आंतरराष्ट्रीय धोरणांचा लेखाजोखा

विवेक मराठी    29-Mar-2023   
Total Views |
 
bjp
मोदीजींच्या धोरणांची चर्चा आणि विवेचन वाचून, वाचकांना जटिल आणि अनिश्चित जगाची तर माहिती होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रख्यात नेतृत्वाखाली, कार्यप्रणाली आणि सर्वसमावेशक लोकशाहीच्या माध्यमातून भारत कसा मार्गक्रमण करत आहे, हेसुद्धा विस्ताराने आणि सैद्धान्तिक पातळीवर समजते. ह्या सैद्धान्तिक विवेचनासाठी आणि व्यावहारिक पातळीवर जगाच्या व्यासपीठावर केलेल्या उपाययोजना समजण्यासाठी हे पुस्तक वाचलेच पाहिजे असे आहे. मोदीजींची दूरदृष्टी आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपक्रमांचा परिणाम म्हणून भारताचा विस्तारलेला प्रोफाइल समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचे योगदान आहे.
 
Modi Shaping A Global Order In Flux

• प्रस्तावना - परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

• संपादक - सुजय चिनॉय, विजय चौथाईवाले, उत्तम कुमार सिन्हा

• प्रकाशक - विस्डम ट्री
 
• पृष्ठसंख्या - • मूल्य - रु. 995/-
 
"Modi Shaping A Global Order in Flux' हे Wisdom Tree प्रकाशनाने नुकतेच प्रकाशित केलेले पुस्तक. देशांच्या परस्पर संबंधात अनिश्चिती असलेल्या जगात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे राज्यकर्तृत्व, धोरणात्मक नियोजन आणि प्रबळ इच्छाशक्तीसह अंमलबजावणी या सर्व पैलूंवर हे पुस्तक सर्वसमावेशक भाष्य करते. मागच्या 9 वर्षांच्या कालावधीत पंतप्रधान मोदींनी अमलात आणलेल्या रणनीतींमुळे भारताला एक नवीन, उदयोन्मुख जागतिक व्यवस्था म्हणून आकार येण्यास आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला उच्च स्थानावर पोहोचण्यासाठी सक्षम केले आहे. निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान भूषविणार्‍या वेगवेगळ्या प्रस्थापित विचारवंतांनी लिहिलेले आणि सुजन चिनॉय, विजय चौथाईवाले आणि उत्तम कुमार सिन्हा यांनी संपादित केलेले हे पुस्तक पाच विभागांमध्ये मोदीजींच्या अशा अनेक धोरणांचा अभ्यास करते, त्यातील आव्हानांवर चर्चा करते. मा. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ह्यांची प्रस्तावना पुस्तकाला लाभली आहे. भू-राजकीय अनिश्चितता, सामायिक भागीदारी, आर्थिक घसरण, आव्हाने आणि पुरवठा साखळी समस्या, सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण आणि भारताचे तंत्रज्ञान स्टॅक आणि सॉफ्ट पॉवर याच्या पार्श्वभूमीवर हे लेखक भारताच्या परराष्ट्र धोरणांचे विहंगम दृश्य रेखाटतात. त्यासाठी हे पुस्तक विशेष उल्लेखनीय आहे.
 
 
 
आर्थिक मंदी, सार्वजनिक आरोग्य समस्या, हवामान बदल आणि भू-राजकीय दबाव यांसारख्या विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी मा. नरेंद्र मोदी यांच्या दुसर्‍या कारकिर्दीवर या पुस्तकात प्रामुख्याने चर्चा करण्यात आली आहे. क्षेत्रातील तज्ज्ञांच्या योगदानाद्वारे, वाढत्या गुंतागुंतीच्या जागतिक पटलावर हे पुस्तक भारताच्या क्षमतेचे आणि राजकीय इच्छाशक्तीचे परीक्षण करते. विविध क्षेत्रांतील धोरणकर्ते, शैक्षणिक आणि आंतरराष्ट्रीय संबंध, व्यापार आणि अर्थशास्त्राचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक एक महत्त्वाचे साधन आहे. सामान्यांना लहान वाटणार्‍या अनेक कृती एका मोठ्या सैद्धान्तिक विचाराने पार पाडल्या जात आहेत, हे पुस्तक वाचल्यावर समजते आणि जाणिवांची कक्षा अधिकच रुंदावते. त्यामुळे सामान्य वाचकांना, मतदारांना आणि विरोधकांनाही ‘विचार’ समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
 
