तिला जगायचा अधिकार नाही?

विवेक मराठी    16-Jun-2023   
Total Views |
  
ott
क्रौर्याचीही परिसीमा गाठणार्‍या घटना गेल्या काही वर्षांत सातत्याने घडत आहेत. भारतीय संस्कृतीशी नाळ तुटल्यामुळे दुर्दैवाने पाश्चात्त्य विकृती लिव्ह-इन-रिलेशन पद्धतीच्या म्हणजे वापरा आणि फेकाच्या पुढील भयानक विकृती या घटनांमध्ये आढळून आली आहे. एखाद्या मुलीने नकार दिला तर तिचा जगण्याचा हक्कच हिरावून घेतला जातो. या मुलींनी जिवंतपणी काय यातना भोगाव्या लागल्या असतील माहीत नाही, पण त्यांना मारल्यावरही त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली गेली.
  
क्रौर्याच्या पराकोटीने समाज हतबुद्ध, हतबल झाला आहे. श्रद्धा वालकर, साक्षी आणि आता सरस्वती!!
 
 
या मुलींनी प्रेम केले, एकत्र राहायचा निर्णय घेतला, किंवा प्रेमसंबंध नाकारायचा विचार केला, हा काय त्यांचा गुन्हा आहे? तोही असा गुन्हा की त्यांचा जगण्याचा हक्कच हिरावून घेतला गेला. जिवंतपणी त्यांनी काय यातना भोगल्या असतील माहीत नाही, त्यांना मारल्यावरही त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली गेली. त्यांच्या तथाकथित प्रेमिकांनी मृतदेहाला सद्गती न देता, त्याचे तुकडे केले.. सुर्‍याचे वीस घाव घालूनही डोक्यातली आग शमली नाही, म्हणून डोक्यात दगड घातला, सरस्वतीच्या देहाचे तुकडे तर केलेच.. पुढेही थंड डोक्याने क्रूर विटंबना करतच राहिला तो नराधम!
 
 
या बातम्यांनी डोके सुन्न झाले, बधिर झाले. समाज म्हणून या देशाची आणखी किती अधोगती होणार आहे? इतकी पराकोटीची क्रौर्याची भावना येते कुठून? आपल्या मनाविरुद्ध काही झालेले चालणार नाही, होताच कामा नये, झाले तर मी सहन करणार नाही, काय वाट्टेल ते करून मी काटा काढून टाकीन.. हे व असे टोकाचे खुनशी, पाशवी विचार करणारे आफताबचे, साहिलचे किंवा मनोजचे मन, मेंदू, हृदय कोणत्या गोष्टींनी बनले असेल?
 
ott  
बलात्कार करायचा आणि तिला ठारच मारून टाकायचे. कधी गाडीखाली फरफटत न्यायचे. गुन्ह्यांचे नवे नवे प्रकार, अधिक क्रौर्य आणि अधिक क्रौर्य! हे काय चालले हे? हे कृत्य करणारे मुलगे, पुरुष याच समाजातले ना? त्यांच्या विचारप्रक्रियेकडे आपले लक्ष आहे का? मुलग्याच्याही वर्तनावर, मित्र संगतीवर, त्याच्या सवयींवर, तो पाहत असलेल्या सिनेमा, मालिकांवर पालकांची नजर हवी, चर्चा करायला हवी. संवाद हे महत्त्वाचे अस्त्र आहे. स्वातंत्र्य किती व कुठले द्यायचे, बंधने कोणती व केव्हा घालायची याचा विवेक पालकांकडे हवा.
 
 ‘मी, माझे, माझ्यापुरते’ ही व्यक्तिकेंद्री विचारसरणी समाजव्यवस्थेपुढे असे भयंकर सामाजिक, मानसिक प्रश्न उभे करत आहे.
एखाद्या युवा प्रेमिकाने केलेल्या घटनेत वयाचा जोश असतो. मनोज-सरस्वतीच्या घटनेने तर प्रेमातले वयाचे संदर्भही तोडले. वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांनुसार मनोज हा गंभीर आजारग्रस्त होता. तरीही थंड डोक्याने, सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्याचे वर्तन होते. गुन्ह्यासाठी त्याने विजेवरची करवत, हत्यारे विकत आणली. मृतदेहाची विल्हेवाट लावताना त्याला शेजारी, पोलीस, समाज, देव.. अगदी कशाकशाचीही जराही भीती वाटली नाही. ही मुर्दाड गुन्हेगारी त्याच्यात का, कधी, कशी विकसित झाली? ती होताना त्या सरस्वतीला, संपर्कातल्या कोणालाही त्याच्यातले बदल जाणवले नसतील? असले, तर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले की ते काही करू शकले नाहीत? त्याचा कोणाशी संपर्कच नसेल, तर या भयानक एकटेपणाला काही उत्तर शोधावे लागेल. संपर्क, सामाजिक संबंध, अभिसरण, प्रेम, आस्था, एकोपा, सामाजिक जबाबदारी हे भारतीय समाजव्यवस्थेचे वैशिष्ट्य होते, आजही आहे. या हिंसक घटनांमुळे त्यात येणार्‍या अधिक्षेपाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘मी, माझे, माझ्यापुरते’ ही व्यक्तिकेंद्री विचारसरणी समाजव्यवस्थेपुढे असे भयंकर सामाजिक, मानसिक प्रश्न उभे करत आहे.
 
