वज्रमूठ घट्ट होईल का?

विवेक मराठी    07-Apr-2023   
Total Views |
उद्धव ठाकरे यांनी वज्रमूठ सभेत आपला हिंदुत्ववादी बाणा दाखवण्याचा प्रयत्न केला. हिंदुत्वाचा सूर आळवला, वीर सावरकरांवर बोलले. या वेळी हिंदुत्वावर बोलताना व्यासपीठावर बसलेल्या अफजलखानाच्या उरुसाला परवानगी देणार्‍या आणि टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करणार्‍या नेत्यांना हिंदुत्व पचेल का, याचा विचार ठाकरे यांनी केला का? व्रजमूठ ही एकीची असते, एका विचाराची असते, एका ध्येयाची असते. शिवसेना-भाजपाने बाळासाहेब ठाकरे आणि अटलजींच्या नेतृत्वात 25 वर्षे अशी वज्रमूठ ठेवली होती. आजची महाविकास आघाडीची वज्रमूठ फक्त मतांच्या जोगव्यासाठी आहे, हिंदुत्वासाठी नाही, असे दिसून येत आहे.

shivsena
 
डिसेंबर 2022मध्ये मुंबईमध्ये महाविकास आघाडीतर्फे हल्लाबोल मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चाला गर्दी जमवण्यात महाविकास आघाडी अयशस्वी ठरली होती. असाच काहीसा प्रकार छ. संभाजीनगरमध्ये दि. 2 एप्रिल रोजी घडला. छ. संभाजीनगर येथे महाविकास आघाडीतर्फे वज्रमूठ सभा झाली. निवडणूक प्रचार वगळता महाविकास आघाडीच्या शक्तिप्रदर्शनाची सर्वात मोठी सभा म्हणता येईल. तीन पक्षांची एकत्र ताकद पाहता ही सभा अयशस्वी झाली असेच म्हणावे लागेल, कारण तीन पक्ष एकत्र येत असतील तर सभेचा आवाका मोठा हवा होता. पण तेच झालेले दिसले नाही. तसे पाहिले, तर मराठवाड्यात या तिन्ही पक्षांचा बर्‍यापैकी प्रभाव होता. संभाजीनगर हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. बाळासाहेबांना मानणारा मोठा गट या भागात होता. तर राष्ट्रवादीची, काँग्रेसचीही ताकद येथे आहे. तरीही एवढी कमी गर्दी असलेली सभा हे तिन्ही पक्षांची ताकद कमी झाल्याचे द्योतक आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे तीन पक्ष एकत्र आले, तरीही भाजपाला आव्हान देऊ शकेल एवढे त्यांचे सामर्थ्य अजूनही नाही, हे अधोरेखित झाले आहे.
 
 
वज्रमूठ कोणाची?
 
मीडियातून वज्रमूठ सभेचा मोठा गाजावाजा झाला. सभेतील भाषणे लाइव्ह झाली. सभेआधी माध्यमांनीही वातावरणनिर्मिती केली. या सभेसाठी व्यासपीठावरील बॅकड्रॉपवर तिन्ही पक्षांचे लोगो होते. पण उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व दाखवणारे चित्र होते. सभास्थळावरील बॅनरवरही त्यांचेच मोठे फोटो लावलेले होते. यावरून ही सभा महाविकास आघाडीची आहे की उध्दव गटाची आहे? अशी शंका उपस्थित होत होती. जर महाविकास आघाडीची सभा असेल, तर तिघांचेही फोटो समसमान हवे होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा नेत्यांचे मोठे फोटो लावणे टाळले. त्यामुळे यापुढे महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. दोन महिन्यांपूर्वी विभानसभा आवारातील पत्रकार परिषदेतील डोळा मारणार्‍या प्रसंगासारखे हे होते का? असा ही प्रश्न उपस्थित होतो. आज उद्धव ठाकरेंना मोठेपण दिले जात आहे, पण जागा वाटपाच्या वेळी मात्र ठेंगा तर दाखवणार नाही ना? जसे राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना मान दिला आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना सर्व चांगली मंत्रिपदे, जास्त निधी वाटप अशीच रणनीती नसणार ना? अशी शंका उपस्थित होते. कारण आता उद्धव गटामध्ये फक्त 16 आमदार उरले आहेत. 4 खासदार उरले आहेत, पक्षाचे नाव व चिन्ह गेले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांपेक्षा उद्धव ठाकरे गटाची बिकट अवस्था आहे. अशा स्थितीत शरद पवार आणि राहुल गांधी हे उद्धव गटाला महाविकास आघाडीचे नेतृत्व देतील का?
 
