्र घेणे), इंटेलिजन्स (गुप्त माहिती गोळा करणे), दळणवळण यासाठी भारतीय हवाई दलाने अंतराळाला कायमच लाभदायक मानले आहे. आता त्याला डॉक्ट्रीनच्या रूपात अधिकृतता देण्यात आली आहे. याचे कारण यात गेल्या काही काळात जगभर झालेली प्रगती. अर्थात भारताने आणि भारतीय हवाई दलाने ही निकड पूर्वीच ओळखली असल्याने त्या दृष्टीने पुढील वाटचालीस हे डॉक्ट्रीन दृष्टी आणि दिशा देईल.”
 

'doctrine' 
 
गोखले म्हणाले, त्यातील लक्षवेधी भाग म्हणजे चीन, पाकिस्तान यासारखी राष्ट्रे सीमेवर असताना भारतीय हवाई दलाने केवळ सज्ज नव्हे, तर भविष्यवेधी असायला हवे आणि त्या दृष्टीने हे डॉक्ट्रीन दिशादर्शक म्हणून काम करेल. ही दोन्ही राष्ट्रे भारताची कुरापत काढण्याची एकही संधी सोडत नाहीत. हे युद्ध नसते, पण शांततादेखील नसते. तेव्हा अशा स्थितीसाठी भारतीय हवाई दलाने कशा पद्धतीने सिद्ध असावयास हवे, यावर हा दस्तऐवज मार्गदर्शक ठरतो. किंबहुना अगोदरच्या डॉक्ट्रीनमध्ये ’शत्रुराष्ट्रांकडून धोके लक्षात घेऊन’ केलेली मांडणी होती, तीत सुधारित दस्तऐवजात बदल करण्यात आला असून आता ‘क्षमतांची निकड’ हा केंद्रबिंदू धरून मांडणी करण्यात आली आहे. शिवाय हा दस्तऐवज जरी हवाई दलाचा असला, तरी यापुढील युद्ध अथवा युद्धजन्य स्थितीत तिन्ही सशस्त्र दलांच्या संयुक्त व्यूहनीतीवर (जॉइंटनेसवर) भर देण्यात आला आहे. अर्थात गोखले यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे ’सामायिकपणा हा केवळ युद्ध कारवाईच्या दृष्टीने अभिप्रेत नाही, तर नोकरशाहीतील समन्वय, मुत्सद्देगिरी यांनाही अंतर्भूत करतो. यात कारवाईचा अंतिम परिणाम महत्त्वाचा गृहीत धरला पाहिजे.’ हे खरे यासाठी की भारत आणि चीन यांच्यामधील संरक्षणावरील अर्थसंकल्पीय तरतुदीपासून लढाऊ विमानांच्या ताफ्यापर्यंत तफावत प्रचंड आहे. मात्र डॉक्ट्रीन त्या संख्येवर (इन्व्हेंटरीवर) भर देत नाही. डॉक्ट्रीनचा भर आहे तो भारतीय हवाई दलाची क्षमता अद्ययावत करण्यावर आणि भविष्यातील कोणत्याही आक्रमणाला तोंड देण्यास सज्ज आणि सिद्ध राहण्यावर. आपण आता केवळ देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी बचावात्मक संरक्षणापुरते (डिफेन्स) मर्यादित राहिलेले नसून प्रसंगी चढाईयुक्त संरक्षणाकडे (ऑफेन्सिव्ह डिफेन्सकडे) वळलो आहोत, याचा भारताने बालाकोटसारख्या कारवाईने प्रत्यय आणून दिला आहे. मात्र हे साधायचे, तर शत्रूच्या ठिकाणांची, हालचालींची नेमकी माहिती आणि तीही कमीत कमी वेळात मिळणे अत्यावश्यक असते. कारवाई करायची, तर त्यातील अचूकतेसाठी जेथे हल्ला करायचा, तेथील चित्रे तातडीने मिळणे आवशयक असते. हे सगळे आधुनिक तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. तथापि त्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता सुधारित डॉक्ट्रीनमध्ये केंद्रस्थानी आला आहे. लढाऊ विमानांच्या स्क्वाड्रनची कमतरता आहे याची तक्रार होत असते आणि ती अयोग्य नाही. किंबहुना क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यासारखी आयुधे वापरून आता दूरवर हल्ले करता येतात. आपल्या बाजूची जीवितहानी कमीत कमी होईल, ही त्यातील जमेची बाजू. तेव्हा त्या दृष्टीने संशोधन आणि विकास गरजेचा. मात्र म्हणून लढाऊ विमानांची गरज संपुष्टात येईल अथवा ती घटेल असे मात्र सांगता येत नाही, एरव्ही अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रांनी नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित लढाऊ विमाने विकसित केली नसती” असे सांगून गोखले यांनी अखेरीस प्रत्येक तंत्रज्ञानाची सामर्थ्यस्थळे असतात, तद्वत मर्यादाही असतात हे स्पष्ट केले. शिवाय आपल्या सिद्धतेसाठी या सर्वांचीच गरज आहे, याचे कारण अशी सिद्धता युद्धात उपयोगी येते, त्यापेक्षाही शांतता राखण्यासाठी अधिक प्रभावी ठरत असते. गोखले यांनी यावर मत व्यक्त केले की, ‘’आण्विक शस्त्र ही मारा करण्याची शस्त्रे नसून प्रतिबंधक शस्त्रास्त्रे आहेत. याचा अर्थ कोणी आक्रमण करायचा विचारच करू नये, म्हणून या सिद्धतेची आवश्यकता असते.” हेच प्रत्येक सशस्त्र दलाच्या सिद्धतेलाही लागू आहे, यात शंका नाही. आणि म्हणूनच हे सुधारित डॉक्ट्रीन अगदी योग्य वेळी आले आहे, असेच म्हटले पाहिजे.
 
