जयंतरावांचे अश्रू नक्की कोणत्या अगतिकतेतून

विनोद कांबळीची आठवण आली..

विवेक मराठी    06-May-2023   
Total Views |
पवारांनी राजीनामा दिल्यानंतर जयंतरावांना अश्रू अनावर झाले. त्यांच्यासारख्या अनुभवी राजकीय व्यक्तीच्या रडण्याची आता राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे. हे अश्रू नक्की कोणत्या अगतिकतेतून आले होते याचेच विश्लेषण करणारा लेख...

jayant patil
 
सर्वांना 1996चा विश्वचषक आठवतच असेलच. भारत हा विश्वचषक पटकावेल असे सर्वच जगाला वाटले होते. पण सेमीफायनल सामन्यात श्रीलंकेकडून भारताचा दारुण पराभव झाला. यामध्ये सर्वांच्याच स्मरणात राहील अशी घटना घडली, ती म्हणजे विनोद कांबळी बाद होऊन, हाताश होऊन जेव्हा मैदानाबाहेर जात होता, तेव्हा तो रडत रडत बाहेर पडत होता. या वेळी किक्रेटच्या चाहत्यांनी विनोद कांबळीच्या अश्रूंवर नाराजी व्यक्त केली - तुम्हाला लढायला पाठवले होते. रडायला नाही. दोन दिवसांपूर्वी याचे स्मरण झाले, याचे कारण म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. पवारांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. जयंतरावांसारख्या अनुभवी राजकीय व्यक्तीने रडण्याची राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे. 1996च्या विश्वचषकादरम्यान मैदानातून सचिन बाद झाल्यानंतर जशा बाकीच्या विकेट्स गेल्या, तसाच प्रकार पवारांच्या राजीनाम्यानंतर झाल्याचे दिसून आले होते. खरे तर पवारांना राजीनामा न स्वीकारण्याचे, त्यांची मनभरणी करण्याचे असे अनेक प्रकार असताना जयंतराव, आव्हाड व कार्यकर्ते रडू लागले.. अगदी रणांगणातून हत्यार टाकल्यासारखेच त्यांचे वर्तन होते.
 
 
 
जयंतरावांचा स्वभाव नेहमीच मिश्कील शैलीत विनोदी असतो. विधानसभेचे सभागृह असो वा जाहीर सभा.. जयंतरावांचे विनोदी फटकारे सर्वांनाच हसवून सोडतात. असे दिलखुलास व्यक्तिमत्त्व मग त्या दिवशी एवढे रडू लागले? त्यामुळे जयंतरावांसारख्या व्यक्तीच्या डोळ्यात खरेच पवारांच्या पदत्यागाचे अश्रू होते की ते मगरीचे अश्रू होते, अशी चर्चा रंगू लागली आहे. जयंतराव पाटील हे तसे योद्धे मानले जातात. इस्लामपूर हा त्यांचा बालेकिल्ला आहे, त्यांची तेथे एकहाती सत्ता असते. अजूनही तेथे त्यांना आव्हान देईल असा राजकीय प्रतिस्पर्धी जयंतरावांनी निर्माणच होऊ दिला नाही. ते पवारांचे एकनिष्ठ, विश्वासू मानले जातात. पवारांच्या आशिर्वादाने अगदी सलग नऊ वर्षे राज्याचा अर्थसंकल्प मांडणारी एकमेव व्यक्ती ठरले आहेत. अर्थमंत्री, गृहमंत्री अशी महत्त्वाची खाती त्यांनी राज्यात सांभाळली आहेत. असा हे व्यक्तिमत्त्व जेव्हा राजीनाम्याच्या घोषणेनंतर रडू लागते, तेव्हा राष्ट्रवादीची शिवसेनेसारखी भावनिक संघटना झाली नाही ना? अशी शंका नक्कीच उपस्थित होते. शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते रडले तर समजू शकतो. कारण त्यांची पक्षसंघटनाच भावनिक आहे. आजवर घडलेल्या घटनांचा विचार केला, तर पवारानंतर पक्षात आपले काही चालेल का? पक्षातील आपले स्थान तेवढेच बळकट राहील का? या विचारांतून जयंतरावांचे अश्रू आलेले नव्हते ना? असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण आज जयंतरावांना पक्षात आधार आहे खुद्द शरद पवार यांचा. अजितदादांशी त्यांचे फारसे पटत नाही. हिवाळी अधिवेशनात जयंतरावांना निलंबित केले, अजित पवारांनी त्याचे समर्थन केले. अगदी सर्वच ठिकाणी अजितदादांकडून जयंतरावांची कोंडी करण्यात येते. असोड गावच्या सरपंचासारखे ते कोरोना काळापासून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना कार्यकर्त्यांकडूनही ना मान, ना सन्मान. पक्षात चालते ती अजितदादांची दादागिरी! भाजपासह सकाळ शपथविधीसारखी घटना घडली, तरीसुद्धा पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर उपमुख्यमंत्री म्हणून तेच विराजमान झाले, पण जयंतराव आहेत तेथेच राहिले.
 
 
jayant patil
 
जयंतराव पाटील यांच्याकडे 30 वर्षांपेक्षा जास्त काळाचा राजकीय अनुभव आहे. ते उच्चशिक्षित आहेत, राजकीयदृष्ट्या सक्षम असूनही एखाद्या छोट्या राजकीय घडमोडींसाठी आश्रू ढाळणे हे त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाला शोभणारे नाही.
 
 
2004च्या लोकभसा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला, सर्व पराभवाचे खापर प्रमोद महाजनांनी आपल्या खांद्यावर घेतले. यानंतर अटलजी विजनवासात गेले, पण महाजन मात्र खचले नाहीत, रडले नाहीत. त्यांनी आपले काम सुरू ठेवले.. कारण व्यक्तिपूजा हा राष्ट्रनिष्ठ संघटनेचा पाया नसतो, याचे ते द्योतक होते. जयंतराव फक्त घोषणेनेच शस्त्र टाकून रडू लागले, यावरूनच लक्षात येते की राष्ट्रवादीतील वरिष्ठ कार्यकर्त्यांचे मनोधैर्य छोट्याशा प्रसंगी खचते, तर आगामी काळात पक्षाला कठीण प्रसंगातून ते कसे वाचवतील? असा प्रश्न नक्कीच निर्माण होतो.