पवारांची धोबीपछाड कोणाला?

विवेक मराठी    10-May-2023   
Total Views |
@रवींद्र गोळे
  शरद पवारांनी आपल्या पदत्यागाची घोषणा केली आणि पुन्हा ती घोषणा मागेही घेतली. सदैव धक्का तंत्राचा वापर करून आपले स्थान अधिक घट्ट करण्यासाठी शरद पवारांनी याआधीही असे निर्णय फिरवले आहेत. “पक्षात नव्या पिढीला संधी मिळाली पाहिजे” असे म्हणत शरद पवारांनी करपलेली भाकरी फिरविण्याचा प्रयत्न केला आणि आपल्यासमक्ष पक्ष आपल्या हातून निसटून जातो आहे, हे लक्षात येताच पुन्हा राजकीय पटलावर स्वत:चे नेतृत्व अधोरेखित केले. घडवून आणलेल्या राजीनामा नाट्यातून शरद पवारांनी एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य करून घेतल्या.
 
vivek
 
आपल्या निर्णयावर ठाम न राहता शरद पवारांनी पुन्हा सक्रिय राजकारणाचे सूतोवाच केले आणि तातडीने पंढरीला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतले. पुढे मुसळधार पावसात सोलापूरला जाऊन कार्यकर्त्यांच्या घरच्या लग्नात हजेरी लावली. दोन मे रोजी ‘लोक माझा सांगाती’ या आपल्या आत्मकथनाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केली होती. आणि अवघ्या काही दिवसांत त्यांनी आपल्या घोषणेपासून घूमजाव केले. निवृत्तीची घोषणा ते परत सक्रीय राजकारणाचा संकल्प या काळात अनेक गोष्टी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षपद नव्या नेतृत्वाकडे देण्याची भूमिका शरद पवार यांनी घेतली आणि त्या क्षणापासून राजकीय पटलावर पवार समर्थकांनी, पवारनिष्ठांनी प्रसारमाध्यमांतून रतीब सुरू केला. शरद पवारांनी केलेले बेरजेचे राजकारण, त्यांना असलेले सामाजिक भान यावर रकानेच्या रकाने लिहिले गेले. पवारांची राजकीय दूरदृष्टी हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भवितव्य नक्की करण्यासाठी आणि पक्षासह आपल्या समर्थकांचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पवारांनी केलेली ही खेळी होती का? याचा राजकीय विश्लेषक विचार करत आहेत. पवारांची ही खेळी यशस्वी झाली का, त्यांना अपेक्षित असणारा परिणाम साधला का? हे पुढील काळात स्पष्ट होईल. या राजीनामा नाट्यातून शरद पवारांनी कोणता संदेश दिला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. शरद पवारांनी आपल्या पदत्यागाची घोषणा केली आणि एकाधिकारशाहीनुसार चालणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवे नेतृत्व कोणाकडे, याचा अंदाज लावण्याची होड लागली. शरद पवारांचा राजकीय वारस कोण? या प्रश्नाचे उत्तर शोधताना स्वाभाविकपणे पवार कुटुंबीयापैकी कोण? असा उपप्रश्नही चर्चिला गेला होता.
 
