परिचारकांच्या स्वास्थ्यासाठी

विवेक मराठी    08-May-2023   
Total Views |
 
vivek
परिचारक हा चिकित्सेचा एक मुख्य आधारस्तंभ आहे. परिचारक हा सर्वात जास्त काळ रुग्णाच्या सानिध्यात असतो. त्यामुळे तो निरोगी, प्रसन्न आणि उत्साही असणं अत्यंत आवश्यक असतं. परंतु परिचारकांच्या कामाचे स्वरूप पाहता त्याच्यावर शारिरीक व मानसिक ताण अधिक असतो. या लेखात परिचारकांच्या स्वास्थ्यासाठी विचार केला आहे.
 
यस्मिन् जीवति जीवन्ति बहवः स तु जीवति ।
 
काकोऽपि किं न कुरुते चञ्च्वा स्वोदरपूरणम् ॥
 
जो जिवंत असताना ज्याच्यामुळे पुष्कळ जीव जगतात, तोच खरोखर जगतो असं म्हणावं. नाहीतर कावळासुद्धा आपल्या चोचीनं स्वतःचं पोट भरत नाही का? केवळ स्वतःसाठी जगण्यात काय विशेष?
 
 
या सुभाषितातील पहिली ओळ ज्यांना चपखलपणे लागू होते असा वर्ग म्हणजे परिचारक वर्ग. त्यांच्या दररोजच्या कामातून ते अनेकांना जगवतात हेच खरं. सामान्यतः आपल्याकडे महिला परिचारक मोठ्या प्रमाणात आढळतात. कारण या कामासाठी आवश्यक अशा स्नेहयुक्त सेवाभावाची देणगी महिलांना निसर्गतः मिळालेली असते. मात्र काही पुरुषदेखील आता या क्षेत्रात आढळू लागले आहेत.
 
  
आपलं गमावलेले आरोग्य परत मिळवण्यासाठी वैद्य किंवा डॉक्टर आवश्यक असतातच, परंतु ते वैद्यकीय सल्ला देण्याइतपतच भूमिका निभावतात. त्या सल्ल्यानुसार औषध, आहार, पथ्य, विश्रांती, आवश्यक असल्यास मसाज इत्यादी गोष्टी सर्व पार पाडण्याची भूमिका रुग्णालयातील किंवा घरातील परिचारक करत असतात. कोविडच्या काळात या परिचारकांनी आपले प्राणदेखील पणाला लावून इतरांचे जीव वाचवले हे आपण बघितलंच आहे.
 
 
अनपेक्षः शुचिर्दक्षो बुद्धिमान् परिचारकः ।
 
म्हणजे निरपेक्षता, पवित्रता/स्वच्छता, दक्षता आणि हुशारी या गुणांनी परिचारक युक्त असावा असा उल्लेख आयुर्वेदात आढळतो. या चार गुणांनी संपन्न असलेला परिचारक लाभल्यास रुग्ण आजारातून लवकर बरा होतो.
 
 
असे गुणसंपन्न परिचारक जेव्हा रात्रंदिवस कार्यरत असतात तेव्हा त्यांच्या आरोग्याची काळजी कोण घेतं? हा कळीचा प्रश्न आहे. विशेषतः महिला परिचारकांच्या बाबतीत हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो. कारण रुग्णालयातील त्यांचं काम आटोपल्यावर घरातील कामांची जबाबदारीसुद्धा त्यांच्यावरच असते. रुग्णालयात कितीही गंभीर रुग्ण असला तरी त्याला हाताळताना त्यांना स्वत:चं शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवायचं असतं. त्यासाठी काही प्रयत्न केले जातात का? या प्रश्नाचं उत्तर 95 टक्के वेळा नकारार्थीच मिळेल.
 
 
 
रुग्णालयात अनेक प्रकारच्या संक्रमक व्याधींचे रुग्ण भरती होतात. सतत त्यांच्या सहवासात राहिल्यानं हे संक्रमण परिचारकांच्या शरीरात कधीच संक्रमित झालेलं असतं. अशा हजारो विषाणू आणि जीवाणू यांच्याशी सामना करण्यासाठी परिचारकांची रोगप्रतिकारक्षमता अत्यंत उत्तम असणं अपेक्षित आहे. प्रत्येक रोगाची लस घेत बसणं हा काही त्यावरचा उपाय नाही. त्यासाठी ताजा-पोषक-गरम-पारंपरिक आहार सगळ्यात महत्त्वाचा! याशिवाय योग्य प्रमाणात व्यायाम आणि झोप यांचीही पूर्तता व्हायला हवी. झोप पूर्ण होत नसेल, तरी व्याधी प्रतिकारक्षमता कमी होते.
 
