पूर्वग्रहाच्या तलखीत वस्तुनिष्ठतेची झुळूक!

विवेक मराठी    01-Apr-2023   
Total Views |
 
bjp
मिड यांनी यापूर्वीही भारताकडून असणार्‍या वाढत्या अपेक्षांचा उल्लेख केला होता. मात्र आता त्यांनी वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये लिहिलेल्या लेखात विशेषत: भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इत्यादी मुद्द्यांना स्पर्श केल्याने त्यांचा हा लेख अधिक लक्षवेधी ठरला आहे. मिड यांचा वस्तुनिष्ठ मांडणी करणारा लेख आंतरराष्ट्रीय स्तरावर डाव्यांच्या पूर्वग्रहदूषित मांडणीच्या तलखीत झुळकेचे काम करतो.
आंतरराष्ट्रीय व्यासपीठे आणि माध्यमे यांतून सातत्याने हिंदू धर्म, हिंदू समाज, हिंदुत्व यावर हेतुपुरस्सर आणि जाणीवपूर्वक अश्लाघ्य टीका होत असतानाच वॉल्टर रसेल मिड यांचा वॉल स्ट्रीट जर्नलमधील एक लेख त्यातील आगळ्या मांडणीसाठी लक्षवेधी ठरला आहे. मिड यांचे व्यक्तिमत्त्व बहुपेडी आहे. वॉल स्ट्रीट जर्नल या ख्यातनाम वृत्तपत्राचे ते स्तंभलेखक आहेत. त्याखेरीज अमेरिकेतील हडसन इन्स्टिट्यूटमध्ये ’मुत्सद्दीपणा आणि व्यूहनीती’ या अभ्यासशाखेचे फेलो आहेत. न्यू यॉर्कच्या बार्ड कॉलेजचे आंतरराष्ट्रीय विषयांचे प्राध्यापक आहेत. आंतरराष्ट्रीय विषयांवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. तेव्हा या प्रांतातील त्यांचा अभ्यास आणि पर्यायाने अधिकार सर्वश्रुतच नव्हे, तर सर्वमान्य असाच. त्यांनी वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये एक लेख लिहिला आणि त्याचे शीर्षकच अनोखे होते - ’भारतातील भाजपा हा जगभरातील सर्वाधिक महत्त्वाचा पक्ष’. साहजिकच भारतातील माध्यमांनादेखील मिड यांच्या लेखाची दखल घ्यावी लागली. अर्थात मिड यांनी भारतावर पहिल्यांदाच अनुकूल असे लिहिले आहे असे नाही. यापूर्वीही त्यांनी भारताकडून असणार्‍या वाढत्या अपेक्षांचा उल्लेख केला होताच. मात्र आता त्यांनी विशेषत: भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इत्यादी मुद्द्यांना स्पर्श केल्याने त्यांचा हा लेख अधिक लक्षवेधी ठरला आहे. मात्र मिड यांच्या या लेखातील मुद्द्यांचा परामर्श घेण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदुत्वाला लक्ष्य करण्याचा जो कावेबाजपणा चालतो, त्याची नोंद घेणे आवश्यक. याचे कारण ती पार्श्वभूमी पाहिली, तर मिड यांच्या लेखातील आगळेपण अधोरेखित होईल.
 
