नवीन परंपरेची सुरुवात

विवेक मराठी    21-Apr-2023   
Total Views |
विराग पाचपोर
। 9579296582
 
 
Samaveda in Hindi and Urdu translated
इक्बाल दुर्रानी यांनी अनुवाद केलेल्या सामवेदाच्या हिंदी अणि उर्दू भाषेतील ग्रंथाच्या प्रकाशनाने आज समन्वयाचा एक प्रवास पुन्हा प्रारंभ झाला आहे. ज्यातून एक असा भारत निर्माण होईल, जिथे धर्मांतरण, लव्ह जिहाद यासारख्या घटना होणार नाहीत. आज जिथे लोकांना भडकविण्याचे, धार्मिक तणाव निर्माण करण्याचे कारस्थान सुरू आहे, अशा वेळी सामवेदाचा हा समन्वयाचा संदेश या कार्यक्रमाद्वारे दिला गेला आहे.
बॉलीवूडचे प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक इक्बाल दुर्रानी यांनी सामवेदाचे हिंदी अणि उर्दू भाषेत सचित्र अनुवाद करणार्‍या त्यांच्या ग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना नुकतेच सांगितले की “400 वर्षांपूर्वी मोगल सम्राट शहाजहान याचा मोठा मुलगा दारा शिकोह याने उपनिषदांचा फारसीत आणि उर्दूत अनुवाद केल्यानंतर वेदांचाही अनुवाद करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. दाराच्या या उपक्रमाने हिंदू आणि मुसलमान या दोन्ही समाजांतील दरी कमी होऊन सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया सुरू झाली असती. पण त्यामुळे इस्लामचे वेगळेपण संपू शकले असते, अशी भीती वाटल्याने आणि मुल्ला-मौलवींनी तसे औरंगजेबाच्या मनात भरवल्यामुळे कट्टर आणि क्रूर औरंगजेबाने आपल्या बापाला कैदेत टाकून दारा शिकोहची हत्या केली आणि त्याचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. आज पंतप्रधान मोदींच्या राज्यात त्याचे हे स्वप्न माझ्या हातून पूर्ण झाले आहे. आज औरंगजेब पराभूत झाला आहे आणि पंतप्रधान मोदी जिंकले आहेत. (औरंगजेब हार गया और मोदी जीत गये।)”
 
 
दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या प्रांगणात 17 मार्च रोजी झालेल्या या भव्य कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत, महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद, स्वामी ज्ञानानंद महाराज, मौलाना उमेर इलियासी, संघाचे संपर्क प्रमुख रामलाल, सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल, मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे संरक्षक डॉ. इंद्रेश कुमार, कलाकार गजेंद्र चौहान, सुनील शेट्टी, जयाप्रदा, मुकेश खन्ना, अनूप जलोटा, दिल्लीचे खासदार मनोज तिवारी आणि हंसराज हंस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
 

Samaveda in Hindi and Urdu translated  
 
17 मार्चला शुक्रवार होता आणि शुक्रवारची नमाज संपल्यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात झाली, तीदेखील अनूप जलोटा यांच्या सुरेल आवाजातील भजनांनी आणि शिवस्तुतीने. या भक्तिसंगीताने लाल किल्ल्यावरील वातावरण भारून टाकले होते. अशा या भारलेल्या वातावरणात सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांच्या शुभहस्ते सामवेदाच्या या हिंदी आणि उर्दू भाषांतराचे विधिवत प्रकाशन झाले. इक्बाल दुर्रानी यांनी अनुवादाचे हे शिवधनुष्य परिश्रमपूर्वक आणि काळजीपूर्वक पेलले आहे.
 
 
या प्रसंगी बोलताना भागवत म्हणाले की “प्रत्येकाची पूजापद्धती किंवा पंथ वेगवेगळा असला, तरी गंतव्य स्थान मात्र एकच आहे. सगळ्यांचे रस्ते वेगवेगळे आहेत, पण मुक्कामाचे ठिकाण मात्र एकच आहे. त्याकडे दृष्टी ठेवत आपल्याला मार्गक्रमण करायचे आहे आणि ते करीत असताना परस्परांशी न भांडता, न लढता पुढे जायचे आहे, हा आजच्या या कार्यक्रमाचा संदेश आहे आणि संपूर्ण जगाला हा संदेश देण्याची जबाबदारी भारताची आहे.”
 
