संगणकीय व्यावसायिकांचं डोळ्याचं आरोग्य

विवेक मराठी    31-Mar-2023   
Total Views |

vivek
 
 
संगणक क्षेत्रातील लोकांच्या डोळ्यांसंबंधीच्या तक्रारीचं स्वरूप म्हणजे डोळे कोरडे वाटणं, डोळे थकणं, डोळ्यांवर ताण जाणवणं, डोळ्यांची उघडझाप करताना त्रास होणं, डोळे लाल होणं, चश्म्याचा वाढता नंबर, डोकेदुखी, डोळेदुखी, डोळे खाजणं अशा स्वरूपात काहीही असू शकतं. Computer Vision Syndrome असं एक गोंडस नाव याला देऊन आपली सुटका होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला योग्य उपाय शोधायला हवे.
 
 
नुकतेच माझे एक दूरचे नातेवाईक अमेरिकेतून भारतात - बंगळुरूला आले. अमेरिकेपेक्षा भारतात वैद्यकीय सेवा स्वस्तात उपलब्ध होते. माझे हे नातेवाईक संगणक क्षेत्रात काम करत होते आणि त्यांना डोळ्यांच्या काही समस्या होत्या. त्यांचे डोळे त्यांना खूप थकल्यासारखे वाटायचे, कधीकधी डोळे कोरडे पडायचे, दुखायचे, पापण्या उघडू नये असं वाटायचं. त्यांनी बंगळुरूमधल्या नेत्रविशारद डॉक्टरांकडे त्यांची स्वारी वळवली. सर्व स्वस्त, महाग, विविध उपकरणांनी करण्याच्या तपासण्या झाल्या. डॉक्टरांनी सांगितलं, ’‘तसा डोळ्यात काही Problem नाहीये. पण हे तुमच्या व्यवसायामुळं घडत असावं. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही हा व्यवसाय करताय, तोपर्यंत हे असंच चालणार.”
 
 
जिथे अन्य शास्त्रं हात टेकतात, तिथे आयुर्वेदशास्त्र उत्तम मार्गदर्शक ठरतं. मुंबईत येऊन हे माझे नातेवाईक मला भेटले आणि त्यांची बरीचशी कोडी आयुर्वेद शास्त्राच्या मदतीने सोडवता आली.
 
 
मुळात निसर्गाने डोळ्यांची रचना ’दूरच्या’ वस्तू बघण्यासाठी केली आहे. मनुष्य पूर्वी वसाहतीने रहात असला, तरी तो निसर्गाच्या जवळ होता. शेती, शिकार, युद्ध, वसाहतीची राखण, पायी केलेले प्रवास अशा त्याच्या जीवनपद्धतीत लांबवरच्या संकटांची चाहूल घेण्यासाठी ’डोळे’ हेच त्याचं मुख्य साधन होतं. दुरून येणारं जनावर, आकाशात जमलेले ढग, पावसाळ्यात नदीचं वाढणारं पाणी, आकाशात उडणारे नेहमीचे/नवीन पक्षी, प्रवासात दिशा ठरवण्यासाठी बघितले जाणारे आकाशातले तारे.. सगळं डोळ्यांवरच तर अवलंबून होतं आणि तेही ‘दूरवर’ दृष्टी टाकून बघितलं जायचं. हे काम करण्यासाठी निसर्गाने डोळ्यांची रचना केली. पण औद्योगिक प्रगतीमुळे जग अधिकाधिक संकुचित व्हायला लागलं.
 
 
 
14 इंच द 7 इंचाच्या संगणकाच्या पडद्यावर, सतत 8 ते 10 तास नजर हलू न देता काम करणारी संगणकीय पिढी म्हणजे निसर्गनिर्मित डोळ्यांसाठी आव्हानच ठरलं. कुठे आकाश-क्षितिज आणि कुठे हा दीड ते तीन फूट अंतरावरचा छोटा पडदा! इतकं जवळचं काम सतत करण्यासाठी आवश्यक गोष्टी डोळ्यांत मुळात नाहीतच. मग असं काम करताना त्यांच्यावर ताण आला, तर नवल कसलं? म्हणून बघा, आजही आपण कधी घराच्या गच्चीत जाऊन क्षितिजापर्यंत नजर टाकली, तर मन आणि डोळे लगेच शांत होतात.
 