 
 
सर्व लेखक, सुजन चिनॉय, विजय चौथाईवाले आणि उत्तम कुमार सिन्हा हे सर्व आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी ह्या पुस्तकाद्वारे त्यांचे विशिष्ट दृष्टीकोन समाजामध्ये चर्चेत आणले आहेत. सुजन चिनॉय हे MP-IDSA,, नवी दिल्लीचे महासंचालक आहेत. विजय चौथाईवाले हे 2014पासून भारतीय जनता पार्टीच्या (BJPच्या) परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रभारी आहेत. तर उत्तम कुमार सिन्हा MP-IDSA, नवी दिल्ली येथे वरिष्ठ फेलो आणि स्ट्रॅटेजिक अ‍ॅनालिसिसचे व्यवस्थापकीय संपादक आहेत.
 
 
भारत वेळोवेळी ठाम भूमिका घेऊ शकतो आणि पंतप्रधान मोदींच्या धोरणात्मक निर्णयांमुळे, भारताची प्रतिमा भ्रष्ट, कमकुवत राष्ट्रापासून रशिया-युक्रेन युद्ध किंवा देशांतर्गत लसीकरण तसेच लसीकरण मुत्सद्देगिरी यासारख्या जटिल आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर ठोस निर्णय घेणारे राष्ट्र अशी जगभरात बदलली आहे, हे आपल्याला ह्या पुस्तकातून खात्रीलायकरित्या समजते.
 
 
मोदींचा पहिला कार्यकाल म्हणजे देशांतर्गत प्रगतीचे संपूर्ण परिवर्तन! दुसर्‍या कार्यकालासाठी यापूर्वी कधीही न मिळालेला जनादेश असलेला विजय ही पक्षासाठी मोठी उपलब्धी होती. निवडणुकीतील ऐतिहासिक मताधिक्याने मोदीजींची लोकप्रियता दाखवून दिली, एवढेच नाही, तर विकासाच्या आणि सुशासनाच्या धोरणांना जनतेने कौल दिला. कोविड-19 साथीच्या महामारीमुळे त्यांच्या दुसर्‍या कार्यकालाची अक्षरश: परीक्षा बघितली गेली. सरकारला आरोग्य सेवा आणि अन्न पुरवण्याच्या आव्हानांचा सामना करावा लागला. त्यांचा दुसरा कार्यकाल हा भारताच्या हिताशी तडजोड न करता एकमेकांत गुंतलेल्या अनेक आव्हानांचे बारकाईने निरीक्षण करणे, पुनर्मूल्यांकन करणे आणि त्यांच्याशी जुळवून घेणे आणि भारताच्या आर्थिक, औद्योगिक आणि आरोग्य सेवेच्या अधिक चांगल्या स्थिती निर्माण करणे ह्याचा परिपाठ आहे. आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे आणि आज पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आघाडीवर आहे, ही अत्यंत आशादायक स्थिती आहे.
 
अनिश्चित धोरणात्मक दृश्य
 
पुस्तकातील ह्या भागातील सुजन चिनॉय पहिल्या प्रकरणात चतुर्भुज सुरक्षा संवाद (क्वाड) आणि इंडो पॅसिफिक संकल्पनांचे वर्णन करतात. भारताला आफ्रिका आणि आसियान या दोन्ही देशांच्या जवळ आणण्यासाठी ‘सर्वांसाठी सुरक्षा आणि वाढ (SAGAR)’ आणि ‘मौसम’ यासारख्या मोदींनी सुरू केलेल्या या प्रदेशातील उपक्रमांवर लेखक प्रकाश टाकतात. ‘इंडो पॅसिफिक’ हे सध्याच्या वास्तवात अधिक सर्वसमावेशक आणि अधिक प्रातिनिधिक आहे. ह्या उपक्रमामुळे अशा प्रकारे एकत्र येऊन क्वाडने इंडो पॅसिफिकमध्ये चीनची मक्तेदारी काढून टाकली आहे. यामुळे भारताच्या भूमिकेला केवळ एक प्रेक्षक म्हणून नव्हे, तर सक्रिय खेळाडू म्हणून अधिक महत्त्व प्राप्त झाले. चिनॉय हिंद महासागरात चीनच्या शक्ती प्रक्षेपण क्षमतेचे निरीक्षण करतात. ‘मेड इन चायना 2025’ चीनला आर्थिक आणि लष्करी शक्ती बनवते. त्याला तोंड देण्यासाठी पश्चिम सीमेवर चीनच्या लष्करी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर भारतानेही विचारपूर्वक नियोजन केलेले धोरण अवलंबावे लागणार आहे. त्यासाठी भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांसह मोदींचे ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरण हे चीनला संतुलित ठेवण्यात महत्त्वाचे प्रादेशिक साधन आहे. शेजारील देशांमधील आर्थिक मंदीसह नैसर्गिक आपत्तींना भारताने सर्वप्रथम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे चीनच्या विपरीत विश्वासार्ह नेतृत्व म्हणून भारत नक्कीच दावा ठेवू शकतो. अशा धोरणात्मक निर्णयांमागील दूरदृष्टी आणि त्याचे सकारात्मक परिणाम ह्यावर हे पुस्तक भाष्य करते.
 