शरद पवारांनी पदत्यागाची घोषणा केल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या चेहर्‍यावर हास्य होते, तर अजित पवारांनी पक्ष ताब्यात आल्यासारखा व्यवहार सुरू करून ‘आता मीच’ ही भूमिका अधोरेखित केली होती. पण राज्यभरातील कार्यकर्त्यांनी दबाव आणला, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील चक्क रडले, जितेंद्र आव्हाड यांचाही गळा दाटून आला, कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले.. शेवटी 72 तासांनी शरद पवारांनी आपला निर्णय मागे घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तहहयात अध्यक्ष म्हणून ते पुन्हा सक्रिय काम करू लागले. पवारांनी आपल्या पदत्यागाची घोषणा केली, तो घटनाक्रम पुन्हा एकदा पाहिला तर लक्षात येते की पवार कुटुंबीयांना पवारांच्या निर्णयाची पूर्वकल्पना होती. अजित पवार, सुप्रिया सुळे यांचा वावर लक्षात घेतला, तर उत्तराधिकारी म्हणून आपली घोषणा होईल अशी अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनाही खात्री वाटत होती. आणि म्हणून शरद पवारांनी पदत्यागाची घोषणा केल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या चेहर्‍यावर हास्य होते, तर अजित पवारांनी पक्ष ताब्यात आल्यासारखा व्यवहार सुरू करून ‘आता मीच’ ही भूमिका अधोरेखित केली होती. पण राज्यभरातील कार्यकर्त्यांनी दबाव आणला, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील चक्क रडले, जितेंद्र आव्हाड यांचाही गळा दाटून आला, कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले.. शेवटी 72 तासांनी शरद पवारांनी आपला निर्णय मागे घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तहहयात अध्यक्ष म्हणून ते पुन्हा सक्रिय काम करू लागले. या सार्‍या राजीनामा नाट्यातून शरद पवारांनी काय साध्य केले? आपला राजीनामा देताना त्यांनी कोणाला पुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि राजीनामा मागे घेऊन कोणाचे पंख कापले? याचा अन्वयार्थ लावायला हवा.
 
 
 
खरे तर काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष प्रादेशिक पक्ष झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष हे पदच संदर्भहीन झाले होते. जे पद संपुष्टात आले आहे, त्याचा राजीनामा देऊन शरद पवारांनी आपण मोठा त्याग करत असून नव्या पिढीला नेतृत्वाची संधी देत असल्याचा आभास निर्माण केला. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष जयंतराव पाटील हे पक्षाचे प्रमुख ठरले. अशा वेळी आपल्या नेतृत्वाखाली पक्ष काम करत आहे, आपल्याला पर्याय नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध करण्याची आवश्यकता होती. त्याचबरोबर राष्ट्रीय राजकारणात आपण अजूनही आहोत, हे अधोरेखित करण्याची आवश्यकता होती. भविष्यात मोदींविरोधात देशभरातील सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले, तर त्याचे नेतृत्व आपल्याकडे आले पाहिजे आणि त्यासाठी आपले अस्तित्व राजकीय पटलावर अधोरेखित झाले पाहिजे, हे लक्षात घेऊन तर शरद पवारांनी राजीनामा नाट्य घडवून आणले नसेल ना? देशाला सक्षम विरोधी पक्षनेत्याची गरज असली, तरी ती संधी शरद पवारांना मिळेल का? पवारांना देशाचे पंतप्रधान व्हायचे आहे. शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा केली, तेव्हा “तुम्ही मोदींना पराभूत करण्यासाठी तरी राजीनामा देऊ नका” असे एक कार्यकर्ता बोलला होता. मोदींना पराभूत करण्याची क्षमता पवारांकडे आहे की नाही, हे काळ ठरवेल.पण आपल्या राजीनाम्याची घोषणा करून अडगळीत गेलेला आपला पक्ष आणि स्वत:चे नेतृत्व शरद पवारांनी प्रकाशझोतात आणले. ममता बॅनर्जी, नितीश कुमार, चंद्रशेखर राव, अरविंद केजरीवाल अशांच्या मांदियाळी आपण वरिष्ठ आहोत, पर्यायाने सर्वाचे नेते आहोत हे तर शरद पवारांनी दाखवून दिले नाही ना?
 