 
सभा महाविकास आघाडीची, भाषण हिंदुत्वाचे
 
 
उद्धव ठाकरेंनी खेड, मालेगाव भाषणाची तीच स्क्रिप्ट पुन्हा वाचली. मिंधे, गद्दार, खोके, ओके हे त्यांचे ठरलेले भाषण करून सभेत रंग भरण्याचा प्रयत्न केला. दसरा मेळाव्याच्या भाषणापासून त्यांची ही शिवराळ भाषणे सुरू आहेत. त्याच भाषणात काही दोन-चार वाक्ये नवीन घेऊन पुन्हा तेच रटाळ भाषण केले. खरे तर ही सभा महाविकास आघाडीची होती. आम्ही तीन पक्ष मिळून काय केले, काय करणार आहोत? याची मांडणी करायला हवी होती. ही व्रजमूठ का आहे, ही मांडणी हवी होती. तसेच संभाजीनगरमधील काही प्रश्न, मराठवाड्यातील काही प्रश्न या निमित्ताने मांडायला हवे होते. पण तसे न करता, लोकशाही कशी धोक्यात आहे याची मांडणी केली. खरे तर “माझ्या तमाम हिंदू बांधवांनो” अशी सुरुवात करूनच उद्धव ठाकरे यांनी वज्रमूठ सभेत आपला हिंदुत्वादी बाणा दाखवण्याचा प्रयत्न केला. हिंदुत्वाचा सूर आळवला, वीर सावरकरांच्या विचारांवरून भाजपाला टोमणे मारले, पण राहुल गांधी सावरकरांचा अपमान करतात त्यावर मात्र एक शब्दही बोलले नाहीत. तसेच हिंदुत्वावर बोलताना, व्यासपीठावर बसलेल्या अफजलखानाच्या उरुसाला परवानगी देणार्‍या आणि टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करणार्‍या नेत्यांना हिंदुत्व पचेल का, याचा विचार त्यांनी केला का? व्रजमूठ ही एकीची असते, एका विचारांची असते, एका ध्येयाची असते. शिवसेना-भाजपाने बाळासाहेब ठाकरे आणि अटलजींच्या नेतृत्वात 25 वर्षे अशी वज्रमूठ ठेवली होती. आजची महाविकास आघाडीची वज्रमूठ फक्त मतांच्या जोगव्यासाठी आहे. हिंदुत्वासाठी नाही, असे दिसून येत आहे.
 

shivsena 
 
त्यामुळे राज्यात उद्धव ठाकरे गटाचे बेगडी हिंदुत्व आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचे मुस्लीम तुष्टीकरण यातून कार्यकर्त्यांची वज्रमूठ नक्की होईल का? याचे उत्तर येणार्‍या काळात पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
 
 
महाविकास आघाडीचे दिवास्वप्न
 
 वज्रमूठ सभेत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नसल्याने व्यासपीठावर आवेशात बोलण्याची नामी संधी मिळाली. त्यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे गुणगान गायले. तसेच महाराष्ट्रात महविकास आघाडीचे 34 खासदार निवडून येतील असे दिवास्वप्न दाखवले. एकेकाळी महाराष्ट्रात ज्या काँग्रेसचे 40 खासदार निवडून येत होते, त्यांचे आज तिन्ही पक्ष मिळून 34 खासदार निवडून येतील असे भाकीत करून पुरतीच लाज काढली आहे. अजित पवार यांनी महाविकास आघाडी कसे चांगले काम करीत आहे, याचे गुणगान गायले. एकंदरीत काय, तिन्ही नेत्यांच्या भाषणात कार्यकर्त्यांमध्ये स्फुरण चढेल अशी ऊर्जाच नव्हती. त्यामुळे वज्रमूठ सभेत नेत्यांनी किती आवेशात येऊन भाषणे केली, तरी भाजपाला आव्हान देण्याचे सामर्थ्य आज दिसून येत नाही.
 
 
वज्रमुठीत समन्वयाचा अभाव
 
ही वज्रमूठ कार्यकर्त्यांच्या अगोदर नेत्यांमध्ये हवी आहे. कारण राहुल गांधी सावरकरांचा द्वेष करातात, तर शिवसेना सावरकरप्रेमी आहे. संजय राऊत यांच्या विधानांची अजित पवारच खिल्ली उडवत असतात. काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांचे पटोलेप्रेम आता सर्वश्रुत झाले आहे. शिवसेनेने वंचितला सोबत घेतले आहे, पण प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावरच टीका करीत असतात. तसेच तिन्ही पक्षांची सर्वात मोठी सभा म्हटल्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित राहणे अपेक्षित होते. पण ते गैरहजर राहिले. जर ते उपस्थित राहिले असते, तर ही सभा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतली असती का? असाही सवाल उपस्थित होत आहे.