 
अनिश्चित धोरणात्मक दृश्य
 
ह्या विभागात लेखक हर्ष पंत आणि चिरायू ठक्कर हेदेखील अफगाणिस्तानमधील सुरक्षाविषयक चिंतेबद्दल लिहितात. अफगाणिस्तानात तालिबानच्या नेतृत्वाखालील सरकार हा महत्त्वाचा आणखी एक मुद्दा आहे. त्यासाठी मूक निरीक्षक न राहता या प्रदेशातील धोरणात्मक स्थैर्य राखले जाणे महत्त्वाचे आहे. भारताने अफगाणिस्तानच्या शेजार्‍यांना त्या देशाला दहशतवादविरोधी मदत देण्यास उद्युक्त करण्याचे प्रयत्न केले. तसेच भारताने द्विपक्षीय पातळीवरही प्रयत्न केले आहेत. लेखक असा मुद्दा मांडतात की पाकिस्तानचा प्रतिकार करणे आणि भारतकेंद्रित दहशतवाद रोखणे या दोन मुख्य समस्या साध्य करण्यासाठी भारताला एकट्याने काम करावे लागेल. असे करताना पाच मध्य आशियाई प्रजासत्ताक देश भारताने विचारात घेतले पाहिजेत आणि दुसरीकडे लेखक सद्भावना आणि सॉफ्ट पॉवर यांचे महत्त्व अधोरेखित करतात, विशेषत: भारताने अफगाणिस्तानला 200 कोटींची मदत करणे हे ह्याचसाठी महत्त्वाचे ठरते. संरक्षण उत्पादनात स्वावलंबी होण्याचे मोदीजींचे स्पष्ट आवाहन, मोठ्या शस्त्रास्त्रांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हे एका रात्रीचे काम असू शकत नाही, असे लेखक म्हणतात. परंतु मोदीजींच्या दूरदृष्टीचे महत्त्व ह्याद्वारे अधोरेखित होते.
 
