हिंदूफोबियाचा जाहीर निषेध करणारेजॉर्जिया

विवेक मराठी    07-Apr-2023   
Total Views |
पाश्चात्त्य देशांत हिंदूंबद्दल वाढत असलेला द्वेष विविध रूपांत दिसतो. हिंदू समाजाचा होत असलेला उत्कर्ष हेच तर हिंदूफोबियाचे/हिंदुद्वेषाचे कारण आहे असे म्हणायला हरकत नाही. या सर्वांवर उत्तर म्हणजे हिंदू संघटनांनी एकमेकांच्या संघटनात्मक ध्येयांचा आदर राखत, एकमेकांबरोबर समान आव्हांनासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, त्याचे परिणाम हळूहळू सकारात्मकतेकडे झुकतील. जॉर्जियाच्या लोकप्रतिनिधीगृहाकडून संमत झालेला ठराव हे असेच एक बोलके यश आहे.
 
Hinduphobia
 
दि. 27 मार्च 2023 रोजी जॉर्जिया या अमेरिकेतील दक्षिणेकडील राज्याच्या प्रतिनिधीगृहाने हिंदू तिरस्कार, हिंदू द्वेष - ज्याला इंग्लिशमध्ये ‘हिंदूफोबिया’ असे म्हटले जाते, त्याचा जाहीर निषेध करत फोर्सिथ या जिल्ह्याच्या प्रतिनिधींनी आणलेला ठराव सर्वसंमतीने मंजूर करून घेतला. असे करणारे ते अमेरिकेतील पहिले राज्य. अमेरिकेमध्ये गुण्यागोविंदाने राहणार्‍या आणि अमेरिकेस कर्मभूमी मानून या देशाच्या सर्वांगीण समृद्धीस मनापासून हातभार लावणार्‍या हिंदू समाजासाठी हा एक महत्त्वाचा क्षण होता.
 
 
 
वर उल्लेखल्याप्रमाणे फोबिया या शब्दाचा अर्थ ‘तिरस्कार’ असा होतो अथवा अकारण वाटणारी भीती असादेखील होतो. कधीकधी या काहीशा भिन्न वाटणार्‍या अर्थांना एकत्रित करत, अकारण वाटणार्‍या भीतीचे तिरस्कारात अथवा द्वेषात रूपांतर होणे असादेखील होतो. सध्या अमेरिकेत आणि एकूणच पाश्चात्त्य जगतात अशा अनामिक भीतीतून आणि हेतुपुरस्सर खोटी माहिती पसरवण्याच्या मोहिमेतून (disinformation campaignमधून) हिंदुविरोध, हिंदुद्वेष, हिंदू तिरस्कार यांचे मिश्रण कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये दिसते.
 
 
गेल्या काही वर्षांत अमेरिकन हिंदू समाजास आणि व्यक्तिगत स्तरावर काही व्यक्तींना हिंदुद्वेषाचा अनुभव आलेला आहे. न्यूयॉर्कपासून ते कॅलिफोर्नियापर्यंत अनेक घटना घडलेल्या आहेत.
 
 
न्यू जर्सी राज्यामधील रटगर्स या विद्यापीठामधील समाजशास्त्रीय संशोधन करणार्‍या संशोधक-प्राध्यापकांनी, गेल्या वर्षी देशात वाढत जाणार्‍या हिंदूफोबियावरून एक शास्त्राधारित संशोधन प्रसिद्ध केले होते. या संशोधनानुसार हिंदूंबद्दल वाढत असलेला द्वेष हा विविध रूपांत दिसतो. त्यामध्ये हिंदू धर्मसंस्कृतीवर टीका करणारे लेखन, समाजमाध्यमात येणारी हिंदूंवरील व्यंगचित्रे, भारतीय वर्तमानातील समाजकारण आणि राजकारण यांचे चुकीचे विश्लेषण करून हिंदू समाज हा कसा हिंसक, द्वेषी, असहिष्णू आहे अशी आवई उठवून देणे असे अनेक प्रकार घडत असतात, असे दाखवून दिले आहे.
 
