गडचिरोलीची मधकन्या

विवेक मराठी    19-May-2023   
Total Views |
गडचिरोलीच्या जंगलात नक्षलींच्या वीषपेरणीला न जुमानता प्राजक्ता अदमाने कारू या युवतीने मधुमक्षिकापालनाचा व्यवसाय उभा केला आहे. 2016 साली 100 मधपेट्यांपासून व्यवसायाला सुरुवात केली. या माध्यमातून विदर्भातील 11 जिल्ह्यांना मधपेट्या वसाहती पुरवणारी एक यंत्रणा उभी केली आहे. तिची ही कहाणी आदिवासी आणि विदर्भातील शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. जागतिक मधमाशी (20 मे) दिनानिमित्त तिची कहाणी सांगणारा हा लेख.

vivek
 
प्राजक्ता मूळची गडचिरोलीची. वडील बिल्डिंग मटेरियल सप्लायर, तर आई शिक्षिका. प्राजक्ताचे बारावीपर्यंतचे शिक्षण गडचिरोलीत झाले. त्यानंतर तिने नागपूर येथून औषधनिर्माण पदवीचे शिक्षण घेतले. पुण्यात मार्केटिंगमध्ये एमबीएची पदवी पूर्ण केली. शिक्षण पूर्ण करून तिने पुण्यात काही वर्षे नोकरी केली. मात्र तिने गावाकडे येऊन जीवविविधतेचा अभ्यास करून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. लहानपणी तिने जंगलामध्ये आदिवासी लोकांना मध गोळा करताना पाहिले होते. या व्यवसायाची ओढ लक्षात घेऊन तिने त्यानंतर तिने या व्यवसायासंबंधी माहिती मिळवण्यास सुरुवात केली. तिने वनउपज संबंधित मधमाशीपालनासारखा वेगळ्या व्यवसायाची निवड केली. तिच्या या निर्णयाबद्दल आईवडील अनुकूल नव्हते. परंतु जिद्दी प्राजक्ताने शर्थीचे प्रयत्न करून या व्यवसायाला सुरुवात केली. तिने या विषयाची पुस्तके वाचली, अभ्यास केला. दिल्ली येथील मधुमक्षिकापालन केंद्रात जाऊन रीतसर प्रशिक्षण घेतले.
 
 
2016 या वर्षी अडीच लाख रुपये गुंतवून 100 मधुपेट्यांपासून गडचिरोलीच्या जंगलात मधमाशीपालनाचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी आवश्यक परवाने घेण्यासाठी आणि अल्प आर्थिक मदतीसाठी प्राजक्ताचे वडील मदतीस पुढे आले. सुरुवातीच्या हंगामात 700 किलो मधाचे उत्पादन मिळाले. वर्षभरातील खर्च वजा जाता साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळाले.
 

vivek 
 
मधमाश्याच्या वसाहतींचे संगोपन
 
 
फुले तिथे मधमाश्यांच्या वसाहती हे नाते ठरलेले. त्यामुळे फुलांनी बहरलेली शेते, झाडे जिथे असतील तिथे तिने मधमाशी वसाहतीच्या पेट्या ठेवल्या. फुलांच्या हंगामात मध गोळा करण्यासाठी मधमाश्यांच्या वसाहती शेताजवळ अथवा जंगलात ठेवल्या. या वसाहतींचे संगोपन आणि संरक्षण करण्यासाठी काही कामगार नेमले. मध गोळा करण्यासाठी मधुवसाहती कुठल्या ठिकाणी कुठल्या महिन्यात स्थलांतरित होतील याचे वर्षभराचे नियोजन केले. मधमाश्या लेबर टेंटमध्ये निवासी असतात. या मधमाश्यांचे योग्य संगोपन करणे आवश्यक असते. कारण फुलांचा बहार नसेल त्या काळात काही दिवसांसाठी पेट्या इतरत्र हलवाव्या लागतात. इतर राज्यातसुद्धा स्थलांतर केले जाते. स्थलांतराच्या काळात मधसंकलनही त्या भागातच केले जाते. मधमाश्यांच्या वसाहतीचे संवर्धन करणे व मधनिर्मितीसाठी आवश्यक वनस्पती, झाडे लागवड करणे या बाबींवरसुद्धा प्राजक्ता काम करू लागली आहे.
 