 
डाव्यांची कथित इकोसिस्टिम
 
 
याच डावपेचांना आणि व्यूहनीतीला अलीकडच्या भाषेत ’इकोसिस्टिम’ असे म्हणतात. रवी चांद यांनी यासंबंधी गेल्या वर्षी जून महिन्यात लिहिलेल्या एका लेखाचा येथे उल्लेख करावयास हवा. त्यांनी आपल्या लेखात या इकोसिस्टिमची चिरफाड केली होती. त्यासाठी त्यांनी गेल्या वर्षी श्रुती कपिला यांनी राहुल गांधी यांच्या केंब्रिजमध्ये घेतलेल्या मुलाखतीचे उदाहरण दिले आहे. चांद म्हणतात, ’हा कार्यक्रम केंब्रिज येथे आयोजित केला जात असला तरी तो काँग्रेस संलग्न संघटनेने आयोजित केला आहे, सूत्रसंचालक असलेल्या श्रुती कपिला केंब्रिजमधील सहयोगी प्राध्यापिका असल्या, तरी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात असताना एसएफआय या डाव्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्या होत्या. काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतातील काही आघाडीच्या विद्यापीठांत डाव्यांचे वर्चस्व होते आणि भाजपा सत्तेत येईपर्यंत ते अनियंत्रित राहिले. शहरी नक्षलवाद्यांसह डाव्या विचारसरणीशी सहमत असतील तरच संशोधक विद्यार्थी यशस्वी होतील अशी स्थिती होती आणि श्रुती अशाच विद्यार्थ्यांपैकी एक.. या रिसर्च स्कॉलरची शिष्यवृत्तीवर परदेशात शिक्षण घेण्यासाठी निवड केल्यामुळे या इकोसिस्टिमने पाश्चिमात्य विद्यापीठांमध्ये त्यांचा अजेंडा रोवण्यात यश मिळविले आणि भारतविरोधी आणि हिंदूविरोधी समज निर्माण केला. ज्यांनी हिंदूविरोधी मते मिळविण्यासाठी मतपेढीचे राजकारण केले असे डावे, शहरी नक्षलवादी तसेच अनेक परदेशी सरकारांना त्यांच्या भौगोलिक-राजकीय हितसंबंधांसाठी असे वातावरण निर्माण होणे निकडीचे होते.’ तेव्हा श्रुती कपिला यांच्यासारख्या भारतीयांनी परदेशात जाऊन भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यास कसे प्राधान्य दिले, यावर चांद यांनी प्रकाश टाकला आहे.
 
 
2021च्या सप्टेंबरमध्ये झालेल्या ‘डिसमँटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या ऑनलाइन परिषदेने असेच आग्यामोहोळ उठवून दिले होते. त्या परिषदेला जोरकस विरोध केला तो ओहायोचा सिनेटर असलेल्या नीरज अंतानी यांनी. अमेरिकेतील हिंदूंच्या विरोधात वर्णद्वेष आणि कट्टरता पसरविण्याचा या परिषदेचा हेतू आहे आणि म्हणून त्या परिषदेला विरोध केला पाहिजे, अशी त्यांनी भूमिका घेतली होती. बेगडी धर्मनिरपेक्ष असणारी मंडळी त्या परिषदेची आयोजक होती, हा योगायोग नाही. अशा अनेक प्रसंगांतून डाव्यांच्या सुप्त हेतूंचा अंदाज येतो. भारतात डाव्यांची सद्दी संपली आहे. मात्र परदेशात जाऊन तेथील डावीकडे कललेल्या माध्यमांचा वापर करून ते आपला अजेंडा राबवू पाहतात. जागतिक स्तरावर हिंदू-फोबिया निर्माण करणे हा या सगळ्याचा उद्देश असतो, त्याप्रमाणेच भारतात अस्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, हिंदूंचे विकृत चित्र रंगविणे, हिंदूंचा तेजोभंग करणे हाही असतो. अशा वातावरणर्निर्मितीत तेथील अनेक माध्यमे उत्साहाने सामील होतात, याचीही अनेक उदाहरणे आहेत.
 