 
हिंदू समाजाबद्दल भीती तयार करताना काही ठरावीक मुद्दे वापरलेले दिसू शकतात. यावरून मग नखाच्या चित्रावरून रावण काढण्याचा प्रकार यातून चालू होतो. भारतीयांसहित पौर्वात्य राष्ट्रांमध्ये सहजतेने वापरले जाणारे इंग्लिश शब्द nationalism अथवा  nationalist हे पाश्चिमात्य देशांमध्ये हिटलर आणि नाझी जर्मन राजवटीसंदर्भात वापरले जातात. त्याचा गैरफायदा घेत हिंदूंची आणि हिंदू संघटनांची बदनामी केली जाते. दुसरीकडे शाळांमध्ये जगाचा इतिहास शिकवताना हिंदू धर्म आणि हिंदू धर्मीयांमधील जातिभेद, आता अस्तित्वात नसलेली सतीची प्रथा आदी नकारात्मक गोष्टी शिकवल्या जातात. परिणामी हिंदू शाळकरी मुलांना स्वधर्माबद्दल न्यूनगंड तयार होतो, तर इतरधर्मीय मुलांना स्वधर्माबद्दल अहंगड आणि हिंदू वर्गमित्रांबद्दल कमीपणा वाटू लागतो आणि वाढत्या वयात हिंदूफोबिक वृत्ती वाढू लागते. सभोवतालच्या जगात असा हिंदूफोबिया सहज पसरतो, तो हिंदू देवळांची विटंबना, सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर हिंदूंना कमी लेखणारे अथवा दम देणारे संदेश अशा अनेक प्रकारांमुळे अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आदी प्रगत राष्ट्रांमध्ये विविध स्तरांवर हिंदुद्वेष वाढताना दिसतो.
 
 
हे असे का घडावे? - हिंदूफोबिया का तयार झाला?
 
 
हा प्रश्न अमेरिकेतीलच कशाला, भारतातील भारतीय मनालादेखील पडू शकतो. त्याची कारणेदेखील अनेक आणि संमिश्र आहेत. अमेरिकेत आज एकूण लोकसंख्येच्या सुमारे 1% इतकेच हिंदू आहेत. अथवा आकडेवारीचा विचार केल्यास लक्षात येईल की साधारण 33.4 लाख इतकेच आहेत. एवढ्या लहान लोकसंख्येच्या समाजात आज गूगल-मायक्रोसॉफ्टच्या प्रमुखांपासून ते अनेक उद्योगांचे प्रमुख, प्रसिद्ध डॉक्टर्स, अर्थशास्त्रज्ञ, वैज्ञानिक, संशोधक, विद्यापीठातील प्राध्यापक, पत्रकार, केंद्र-राज्य-स्थानिक स्तरावर सरकारी अधिकारी, राजकारणी असे सर्वत्र हिंदू दिसतील. त्याव्यतिरिक्त भारतातून 2021-22मध्ये आलेले जवळपास 9.5 लाख विद्यार्थी आज अमेरिकन विद्यापीठांना आर्थिक साहाय्य देत आहेत. आज अमेरिकेत राष्ट्रीय लोकसंख्येच्या केवळ 1% असलेला हिंदू समाज हा देशातील सगळ्यात श्रीमंत अल्पसंख्य समाज ठरलेला आहे.
 
 
 
हिंदूंची धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना नसलेले कदाचित एखादेच अमेरिकन राज्य दिसेल. यात जशी विविध भाषक मंडळे आहेत, तशाच अमेरिकन कर्मभूमीत हिंदूंसाठी आणि सभोवतालची जनतेसाठी मदतीचा हात पुढे करून ‘नर सेवा नारायण सेवा’ म्हणत हिंदू स्वयंसेवक संघ, सेवा इंटरनॅशनल, एकल यूएसए, अनेक देवळे इथपासून ते हिंदू अमेरिकन फाउंडेशन, Coalition ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका (COHNA/कोहना) अशा मानवी हक्क संघटनादेखील आहेत. ह्या संघटना जसे त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात हिंदूंसाठी काम करतात, तसेच अडीअडचणीस आपल्या समाजाबाहेर पाहून मदतीचा हात देण्यात पुढे असतात. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून एक समर्थ आणि उदार असे हिंदू समाजाचे चित्र तयार झाले आहे.
 
जॉर्जियाच्या हिंदूफोबियाविरोधी ठरावामध्ये वर उल्लेखलेले अमेरिकन हिंदूंचे सामाजिक यश सुरुवातीसच नमूद केले आहे. त्याव्यतिरिक्त योगसाधना, अन्नपदार्थ, संगीत, कला आदीमधल्या हिंदू समाजाच्या योगदानाचे कौतुक केले आहे. हिंदूंवर होणारे वैचारिक आणि प्रत्यक्ष हल्ले यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हिंदूफोबिया ह्या शब्दाची काळजीपूर्वक व्याख्या नमूद केली आहे, ज्यानुसार हिंदूफोबिया म्हणजे Aset of antagonistic, destructive, and derogatory attitudes and behaviors towards Sanatana Dharma (Hinduism) and Hindus that may manifest as prejudice, fear, or hatred; मराठीत - सनातन धर्म (हिंदू धर्म) आणि हिंदूंबद्दल विरोधी, विध्वंसक आणि अपमानास्पद वृत्ती आणि वर्तन जे पूर्वग्रह, भीती किंवा द्वेष म्हणून प्रकट होऊ शकते.
 