vivek 
 
शरद पवारांचा राजकीय पक्ष हा एकाधिकारशाहीने चालणारा पक्ष आहे. पक्षांच्या स्थापनेपासून शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत. शाहू-फुले-आंबेडकर यांचा वारसा सांगणार्‍या शरद पवारांनी आपल्या पक्षात लोकशाही प्रस्थापित होऊ दिली नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांना लोकशाहीच्या आधारे पक्ष चालवायचा असता, तर 1998पासून स्वत: कायम अध्यक्षपदी राहिले नसते. नवे नेतृत्व ही आजची गरज आहे की शरद पवारांनी नवे नेतृत्व जाणीवपूर्वक निर्माण केले नाही? या प्रश्नाचे उत्तर ‘जाणता राजा’ म्हणून शरद पवारांचा गौरव करणारे देतील का? आपला उत्तराधिकारी कोण हे लोकशाही मार्गाने ठरवण्याऐवजी मुलगी की पुतण्या या द्विधेत शरद पवार का अडकून पडले? या प्रश्नाचे उत्तर कधीच कोणी देत नाही. पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दोन गट कायम कार्यरत राहिले आहेत - एक शरद पवारांचा आणि दुसरा अजित पवारांचा. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना व्हायच्या आधीपासून अजित पवारांनी स्वत:चा वेगळा गट निर्माण केला होता. अजित बिग्रेड नावाने तरुण कार्यकर्ते अजित पवारांची पाठराखण करत असत. परखड बोलणे आणि बेधडक वागणे यामुळे अजित पवारांची लोकप्रियता वाढली आहे. पण अजित पवार हे शरद पवारांसाठी कायम बेभरवशाचे राहिले. परिणाम म्हणून अजित पवारांनी याआधीही आपला वेगळा सवतासुभा मांडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर ताबा कुणाचा, हा नेहमीच संघर्षाचा विषय राहिला आहे. वर वर एकसंघ वाटणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्ता संघर्षाची शिकार झालेली आहे. अशा परिस्थितीत अजित पवारांना जागा दाखवून देण्याची गरज शरद पवारांना वाटली नसेल, तर नवलच. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी पक्षाचे किती कार्यकर्ते उभे राहतील, याचाही शरद पवारांनी या निमित्ताने अंदाज घेतला असावा. आजतरी महाराष्ट्रात पक्षात अजित पवार हेच दुसर्‍या स्थानावर आहेत, हे अजित पवारांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. या सार्‍या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा करून पक्षांतर्गत शक्तिपरीक्षण केले आहे.
 
अजित पवारांना जागा दाखवून देण्याची गरज शरद पवारांना वाटली नसेल, तर नवलच. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी पक्षाचे किती कार्यकर्ते उभे राहतील, याचाही शरद पवारांनी या निमित्ताने अंदाज घेतला असावा. आजतरी महाराष्ट्रात पक्षात अजित पवार हेच दुसर्‍या स्थानावर आहेत, हे अजित पवारांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. या सार्‍या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा करून पक्षांतर्गत शक्तिपरीक्षण केले आहे. अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्याशिवाय पक्षाचे नेतृत्व करेल असे दुसरे नाव शरद पवार यांच्यासमोर सध्यातरी नाही. महाराष्ट्रात विशेषत पश्चिम महाराष्ट्रात असलेला पक्षाचा प्रभाव शरद पवारांना संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण करता आला नाही. जागोजागी सुभेदार उभे करून त्यांना पाठबळ देणार्‍या शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आजवर कधीही शंभर आमदार निवडून आले नाहीत. अशा परिस्थितीत पक्षाचे भवितव्य काय असेल यांची चिंता शरद पवार यांना नक्कीच सतावत असेल. ज्यांच्याकडे राज्यात नेतृत्व आहे, असे जयंतराव पाटील यांनी पवारांशिवाय पक्षाला अस्तित्व शिल्लक राहणार नाही अशी कबुली देऊन आपण भविष्यात पक्ष चालवण्यासाठी नालायक आहोत हे सिद्ध केले आहे आणि त्यांना बैठकीत न बोलवून शरद पवारांनी त्यांच्या नालायकपणावर शिक्कामोर्तबच केले आहे. एकूणच काय, तर शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेतृत्व करण्यासाठी शरद पवारांशिवाय दुसरे कोणी योग्य नाही, हे सिद्ध झाले आहे. शरद पवारांचा आजवरचा राजकीय प्रवास हा कायम बिनभरवशाचा राहिला आहे. बाळासाहेब ठाकरे त्यांना ‘तेल लावलेला बारामतीचा पहिलवान’ म्हणत असत. या राजीनामा नाट्यातून शरद पवारांनी अनेकांना धोबीपछाड देण्याचा प्रयत्न केला आहे, हे मात्र नक्की.

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001