‘राज’ रंग बदलले का?

विवेक मराठी    23-May-2023   
Total Views |

vivek
इंजिनाच्या दिशेत बदल केला. त्यानंतर पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलून झाल्यानंतर कधी सेक्युलर तर कधी हिंदुत्ववादी.. कधी आघाडीसोबत, तर कधी ‘एकला चलो रे‘चा नारा दिला. आता महायुतीत सामील होतील असे वाटत असतानाच राज ठाकरे यांनी भाजपावर टीका करून आपला रंग बदलला आहे का?....
नोव्हेंबर 2016मध्ये पक्षाला येणार्‍या अपयशाचे कारण व पक्षाची होत चालेली वाताहत पाहता राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या इंजिनाच्या दिशेत बदल केला. त्यानंतर 2020 साली झेंड्याचा रंग भगवा केला. त्याचे परिणाम काय झाले, ते सर्वश्रुत आहेत. ते नव्याने सांगायला नको. पण आज त्यांच्या या गोष्टीची आठवण येण्याचे कारण म्हणजे जशी इंजिनाची दिशा बदलली, तशीच राज ठाकरे आपली भूमिकाही बदलू लागले आहेत की, काय असे वाटू लागले आहे. राज ठाकरे यांनी 2022 साली आपल्या पक्षाचा गुढीपाडवा मेळावा घेतला होता. यामध्ये त्यांनी मशिदीवरील भोंग्यांना लक्ष्य केले. “हे अनधिकृत भोंगे राज्य सरकारने उतरवले नाहीत, तर आम्ही मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू!” या विधानांनंतर राज ठाकरे मीडियासाठी एकदम हिंदुहृदयसम्राटच झाले. हिंदूंचे जननायक काय.. आणि आणखी काय.. अशा उपाध्या त्यांना मिळू लागल्या. कार्यकर्त्यांना हिंदुत्ववादी भूमिका घेऊन सर्वांनाच चकित केले होते. मशिदीवरील भोंग्यावरून त्यांनी रान उठवले होते. अखेर त्यांच्या अल्टिमेटमला काही प्रमाणात यश येऊन भोंगे हटवले गेलेसुद्धा. हिंदू समाजाने राज यांच्या भूमिकेचे स्वागत केले. भाजपाशी युती होणार असे तिथेच संकेत मिळाले होते. जुलै महिन्यात झालेल्या राजकीय उलथापालथीत महाराष्ट्रातील मविआचे सरकार कोसळले. त्यानंतरही राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढत गेली. शिवाजी पार्क येथे मनसेने आयोजित केलेल्या शिवाजी पार्क दीपोत्सवाचे उद्धघाटनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केले. राजही भाजपावर टीका करताना फारसे दिसत नव्हते. त्यामुळे आपसूकच नव्या राजकीय महायुतीचे संकेत तेव्हाच मिळाले होते. त्यानंतर अनेक ठिकाणी मनसे आणि भाजपाचे कार्यकर्ते एकत्र काम करताना दिसून येत होते. मनसेचे नेते संदीप देशपांडे तर शिवसेनेच्या ( शिंदे गट) व्यासपीठावर दिसून येत होते. मनसेच्या पदाधिकार्‍यांची भाजपावरीलची टीकेची धार बोथट झाल्याचे दिसून येत होती.
 
