‘भू’यात्रा

विवेक मराठी    10-Jun-2023   
Total Views |

kokan
कोकणात ‘गाव पर्यटन’ या गोष्टीला खूप वाव आहे. गावं सगळी सारखीच, पण अभ्यासात्मक दृष्टी असेल तर त्यांतलं वैविध्य लक्षात येतं, त्यांतलं सौंदर्य कळतं आणि ते गाव फिरण्याचा आणि पाहण्याचा खर्‍या अर्थाने आनंद घेता येतो. यासाठी स्थानिक लोकांनी परिसरज्ञानात थोडीशी गुंतवणूक करायला हवी. एक गाव हा एक संशोधनविषय होऊ शकतो आणि त्यातून भरपूर साहित्यनिर्मिती आणि परिणामत: आनंदनिर्मिती होऊ शकते, हे निश्चित. अशीच कोकणातल्या ‘भू’ या एका सुंदर गावाची रम्य सफर घडवून आणणारा हा लेख.
 
हे एका गावाचं नाव आहे हे कळल्यावर एकतर हसायला तरी येतं किंवा अचंबित तरी व्हायला होतं. एकाक्षरी नाव असलेलं मला तरी वाटतं हे भूतलावरचं एकमेव गाव असावं. कुठे गेला होतास? असं विचारल्यावर भूत असं न म्हणता भुवात गेलो होतो असं म्हणण्याची इकडे पद्धत आहे. विशिष्ट गावाला विशिष्ट नाव का पडलं? हा एक प्रचंड मोठा संशोधनाचा विषय होऊ शकतो. मिठागरांचं गाव म्हणून ’मिठगवाणे’, केळीची झाडं भरपूर म्हणून ’केळशी’, तसं ’भू’ या गावाला ’भू’ हेच नाव कशावरून पडलं, याबद्दल अनेकांना विचारूनदेखील काही संदर्भ अद्याप मिळालेला नाही असो.
 
 
 
लहानपणी पाच-सहा वर्षांचा असताना एकदा माझ्या मावशीच्या लग्नाच्या बैठकीला (मी!) या गावात गेलो होतो. त्यानंतर आज सुमारे बावीस-तेवीस वर्षांनी आयआयटी मुंबईतर्फे सुरू असलेल्या ’उन्नत महाराष्ट्र अभियान’ प्रकल्पाअंतर्गत एका सर्वेक्षणासाठी या गावात पुन्हा जाणं झालं. कोकणात राजापूर तालुक्यात भू हे गाव तसं प्रसिद्ध. राजापूरपासून उत्तर दिशेला अवघ्या 13 किलोमीटरवर भू गाव वसलंय. पूर्वेला खिणगिणी आणि पेंडखळे, दक्षिणेला तेरवण, पश्चिमेकडे कोतापूर यांच्या सान्निध्यात वसलेलं हे गाव. या गावांची मिळून बनते ’भू पंचक्रोशी’. खरं तर भू या गावी (भुवात!) जायला रत्नागिरी, लांजा, राजापूर, जैतापूर इकडून बरेच निरनिराळे मार्ग आहेत. रत्नागिरीहून पावस-नाखरे-खानवली-साटवली-बेनी या मार्गे एक रस्ता भुवात जातो, तर पावसवरूनच पूर्णगड-कशेळी-आडिवरे-भालावली-देवीहसोळ या मार्गेही भुवात जाता येतं. राजापूरवरून एक रस्ता सरळ रानतळे-खिणगिणी मार्गे आहे, तर रानतळे-बारसू-देवाचे गोठणे-कोतापूर-खडकवली-तेरवण हाही एक मार्ग वळसा घालून भू गावी जातो. मुंबई-गोवा महामार्गावरून लांज्याहून एक फाटा फुटतो व तो रांबाडेगाव-निव्हेशी-गोलवशी-चिखले यामार्गे भू गावी जातो, तर राजापूरजवळ असलेल्या ओणी या ठिकाणावरून एक फाटा फुटून तो चुनाकोळवण-कळसवली-पेंडखळे मार्गे भू गावी जातो. देवगडवरून जायचं झालं, तर पडेल-सागवे-जैतापूर-नाटे-धारतळे-रातांबशेंडा हा मार्ग कोतापूर फाट्याला मिळतो व तिथून पुढे भुवात जातो. एकंदरीत, काय, भुवात कुठूनही कसंही जाता येतं!
 