 
सामायिक भागीदारीचे युग
 
 
मोदीजी भारताच्या तत्त्वज्ञानावर ज्या पद्धतीने भर देतात, त्यावर लेखक ‘सामायिक भागीदारीचे युग’ या अध्यायात भाष्य करतात. भारताची धोरणात्मक आणि सामायिक भागीदारी ज्यावर आधारित आहे, असे तत्त्व म्हणजे ‘वसुधैव कुटुंबकम्.’ शीतयुद्धाच्या काळात सामायिक शत्रूविरुद्ध मित्रत्वाची वचनबद्धता असलेल्या युती होत असत. मात्र आता अशा प्रणालीच्या विरुद्ध, राज्ये परस्पर फायद्यांसाठी पूरक क्षमता शोधण्यासाठी वेगवेगळ्या भागीदार्‍यांना प्राधान्य देत आहेत. एकापेक्षा जास्त हातमिळवणीसाठी मोदीजींचे प्रयत्न भारताच्या व्यापक परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टांमधील सातत्य दर्शवते. नेबरहुड फर्स्टचे धोरण असो किंवा भारतातील डायस्पोराचा फायदा उचलणे असो किंवा ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ ह्यासाठी संयुक्त संशोधन आणि विकास आणि संरक्षण उपकरणांचे उत्पादन आणि देखभाल यासाठी अमेरिकी कंपन्यांना बोलावणे असो.. ह्या सर्वातून मोदीजींच्या संकल्पनेची दूरदृष्टी दिसते. या पुस्तकात मोदीजींच्या ज्ञान, कल्पना, नवोपक्रमाची देवाणघेवाण करण्याचे मूल्यही अधोरेखित करण्यात आले आहे. तसेच पुस्तकात भारत-आखाती संबंधांसारख्या शेजारील देशांशी संबंधांच्या काही महत्त्वाच्या पैलूंबद्दल सांगितले आहे. लेखक रशियाबरोबरच्या धोरणात्मक भागीदारीबद्दल आणि डिसेंबर 2021च्या संयुक्त निवेदनातून दिसणार्‍या नवीन आयामांबद्दल लिहितात. बहुध्रुवीय जगाची उभारणी ही दोन्ही देशांची सामायिक धोरणात्मक आकांक्षा आहे आणि पाश्चिमात्य समाजांपासून सावध राहण्याची गरजही लेखक व्यक्त करतात. लेखिका रुचिता बेरी ह्या मोदींच्या परराष्ट्र धोरणाच्या पाच स्तंभांवर आफ्रिकेबरोबरच्या भागीदारीची रचना करतात. प्रतिष्ठा, प्रतिबद्धता, सामायिक समृद्धी, जागतिक सुरक्षा आणि सांस्कृतिक संबंध हे ते पाच आधार आहेत, ज्याद्वारे आफ्रिकेबरोबर भागीदारी होऊ शकते. भारताने 25 आफ्रिकन राज्यांमध्ये वैद्यकीय मदत आणि आरोग्य सुविधा वाढवल्या, हे भारताचे ह्यासाठी असलेल्या वचनबद्धतेचे उदाहरण म्हणून बघता येईल. ही एक भागीदारी आहे, जी सामायिक वसाहतवादाच्या अनुभवांवर आधारित आहे. मात्र ही भागीदारी यशस्वी होण्यासाठी ‘भारताला प्रकल्प वचनबद्धतेने वेळेवर पूर्ण करण्यासाठी काम करावे लागेल’ असा इशाराही लेखिका देतात.
 
 
ग्लोबल इकॉनॉमिक ऑर्डर
 
 
‘ग्लोबल इकॉनॉमिक ऑर्डर’ ह्या प्रकरणात कोविड-19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर जागतिक आर्थिक व्यवस्थेच्या सद्य:स्थितीवर चर्चा केली आहे. कोविडनंतर आर्थिक पुनर्रचना मजबूत दिसत असली, तरी ती असमान दिसत आहे. विकसनशील देशांना अन्न आणि ऊर्जा टंचाईमुळे मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. लेखक भारताची आर्थिक सुधारणा आणि जागतिक उत्पादन केंद्र बनण्याच्या प्रयत्नांचे आपल्या लेखात परीक्षण करतात. मानवी भांडवल मजबूत करणे, डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि हरित पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे यासह आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताने केलेल्या विविध उपाययोजनांवर लेखक चर्चा करतात. आत्मनिर्भर भारताचा मोदीजींचा पाठपुरावा हाच प्रगतिपथावर जाण्याचा मार्ग आहे, असे मत लेखक ठामपणे व्यक्त करतात. शेतीसाठी पुरवठा साखळी सुधारणा, तर्कसंगत कर प्रणाली, स्पष्ट कायदे, सक्षम मानव संसाधन आणि आर्थिक व्यवस्थेचे बळकटीकरण आज भारताला स्वावलंबनाकडे नेत आहे. अकराव्या क्रमांकावरून जगातील मोठ्या वर्धित होणार्‍या अर्थव्यवस्थांमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे.
 
 
याव्यतिरिक्त, ह्या प्रकरणात लेखक आर्थिक वाढीस चालना देण्यासाठी एफडीआयचे आणि व्यापाराचे महत्त्व अधोरेखित करतात आणि भारतासाठी स्पष्ट औद्योगिक धोरण आणि उत्पादन धोरण असण्याची गरज यावर जोरही देतात. शेवटी, निर्यातीला चालना देण्यासाठी भारताच्या देशांतर्गत उत्पादन उद्योगाला चालना देण्याच्या प्रयत्नांची आणि खाजगी उद्योगांची गरज अधोरेखित करतात.
 