 
 
 
 
भागवत पुढे म्हणाले की “पूजापद्धती हे धर्माचे एक अंग आहे, तेच पूर्ण सत्य नाही. अंतिम सत्य प्रत्येक धर्माचे मूळ तत्त्व जाणणे हेच आहे आणि सर्वांनी त्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. सगळ्यांनाच आपला मार्गच योग्य वाटतो. पण आपण हे समजले पाहिजे की त्या एकमेव सत्याची अनुभूती प्राप्त करणे हेच सर्व मार्गांचे अंतिम लक्ष्य आहे.
 
 
 
सनातन धर्मात आंतरिक आणि बाह्य ज्ञानप्राप्ती आवश्यक मानली आहे. त्याशिवाय संपूर्ण ज्ञानप्राप्ती होत नाही. वेदांचे सूत्र समजून घेतले पाहिजे. लेखक इक्बाल दुर्रानी यांनी सामवेदाचे हिंदी आणि उर्दू भाषेत अनुवाद करून फार मोठे काम केले आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो. आपण सर्वांनी हे समजून घेत आपल्या आचरणात आणावे, जेणेकरून देशात शांतीचे आणि परस्पर बंधुभावाचे वातावरण वाढीस लागेल.”
 
 
Samaveda in Hindi and Urdu translated
 
ते पुढे म्हणाले, “कोणताच मार्ग चूक नसतो. सगळेच मार्ग त्याच एका गंतव्य स्थानाकडे जात असतात. आज जगात सर्वत्र कलह, अशांती, दुराग्रहाचे वातावरण दिसून येत आहे, पण यासाठी मनुष्यच जबाबदार आहे. त्यामुळे आपापल्या मार्गाने पुढे जात असताना परस्पर सहकार्याचे, सौहार्दाचे आणि बंधुभावाचे आचरण ठेवले, तर आपण सहजतेने आपल्या गंतव्य स्थानाकडे अग्रेसर होऊ शकू.”
 
 
लेखक इक्बाल दुर्रानी म्हणाले की “सामवेद मंत्रांचा संग्रह आहे. हे मंत्र मनुष्य आणि परमेश्वर यांच्यातील संवादाचे साधन आहेत. या ग्रंथात अशी एकही गोष्ट नाही, जी मुसलमान समजू शकणार नाहीत. यातील प्रत्येक गोष्ट मुसलमानांनी समजून घ्यावी यासाठी याचा उर्दूत अनुवाद करणे गरजेचे होते. हे असे एक स्वप्न होते, जे 400 वर्षांपूर्वी बादशाह शाहजहानच्या काळात दारा शिकोहने पाहिले होते, पण ते तो पूर्णत्वास नेऊ शकला नव्हता. त्याचे हे अपूर्ण राहिलेले स्वप्न आज नरेंद्र मोदींच्या राज्यात इक्बाल दुर्रानीने पूर्णत्वास नेले आहे.
 
 
 
मी लाल किल्ल्याच्या या ऐतिसाहिक प्रांगणातून आज ही उद्घोषणा करतो की औरंगजेब काल जिंकला होता, परंतु आज औरंगजेब पराभूत झाला आहे आणि नरेंद्र मोदी जिंकले आहेत.”
 
 
 
सामवेदाच्या अनुवादाचे मूळ सांगताना लेखक दुर्रानी म्हणाले की “मी यापूर्वी कधीच वेद पाहिले नव्हते. चित्रपटाच्या लोकेशनसाठी मी एकदा एटा या गावी एका गुरुकुलात गेलो असताना तेथे भिंतीवर वेदातील ऋचा पाहिल्या. सहज उत्सुकतेपोटी मी विचारणा केली असता त्या गुरुकुलाच्या प्राचार्यांनी मला अनपेक्षितपणे ऋग्वेद, अथर्ववेद आणि सामवेद भेट म्हणून दिले. मनाच्या एका भारावलेल्या अवस्थेत हे ग्रंथ हातात असताना मी आकाशाकडे पाहत विचारले की माझ्याकडून काय करवून घेणार आहेस?”
 