 
डोळ्यांबाबतची आणखी एक वस्तुस्थिती म्हणजे त्यांची रचना त्रिमितीमधील (Three dimentional) वस्तू बघण्यासाठी आणि नैसर्गिक उजेडात (सूर्य किंवा चंद्रप्रकाशात) काम करण्यासाठी केलेली आहे. संगणक क्षेत्र या ही नियमांचं उल्लंघन करतं. इथे संगणकाच्या पडद्यावर केवळ द्विमितीय आकार ( Two dimentional) दिसतात आणि बहुतांश कार्यालयं वातानुकूलनासाठी बंद केलेली असल्यामुळे तिथं नैसर्गिक उजेड पोहोचूच शकत नाही. ही सर्व स्थिती डोळ्यांसाठी आरोग्यदायक, आनंदी निश्चितच नाही.
संगणकाच्या पडद्याची प्रखरता हाही डोळ्यांसाठी घातक असलेलाच घटक आहे. अर्थात त्यावर एखादी गुलाबी काच लावून या घटकाची तीव्रता कमी करता येते.
  
vivek 

डोळ्यांवर परिणाम करणारी आणखी महत्त्वाची गोष्ट असते ’मनाची स्थिती.’ मानवी मनाच्या राग, लोभ, प्रेम, दु:ख, निराशा, हतबलपणा, आनंद अशा विविध भावभावनांचं दर्शन आपल्याला त्याच्या डोळ्यांत होतं. म्हणून दु:ख झालं किंवा अतिशय आनंद झाला तरी डोळ्यांत पाणी येतं. थोडक्यात, मानवी मनाचा आणि डोळे यांचा थेट संबंध आहे. मन जितकं ताणलेल्या अवस्थेत असेल, तितक्या डोळ्यांवरचा ताण जास्त असतो. थोडा वेळ डोळे बंद करून त्यांना विश्रांती दिली की मनावरचा ताणही कमी व्हायला मदत होते. The fastest way to bring the mind into concentration is through eyes. मन आणि डोळे यांचा हा इतका घनिष्ठ संबंध लक्षात घेता, संगणक क्षेत्रातल्या व्यक्तींच्या तणावांचेही त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होणारच, हे लक्षात घ्यायला हवं.
 
 
गलेलठ्ठ पगार देणार्‍या या क्षेत्रात, त्या पगाराची पै न् पै वसूल करण्यासाठी सगळ्याच व्यक्तींवर कामाचं प्रचंड ओझं टाकलेलं असतं. हे काम आणि उपलब्ध वेळ यांचं प्रमाणही बरेच वेळा व्यस्त असतं. आर्थिक मंदीच्या काळात नोकरीची हमी नसते. नोकरी गेली तर घेतलेल्या कर्जांचे हप्ते कसे फेडायचे? ही एक मोठी समस्या असते. शिवाय ज्या एका श्रीमंत जीवनशैलीचा अंगीकार केलेला असतो, ती टिकणं सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने गरजेचं असतं. म्हणजे कामातले ताण वेगळे, वैयक्तिक-कौटुंबिक वेगळे, सामाजिक वेगळे!
 
 
संगणकाशी थेट संबंध असलेल्या या कारणांव्यतिरिक्त, जीवनशैलीतल्या अन्य गोष्टीही डोळ्यांच्या अनारोग्याला जन्म देणार्‍या ठरतात. उदा., रात्री जागरण, दिवसा उशिरा उठणं, अवेळी जेवण, खारवलेले पदार्थ, टिकवलेले खाद्यपदार्थ( preserved food), बेकरीचे पदार्थ, पुन्हा पुन्हा शिजवलेले पदार्थ हे असे घटकही डोळ्यांचं ’आरोग्य’ हळूहळू कमी करत असतात.
 
 
आयुर्वेदाच्या मते डोळ्याच्या रचनेमध्ये मांसधातूचा हिस्सा बराच मोठा आहे. त्यामुळे रचनात्मकदृष्ट्या डोळ्याचं आरोग्य हे शरीराच्या मांसधातूवर अवलंबून असतं. जितका मांसधातू बलवान, तितकी दृष्टी चांगली. साहजिकच अव्यायाम, शिळं अन्न, रात्रीचं जागरण, क्षारयुक्त आहार (उदा., चायनीज पदार्थ) हे मांसधातूला घातक घटक डोळ्यांचंही आरोग्य बिघडवतात.
 
 
संगणक क्षेत्रातील लोकांच्या डोळ्यांसंबंधीच्या तक्रारीचं स्वरूप म्हणजे डोळे कोरडे वाटणं, डोळे थकणं, डोळ्यांवर ताण जाणवणं, डोळ्यांची उघडझाप करताना त्रास होणं, डोळे लाल होणं, चश्म्याचा वाढता नंबर, डोकेदुखी, डोळेदुखी, डोळे खाजणं अशा स्वरूपात काहीही असू शकतं. Computer Vision Syndrome असं एक गोंडस नाव याला देऊन आपली सुटका होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला योग्य उपाय शोधायला हवे.
 
vivek 
 
या सगळ्याचा विचार करता, डोळ्यांसाठी ’आदर्श’ किंवा ’उपयुक्त’ दिनचर्या अशी -
 
सकाळी लवकर उठावं. (5 ते 6च्या दरम्यान)
 
सकाळी उठल्यावर लगेच पोट साफ व्हायला हवं.
 
