आरोग्य शिक्षकांचं

विवेक मराठी    13-Mar-2023   
Total Views |
  
of health teachers
उद्याच्या राष्ट्राचे आधारस्तंभ असलेले आजचे विद्यार्थी शिक्षकांच्या हातात असतात. विद्यार्थ्यांना आकार देण्याचं, त्यांच्यावर संस्कार करण्याचं, त्यांची वृत्ती घडवण्याचं खूप महत्त्वाचं काम शिक्षक करत असतात. विद्यार्थिरूपी पोहर्‍यात उत्तम गुण येण्यासाठी शिक्षकरूपी आड अशा गुणांनी समृद्ध असायला हवा. स्वत:चं हे महत्त्व आणि जबाबदारी ओळखून शिक्षकांनी आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखायला हवं.
 
परवा एका शाळेतील मुलांच्या वैद्यकीय तपासणीसाठी गेले होते. मुलांची तपासणी झाल्यावर मुख्याध्यापकांशी आणि अन्य शिक्षकांशी गप्पा झाल्या. मी मुद्दामच प्रश्न केला, “इथल्या शिक्षकांच्या आरोग्याची स्थिती कशी आहे?” माझ्या दृष्टीने शिक्षकांनी शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या सुदृढ असणं अत्यंत आवश्यक आहे. तरच ते उत्साही, प्रसन्न, आनंदी, हसतमुख, अविश्रांत मेहनत करू शकणारे असतात. ऊर्जेचा धबधबा असणार्‍या शेकडो मुलांशी सुसंवाद साधून, त्यांना आवडेल असं व्यक्तिमत्त्व बनवण्यासाठी हे गुण अत्यावश्यक आहेत. मरगळलेल्या, आजारी, अनुत्साही, निस्तेज शिक्षकांकडून मुलं काय शिकणार? शिक्षकांच्या आरोग्याची निकड मला जाणवते ती भावी पिढीसाठी. मी प्रश्न विचारताच मुख्याध्यापक तक्रारींचा पाढा वाचायला लागले. “काय सांगू डॉक्टर तुम्हाला? आमच्या शाळेतले शिक्षक इतके आजारी पडतात ना.. अहो, आधीच शाळेत शिक्षकांची संख्या कमी. त्यात कुणी आलं नाही की वर्गावर पाठवायचं कुणाला? आणि कुणी गेलं नाही की लगेच पालकांचा आरडाओरडा सुरू होतो. मी हैराण झालोय बघा.”
 
 
आज बहुतेक शाळांमध्ये हीच स्थिती आहे. वारंवार होणार्‍या आजारांमुळे शिक्षक निस्तेज, अशक्त होतात. मग बसून शिकवणं, थोडाच वेळ शिकवणं, नुसतं वाचून दाखवणं, वर्गातल्याच कुणा मुलाला प्रश्नोत्तरं सांगायला लावून मुलांना ती उतरवून घ्यायला सांगणं.. असे उपाय ते करू लागतात. पण यामुळे मुलांचे ते ‘आवडते शिक्षक’ बनू शकत नाहीत. मुलांवर त्यांचा वचकही राहत नाही. शिकवण्यातला ताजेपणा आणि प्रसन्नता नष्ट होते. मग मुलंही ते शांतपणे ऐकत नाहीत. त्यातून शिक्षकांचा शिकवण्यातला उत्साह मावळतो. हे सगळं शिक्षण पद्धतीला घातक आहे.
 