 
 
यातील सामवेद त्यांना फारच भावला आणि याचा उर्दूत अनुवाद करावा असे त्यांच्या मनाने घेतले. त्यांनी माहिती काढली, तर कळले की अजूनपर्यंत सामवेदाचा उर्दूत अनुवाद झालेला नाही, म्हणून त्यांनी हा निर्णय पक्का केला.
 
 
 
पण भाषेची अडचण होती. संस्कृतचे ज्ञान नाही आणि वेद तर संस्कृतात. कसे जमायचे? पण दुर्रानी म्हणाले की “माझ्या हातून हे काम व्हावे, ही जणू ईश्वरी इच्छाच होती.” 40 वर्षांपूर्वी त्यांच्या आजोबांनी याचे बीजारोपण केले होते. त्यांचे आजोबा संस्कृतचे अध्यापक होते आणि लोक त्यांना आदराने पंडितजी म्हणत असत. हे जेव्हा तेथे जात, तेव्हा ‘पंडितजी का पोता’ असे त्यांचे स्वागत होत असे.
 
 
त्यांचे जे पैतृक गाव आहे, ते समुद्रमंथनासाठी ज्या पर्वताची रवी करण्यात आली होती, त्या मंदार पर्वताच्या पायथ्याशी आहे. रोज सकाळी उठल्यावर या पर्वताचे दर्शन होत असे आणि त्याबरोबरच समुद्रमंथनाची गोष्ट त्यांच्या मनात रुंजी घालीत असे. त्यांची पत्नी ब्राह्मण कुटुंबातील आहे. दुर्रानी सांगतात की या सगळ्यांचा परिणाम म्हणून की काय, मी कट्टरतेपासून दूरच राहिलो आणि कदाचित म्हणूनच सामवेदाचे भाषांतर करण्यात आलेल्या अडचणी सहजतेने दूर झाल्यात.
 
 
 
प्रत्येक ऋचा संस्कृत, हिंदी आणि उर्दूत लिहून योग्य शब्दांसाठी अरेबिक आणि पर्शियन भाषेची मदत घेत आणि त्या ऋचेला अनुरूप असे चित्र काढून या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. एक उदाहरण देत ते म्हणाले की “सामवेदात एक ऋचा आहे, ज्यात असे म्हटले आहे ‘हे प्रकाशमान परमेश्वर, तू सर्वत्र व्याप्त आहेस आणि आम्ही तुझ्या भेटीसाठी असे आतुर झालो आहोत की जशा नद्या समुद्राला मिळण्यासाठी अधिर असतात.’ यातील प्रकाशमान या शब्दासाठी योग्य असा उर्दू शब्द त्यांना अरेबिक भाषेत मिळाला. हा प्रतिशब्द होता नूर-ए-मुजस्सम. म्हणून याचा उर्दू अनुवाद झाला - अय नूर-ए-मुजस्सम तू हमारे करीब हीन, और हम तुझसे मिलने को बेताब हैं जिस तरह से नदियाँ समुद्र में मिलने के लिए बेताब होती हैं.”
 
 
 
