कोकणच्या मातीत दुर्मीळ औषधी वनस्पती शेतीचा प्रयोग

विवेक मराठी    22-May-2023   
Total Views |
 

vivek
कृषी क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत. शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील साखळोली गावात तीन एकरांमध्ये पितांबरीने ‘आयुर्तेज उद्यान’ विकसित केले आहे. हे दापोली तालुक्यातील पहिले व एकमेव आयुर्वेदिक उद्यान आहे. या उद्यानात सुमारे सहाशेहून अधिक दुर्मीळ औषधी वनस्पती शेतीचा प्रयोग करण्यात आला आहे.
 
मागील काही लेखांमधून ’पितांबरी’ समूहाच्या कृषी प्रकल्पांची माहिती आपण वाचत आहातच. शेतकर्‍यांची व वाचकांची उत्सुकता लक्षात घेऊन प्रस्तुत लेखातून साखळोलीत विकसित होत असलेल्या औषधी वनस्पती शेती प्रयोगाची माहिती जाणून घेणार आहोत.
 
 
 
निसर्गसौंदर्याने नटलेल्या, नानाविध वनस्पतींनी, फळाफुलांनी बहरलेल्या कोकणात वनौषधी वनस्पतींचे भांडार आहे. या प्रदेशात सर्व प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड करता येऊ शकते. यामध्ये निर्गुडी, अडुळसा, तुळस, अर्जुन, गवती चहा, वड, हिरडा, बेहडा, ब्राह्मी, पिंपळी अशा विविध वनौषधींचा समावेश करता येईल. सुगंधी फूलझाडांच्या उत्पादनालाही कोकणात उत्तम वाव आहे. पितांबरीने दापोली तालुक्यातील साखळोली गावात ’आयुर्तेज उद्यान’ विकसित केले आहे. हे दापोलीतील पहिले व एकमेव आयुर्वेदिक उद्यान आहे. हे उद्यान तीन एकर परिसरात वसले आहे. या ठिकाणी सुमारे 300 प्रकारची औषधी झुडपे, 148 प्रकारचे वृक्ष, 100 प्रकारच्या क्षुप प्रजातीय वनस्पती अशा 600हून अधिक औषधी वनस्पती प्रजातींची लागवड करण्यात आली आहे.
 
 
पितांबरीच्या राजापूर तालुक्यातील तळवडे गावातील शेतजमिनीवर अशा प्रकारची लागवड करण्यात आली आहे. साखळोलीच्या आयुर्तेज उद्यानात वन्य झाडे व अनोखे बांबू पार्कसुद्धा साकार करण्यात आले आहे.
 
 
vivek
 
या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे लागवड केलेल्या औषधी वनस्पतींमध्ये काळी हळद, वेखंड, 15 प्रकारांतील तुळस, गवती चहा, रिठा, पिंपळी, अडुळसा, निर्गुडी, अक्कलकाढा, ब्राह्मी, चित्रस, बेल, शतावरी, कडुनिंब, सागरगोटा, आंबेहळद, रक्त रोहिदा, काळमेघ, बिब्बा इ.चा समावेश आहे. तसेच विविध वनस्पतींच्या गटामध्ये विस्तीर्ण दूर्वा पसरल्या आहेत. मोठ्या झाडांच्या भोवती, प्रवेशद्वारावर व कुंपणाशेजारी वेली चढवल्या आहेत. याशिवाय रोगांनुसार औषधी वनस्पतींचे वर्गीकरण करण्यात आले आहे. कुंपणाभोवती अनेक वृक्ष प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये सीता अशोक, वड, निर्गुडी, बांबू इ. वृक्ष पाहायला मिळतात. तसेच मुख्य पीक म्हणून गवती चहाची लागवड केली आहे. याशिवाय पाणथळ भागात ब्राह्मी, मंडुकपर्णी अशा औषधी वनस्पती आहेत. लागवड केलेल्या सर्व औषधी वनस्पतींचे व्यवस्थापन सेंद्रीय पद्धतीने केले जाते.
 
 
याबरोबरच वनस्पतींच्या व पिकांच्या उत्तम वाढीकरिता, जमिनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी, तसेच दर्जेदार उत्पादन यावे यासाठी पितांबरीचे ’गोमय’ सेंद्रिय खत वापरूनच लागवड व रोपे तयार केली जातात. आवश्यकतेनुसार ठिबक व तुषार सिंचनाचाही वापर केला जातो. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्याशी गेली 15 वर्षे पितांबरी संलग्न आहे. त्यांच्यामार्फत प्रमाणित मातृवृक्षांपासून सर्व रोपे व कलमे शेती विषयातील तज्ज्ञांच्या देखरेखीखाली तयार केली जातात. त्यामुळे दर्जेदार वनस्पतींची लागवड करणे सोपे होते.
 

vivek 
 
आयुर्तेज उद्यानात लागवड केलेल्या सुगंधीत वनस्पतींच्या अर्काचा वापर करून पितांबरीच्या ’देवभक्ती अगरबत्ती’ची निर्मिती करण्यात येते. गवती चहापासून तेल काढले जाते. तसेच पितांबरीच्या हेल्थकेअर विभागातील ’क्युअरऑन प्लस’ पेन रिलीफ ऑइल या तेलासाठी लागणारा कच्चा मालदेखील वनौषधी शेतीमधून उपलब्ध होतो. गवती चहा या मुख्य पिकापासून एकरी खर्च वजा करता 50 हजार रुपये वार्षिक उत्पन्न मिळते.
 
 
पूर्वीच्या काळी परसात, कुंपणावर ज्या वृक्षवेली सहज उपलब्ध असत, त्या प्रमाणात आज त्या वनस्पती कुंडीत, गच्चीत अथवा फ्रेंच विंडोत दिसत नसल्या, तरी आजही अनेक घरात हमखास तुळस, कोरफड इ. औषधी वनस्पती लावलेल्या दिसतात.
लोकांना औषधी वनस्पतींची माहिती मिळावी व गरजूंना त्यांच्या गुणांचा लाभ व्हावा, याकरिता भविष्यात अनेक प्रकारच्या वृक्षांची व जास्तीत जास्त औषधी वनस्पतींची लागवड करण्याचा, तसेच रोपवाटिकेत रोपे तयार करण्याचा पितांबरीच्या अ‍ॅग्री केअर विभागाचा मानस आहे.
या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी व अधिक माहितीसाठी 9867112714 या क्रमांकावर संपर्क साधावा.

रवींद्र प्रभुदेसाई

पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.ची सुरुवात 1989 मध्ये श्री रवींद्र प्रभुदेसाई आणि त्यांचे वडील स्वर्गीय श्री वामनराव प्रभुदेसाई यांनी लहान घरगुती व्यवसाय म्हणून केली होती. ती हळूहळू एक आघाडीची उत्पादन आणि विपणन कंपनी बनली आहे. होमकेअर डिव्हिजनमध्ये एफएमसीजी उत्पादनांसह सुरुवात करून, आता संस्थेकडे एकाच छताखाली 10 विभाग आहेत उदा; होमकेअर, हेल्थकेअर, अॅग्रीकेअर, फूडकेअर, सौर, धूप, परफ्युमरी, डिजीकेअर, कृषी पर्यटन आणि निर्यात विभाग.