गिरीश बापट राजकारणी नव्हे, समाजकारणी

विवेक मराठी    01-Apr-2023   
Total Views |

bjp
पुण्याचे भाजपा खासदार गिरीश बापट यांचे बुधवार दि. 29 मार्च 2023 रोजी निधन झाले. पुणे महापालिकेचे नगरसेवक, आमदार, महाराष्ट्र राज्याचे मंत्री, लोकसभा खासदार अशी संघस्वयंसेवक गिरीश बापट यांची चार दशकांची प्रदीर्घ राजकीय कारकिर्द होती. वैयक्तिक संपर्क आणि संघटनात्मक बांधणी यांचा गिरीशभाऊंनी पुण्यात बेमालूम मिलाफ केला होता. जनसेवेचा अखंड ध्यास घेतलेल्या गिरीशभाऊंनी पक्षनिष्ठेला सर्वोच्च महत्त्व दिले. एखाद्या शिस्तबद्ध सैनिकाप्रमाणे त्यांनी पक्षाने दिलेल्या आदेशांचे पालन केले. पुण्यात भाजपाच्या या उभारणीतील त्यांचे योगदान न विसरता येण्याजोगे आहे. अशा राजकीय व्यक्तिमत्त्वाला श्रद्धांजली अर्पण करणारा लेख...
गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुण्यातील राजकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने तर हा मोठा आघात आहेच, तसेच एकूण सार्वजनिक व्यवहार आणि राजकारण यांच्या दृष्टीनेही ही खूप मोठी हानी आहे. राजकारणाची पातळी दिवसेन्दिवस खालावत जात आहे, ही ओरड अधिकाधिक मोठ्या आवाजात होत असताना बापट यांच्यासारख्या सुसंस्कृत, सुस्वभावी आणि सहृदय नेत्याचे जाणे अधिक चटका लावून जाणारे आहे. तब्बल पाच वेळा एका विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणे आणि सहाव्या वेळेस तिथूनच खासदार म्हणून राष्ट्रीय राजकारणात जाणे ही खायची गोष्ट नाही. मात्र गिरीश बापट यांनी आपल्या कर्तृत्वाने ती शक्य करून दाखविली. कार्यकर्त्यांचे घट्ट जाळे, सातत्याने कामे करण्याची तडफ आणि मतदारसंघातील लोकांचा मिळविलेला विश्वास या भांडवलावर बापट यांनी ही अविश्वसनीय वाटणारी कामगिरी करून दाखविली. पुण्यात गिरीशभाऊ म्हणून त्यांची ओळख होती, ती काही उगीच नाही.
 
 
त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा हा ऐन बहारीचा काळ हा तसा पाहिला तर काँग्रेसच्या वर्चस्वाचा. पुण्यात एकीकडे सुरेश कलमाडी यांच्यासारखा भरभक्कम नेता काँग्रेसचे नेतृत्व करत होता, दुसरीकडे शरद पवार यांच्यासारखा दिग्गज नेता वेगळ्या पक्षामार्फत परंतु काँग्रेसच्याच विचारधारेला पुढे रेटत होता. शिवाय वाढत्या पुण्याचे स्वरूपही बहुसांस्कृतिक होत होते. या सर्वांसमोर आपला झेंडा हातात घेऊन, आपला विचार घेऊन ठामपणे उभे राहणे ही किरकोळ बाब नव्हती. ती त्यांनी सहजसाध्य करून दाखविली. या सर्व प्रवासात आपल्या राजकीय विचारसरणीशी तडजोड केल्याचा आरोप कधीही त्यांच्यावर झाला नाही. त्यांच्या नैष्ठिक वाटचालीचा यापेक्षा मोठा पुरावा असू शकत नाही.
 
 
बापट यांच्याशी माझा वैयक्तिक संबंध पत्रकार म्हणूनच आला. एका इंग्लिश वर्तमानपत्रात वार्ताहर म्हणून काम करत असताना वारंवार त्यांच्याशी बोलणे होई. कुठल्याही बातमीवर प्रतिक्रिया घेताना किंवा काही माहिती घेण्याची वेळ आली की हक्काने बोलावा असा एक लोकप्रतिनिधी म्हणजे गिरीश बापट. या विश्वासाला त्यांनी कधीही तडा जाऊ दिला नाही. एखाद्या वेळेस कामात असतील आणि फोन घेता येत नसेल, तर त्यांचा किंवा त्यांच्या साहाय्यकाचा उलट फोन येई. फोनवरील हा सुसंवाद प्रत्यक्ष भेटीतही दिसून यायचा. पुण्यात त्यांचा संचार सर्वत्र होता. कसबा विधानसभा मतदारसंघाचे ते 1995पासून 2019पर्यंत आमदार होते. परंतु त्यांच्या कार्याची व्याप्ती केवळ त्यांच्या मतदारसंघापुरती मर्यादित नव्हती. कसब्याशिवाय अन्य भागांतील नागरिकही हक्काने त्यांच्याकडे जात आणि आपली समस्या मांडत. ती समस्या सोडविण्यासाठी मग ते हिरिरीने प्रयत्न करत.
 
 
महापालिकेपासून संसदेपर्यंत प्रतिनिधित्व केल्यामुळे त्यांना पुण्याची खडान्खडा माहिती होती. पुण्याच्या समस्यांची त्यांना नेमकी जाण होती. या समस्या सोडविण्यासाठी ते सातत्याने कार्यरत असत.
 