कडू, तिखट, तुरट चवीच्या औषधी चूर्णांनी दात घासावे.
 
अंगाला तिळाचं तेल लावून अभ्यंग करावें. (किमान सुट्टीच्या दिवशी.)
 
घाम येईपर्यंत व्यायाम करावा.
 
कोमट पाण्याने आंघोळ करावी. (डोक्यावरून गरम पाणी घेऊ नये. ते डोळ्यांना घातक असतं.) डोळ्याच्या विशेषत: दृष्टीच्या तक्रारी असतील, तर डोक्यावरून आवळ्याचा काढा घ्यावा.
 
अंघोळीनंतर आणि रात्री झोपताना नाकात तिळाचं तेल 2-2 थेंब टाकावं.
 
 
ताजं अन्न खावं. गाईचं दूध, तूप, कारलं, जुने तांदूळ, गहू, पडवळ, आंबा, बदाम, आवळा, ज्येष्ठमध, कोवळा मुळा, शेवगा, लोणी, हिंग, लसूण हे डोळ्यांना हितकर पदार्थ आहेत.
 
 
रात्री वेळेवर झोपावं. (10 ते 10.30च्या दरम्यान)
 
रोज डोक्याला व तळपायांना तेल लावावं.
 
संगणकावर काम करताना दर एक तासाने आपली जागा सोडून उठावं.
 
डोळ्यांचे व्यायाम, मानेचे व्यायाम, प्राणायाम यांचा नियमित सराव करावा.
 
घरी तयार केलेलं काजळ रोज डोळ्यात घालावं. तर आठवड्यातून एकदा तीक्ष्ण अंजन (वैद्यांच्या सल्ल्याने) घालावं.
 
 
डोळ्यांसाठी घातक गोष्टी टाळाव्या - उदा., खारट पदार्थ, खूप आंबट पदार्थ, कलिंगड, जास्त प्रमाणात पान खाणं, तंबाखू, गाजर, दोनदा उकळलेलं पाणी, पुन्हा पुन्हा गरम केलेलं अन्न, धूर, धूळ, रात्री झोपताना किंवा झोपेतून उठून पाणी पिणं, तीव्र उन्हात फिरणं, तेज:पुंज - चंचल व खूप सूक्ष्म पदार्थ सतत बघणं इ.
 
 
जेवल्यावर हात धुऊन एकमेकांवर चोळून डोळ्यांना लावावे.
 
 
चामड्याची किंवा लकडी पादत्राणं वापरावी.
 
 
दिवसांतून एकदा किंवा रविवारी अकरा वेळा चाक्षुषोपनिषद् म्हणावं.
 
 
डोळ्यांच्या आरोग्यासाठी पंचकर्म - बस्ति, वमन, विरेचन, तर्पण, पुटपाक, अंजन, रक्तमोक्षण अशा विविध कर्मांद्वारे डोळ्यांच्या कित्येक आजारांवर आपल्याला उपचार करता येतो. मात्र हे उपचार वैद्यांकडून, योग्य वेळी आणि पूर्ण पथ्यापथ्य पाळूनच करावे. तरच त्यांचा उत्तम फायदा मिळतो.
 
 
आयुर्वेदशास्त्र डोळ्यांच्या कुठल्या समस्या सोडवू शकतं? - काही आजार असे असतात, जिथं आधुनिक शास्त्र हात टेकतं. रोग्याची दृष्टी जाण्याची भीती असते. ‘आता यापुढे काही होऊ शकणार नाही’ असं नेत्रतज्ज्ञ सांगतात. पण तिथेही आयुर्वेदशास्त्र कधीकधी मदत करू शकतं, हे आपल्याला माहीतच नसतं. आयुर्वेदाची ’मक्तेदारी’ असलेल्या डोळ्यांच्या अशा समस्या म्हणजे
 
 
मधुमेहामुळे होणारे डोळ्यांचे विकार - Diabetic Retinopathy
 
 
लहान मुलांचा पुन: पुन: वाढणारा डोळ्यांचा नंबर
 
डोळे लाल होणं / खाजणं -

- allergic conjunctivitis
 
डोळ्यांच्या आतील पडद्याला सूज येणं -
Uveitis
 
डोळ्यांच्या स्नायूंची शक्ती कमी होणं -
paralysis of eye
 
 
वार्धक्यामुळे होणारी कमजोर दृष्टी -
Age related macular degeneration
 
डोळे कोरडे होणं -
Dry eye
 
लहान मुलांमधील तिरळेपणा -
squint
 
काळ्या बुबुळावरील जखमा -
Corneal ulcers
Retinal Pigmentation