 ब्राह्मणदेव झरा
 
kokan
 
या वेळच्या भू दौर्‍यात रोज सकाळी स्कूटरवरून अणसुरे इथल्या माझ्या घरून धारतळे मार्गे सलग आठ दिवस माझा दौरा होता. धारतळे-कोतापूर-खडकवली मार्गे जाताना बरेच चढउतार आणि वळणं पार केल्यावर सुपारीच्या मोठाल्या बागा दिसायला लागल्या की समजावं.. भू गावात आपला प्रवेश झाला. भू गाव डोंगराच्या कुशीत आहे. एका बाजूला समुद्रसपाटीपासून सुमारे अडीचशे मीटर उंचीचा निर्मनुष्य डोंगर आणि एका बाजूला डोंगराच्या पायथ्यालगत नदीकाठी वसलेल्या वाड्या ही भू गावची सर्वसाधारण रचना. सुपारीच्या बागा ही भू गावची खरी ओळख. सुपारीच्या बागांनी या गावाची केवळ अर्थव्यवस्थाच घडवली नाहीये, तर त्यामुळे गावाला एक सौंदर्य प्राप्त झालंय. एका रेषेत उतारावर लांबच्या लांब पसरलेल्या गगनचुंबी पोफळी नयनरम्य देखावा निर्माण करतात. एकेकाच्या दोन-दोन, तीन-तीन हजार पोफळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुपारीची लागवड ही राजापूर-लांजा-रत्नागिरी-देवगड परिसरात अन्यत्र कुठेही नाही. कोकणात मोठ्या प्रमाणात सुपारी लागवड उत्तर भागात, म्हणजेच गुहागर, दापोली आणि रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीच्या भागात आहे. परंतु तिकडच्या बागा किनारपट्टीलगतच आहेत, तर भुवातल्या सुपारीच्या बागा समुद्रसपाटीपासून सुमारे 60 ते 90 मीटर उंचीवर डोंगरउतारावर आहेत. इथे पिकवल्या जाणार्‍या सुपारीची काही विशिष्ट जात आहे का? असं विचारल्यावर सर्वांनी ’आम्ही याला गावठी सुपारी म्हणतो व ही मूळची इथलीच आहे’ असंच सांगितलं. उत्तर कोकणात ’श्रीवर्धन रोठा’ ही जात जशी प्रसिद्ध आहे, तसं भू गाव परिसरातल्या सुपारीला काही विशिष्ट नाव नाही. ही खरं तर एक गंमत आहे. कोकणात केळी, सुपारी, काजू, तांदूळ, कडधान्य, भाज्या यांच्या अनेक स्थानिक जाती आहेत, ज्यांना ’गावठी’ या सामान्यनामाव्यतिरिक्त काही विशेषनाम नाही. केळीच्या रोपाला जसं आपल्याकडे ’पासंबा’ म्हणतात, तसंच सुपारीच्या लहान रोपाला भू-तेरवण भागात ’कावत्ती’ हा एक नवीन शब्द कळला. सुपारी सोलण्यासाठी इथे एक विशिष्ट प्रकारचा चाकू वापरतात, त्याला ’रापा’ असं म्हणतात. असे नवीन शब्द कानावर पडण्यातही एक मौज असते. मागे केव्हातरी रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन-दिवेआगर भागांत गेलो होतो, तेव्हा तिथे सुपारीचं वरचं पातळ साल काढण्याला ’पष्टाळणे’ असा एक शब्द ऐकला होता!
 