 
पुण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी सदैव स्मरणात राहील. शहराच्या प्रश्नांची व प्रगतीची त्यांच्याएवढी जाण अन्य कोणाकडे क्वचितच असेल. म्हणूनच मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीएच्या) अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती. त्या वेळीही त्यांची तडफ दिसून आली होती. एवढे कशाला, सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेतील (रेशन) धान्याचा अपहार केल्याप्रकरणी राज्यात पहिल्यांदाच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 (मोक्का)अंतर्गत कारवाई करण्यात आली, तीसुद्धा त्यांच्याच पुरवठा मंत्रिपदाच्या कार्यकाळात. दहशतवादी आणि समाजविरोधी कृत्ये करणार्‍या गुन्हेगारांविरोधातच लावण्यात येणारा ‘मोक्का’ रेशन माफियांवर लावण्याची हिंमत त्यांनी दाखविली होती.
 
 
पुण्यातील सार्वजनिक कार्यक्रम - गणेशोत्सव किंवा अन्य संस्था संघटनांचे कार्यक्रम यामध्ये तर त्यांचा वावर नित्याचा होता. पुण्याच्या सार्वजनिक जीवनाशी ते अगदी समरस झाले होते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अठरापगड जातीच्या जनमानसाशी एकरूप होण्यामध्ये त्यांचे जन्मजात ब्राह्मण असणे कधीही आडवे आले नाही. किंबहुना तो प्रश्नही कधी कोणाच्या मनात आला नाही.
 
 
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर ते पहिल्यांदा पुण्याला आले, तो दिवस मला अजूनही आठवतो. तो दिवस होता 6 डिसेंबर 2014. मुंबईहून ते रेल्वेने आले आणि पुणे स्थानकात उतरले. कार्यकर्त्यांनी उत्साहाने त्यांना रेल्वे अधिकार्‍यांच्या केबिनमध्ये नेले आणि तिथेच त्यांचा सत्कार केला. तिथून ते तडक रेल्वे स्थानकाशेजारी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गेले. तिथे बाबासाहेबांना अभिवादन केले आणि माध्यमांशी संवाद साधला. “जगाला युद्ध नको, तर बुद्ध हवा” हे त्यांनी तेव्हा सांगितले. त्यानंतर ते तिथून थेट संघाच्या कार्यालयात आले आणि म्हणाले, “इथे मी मंत्री म्हणून आलेलो नाही. ही नम्रतेने वागण्याची जागा आहे.” त्यांच्यातला हा स्वयंसेवक सदैव जागा असे.
 
 
वैयक्तिक संपर्क आणि संघटनात्मक बांधणी यांचा गिरीशभाऊंनी पुण्यात इतका बेमालूम मिलाफ केला होता की कसब्यात भाजपाचा पराभव करणे हे विरोधकांना स्वप्नातही अशक्य वाटायचे. जनसेवेचा अखंड ध्यास घेतलेल्या गिरीशभाऊंनी पक्षनिष्ठेला सर्वोच्च महत्त्व दिले. एखाद्या शिस्तबद्ध सैनिकाप्रमाणे त्यांनी पक्षाने दिलेल्या आदेशांचे पालन केले. अगदी शेवटच्या आजारात पक्षाला गरज होती म्हणून प्रचाराला यायलाही त्यांनी कमी केले नाही. ज्या शहरात त्यांनी भाजपाचा एकहाती किल्ला लढविला, त्याच शहरात भाजपाचे आठ-आठ आमदार होताना पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले. पुण्यात भाजपाच्या या उभारणीतील त्यांचे योगदान न विसरता येण्याजोगे आहे.
 
 
एखादी गोष्ट असताना आपल्याला तिची किंमत कळत नाही, असे म्हणतात. गिरीशभाऊंच्या बाबतीत तेच झाले. ते असताना कसबा म्हणजे भाजपाचा गड हे समीकरण इतके घट्ट रुचले होते की या समीकरणाला धक्का लागेल असे कधी कोणाला वाटलेही नाही. दुर्दैवाने गेल्या दीड-दोन वर्षांत आजारपणाने गिरीशभाऊंना गाठले आणि ते गलितगात्र झाले. एकेकाळी कबड्डीचे मैदान गाजविणारे गिरीशभाऊ अंथरुणाला खिळून राहिले. त्यांच्या या विकलांग अवस्थेतच झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत जो निकाल लागला, तो गिरीशभाऊ हे किती महत्त्वाचे होते हेच अधोरेखित करणारा ठरला.
 
 
 
लायन्स क्लबच्या एका कार्यक्रमात ते म्हणाले होते, “राजकारण हे अळवावरचे पाणी असते. पान हलले की पाण्याचे थेंब पटापट पडतात. राजकारणात निवडणुकीपूर्वी जोरात काम होते आणि निवडणुकीनंतर संपते. समाजकारण मात्र चिरकाल टिकणारे असते. हा देश राजकारण्यांमुळे चालत नसून समाजकारण्यांमुळे चालतो.” गिरीश बापट यांच्या रूपाने एक राजकारणी आपल्यातून निघून गेला आहे. मात्र समाजकारणी गिरीशभाऊ हे कायम पुणेकरांच्या स्मरणात राहतील.

देविदास देशपांडे

पत्रकार आणि राजकीय विश्लेषक