bjp 
 
डावीकडे कललेली माध्यमे
 
कोलंबस विद्यापीठातील प्राध्यापक रमेश राव यांनी तर न्यू यॉर्क टाइम्स आणि तत्सम माध्यमांच्या पूर्वग्रहदूषित भूमिकेचा विस्ताराने समाचार घेतला होता. ’दि न्यू यॉर्क टाइम्स प्रेजुडीस्ड गेझ अँट इंडिया, हिंदूज, हिंदुइझम’ या दीर्घ लेखात त्यांनी या डाव्या ’इकोसिस्टिम’ची झाडाझडती घेतली आहे. 2004 ते 2014 या यूपीएच्या काळात अमेरिकी माध्यमे भारतातील घडामोडींविषयी उदासीनता दाखवत होती (किंवा सोयीस्कर मौन राखून होती); मात्र त्यानंतर भाजपा सत्तेत आल्यानंतर न्यू यॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, लॉस एंजिलिस टाइम्स, नॅशनल पब्लिक रेडियो या संस्थांनी भारतविरोधी फूत्कार सोडणे कसे सुरू केले, हे रमेश यांनी सोदाहरण दाखवून दिले आहे. वामसी जुलुरी, इंदू विश्वनाथन अशांनीदेखील आपल्या लेखांतून या माध्यमांचा ढळढळीत पक्षपातीपणा मांडला. रमेश यांनी जानेवारी 2017 ते ऑक्टोबर 2019 हा जवळपास तीन वर्षांचा कालावधी या अभ्यासासाठी निश्चित केला आणि न्यू यॉर्क टाइम्समधील बातम्या, संपादकीय लेख इत्यादींचा आलेखच मांडला. न्यू यॉर्क टाइम्स कसा भारतविरोधी भूमिका घेतो, याचा प्रत्यय अगदी 1999 साली म्हणजे अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत असतानाच आला होता. मार्च 1999च्या अंकात या पत्राने एका बातमीला दिलेले शीर्षक होते - ’शिवा व्हर्सेस जिझस: हिंदूज बर्न होम्स ऑफ ख्रिश्चन्स.’ रमेश म्हणतात, ‘हे शीर्षक तेथे अजाणतेपणे आलेले नाही. विविध स्तरांवरील संपादकीय चाळण्या पार करीत ते शीर्षक तेथे पोहोचले.’ त्यानंतर रमेश यांनी अशा लेखांची जंत्रीच दिली आहेत, ज्यात भारताचा तेजोभंग करायचाच असा उघड उद्देश दिसतो. ‘लोकशाही धोक्यात’, ‘गोरक्षकांकडून मुस्लिमांची हत्या’, ‘झुंडशाही’, ‘कट्टर संन्याशाने चढली राजकीय शिडी’, ‘मोदींनी भारताला द्वेषाने आणि मत्सराने संमोहित केले’ ही काही लेखांची शीर्षके. त्यातून भारताविरुद्ध गरळ ओकायची वृत्ती लपून राहत नाही, असे रमेश यांनी प्रतिपादन केले आहे. याची कारणमीमांसा देताना रमेश म्हणतात की ‘जिथे जिथे हिंदू, हिंदुत्व अशा संज्ञांचा प्रयोग झाला आहे, त्याचा भाव बहुतांशी नकारात्मक आहे. अल्पसंख्याक हे हिंदूंच्या आक्रमकतेचे बळी ठरत आहेत असे चित्र सातत्याने रंगविण्यात आले आहे. यातील आणखी एक उल्लेखनीय भाग हा की न्यू यॉर्क टाइम्सपेक्षा वेगळे मत असणारे अभ्यासक, संशोधक नाहीत असे नाही, मात्र त्यांचे या विषयांवरील मत काय हे जाणून घेण्याची तसदी न्यू यॉर्क टाइम्सने घेतलेली नाही.’
 