kokan
 
भू गावात सुपारीच्या बागा बहरल्या त्या इथल्या पाटाच्या पाण्यावर. गावात दोन मुख्य नद्या आहेत. मूळ नदी पूर्वेकडे पेंडखळ्यातून उगम पावून भुवात येते आणि पश्चिमेकडे वाहत जाऊन भालावलीच्या खाडीला मिळते. दक्षिण दिशेला असलेल्या तेरवण गावात एक प्रवाह उगम पावून तो उत्तरेकडे वाहत येतो आणि हर्डीकर वठाराजवळ मूळ नदीला मिळतो. याबरोबरच ’जास्वंदपर्‍या’ नावाचा एक वहाळ उत्तरेकडे डोंगरावर उगम पावतो आणि गावाच्या पश्चिम सीमेवरून खाली वाहत येऊन मूळ नदीला मिळतो. या भू गावाच्या जीवनवाहिन्या. खरं तर कोकणातल्या प्रत्येक गावातलं जीवन फुललं ते तिथल्या नद्या, वहाळ, परे आणि ओढ्यांवर. भू आणि आजूबाजूच्या गावांत नदीवरून ज्या कल्पकतेने पाट काढलेले आहेत ते खरंच अभ्यासण्यासारखं आहे. नदीवर योग्य ठिकाणी बंधारा बांधायचा, पाणी अडवायचं आणि ते पाटाने जवळजवळ एक-दीड किलोमीटर लांबपर्यंत न्यायचं. एका पाटाच्या बाजूला अनेकांच्या बागा. मग पाटाचं पाणी कोणी किती वेळ आपल्या बागेत सोडायचं त्याची हिस्सेदारी ठरलेली. (त्यावरून हेवेदावेही होत!) ’करंबेळपाट’, ’देऊळपाट’ अशी पाटांना नावंही दिलेली. भू या एका गावातच पूर्वी असे दहा-बारा पाट कार्यरत होते. ’शिवूरवाडा’, ’मडकीरान’, ’जळकोंड’, ’जुवी धरण’, ’आंबेढोकण’, ’खालपाट’, ’कापेमळी’ अशी नदीवरची विशिष्ट नावांची ठिकाणं निवडून तिथे बंधारे घालून बागेपर्यंत पाट आणलेले. 2009 साली नदीला मोठा पूर आला. काही मिनिटांत प्रचंड मोठा प्रवाह वाहिला आणि त्याने नदीचं पात्र मोठ्या प्रमाणात खणलं गेलं. नदीचा काठ खरवडला गेला व त्यात अनेकांच्या बागाही वाहून गेल्या. तेव्हापासून बरेच पारंपरिक पाट बंद झाले. तरीही आज गावात चार मोठे पाट व्यवस्थित सुरू आहेत. बर्‍याचशा लोकांनी पाटाच्या पाण्यावरचं अवलंबित्व कमी करून विहिरी खोदल्या आहेत. केवळ बागेला पाणी एवढाच पाटांचा उपयोग नव्हता, तर विहिरींच्या पुनर्भरणासाठीही साहाय्य्य करणारी ती एक मोठी यंत्रणा होती. पाट म्हणजे एक प्रकारचे कालवेच. एका विशिष्ट उंचीवरून पाट आडवा वाहत असला की त्यामुळे जमिनीत पाणी मुरून त्याच्या खालच्या भागातल्या विहिरींना झर्‍याच्या रूपाने पाणीपुरवठा होतो, हा पाटांचा मोठा उपयोग.
 
 
 
कुठल्याही नवीन ठिकाणी गेलं की तिथे वेगळी झाडं कुठली कुठली दिसताहेत, याकडे माझा पहिला डोळा असतो. सह्याद्रीत अत्यंत दुर्मीळ असलेलं, ’इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ या जागतिक संस्थेने धोक्यात असलेली प्रजाती (Endangered) म्हणून घोषित केलेलं ’कडू कवठ’ हे झाड मला नजरेस पडलं ते भुवात. नदीच्या कडेला कडू कवठाचे मोठाले वृक्ष आहेत. याला चिकूसारखी दिसणारी गोल फळं येतात. याच्या बियांपासून निघणार्‍या तेलाला ’कवठेल’ म्हणतात व ते पूर्वी गुरांसाठी औषध म्हणून वापरलं जाई. ’रानफणस’ (Artocarpus hirsutus) ही फणसाची एक दुर्मीळ जात. या रानफणसाचे दोन भलेमोठे, उंच वृक्ष भुवातल्या नदीकाठी नजरेस पडले. केळीसारखी लांबट पानं असणारी, फेब्रुवारी-मार्चच्या सुमारास एकच दिवस पिवळ्या पुष्पबहराने ओथंबणारी ’करमाळी’ची (Dillenia pentagyna ) झाडं भुवात अनेक ठिकाणी दिसली. वडासारखंच खोड असणारे आणि पायरीसारखी पानं असणारे काही मोठे वृक्ष वहाळात नजरेस पडले. पायर हे एक वटवर्गीय झाड कोकणात सररास आढळतं. पण भू गावात वहाळात असणारे हे वृक्ष पायर नव्हेत, हे पानांवरून लक्षात येत होतं. तिथल्या एक-दोन लोकांनी सांगितलं की आम्ही याला ’केळाचं झाड’ म्हणतो. ’केळाचं झाड’ हे नाव त्या दिवशी मी प्रथमच ऐकत होतो. काही तज्ज्ञांना विचारल्यावर हे वडाच्याच कुळातलं Ficus tsjahela या जातीचं झाड असावं, असा एक अंदाज निघाला. ऐनासारखी फळं असणारी, दिव्यांच्या माळांची सजावट वाटावी अशा सुंदर लालेलाल फळांच्या माळांनी शोभिवंत दिसणारी ’पिळुकी’ ही वेल वहाळाच्या कडेने आढळून आली. या वेलीचं प्रजातीवाचक नाव Combretumअसं आहे. अर्थात ’हळदवेल’ या नावाची अशीच एक वेल असते, ती हीच की वेगळी? याबाबत अजून खात्री झालेली नाही. मागे एका बॉटनीच्या प्राध्यापकांनी मला एक सल्ला दिला होता, “तुला झाडांची आवड आहे ना? मग शहाणा असशील तर ’टॅक्सॉनॉमीत’ शिरू नकोस!” पण एकंदरच ’वर्गीकरणशास्त्र’ ( Taxonomy) हा मनोरंजक आणि डोकं खाणारा विषय आहे खरा!
 