 
of health teachers
 
आम्ही शाळेत होतो, तेव्हा शिक्षकांचं मुलांकडे खूप लक्ष असायचं. केवळ आपला विषय शिकवून झाला की आपलं काम झालं, अशी कोती वृत्ती नव्हती. मला आठवतं, सातवीत मला गणिताला मुळे सर होते. माझ्या सहावीतल्या भावाला ते रसायनशास्त्र शिकवायचे. त्या वेळी रसायनशास्त्र हा विषय सहावीत नव्याने सुरू होत होता. मला सहावीत ते आवडलं नव्हतं, म्हणून “हे कठीण आहे. याला गाइडची गरज आहे” असं मी जाहीर केलं. सहसा आम्ही अशा मागण्या करत नव्हतो. त्यामुळे कधीतरी केलेली ती मागणी मान्य झाली आणि आम्हाला दोघांनाही रसायनशास्त्राचं गाइड घेण्यात आलं. भावाने ते दुसर्‍या दिवशी लगेच शाळेत नेलं. मुळे सरांच्या तासाला तो ते उघडून बसला. पूर्वी गाइड हा पदार्थ विद्यार्थ्यांसाठी दुर्लभ होता. साहजिकच तो मुलांच्या आकर्षणाचा विषय झाला. मुलांचं शिकण्यात लक्ष नाही, हे सरांच्या लगेच ध्यानात आलं. त्यांनी बघितलं तर भावाकडे गाइड मिळालं. “ताई म्हणाली, रसायनशास्त्र अवघड आहे म्हणून घेतलं” असं सांगून बंधुराजांनी मला त्या प्रकरणात ओढलं. सरांनी मला वर्गातून बोलावून घेतलं. म्हणाले, “आज मी याचं गाइड काढून घेतोय. उद्या तुझं आणून द्यायचं. आणि रसायनशास्त्रातलं कधीही काहीही अडलं तरी दोघांनी माझ्याकडे यायचं. मी शिकवेन.” त्यांचा तो आत्मविश्वास, उत्साह मला अजून आठवतो, डोळे पाणावतात आणि ऊर अभिमानाने भरून येतो. पुढे आयुष्यात कधी गाइड वापरायचा विचारही आमच्या मनाला शिवला नाही. त्यामुळे बुद्धी ऐतखाऊ न राहता स्वत:च्या पायावर चालत राहिली. याचं सारं श्रेय मुळे सरांना. असे शिक्षक आज दुर्मीळ झालेत. ‘कधीही या, मी शिकवेन’ असं म्हणणारेच हाडाचे शिक्षक. (आज कुणी शिक्षकांनी गाइड जप्त केलं, तर काय होईल?)
 

of health teachers 
 
 
शिक्षकांचं आरोग्य किती महत्त्वाचं आहे, याचं भान खुद्द शिक्षकांनाच नाही. नसलेलं आरोग्य कमावण्यासाठी आणि असलेलं जपण्यासाठी ते काय करतात? खाजगी शाळांमधल्या शिक्षकांना तर त्यांच्या तुटपुंज्या पगारांमुळे आर्थिक समस्या भेडसावत असतात. त्यावर मात करण्यासाठी ते शालाबाह्य शिकवण्या घेतात आणि त्यात अतिशय दमतात. व्यायाम, पुरेशी झोप, मानसिक शांतता, वेळेवर जेवण यांच्या अभावात त्यांचं स्वास्थ्य हातातून निसटून जातं. त्यात अतिप्रमाणात बोलण्याचा ताण पडून बळ कमी होतं. आपल्याला माहीत नसतं, पण माणसाला बोलायला खूप शक्ती लागते. ‘तोंडाची वाफ दवडणं’ हा वाक्प्रचार उगीच नाही रूढ झाला! त्या वाफेत जी शक्ती असते, तेवढी बोलायला खर्ची पडते. म्हणून आपले पूर्वीचे शिक्षक अधूनमधून मौन पाळायचे. आज केवळ शिक्षकच नाही, तर आपण सगळेच निसर्गाने दिलेलं हे शरीर अक्षरश: ताबडवतो. सावरकरांना ज्या क्रूरपणे इंग्रजांनी कोलूला जुंपलं होतं, त्याच क्रूरपणे आपण स्वत:ला पैसे कमवायच्या कामाला जुंपतो, कुठलीही दया-माया न दाखवता. वीस-तीस हजारांचं यंत्र बिघडू नये, म्हणून आपण त्याचं सर्व्हिसिंग करतो, जपून वापरतो. पण अनमोल अशा या नरदेहाविषयी मात्र आपण अतिशय गलथानपणा दाखवतो. शिक्षकसुद्धा याला अपवाद नाहीत.
 