 
हिंदुत्वाच्या तेजोभंगांचे उद्योग
 
 
येथे पूर्णिमा नाथ यांच्या ‘हिंदू, हिंदू धर्म आणि हिंदुत्व यांवरील हल्ले अलीकडे का वाढले आहेत, याही लेखाचा उल्लेख करावयास हवा. त्यात त्यांनी विशेषत: डेमोक्रॅट पक्षावर डाव्यांचे कसे वर्चस्व आहे आणि त्यात बर्नी सॅण्डर्सपासून रो खन्ना यांच्यापर्यंत कोणकोण बिनीचे ’शिलेदार’ आहेत, याचा पाढाच वाचला आहे. येथे याचे स्मरण ठेवले पाहिजे की हे तेच रो खन्ना आहेत, ज्यांनी राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर ‘गांधीवादी विचारधारेशी आणि भारतीय मूल्यांशी केलेली ती प्रतारणा आहे’ अशी प्रतिक्रिया दिली होती. यातही न्यू यॉर्क टाइम्सने दिलेल्या बातमीत राहुल यांची खासदारकी रद्द होण्याचा संबंध त्यांचा नरेंद्र मोदी यांना असणार्‍या विरोधाशी आहे असे सूचित केले होते आणि त्यावर खन्ना यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. याच खन्ना यांनी 2019 साली ‘अमेरिकेतील हिंदूंनी हिंदुत्व नाकारले पाहिजे’ असे ट्वीट केले होते. तेव्हा या सगळ्यातील सूत्र लक्षात येईल.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत, हिंदू, हिंदुत्व यांना टीकेचेच नव्हे, तर मानहानीचे लक्ष्य करायचे हे उद्योग ही कथित इकोसिस्टिम निगुतीने करीत असते. अशा या व्यवस्थेची काही व्यवच्छेदक लक्षणे राजीव तुली यांनी आपल्या लेखात विशद केली होती - जे काही हिंदू या संज्ञेशी निगडित आहे त्याचा द्वेष, जे जे हिंदू ते ते जातीयवादी, इस्लामी कट्टरवादावर मौन; समानतेच्या गप्पा पण हिजाबसारखा विषय घेण्यात टाळाटाळ, मास मीडियाच्या माध्यमातून भारतविरोधी ’नॅरेटिव्ह’ तयार करण्याचे डावपेच अशी साधारणत: व्यूहनीती असते. आणि अनेक दाखल्यांतून ती दिसून आली आहे. अलीकडेच जॉर्ज सोरोस यांनी भारतातील लोकशाही नव्याने बहरेल असे विधान केले होते आणि आता लोकशाही संकुचित झाली आहे असे अप्रत्यक्षपणे सुचविले होते, ते याच पठडीतील होते असे मानले जाते. या सगळ्या पार्श्वभूमीवर मिड यांनी लिहिलेल्या लेखाकडे पाहायला हवे.
 
bjp 
 
मिड यांची मांडणी
 
मिड यांनी आपल्या लेखात काही लक्षवेधी विधाने केली आहेत-
 
अमेरिकी हितसंबंधांच्या दृष्टीकोनातून पाहिले, तर भारतातील सत्ताधारी भाजपा हा पक्ष सर्वांत महत्त्वाचा परकीय पक्ष आहे, मात्र कदाचित त्याच पक्षाविषयी सर्वाधिक गैरसमज असू शकतात.
 
जपानसह भारत जेव्हा जागतिक आर्थिक सत्ता म्हणून उदयास येत आहे, अशा काळात भाजपाने 2014 आणि 2019 साली सत्ता मिळविली आणि 2024 सालच्या निवडणुकीतदेखील हाच पक्ष सत्तेत येऊ शकतो. साहजिकच भारतातील धोरणांची सूत्रे याच पक्षाच्या हातात राहण्याचा संभव आहे आणि चीनवर नियंत्रण ठेवायचे, तर भारताच्या साह्याशिवाय अमेरिकी प्रयत्न तोकडे पडू शकतात.
 
भाजपाविषयी गैरसमज आहेत, याचे कारण तो पक्ष बिगर-भारतीयांना आकलन नसलेल्या सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासातून उदयास आला आहे.
 
एकेकाळी धूसर असणार्‍या सामाजिक चळवळींच्या यशाचे प्रतिबिंब भाजपाच्या सफलतेत पडलेले दिसते.
पाश्चात्त्य उदारमतवादाच्या संकल्पना भाजपा नाकारतो, मात्र आधुनिकतेची कास धरतो.
 
जागतिक महासत्ता होऊ पाहणार्‍या भारताचे नेतृत्व करण्याची आशा भाजपाला आहे.
 
 
अमेरिकी आणि विशेषत: डावे विचारवंत भाजपाबद्दल आक्षेप घेतात आणि ते जरी पूर्णपणे अप्रस्तुत नसले, तरी भारत हा देश समजण्यास सरळ-सोपा नाही; भाजपाचे अलीकडचे यश हे अनेक ख्रिश्चनबहुल राज्यांतील आहे. वीस कोटींच्या उत्तर प्रदेशात भाजपा सरकारला शिया मुस्लिमांचे समर्थन आहे.
 