हे सांगून ते म्हणतात, “कुठे आहे याच्यात हिंदू अणि मुसलमान? हे तर आध्यात्मिक सत्य आहे. एक सनातन, शाश्वत सत्य आहे. म्हणून सर्वांनी याचे अध्ययन केले पाहिजे. ही आमच्या देशाची, इथल्या मातीची भाषा आहे, सामवेदात दुआ आहे, अर्चना आहे.
पण आम्ही सर्व या सनातन वृक्षाच्या फांद्यांवर बसलो आहोत आणि म्हणून एकमेकांपासून दूर आहोत. आपण जर याच्या मुळाशी बसलो, तर हे अंतर आपोआपच समाप्त होऊन जाईल. आणि हेच धर्माचे मूळ आहे. मी तर याच्या मुळाशीच बसलो आहे.”
एक मुद्दा तर त्यांनी खूपच छान मांडला. ते म्हणाले की “आम्ही जो धर्म मानतो, तोसुद्धा आम्हाला पूर्णपणे माहीत नाही आणि ज्या धर्माशी आमचे वैर आहे, त्याचीदेखील आमची माहिती अपूर्ण आहे. म्हणून आमची मोहब्बत तर आंधळी आहेच, तशीच आमची दुश्मनीदेखील आंधळी आहे. प्रथम आपण आपला धर्म योग्य प्रकारे समजून घेऊ आणि मग मोहब्बत किंवा नफरत करू. धर्मपालन केल्याने शांती मिळते.”
 
 
या कार्यक्रमावर भाष्य करताना संघाचे वरिष्ठ प्रचारक, कार्यकारिणी सदस्य आणि मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे संरक्षक आणि मार्गदर्शक डॉ. इंद्रेश कुमार म्हणाले की “हा कार्यक्रम अनेक दृष्टींनी महत्त्वाचा आणि ऐतिहासिक होता. या कार्यक्रमात सुमारे एक ते दीड हजार मुस्लीम बंधू, तर 800च्या वर हिंदू उपस्थित होते. इतक्या मोठ्या मुस्लीम श्रोत्यांसमोर सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांचे प्रथमच भाषण झाले, ज्याचा संदेश सकारात्मक गेला. मुस्लीम समाजासाठी आणखी एक रस्ता या निमित्ताने खुला झाला आहे.”
 
 
 
काही लोकांनी सोशल मीडियावर या अनुवादासंबंधी प्रश्न उपस्थित करून सरसंघचालकांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया देताना इंद्रेश कुमार म्हणाले की “अशी मंडळी कायम नफरतीच्या वातावरणात राहत असतात. त्यांना अशा कार्यक्रमाचे महत्त्वच कळत नाही.” या अनुवादाला महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद, कैलाशानंद, स्वामी रामदेव, श्री श्री रविशंकर, स्वामी ज्ञानानंद यांच्यासारख्या आध्यात्मिक क्षेत्रातील अग्रगण्य संतमहात्म्यांनी आशीर्वाद दिला आहे. कार्यक्रमातदेखील ही सर्व संत मंडळी उपस्थित होती.
 
 
 
वास्तविक हा कार्यक्रम म्हणजे एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे. सरसंघचालकांचे विचार मोठ्या प्रमाणात मुस्लीम समाजात प्रथमच या निमित्ताने गेले आहेत. यामुळे एका अशा नवीन परंपरेची सुरुवात झाली आहे, ज्याने मुसलमानांना याची जाणीव करून दिली की जर औरंगजेबाने आपल्या वडिलांना कैदेत टाकणे, भावांची हत्या करणे अशी क्रूर कर्मे केली नसती, तर देशात बंधुभावाचे एक वातावरण तेव्हाच निर्माण झाले असते.
 
 
 
पण दारा शिकोहचे बलिदान व्यर्थ गेले नाही. या देशाला रस खान, रहीम, कबीर अशा मुस्लीम संतांची एक श्रेष्ठ परंपरा लाभली. या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे आज समन्वयाचा एक प्रवास पुन्हा प्रारंभ झाला आहे, ज्यातून एक असा भारत निर्माण होईल, जिथे धर्मांतरण, लव्ह जिहाद यासारख्या घटना होणार नाहीत. आज जिथे लोकांना भडकविण्याचे, धार्मिक तणाव निर्माण करण्याचे कारस्थान सुरू आहे, अशा वेळी सामवेदाचा हा समन्वयाचा संदेश या कार्यक्रमाद्वारे दिला गेला आहे. ही या कार्यक्रमाची मोठीच उपलब्धीच आहे.
 
 
लेखक न्यूज भारती डॉट कॉमचे संपादक आणि मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संयोजक आहेत.