 
भारताचे तंत्रज्ञान स्टॅक
 
 
या विभागामध्ये ज्यांना एकत्रितपणे ‘स्टॅक’ म्हणून ओळखले जाते, ज्यांनी देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत योगदान दिले आहे अशा भारताच्या वाढत्या फिनटेक (फायनान्शियल टेक्नॉलॉजीज) उद्योगाची आणि तांत्रिक प्रगतीची चर्चा केली आहे. लक्षणीय वाढ असूनही, बँकिंग सेवांचा लाभ, डेटा सुरक्षा आणि अनुपालन यासह अनेक आव्हाने कायम आहेत. भारताच्या कोविड-19 लसीकरण मोहिमेचे यश आणि सुरक्षित वाहतूक आणि लस शिपमेंटची पडताळणी सुनिश्चित करण्यात तंत्रज्ञानाची भूमिका यावरही लेखात प्रकाश टाकण्यात आला आहे. 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या भारताच्या उद्दिष्टात लेखक माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाच्या ( WTO) महत्त्वावर भर देतात आणि ई-कॉमर्सवरील ICT वाटाघाटींमध्ये भाग घेणार्‍या देशांच्या गटात भारताला सामील होण्याचे आवाहन करतात. शेवटी, या क्षेत्रात चीनच्या स्वत:च्या पुढाकारामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील हाय-टेक उद्योगात सहयोग सुचवतात.
 
 
अपारंपरिक आव्हाने आणि भारताचा प्रतिसाद
 
 
इंटरनॅशनल सोलर अलायन्स अ‍ॅन्ड कोलिशन फॉर डिझास्टर रेझिलिएंट इन्फ्रास्ट्रक्चरसारख्या उपक्रमांसह मोदीजींनी पर्यावरणीय समस्या आणि हवामान बदलासंदर्भात खरे नेतृत्व दाखवले आहे. त्यांनी LiFE (Lifestyle for Environment), P  (प्रो-प्लॅनेट पीपल) यासारखे नवीन मंत्र तयार केले आणि शाश्वत विकास आणि ऊर्जा संक्रमणासाठी योग्य विचार स्थापित होण्यासाठी मोदीजींनी ‘पंचामृत’ मार्गाचे नियोजन केले आहे. भारताची आर्थिक वाढ, कृषी उत्पादन आणि सामाजिक विकासाच्या आकांक्षांना हवामान बदलाशी संबंधित संभाव्य धक्क्यांकडे दुर्लक्ष करणे नक्कीच परवडणारे नाही. त्यामुळे लेखक संजय गुप्ता यांनी सरकारच्या काही कार्यक्रमांची चर्चा करून ते हवामान अनुकूलनात कशी मदत करतात आणि हवामान अनुकूलतेवर अधिक चांगले लक्ष केंद्रित करू शकतात ह्याविषयी लिहिले आहे. धोरणांमध्ये जल प्रशासनाला प्राधान्य देण्याचा मोदींचा प्रयत्न जलस्रोतांचे अधिक शाश्वत आणि न्याय्य व्यवस्थापन करण्याच्या दिशेने सकारात्मक वळण आहे. उत्तम सिन्हा सरकारचा आधुनिकीकरणाचा दृष्टीकोन आणि एक शक्तिशाली सक्षम करणारे नेतृत्व म्हणून गौरव करतात.
 