 
जातीय भेद मिटावे, म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोठे प्रयत्न केले आहेत.
 
 
bjp
 
वॉल्टर रसेल मिड 
 
यानंतर मिड यांनी भाजपा किंवा संघ म्हणजे धार्मिक संघटना आहेत असले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आपल्या लेखातून केला आहे आणि तोही स्वानुभवावर आधारित. योगी आदित्यनाथ यांना आपण भेटलो, तेव्हा ते राज्यातील आर्थिक गुंतवणूक, विकास या विषयांवर बोलत होते आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनीदेखील चर्चेत भारताच्या आर्थिक विकासगतीवर भर दिला; अल्पसंख्याकांना कोणत्याही भेदभावाला सामोरे जाण्याची वेळ येता कामा नये असे स्पष्ट प्रतिपादन केले, असे मिड यांनी लिहिले आहे. तेव्हा भाजपा आणि संघ यांच्याशी संवाद ठेवणे अमेरिकेसाठी अपरिहार्य ठरावे, अशी भूमिका मिड यांनी मांडली आहे.
मिड यांच्या या लेखात कोणताही पूर्वग्रह आढळत नाही किंवा ’अजेंडा’चा भास होत नाही. स्वत: भाजपाशी आणि संघनेत्यांशी केलेल्या चर्चेवर आधारित मत ते व्यक्त करतात. हिंदुत्व आणि विकास हे परस्परविरोधी आहेत या हेतुपुरस्सर पसरविलेल्या समजाच्या आहारी न जाता ते स्वत: आकलन करून घेतात आणि मग मांडणी करतात. त्याच वेळी काही शंकाही सूचित करतात. तेव्हा त्यांच्या लेखात समतोल आहे, पण तो डोळस आहे. उसन्या अवसानाचे संतुलन त्यात नाही. अर्थात मिड यांची भारताची सामर्थ्यस्थळे दाखविण्याची ही पहिलीच वेळ नाही. अडीच महिन्यांपूर्वी मिड यांनी ’कॅन इंडिया इमर्ज अ‍ॅज या रायव्हल टू चायना?’ या लेखातदेखील भारताच्या जमेच्या बाजू व्यक्त केल्या होत्या. जपान हा अमेरिकेचा सर्वांत महत्त्वाचा मित्र झाला असला, तरी भारताच्या हातात हिंद-प्रशांत क्षेत्रातील भवितव्य आहे, असे मिड यांनी म्हटले होते. आर्थिक निकषांवर चीन भारताच्या खूप पुढे आहे हे मिड यांनी मान्य केले होते; मात्र गेल्या चाळीस वर्षांत भारताने आर्थिक विकासाची गती राखली असती, तर भारताची अर्थव्यवस्था आजमितीस 10 ट्रिलियन डॉलर्सची असती, असेही मिड यांनी म्हटले होते. मात्र आता भारत विकासाच्या पथावर आहे आणि अमेरिकेच्या आर्थिक सत्तेसाठी भारताचा विकास हा कळीचा मुद्दा आहे, असेही प्रतिपादन मिड यांनी केले होते. लेखाच्या अखेरीस मिड यांनी केलेली सूचना महत्त्वाची, ती म्हणजे भारतीय उत्पादनांना अमेरिकी बाजारपेठ मिळवून देण्याची जबाबदारी अमेरिकेची आहे.
 
 
 