 

of health teachers
 
सामान्यत: शिक्षकांना होणारे व्यवसायजन्य आजार ठरावीक असतात. एकतर खडूची पूड (आता काही ठिकाणी हिचं उच्चाटन झालं आहे.) त्यांना बाधते. त्यामुळे सर्दी, दमा, घसादुखी, स्वरभेद, सायनसायटिस असे कफाचे आजार होतात. कितीही उपचार केले तरी ‘खडूची पूड’ हे कारण जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत हे आजार बरे होत नाहीत. त्यासाठी सोपा उपाय म्हणजे शिकवायला उभं राहण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यांत खोबरेल किंवा तिळाच्या तेलाचं बोट फिरवावं. याने खडूची पूड नाकात गेली, तरी श्वसनसंस्थेत न जाता तेलाला चिकटून राहते. थोड्या वेळाने नाक शिंकरलं की सहज बाहेर पडते. याशिवाय कपालभातीचा नियमित अभ्याससुद्धा कफाच्या आजारांपासून सुटका करून देणारा ठरतो. मात्र आपल्या वैद्यांकडून आपल्या प्रकृतीनुसार कपालभातीचं प्रमाण ठरवून घ्यावं, हे उत्तम. त्याचा अतिरेक घातक ठरू शकतो.
 
 
 
बोलून बोलून शिक्षकांच्या स्वरयंत्रावर खूप ताण पडतो. त्यामुळे घसादुखी, आवाज बसणं, आवाज चिरका होणं, मोठ्या आवाजात बोलता न येणं, बोलताना दम लागणं, कोरडा खोकला अशा तक्रारी उद्भवतात. अशा वेळी ‘ज्येष्ठमध’ हे त्यांचं श्रेष्ठ औषधज. ज्येष्ठमधाच्या काढ्याच्या गुळण्या, अधूनमधून ज्येष्ठमध घन चोखणं हे उपाय चोख काम करतात. खूप शिक्षकांना बोलण्यापूर्वी किंवा बोलताना पाणी प्यायची सवय असते. आयुर्वेदशास्त्रात हे निषिद्ध सांगितलं आहे. बोलण्यापूर्वी (गाण्यापूर्वी, भाषण करण्यापूर्वीसुद्धा) किमान अर्धा तास आणि बोलताना कुठलाही द्रव पदार्थ पिऊ नये, अन्यथा घशाचे आजार होतात, असं शास्त्र सांगतं. घशाला खूपच कोरड पडत असेल तर गरम पाणी प्यावं, तेही अगदी घोटभर.
 
 बोलण्यापूर्वी (गाण्यापूर्वी, भाषण करण्यापूर्वीसुद्धा) किमान अर्धा तास आणि बोलताना कुठलाही द्रव पदार्थ पिऊ नये, अन्यथा घशाचे आजार होतात, असं शास्त्र सांगतं. घशाला खूपच कोरड पडत असेल तर गरम पाणी प्यावं, तेही अगदी घोटभर.
 ज्यांना सतत कफ होतो, अशा शिक्षकांसाठी आवाजाला हितकर असा एक महत्त्वाचा उपाय म्हणजे विडा. नागवेलीचं पान, कात, चुना, लवंग, कंकोळ, किंचित सुपारी, कापूर, वेलदोडा आणि गोड चव हवी असल्यास काळ्या मनुका असा विडा आवाजाला अत्यंत उत्तम. मात्र यात तंबाखू, गुलकंद, टूटीफ्रूटी, सुगंधी सुपारी असे घटक चुकूनही नसावेत. याशिवाय दिवसातून काही वेळ मौन पाळणं खूप गरजेचं आहे. बोलणं हे आपल्या शरीरातल्या उदान वायूचं काम आहे. या उदानालाच शास्त्रात ‘बल’ असंही म्हटलं आहे. तेव्हा या बलाचं रक्षण करायचं असेल, तर मौनाला पर्याय नाही.
 