 
भारताची सॉफ्ट पॉवर
 
 
धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता यांसारखी मूल्ये भारताच्या सांस्कृतिक वारशात रुजलेली आहेत. भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या टूलकिटमध्ये मोदीजींनी या मूल्यांचा योग्य समावेश करून घेतला आहे. मोदीजींचा प्रामाणिक विश्वास आहे की ही सॉफ्ट पॉवर जगामध्ये एका नवीन संवेदनशीलतेला आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला आवश्यक ती उन्नती देईल, ज्याची जगाला आतुरतेने अपेक्षा आहे. या विभागातील तीन लेखक भारताच्या सॉफ्ट पॉवरच्या परिणामकारकतेवर आणि कार्यक्षमतेवर आणि परिणाम करण्याच्या क्षमतेवर चर्चा करतात. अमिश त्रिपाठी सॉफ्ट पॉवरचे मूळ म्हणून देशाच्या संस्कृतीवर भर देतात आणि ती आपल्या हार्ड पॉवरला बळकट करू शकते का? असे विचारतात. संस्कृती, राजकारण आणि धोरणे यांच्यातील ‘प्रभावाचा प्रवाह’ आणि ‘अनेकांपासून ते एका नातेसंबंधाचे’ वर्णन करणारे स्पष्टीकरणही लेखक देतात. आंतरराष्ट्रीय संबंध हे केवळ व्यापार, सुरक्षा, अर्थकारण अशा हार्ड मुद्द्यांवर ठरत नाहीत, तर आरोग्य, नवीन विचार आणि उपक्रम, सामायिक संस्कृतीचे बंध आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अशा अनेक गोष्टींमुळे साध्य होतात. अशा सर्व बिंदूंना जोडून बहुध्रुवीय संबंधांना चालना देणार्‍या भारताच्या पंतप्रधानांमुळे एक नवे जग आकारास येत आहे आणि त्याचबरोबर ह्या नव्या जगात भारताचे स्थान भक्कम होत आहे.
श्याम परांडे आणि विजय चौथाईवाले भारताच्या डायस्पोराबद्दल लिहितात. असा डायस्पोरा यजमान आणि मायदेशातील राजकारण, अर्थशास्त्र आणि संस्कृती यावर प्रभाव टाकतो, त्यामुळे तो एक प्रकारे डायस्पोरा मुत्सद्देगिरीचा सूत्रधार म्हणून काम करतो. केवळ भारताची सॉफ्ट पॉवर म्हणून नव्हे, तर या राष्ट्रांमध्ये व्होट बँक म्हणून भारतीय डायस्पोरा महत्त्वाची भूमिका बजावतात.
 
 
अनुराग सक्सेना स्पष्ट करतात की भारताच्या सांस्कृतिक वारशाने जगभरातील लाखो लोकांना भुरळ घातली आहे. त्याने मार्क ट्वेन, अल्बर्ट आइनस्टाईन इत्यादींना प्रेरणा दिली आहे. सक्सेना यांच्या मतानुसार सांस्कृतिक वारसा हा भौगोलिक प्रदेशात सामूहिक ओळख निर्माण करण्यासाठी एक संदर्भ म्हणून उदयास आला आणि पुढे ते लिहितात, ‘भारताने आग्रह धरण्याची वेळ आली आहे की इतिहास भूगोलाच्या मालकीचा आहे.’ पुस्तकाच्या अखेराकडे जाताना आपल्या सॉफ्ट पॉवरचा यथायोग्य उपयोग करून घेणारे द्रष्टे नेतृत्व मोदीजींच्या रूपाने देशाने बघितले, ह्याचा अभिमान वाटला नाही तरच आश्चर्य!
 
 
मोदीजींच्या धोरणांची चर्चा आणि विवेचन वाचून, वाचकांना जटिल आणि अनिश्चित जगाची तर माहिती होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रख्यात नेतृत्वाखाली, कार्यप्रणाली आणि सर्वसमावेशक लोकशाहीच्या माध्यमातून भारत कसा मार्गक्रमण करत आहे, हेसुद्धा विस्ताराने आणि सैद्धान्तिक पातळीवर समजते. ह्या सैद्धान्तिक विवेचनासाठी आणि व्यावहारिक पातळीवर जगाच्या व्यासपीठावर केलेल्या उपाययोजना समजण्यासाठी हे पुस्तक वाचलेच पाहिजे असे आहे. मोदीजींची दूरदृष्टी आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपक्रमांचा परिणाम म्हणून भारताचा विस्तारलेला प्रोफाइल समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचे योगदान आहे.

विभावरी बिडवे

बी. ए. (मानसशास्त्र), एल एल. बी. पुणे येथे दिवाणी आणि मिळकत हस्तांतर विषयक वकिली सुमंत्र सेंटर ह्या संस्थेची विश्वस्त म्हणून कार्यरत. कोथरूड, पुणे येथील वस्त्यांमध्ये सदर संस्थेतर्फे उपचारात्मक अभ्यासिका चालविल्या जातात. पूर्वी दिव्य मराठी मध्ये थोडे कायदेविषयक व इतर लिखाण. इतरत्र स्फुट लेखन.