पूर्वग्रहदूषित विरुद्ध वस्तुनिष्ठ
 
 
हिंदू, हिंदुत्व, भारत यांविषयी सतत नकारात्मक मांडणी पाहण्या-ऐकण्याची सवय झाली असताना मिड यांनी केलेली मांडणी त्या पठडीतील नाही आणि म्हणूनच ती लक्षवेधी ठरते. अर्थात मिड यांच्याप्रमाणे जगभर भारताकडे स्वागतशीलतेने आणि उमेदीने पाहणारे वाढत आहेत, ही दिलासा देणारी बाब. येथे ओपन या मासिकात वीरेंद्र कपूर यांनी लिहिलेल्या एका प्रसंगाचा अवश्य उल्लेख करावयास हवा. कपूर लिहितात - एक भव्य कार्यक्रम होता आणि अतिथी होते ऑस्ट्रेलियातील समाजशास्त्र विषयाचे एक प्राध्यापक. सूत्रसंचालकाने त्या महाशयांना परदेशात मोदी सरकारच्या असणार्‍या नकारत्मक प्रतिमेविषयी प्रश्न विचारला. त्या प्राध्यापकाने त्या मुलाखतकाराला चांगलेच सुनावले, ‘हा बुद्धिजीवी वर्ग आहे, ज्याने चुकीच्या पद्धतीने मोदींच्या नेतृत्वाखाली भारताला फॅसिस्ट राज्य म्हणून चित्रित केले आहे. डावी - उदारमतवादी इकोसिस्टिम खरे तर भारतविरोधी आहे. वर्ग म्हणून ते मोदी आणि भाजपाविरोधीही आहे, व्यक्ती म्हणून नव्हे. तुम्ही ज्या सर्वेक्षणांचा संदर्भ घेत आहात, त्या सर्वेक्षणांत तेच तेच डावे-उदारमतवादी विचारवंत, पत्रकार, जेएनयू प्रकारचे आणि भारतीय पाश्चिमात्य विद्यापीठांमध्ये भारताचा अभ्यास करणारे भारतीय असतात.. सर्वेक्षणाचे आयोजक ते मांडण्यापूर्वी प्रतिसादांची पडताळणी करत नाहीत.. (वैचारिक) कावीळ झालेल्यांच्या मतावर विसंबून तेच देशाचे खरे प्रतिबिंब असे मांडतात.’ तेच प्राध्यापक पुढे म्हणाले, ‘भविष्यात कधीतरी मोदी राजवट बदलली जाईल, तेव्हा खरी परीक्षा होईल. नवीन राज्यकर्ते राममंदिर पाडतील की यूएपीए कायदा रद्दबातल ठरवतील? ते यातील काहीही करणार नाहीत.’
 
 
 
डाव्यांनी सतत हिंदुत्वाला, हिंदू समाजाला लक्ष्य केले म्हणून अस्वस्थ होण्याचे कारण नाही, तद्वत मिड यांच्यासारख्यांनी भारत, भाजपा, मोदी यांच्याविषयी चार भले शब्द काढले म्हणून हुरळून जाण्याचे कारण नाही. प्रश्न कोणाचा तिरस्कार व पुरस्कार करण्याचा नाही. मात्र डावीकडे झुकून निरीक्षणाअगोदरच निष्कर्ष काढण्याच्या वृत्तीला मात्र विरोध करावयास हवा. याचा अर्थ कोणाचा विरोध नाकारायलाच हवा असे नाही. अट एवढीच की त्या प्रतिपादनाला पूर्वग्रहदूषितपणाचा दर्प येता कामा नये. परकीय भूमीवरून भारताचे विकृत चित्र रंगविता कामा नये. आंतराराष्ट्रीय स्तरावर डाव्यांनी भारत, हिंदू समाज, हिंदुत्व यांची मानहानी करायचीच असा विडाच उचलला आहे असे म्हणावयास जागा आहे. त्याला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर द्यावयास हवे. अशा वेळी मिड यांच्यासारख्यांनी केलेली मांडणी महत्त्वाची ठरते. याचे कारण त्यात वस्तुनिष्ठपणा दृग्गोचर होतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर डाव्यांच्या पूर्वग्रहदूषित मांडणीच्या तलखीत मिड यांचा वस्तुनिष्ठ मांडणी करणारा लेख झुळुकेचे काम करतो.
 
 

राहुल गोखले

विविध मराठी / इंग्लिश वृत्तपत्रांतून राजकीय, सामाजिक व आंतरराष्ट्रीय विषयांवर नियमित स्तंभलेखन
दैनिक / साप्ताहिक / मासिकांतून इंग्लिश पुस्तक परिचय सातत्याने प्रसिद्ध
'विज्ञानातील सरस आणि सुरस' पुस्तकाला राज्य सरकारचा र.धों. कर्वे पुरस्कार