 
शिक्षकांना खूप वेळ उभं राहून शिकवावं लागतं, ही आणखी एक समस्या. यामुळे त्यांना व्हेरिकोज व्हेन्स होऊ शकतात. यात पायावरील शिरांमध्ये रक्त साठून त्यात गाठी तयार होतात. हा आजार खूप वेदना देणारा असतो. हे टाळण्यासाठी उत्थितद्विपादासन, विपरीतकरणी, सर्वांगासन यांचा नियमित अभ्यास फायदेशीर ठरतो. पायांना तेल लावून शेक घेणं, रात्री झोपताना पायाखाली उशी घेणं या उपायांनी पायातील रक्त हृदयाकडे यायला मदत होते.
 
 
वजन जास्त असेल, तर जास्त वेळ उभं राहिल्याने गुडघ्यावर भार येऊन गुडघेदुखी सुरू होते. मालिश, शेक आणि वजन कमी करणारे बस्ती यावर उपयुक्त ठरू शकतात.
 
 
मान उंच करून फळ्यावर लिहून, खाली मान घालून खर्डेघाशी करून, पेपर तपासून यांना मान, खांदे आणि हात यांचीही दुखणी मागे लागू शकतात. मालिश आणि शेक याव्यतिरिक्त याला योग्य व्यायामाचीसुद्धा गरज असते. मानेचे, खांद्याचे, हाताच्या सर्व सांध्यांचे व्यायाम नियमित केले, तर पेशी लवचीक व कार्यक्षम राहिल्याने वेदना कमी होण्यास मदत होते. अशा सर्व आजारांवर आयुर्वेदात उत्तमोत्तम उपचार उपलब्ध आहेत. त्यासाठी आपल्या वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा.
 
 
 
सरकारी यंत्रणेत अन्य वाट्टेल त्या कामांचा ताण, तर खाजगी व्यवस्थेत अपुरी कमाई, यामुळे सर्व शिक्षक प्रचंड मानसिक तणावाखाली जगत असतात. मनाची आनंदी आणि प्रसन्न अवस्था प्राप्त करण्यासाठी शिक्षकांनी नियमित योगसाधना केली पाहिजे. खरं तर शाळेतील सुरुवातीचा एक तास योगसाधनेला दिला, तर ते शिक्षक आणि विद्यार्थी दोघांसाठी हितकर ठरेल.
शिक्षक ही कुणी साधारण व्यक्ती नसते. उद्याच्या राष्ट्राचे आधारस्तंभ असलेले आजचे विद्यार्थी त्यांच्या हातात असतात. त्यांना आकार देण्याचं, त्यांच्यावर संस्कार करण्याचं, त्यांची वृत्ती घडवण्याचं खूप महत्त्वाचं काम शिक्षक करत असतात. विद्यार्थिरूपी पोहर्‍यात उत्तम गुण येण्यासाठी शिक्षकरूपी आड अशा गुणांनी समृद्ध असायला हवा. स्वत:चं हे महत्त्व आणि जबाबदारी ओळखून शिक्षकांनी आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखायला हवं. आयुर्वेदातील दिनचर्या, ऋतुचर्या, आहार, योग यांचे नियम त्यांनी जाणून घेऊन आचरणात आणायला हवेत. (ते जाणून घेण्यासाठी शिक्षक दिनासारख्या निमित्ताने वैद्यांचं व्याख्यान आयोजित करावं.) तर आपल्या विद्यार्थ्यांना ते चार चांगल्या गोष्टी सांगू शकतील.
 
 
जागेगा शिक्षक, तो बढेगा भारत!