 
 
असे लक्षात येते की असा पद्धतशीर हिंदुद्वेष पसरवणारे हे स्थानिक अभारतीय वंशापेक्षाही - अमेरिकनांपेक्षाही अधिक, बर्‍याचदा भारतीय डाव्या चळवळीतून आलेले असतात. एकीकडे अशा लोकांनी साम्यवादास जवळ केलेले असते आणि दुसरीकडे भांडवलवादी अमेरिकेत येऊन बस्तान बसवलेले असते. तरीही साम्यवादाशी घेतलेल्या जुन्या आणाभाका न विसरल्यामुळे म्हणा अथवा भारतात धार्मिकतेला, पर्यायाने हिंदू धर्माला आणि धर्मीयांना टीकेचे लक्ष्य करण्याची जन्मजात सवय म्हणून म्हणा.. अशा वैचारिक संघटनांचे काम केवळ नकारात्मकतेच्या गर्तेत अडकून हिंदू आणि हिंदू धर्मीयांना नावे ठेवणे, त्यांचा अपप्रचार करणे इतक्याशीच मर्यादित राहिले आहे. फारतर एखादी हिंदूविरोधी कॉन्फरन्स करून, त्या निमित्ताने सोशल मीडियामध्ये मिरवून घेण्याची हौस भागवता येते आणि नंतर तेच संदर्भ परत परत वापरून हिंदू विरोध जागृत ठेवता येतो.
 
 
हिंदुद्वेष केवळ अमेरिकेतच दिसला आहे असे नाही, तर इतर पाश्चात्त्य देशांमध्येसुद्धा दिसतो. देवळांची विटंबना हे त्याचे एक रूप असते, तर दुसरे रूप हे अ‍ॅकॅडमिक क्षेत्रात राजकीय वापर करून हिंदू विचार येऊ द्यायचे नाहीत असे असते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या जगप्रसिद्ध संस्थेत करण कटारिया या विद्यार्थ्याने स्टुडंट युनियनच्या जनरल सेक्रेटरीच्या पदाच्या निवडणुकीसाठी प्रयत्न केला. पण त्याला हिंदू nationalist असे संबोधत त्याचा अर्ज रद्दबातल केला. काही वर्षांपूर्वी रश्मी सामंत या ऑक्स्फर्डमध्ये शिकणार्‍या विद्यार्थिनीसंदर्भात अशीच गोष्ट झालेली होती. ऑस्ट्रेलियात काही देवळांवर हल्ले केले गेले. कॅनडामध्येसुद्धा हिंदूफोबिया विविध पद्धतींनी नजरेस आला आहे.
 
 
अमेरिकन हिंदू समाजाचा होत असलेला उत्कर्ष हेच तर हिंदूफोबियाचे/हिंदुद्वेषाचे कारण नसेल ना.. असा प्रश्न पडतो. ते काही प्रमाणात वास्तव आहे. पण मग पुढचा प्रश्न पडतो की हिंदूंनी काय आपला उत्कर्ष कमी करावा, की संपूर्ण हिंदू समाजाने, या आचार-विचारस्वातंत्र्य असलेल्या देशात मूग गिळून गप्प बसावे? अर्थातच ‘नाही’ असेच त्याचे उत्तर आहे.
 
 
हिंदू संघटनांनी एकमेकांच्या संघटनात्मक ध्येयांचा आदर राखत, एकमेकांबरोबर समान आव्हांनासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. केवळ साम्यवादी संघर्ष हेच या आव्हानांना उत्तर नसते, तर जनसंपर्क आणि लोकशिक्षणदेखील असते. ते जितके प्रभावी होते, तितके आपले केवळ सुहृद अधिक होतात, आणि आपल्यासमोर झालेल्या या कृत्रिम आणि तरीदेखील वास्तव असलेल्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी इतर समुदायांकडून पाठिंबा मिळतो.
 
 
 
जॉर्जियाच्या लोकप्रतिनिधीगृहाकडून संमत झालेला ठराव हे असेच एक बोलके यश आहे.