 
‘कस्तुरी हनी’ची देशभर ओळख
 
मधुपेट्यांतून संकलित केलेला मध पुढे तसाच न विकता गडचिरोलीच्या मधाला देशभर ओळख निर्माण करून देण्यासाठी तिने स्वत:चे ब्रँडिंग केले. यातूनच ’कस्तुरी हनी’ मध प्रक्रिया उद्योगाची निर्मिती केली. सध्या तिच्याकडे 250 मधुमक्षिका वसाहती पेट्या आहेत. पॅकिंग, मार्केटिंग, प्रदर्शन, प्रशिक्षण सुरू केले. या व्यवसायात तिच्यासोबत आता 9 जण कार्यरत आहेत. जांभूळ, ओवा, निलगिरी, शिसव, करंज, कडुनिंब, मोहरीपासून मिळणार्‍या मधावर कुठलीही प्रक्रिया न करता नैसर्गिक स्वरूपात मधाची निर्मिती करण्यास वाव दिला. विशेष म्हणजे हा व्यवसाय मधापुरता मर्यादित न ठेवता मधमाश्यांच्या वसाहती वाढविण्याची, त्यासाठी आवश्यक साधनसामग्री विक्रीची सेवा सुरू केली. खादी ग्रामोद्योग आयोग अंतर्गत विदर्भातील अकरा जिल्ह्यांत मधमाश्यांच्या वसाहती, पेट्या, साहित्य आणि उपकरणे यांचा ती पुरवठा करत असते. यातून वर्षभरात सात लाखांचा नफा मिळतो.
 

vivek 
 
दीड हजार मधुमक्षिका वसाहतींचे वाटप
 
 
नागपूर येथे खादी ग्रामोद्योग आयोग यांचे विदर्भातील अकरा जिल्ह्यांचे विभागीय कार्यालय आहे. या विभागामार्फत विविध शेतकरी उत्पादन संस्था, महिला बचत गट, तरुण यांना मधमाशीपालन प्रशिक्षण आणि मधुवसाहती व साहित्य यांचे वाटप केले जाते. यासाठी टेंडर भरले जाते. कोरोनापूर्व काळात हे टेंडर परराज्यांतून भरले जायचे. टाळेबंदीमुळे या विभागाला महाराष्ट्रातून पुरवठा करणे कठीण झाले आणि इथेच प्राजक्ताला संधी गवसली. तिने मधुमक्षिका वसाहतीच्या वाटपाचे टेंडर भरून मंजुरी मिळविली. तिच्यासाठी हे काम जिकिरीचे होते. कारण वसाहती बाहेरील राज्यातून आणाव्या लागायच्या. दळणवळण, मंजुराचे विलगीकरण या सगळ्या अडचणींतून मार्ग काढत तिने कोरोनाच्या दीड वर्षात यशस्वीरित्या सुमारे 1500 मधुमक्षिका वसाहती वाटप केल्या. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विज्ञान केंद्र, एम सी डी यासारख्या संस्थांना तिने मधुमक्षिका वसाहती वाटप केल्या.
 
 
गडचिरोली येथील औद्योगिक वसाहतीत जागा घेऊन तिने आधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मध प्रक्रिया प्लांट उभारण्यासाठी पावले उचलली आहेत. आधुनिक तंत्राच्या साहाय्याने मध बनविण्यापासून ते पॅकेजिंगपर्यंतचे सर्व काम या ठिकाणाहून करण्यात येणार आहे.
 
 
कुशल प्रशिक्षक
 
 
प्राजक्ता ही महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व कृषी विज्ञान केंद्राची ’मास्टर ट्रेनर’ आहे. या माध्यमातून बेरोजगार, महिला, युवक, शेतकरी यांना व स्वयंसेवी संस्थांना प्रशिक्षण देण्याचे कार्य ती करत आहे. मधमाशीच्या संवर्धनासाठी ’मधमाशीपालन जनजागृती कार्यक्रमाचे’ आयोजन करीत असते. येत्या काळात गडचिरोली येथून मध निर्यात करण्याला आणि शालेय अभ्यासक्रमात ’मधमाशीपालन व त्यांचे महत्त्व’ हा विषय समाविष्ट करण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करण्याचा तिचा संकल्प आहे. मधमाशीपालन हा शेतीपूरक व्यवसाय असल्याने तिला अनेक संस्थांकडून पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
संपर्क
प्राजक्ता अदमाने कारू
रा. सदावर्ती मंदिराजवळ, जोगीठाणा पेठ,
उमरेड, जि. नागपूर
। 7020485685

विकास पांढरे

सध्या सा.विवेकमध्ये उपसंपादक, एम.ए.बीएड पर्यंतचे शिक्षण. वयाच्या १६ व्या वर्षापासून सोलापूर 'तरुण भारत' मध्ये वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ. पुढे दैनिक तरूण भारत, सुराज्य,पुढारीमध्ये वार्ताहर व उपसंपादक. कृषी,साहित्य, व वंचित समाजाविषयी सातत्याने लिखाण.