 
 
या डॉक्ट्रीनच्या प्रस्तावनेत भारतीय हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी म्हटले आहे, ’‘गेल्या काही वर्षांत हवाई क्षेत्र आणि अंतराळ (सेप्स) यांना नियंत्रित करण्यास सक्षम असलेल्या आधुनिक एरोस्पेस शक्तीत भारतीय हवाई दलाचे रूपांतर झाले आहे. सतत बदलणार्‍या भौगोलिक-सामरिक परिस्थितीत कार्य करणे हे भारतीय हवाई दलाने समर्पणाने आणि व्यावसायिक निष्ठेने केले आहे. युद्धातील अनुभव, मित्रराष्ट्रांबरोबर आणि देशांतर्गत केलेले युद्धाभ्यास, या सगळ्यामुळे आपल्या संकल्पना विकसित झाल्या आहेत आणि डॉक्ट्रीनमध्ये त्यांचा अंतर्भाव करून एक भविष्यवेधी मार्गदर्शक दस्तऐवज तयार करणे आवश्यक. हा दस्तऐवज एरोस्पेस सामर्थ्यावर भर देतोच, याचे कारण यांतून येणारी गतिशीलता, प्रतिसादनिकड, लवचीकता, ट्रान्स-डोमेन ऑपरेशनल क्षमता हे भारतीय हवाई दलाला अनोखी शक्ती प्रदान करीत असतात.” एअर कोमोडोर जसजित सिंग यांनी सुमारे दोन दशकांपूर्वी हवाई क्षेत्र आणि अवकाश यांतील धूसर सीमारेषेकडे लक्ष वेधले होते आणि “भविष्यातील लष्करी कारवायांमध्ये या एका अर्थाने सलगतेचा लाभ राष्ट्रीय सुरक्षितेसाठी घेतला जाईल” असे भाकीत केले होते. प्रस्तुत डॉक्ट्रीन त्या भाकिताचे तपशीलवार स्वरूप आहे, असेच म्हटले पाहिजे. केवळ युद्ध अथवा युद्धजन्य परिस्थितीच नव्हे, तर अगदी हवामान अंदाजापासून अन्य अनेक बाबींसाठी या एरोस्पेस शक्तीचा उपयोग फलद्रूप ठरत आहेच. तेव्हा भविष्यात लष्करी कारवाईसाठीदेखील त्याचा वाढता उपयोग होणार आहे, हेच हे डॉक्ट्रीन अधोरेखित करते. गोखले म्हणतात त्याप्रमाणे ’हद्दीच्या (बॉर्डर्स)च्या पलीकडे भारतीय हवाई दलाच्या सीमा (फ्राँटियर्स) आहेत. 1932 साली भारतीय हवाई दलाची स्थापना झाली, तेव्हापासून हवाई दलाने प्रत्येक आपत्तीत देशाच्या संरक्षणात आपले अमोल योगदान दिले आहे. म्यानमारमधील नागा बंडखोरांवरील कारवाईपासून सर्जिकल स्ट्राइकपर्यंत हवाई दलाने आपली क्षमता सिद्ध केली आहे. यापुढेही भारतीय हवाई दल देशाच्या सेवेसाठी सज्ज आहे, हा विश्वास हे डॉक्ट्रीन देईल. अत्यंत निगुतीने, विचारपूर्वक तयार केलेले हे नव्वद पानी डॉक्ट्रीन म्हणजे भारतीय हवाई दलाच्या समग्र भविष्यवेधी सिद्धतेविषयी आश्वासकता निर्माण करणारा दस्तऐवज आहे, याची खात्री पटल्याखेरीज राहणार नाही.

राहुल गोखले

विविध मराठी / इंग्लिश वृत्तपत्रांतून राजकीय, सामाजिक व आंतरराष्ट्रीय विषयांवर नियमित स्तंभलेखन
दैनिक / साप्ताहिक / मासिकांतून इंग्लिश पुस्तक परिचय सातत्याने प्रसिद्ध
'विज्ञानातील सरस आणि सुरस' पुस्तकाला राज्य सरकारचा र.धों. कर्वे पुरस्कार