 
संक्रमक व्याधींपैकी काही व्याधींचं संक्रमण श्वासातून, काहींचं स्पर्शातून तर काहींचं अन्न-पाण्यातून होतं. म्हणूनच स्वच्छता हा परिचारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. ढीगभर सॅनिटायझर आणि साबण वापरून, निसर्गाची हानी करूनच स्वच्छ राहता येते हा गैरसमज काढून टाकायला हवा. गरम पाणी, रिठा, शिकेकाई, वेखंड, तुळस, कडूनिंब अशा नैसर्गिक काढ्यांचा सुद्धा स्वच्छतेसाठी चांगला उपयोग होतो.
 
 
श्वासावाटे होणारी संक्रमणे टाळण्यासाठी घरात, रुग्णालयात नैसर्गिक धूप करणं हा उत्तम उपाय आहे. याशिवाय कामाला सुरुवात करताना तीळ तेलाचं किंवा अणुतेलाचं नस्य केल्यास उत्तम फायदा होतो.
 
 
अन्न आणि पाणी हे फ्रिजमध्ये न ठेवता, ताजे उपयोगात आणले तर त्यांच्यामधून संक्रमण होण्याचा संभव कमी होतो. उकळलेलं पाणी आणि व्यवस्थित शिजलेलं अन्न हे धोरण उपयुक्त ठरतं.
 
 
प्रत्येक व्यवसायामध्ये काही त्रुटी असतात. परिचारकांच्या व्यवसायातील त्रुटी म्हणजे त्यांच्या बदलणार्‍या कामाच्या वेळा. या वेळा दर दोन दिवसांनी बदलत असतात. त्यामुळे परिचारकांची दिनचर्या कधीच सुनियोजित राहू शकत नाही. जेवणाच्या, झोपेच्या वेळा सतत बदलत असतात. याचा त्यांच्या आरोग्यावर निश्चित परिणाम होऊ शकतो. कामाच्या बदलत्या वेळा ही संकल्पना आपल्याकडे कुठून आली याचं मला कुतूहल आहे. मात्र आजपर्यंत कधीही त्यावर विचार झाला नाही, हे मला अत्यंत दुःखद वाटतं. रुग्णालयातील रुग्णांना परिचारकाची आवश्यकता 24 तास असते हे मान्य आहे. परंतु त्यासाठी सर्वच परिचारकांना दावणीला बांधून त्यांची दिनचर्या अस्ताव्यस्त करण्यात काय अर्थ आहे? वर्षानुवर्षे प्रत्येकाची कामाची वेळ एकच ठेवली तर त्याचा फायदा परिचारकांनादेखील होईल याचा विचार कधीतरी व्हायला हवा.
 
 
 
रुग्णालय छोटं असो अथवा मोठं, परिचारकांच्या हाताखालून वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचे रुग्ण सतत जात असतात. काही रुग्णांची चिकित्सा यशस्वी होते, तर काहींची अयशस्वी. शिवाय रुग्णांचा प्रवासदेखील कधीकधी अत्यंत खडतर असतो. त्यांचं रुग्णालयातील वास्तव्य बरेच वेळेला वेदनादायी असतं. रोज हेच सर्व बघूनदेखील रुग्णासमोर प्रसन्न राहणं, त्याला आश्वासन देणं, प्रेरणा देणं ही गोष्ट परिचारक सातत्याने करत असतात. स्वतःचं मनोधैर्य असं टिकवून ठेवणं ही दिसते तितकी सोपी गोष्ट नाही. रोजच्या कामकाजाच्या भाऊगर्दीत स्वतः परिचारकांना हे काम अवघडही वाटत नाही आणि त्यात काही फार विशेष पण वाटत नाही. त्यांच्याकडून हे सर्व सहज होत असतं. अर्थात ही अगदी चांगली गोष्ट आहे. तरीसुद्धा गंभीर आजारांचे, थकलेले, निराश झालेले असे रुग्ण सतत बघून मनावर खोलवर काही परिणाम होतच असतात. त्याचे पडसाद रुग्णासमोर टाळले जात असतील तरी कधी कधी घरी उमटतात किंवा कालांतरानं दिसतात. म्हणूनच ही नकारात्मकता टाळण्यासाठी, मनाला ऊर्जा मिळण्यासाठी, मन सकारात्मक राहण्यासाठी परिचारकांनी काही साधना करणं आवश्यक आहे. योगनिद्रा आणि जप यांचा यासाठी विशेष उपयोग होतो. मन शांत आणि स्थिर राहण्यासाठी ध्यानाचा सरावदेखील आवश्यक ठरतो.
 