 
kokan 
 
तरीही, निसर्गप्रेमींना सगळ्यात भावण्यासारखं इथलं एक ठिकाण म्हणजे ’हेळ्याची राई’. बेहड्याच्या झाडांना कोकणात ’हेळा’ म्हणतात. या हेळ्याचे 50पेक्षा जास्त मोठाले वृक्ष असलेली एक राई भू गावात लक्ष्मीकांताच्या मंदिराच्या बाजूच्या टेकडीवर पसरलेली आहे. या राईत शिरल्यावर आमच्या अणसुरे गावच्या ‘कुसुंबाच्या राईची’ आठवण झाली. पूर्वी इथे याहीपेक्षा मोठे हेळ्याचे वृक्ष होते, असं तिथल्या एका गृहस्थांनी सांगितलं. इथे ’जांभळादेवी’ नावाचं छोटंसं देवस्थान आहे. या निमित्ताने ही राई जपली गेली आहे. अर्थात ही देवराई पूर्णपणे मनुष्यहस्तक्षेपविरहित नाही. या राईतून एक रस्ता एका वाडीत जातो. पण कोकणात दुर्मीळ होत चाललेले हेळ्याचे वृक्ष काही प्रमाणात तरी जपले गेले आहेत, हेही नसे थोडके! या राईत सकाळच्या वेळी भटकत असताना एक ’ग्रेट हॉर्नबिल’ नजरेस पडला आणि मॉर्निंग ’गुड’ झाली. 2002च्या ‘जैविक विविधता कायद्या’चा अभ्यास करून अशा महत्त्वाच्या अधिवासांची नोंद गावाच्या ’लोकजैवविविधता नोंदवही’त करून त्यांचं जतन-संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यायला हवा.
 
 
 
गावाच्या इतिहासाबद्दल आणि संस्कृतीबद्दल जाणून घेण्यात एक आनंद असतो. भू हे गाव कसं वसलं असावं? कोणी वसवलं असावं? पूर्वीच्या काळी हे गाव कसं होतं? याबाबत अनेकांना विचारून माहिती घ्यायचा प्रयत्न केला, परंतु तसा फार काही इतिहास कोणाला ज्ञात नाही. काही जणांकडून कळलं की पूर्वी ’शहाणे’ आडनावाचे लोक गावात होते आणि त्यांनी भू गाव वसवलं. तसा भू-तेरवण हा ’पाध्ये-सप्रेबहुल’ भाग. गावात नदीकिनारी असलेलं लक्ष्मीकांताचं मंदिर हे गावचं प्रमुख देवस्थान. लक्ष्मीकांत, सिद्धेश्वर आणि कालिकादेवी अशी तीन देवळं एकाच आवारात वसली आहेत. या देवळाच्या दारापाशी बकुळीचा एक मोठाला वृक्ष आहे. देवळाच्या दारात बकुळीचा वृक्ष हे दृश्य कोकणात बर्‍याच ठिकाणी दिसतं. या मंदिरांचा इतिहास असा काही सांगता येत नाही. पण वर्तमानात ही मंदिरं गावाच्या एकात्मतेचं प्रतीक आहेत, हे निश्चित. भू या गावात एक तांबेवाडी आहे. या तांबेवाडीपासून चालत दहा-पंधरा मिनिटांवर उंच डोंगरावर ’ब्राह्मणदेव’ हे एक देवस्थान आहे. हे देवस्थान म्हणजे एक झरा आहे. हा झरा बारमाही सुरू असतो. तांबेवाडीतल्या लोकांनी पावसाळ्यात झर्‍यापासून पाइपलाइनने वाडीपर्यंत पाणी आणण्याची व्यवस्था केली आहे. ’देवाचं पाणी’ म्हणून लोक हे पाणी पवित्र समजतात. असाच ‘तळीसखल’ हा उंच डोंगरावर जंगलात एक पारंपरिक पाणवठा आहे. यालाही धार्मिक पार्श्वभूमी असल्याने माणसं तिथे फार जात नाहीत. परंतु पशु-पक्ष्यांसाठी ही एक महत्त्वाची पाणवठ्याची जागा आहे. आजच्या काळात धार्मिक श्रद्धेपोटी का होईना, पण काही वन्यजीवांचे अधिवास जपले जातात, ही महत्त्वाची गोष्ट. या ठिकाणाच्या थोडं खालच्या बाजूला एक सिमेंट बंधारा बांधून पाणी अडवण्याची योजना नुकतीच करण्यात आली. इथे तीन डोंगर एकत्र मिळत असल्याने एक चांगलं पाणलोट क्षेत्र तयार झालं आहे.
 