 
vivek
 
 
डोंबिवलीतील मनसेचे एकमेव आमदार तर नक्की भाजपाचे आमदार आहेत की शिंदे गटाचे आमदार असाच प्रश्न पडला होता. दोन्ही पक्षांंच्या कार्यक्रमांना ते आवर्जून उपस्थित असायचे. अशा प्रकारे आगामी निवडणुकीसाठी शिवसेना, भाजपा आणि मनसे यांची युती जवळपास निश्चित असण्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती. महाराष्ट्रात उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी आणि शिवसेना, भाजपा आणि मनसे अशी अशी महायुती होणार, असे सर्वसामान्य नागरिकांना वाटत होते. पण गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांची बदलत चालेली भूमिका संशयास्पद वाटू लागली आहे. राज ठाकरे यांनी बासू प्रकल्पाला विरोध केला. पण ही त्यांची वैयक्तिक भूमिका असू शकते. भाजपा आणि शिवसेना यांच्यात मागील निवडणुकीत अनेक मुद्द्यांवर मतभेद होते. पण तरीही युती होती. तसे वाटत होते. पण कालच्या नाशिक दौर्‍यात त्यांनी केलेली टीका भाजपाला विरोध दर्शवणारी वाटली. राज हे अत्यंत चाणाक्ष राजकारणी आहेत. त्यांना अचूक टायमिंग साधता येते. पण अंगभूत असलेल्या आळशीपणामुळे त्यांना अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. वर्षांत चार-दोन दौरे, दोन-चार सभा यातून पक्ष चालवणारे राज यांनी भाजपाला कर्नाटकमधील पराभवानंतर भाजपाला आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला.. 2000च्या नोटबंदीला विरोध दर्शवला.. त्र्यंबकेश्वरच्या प्रकरणावर भाष्य केले. यावरून राज इंजिनाच्या दिशेप्रमाणे पक्षाची दिशाही सारखी बदलू लागले आहेत की काय, असा प्रश्न पडला आहे. आज फक्त उबाठा तिकडे असल्याने राज ठाकरे तिकडे जाऊ शकत नाहीत. नाहीतर त्यांचे विचार, त्यांची टीका ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या टीकेत सूर मिसळणारी वाटत आहे.
आयोध्येला कधी जाणार?

राज ठाकरे यांनी 2022च्या गुढीपाडवा मेळाव्यात आपण आयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली. कार्यकर्त्यांनी त्याला भरभरून दाद देऊन ‘जय श्रीराम’चा नारा दिला. आज वर्ष झाले, तरी अजूनही ते आयोध्येला जाऊ शकले नाहीत. पण त्यांचे वर्षभरात दोन परदेश दौरे नक्कीच झाले असतील. या वेळी श्रीरामनवमी जोरदार साजरी करा असे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले, पण ते मात्र रामनवमीला युरोपात होते असा आरोप झाला.
राज ठाकरे यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींविरोधात जोरदार टीका केली. ‘लाव रे तो व्हिडिओ‘ने धुमाकूळ घातला होता. पण राज कोणाचे बोलके पोपट होते, ते लोकांना समजले होते. लोकांनी त्यांच्या सभेला गर्दी केली, पण मतदान मात्र भाजपालाच केले. 2006 साली पक्षस्थापनेपासून मीडियाने वारेमाप प्रसिद्धी दिल्याने मनसे पक्ष मोठा झाला खरा, पण कार्यकर्त्यांचे जाळे नसल्याने आणि स्वत:मधील आळशीपणामुळे 2014मध्ये पक्षाची वाताहत झाली. आपले कार्यकर्ते, नगरसेवक, आमदार सोडून का सोडून गेले याचा ते आजही विचार करीत नाहीत. सध्या भाजपाला डिवचण्यासाठी तेच ‘भारत जोडो’चे कौतुक करीत आहेत. पण आपला पक्ष वाढण्यासाठी गोपिनाथ मुंडेंसारखी एखादी संघर्ष यात्रा किंवा राहुल गांधींसारखी भारत जोडो यात्रा काढावीशी वाटत नाही.
 
 
भूमिका बदलून नाही, तर एकच भूमिका घेऊन जनतेमध्ये ती भूमिका पटवून दिल्याने आपल्या पक्षाचा विस्तार होतो, हेच आत्मपरीक्षण केले पाहिजे. भाजपा आणि काँग्रेसवर टीका करून तत्काळ प्रसिद्धी मिळेल, पण मतदार मिळणार नाहीत, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.