 
रसायन चिकित्सा
 
 
व्याधी आणि वार्धक्य दूर ठेवण्याच्या उपायांना आयुर्वेदात रसायन असं म्हटलं आहे. ब्राह्म रसायन, च्यवनप्राश, अनेक प्रकारच्या एकेरी वनस्पती (उदा. आवळा), काही रसौषधी, भारतीय गायींचं दूध आणि तूप अशी अनेक प्रकारची रसायनं शास्त्रात सांगितलेली आहेत. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, धातुसारता, कामाचं स्वरूप, पूर्वी होऊन गेलेले गंभीर रोग या सर्वांचा विचार करून प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळ्या रसायन औषधीची योजना करावी लागते. समस्त परिचारक वर्गानं यासाठी वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा. सरकारी रुग्णालयांमध्ये तर परिचारकांसाठी स्वतंत्र वैद्यांची नेमणूक करायला हवी. या वैद्यांनी परिचारकांना आहार, व्यायाम, योग आणि रसायन यासाठी वरचेवर मार्गदर्शन करावं. किंबहुना वैयक्तिक सल्ले द्यावे आणि विशिष्ट कालावधीनंतर सतत त्याचा पाठपुरावा करावा.
 
 
परिचारक हा चिकित्सेचा एक मुख्य आधारस्तंभ आहे. वैद्य किंवा डॉक्टर, औषध, स्वतः रुग्ण आणि परिचारक या चारही गोष्टी उत्तम असतील तर रुग्ण बरा होण्याची प्रक्रिया जलद गतीने घडू शकते. पैकी परिचारक हा सर्वात जास्त काळ रुग्णाच्या सानिध्यात असतो. त्यामुळे तो निरोगी, प्रसन्न आणि उत्साही असणं अत्यंत आवश्यक असतं. हे केवळ रुग्णालयातील परिचारकाबाबतच आहे असं नाही. दीर्घकाळ आजारी असणार्‍या व्यक्तींना घरात राहून सांभाळणारे काही परिचारक असतात किंवा त्यांचे जवळचे नातेवाईकच परिचारकाची भूमिका निभावत असतात. कधीकधी तर हा काळ तीन/पाच/दहा वर्ष इतका दीर्घ असू शकतो. नर्सिंग ब्युरोचे परिचारक असतील तर ते बदलले तरी जातात. परंतु ही सेवा कोणी नातेवाईक करत असेल, तर मात्र दीर्घकाळ त्या व्यक्तीची या कामातून सुटका झालेली नसते. ‘आलिया भोगासी असावे सादर’ असा विचार करत ती परिस्थिती निभावून नेण्याची भारतीय संस्कृती आहे. याबाबतीत भारतीय कुटुंबव्यवस्थेचं कौतुक आहेच. परंतु अशा बिकट काळात परिचारक म्हणून भूमिका निभावणार्‍या व्यक्तीचीदेखील काही काळजी घेणं आवश्यक आहे. त्याला आठवड्यातून एखादी विश्रांती, मन:स्वास्थ्य आणि शांत राहण्यासाठी आयुर्वेदाचे काही उपाय, पंधरा दिवसांतून एखादी शिरोधारा, वेळेवर आणि पोषक आहार, रसायन औषध यांची गरज असते. आपल्या जवळच्या वैद्यांच्या सल्ल्यानं हे करता येतं. परंतु मूळ रुग्णालाच प्राधान्य दिलं जात असल्यानं त्यांच्या सेवेत असणार्‍या या परिचारकाकडे लक्ष द्यायला कोणालाही सवड नसते. परिचारक झालेली ती व्यक्तीदेखील स्वतःकडे अत्यंत दुर्लक्ष करते. मग पुढे कालांतरानं हे सगळे हेतू शरीरामध्ये साठून एखाद्या आजाराच्या रूपानं व्यक्त होतात आणि त्रासदायक ठरतात. म्हणूनच - ीींळलह ळप ींळाश ीर्रींशी पळपश हे धोरण आरोग्याच्या बाबतीत सर्वांनीच अंगीकारायला हवं.