 
kokan
 
भू पंचक्रोशीतला बागायतदार वर्ग हा आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत आहे. भुवातलं एक वैशिष्ट्य असं की इथे गावातच सगळा शेतमाल खरेदी करणारी दुकानं आहेत. यामध्ये खिदीर व्यापारी हे एक अग्रगण्य नाव. इथे जे काही पिकतं, ते विकायचं कुठे? हा प्रश्न पडत नाही किंवा विकण्यासाठी लांबवरच्या बाजारपेठेत जावं लागत नाही. आमची साडेतीनशे किलो काळी मिरी झाली, साडेचारशे रु. दराने गावातच दिली असं तिथले लोक सहज सांगतात. उत्पादनाला मिळणारा भाव हा वेगळा विषय, पण माझ्या शेतात वा बागेत जे काही (आणि जेवढं काही) मी पिकवतोय ते ‘जाग्यावर उचललं जाणं’ ही शेतकर्‍यासाठी एक मोठी दिलासादायक गोष्ट असते. त्यासाठी गावोगाव अशी खरेदी केंद्रं निर्माण होणं ही फार मोठी गरज वाटते.
 
  
आपल्या गावात किंवा गावाच्या आजूबाजूच्या चार-पाच किलोमीटरच्या परिसरात काय काय वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत त्या दाखवणं, त्यांची सांस्कृतिक, वैज्ञानिक, ऐतिहासिक अंगाने माहिती सांगणं, गावातले ओढे, नद्या यांची परिक्रमा करणं, मंदिरं, धार्मिक स्थळं दाखवणं, गावातल्या दुर्मीळ झाडांची सफर घडवून आणणं, पारंपरिक घरं आणि त्यात अंतर्भूत असलेलं वास्तुशास्त्र दाखवणं यात पर्यटकांना चार-पाच दिवस सहज रमवता येऊ शकतं. यासाठी स्थानिक लोकांनी परिसरज्ञानात थोडीशी गुंतवणूक करायला हवी. एखादा वेगळ्या प्रकारचा दगड दिसला तर लोक तो नुसता बघतील आणि निघून जातील; पण त्या दगडाचं वेगळेपण काय आहे, त्याबद्दलची शास्त्रीय माहिती, त्याचा काही इतिहास आहे का याबद्दल अभ्यासपूर्ण माहिती आपण करून दिली, तर त्याला पर्यटनमूल्य प्राप्त होईल. त्यासाठी आपली नजर तशी विकसित व्हायला हवी. आपल्या गावाबद्दल अशी ‘संशोधनात्मक दृष्टी’ विकसित व्हावी, याच उद्देशाने आम्ही गेल्या वर्षी ‘सुंदर गावे कोकणची’ हा दिवाळी अंक प्रकाशित केला. यात आपल्या गावाचा इतिहास, भौगोलिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यं, गावातली उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वं, जुने गमतीशीर प्रसंग असे काही मुद्दे घेऊन आपल्या गावावर लेख लिहिण्याचं आवाहन केलं होतं व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. एक गाव हा एक संशोधनविषय होऊ शकतो आणि त्यातून भरपूर साहित्यनिर्मिती आणि परिणामत: आनंदनिर्मिती होऊ शकते, हे निश्चित.
 
 
 
आपल्या परिसराकडे संशोधनात्मक दृष्टीने बघणं, परिसरातल्या गोष्टींचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणं आणि लिखाणातून त्याची पद्धतशीरपणे मांडणी करणं हे एक कौशल्य सध्या कोकणातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये एका चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून रुजवलं जात आहे. त्याबद्दल पुढच्या लेखात.
 
 

हर्षद तुळपुळे

मूळचा अणसुरे,जि. रत्नागिरी रहिवासी. रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात चौदावीपर्यंत शिक्षण, मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयातून बी.ए. (अर्थशास्त्र) पदवी संपादन. शेती, पर्यावरण विषयांची विशेष आवड.