 
 
नाते बिनसत असताना राग, चीड, द्वेष, सुटका करून घेण्याची अपार इच्छा, भीती, चिंता, संशय अशा नकारात्मक भावनांच्या जंजाळात, मानसिक संघर्षात अडकायला होते. अशा नात्यामधून बाहेर कसे पडायचे याचा पूर्वविचार नसतो. या नात्याला कायदेशीर चौकट नाही. मग दाद मागायला व्यासपीठ नाही, परत माघारी जायला वाट नाही, मार्गदर्शक, आदर्श जोडीची उदाहरणे नाहीत, अशा अवस्थेत ही एकांतिक, टोकाची कृत्ये होतात का? हाही मुद्दा विचारार्थ घ्यायला हवा.
या घटनांमध्ये काही जोड्या लिव्ह-इन-रिलेशनमध्ये राहणार्‍या आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये विवाह हा संस्कार आहे, करार नाही; प्रत्येक सामाजिक, सांस्कृतिक कृतीमध्ये सामाजिक, धार्मिक अधिष्ठान आहे. इथे धर्म म्हणजे कर्तव्य, जबाबदारी, नैतिकता, समाजव्यवस्था पुढे नेणारा विचार या अर्थाने वापरला आहे. विवाहामध्ये दोन कुटुंब, नातेवाईक, समाज यांचा सहभाग असतो. अटीतटीच्या प्रसंगी नातेवाइकांची मदत, आधार मिळतो, निर्वाणीच्या प्रसंगी हस्तक्षेप करून परिस्थिती ठीक करण्याचा प्रयत्न केला जातो. दुर्दैवाने लिव्ह-इन-रिलेशन पद्धतीमध्ये दोन व्यक्तींना एकत्र राहण्याची, शरीरसंबंधांची सोय आहे, पण जबाबदारी, कर्तव्य या गोष्टींना अल्प महत्त्व आहे. बरेचदा कुटुंबाचा, नातेवाइकांचा, मित्रमंडळींचा सहभाग नसलेल्या या नव्या प्रकारच्या नात्यातही पारंपरिक अपेक्षा राहतात, पण लग्नात अपेक्षित असलेली ती निष्ठा व जबाबदारी घेण्याची इच्छा व तयारी नसते. अशा जोडीतल्या बेबनावाची ढोबळ कारणे ही पैसा, आधी कबूल केलेल्या अटी-गोष्टी न करणे, दारू व व्यसने, अन्य स्त्रीशी वा पुरुषाशी संबंध म्हणजे एकनिष्ठ नसणे, कायमस्वरूपी नाते - लग्नाचा आग्रह, मूल असण्याचा आग्रह अशी दिसून येतात. म्हणजे लिव्ह-इन-रिलेशनचा पर्याय निवडला असला, तरी अपेक्षा व आराखडा हा भारतीय कुटुंबपद्धतीचा व विवाहपद्धतीचा दिसतो. नाते बिनसत असताना राग, चीड, द्वेष, सुटका करून घेण्याची अपार इच्छा, भीती, चिंता, संशय अशा नकारात्मक भावनांच्या जंजाळात, मानसिक संघर्षात अडकायला होते. अशा नात्यामधून बाहेर कसे पडायचे याचा पूर्वविचार नसतो. या नात्याला कायदेशीर चौकट नाही. मग दाद मागायला व्यासपीठ नाही, परत माघारी जायला वाट नाही, मार्गदर्शक, आदर्श जोडीची उदाहरणे नाहीत, अशा अवस्थेत ही एकांतिक, टोकाची कृत्ये होतात का? हाही मुद्दा विचारार्थ घ्यायला हवा.
 
 
कॉपीकॅट क्राइम - नवा गुन्हा घडतो, त्यामागे एखादी प्रत्यक्ष घडलेली घटना, घटनेची बातमी, सिनेमा, नाटक किंवा मनोरंजन दुनियेमधले मंचन हे निमित्त असते. याला कॉपीकॅट क्राइम म्हणतात - म्हणजे आपण याला ‘अनुकरण गुन्हा’ म्हणू शकतो. अनेक गुन्हेगारांनी केलेल्या खून, बलात्कार, चोरी अशा गंभीर गुन्ह्याची प्रेरणा सिनेमा-नाटकातून, पूर्वीच्या सत्य घटनेतून किंवा मालिकेमध्ये दाखवलेल्या चित्रणातून घेतल्याचे सांगितलेले आहे. बातम्या, विषय-आशय वार्‍याच्या वेगाने पोहोचण्याच्या आजच्या काळात जबाबदार वृत्तांकन, विषय-आशय म्हणजे कंटेंट निर्मितीची जबाबदारी, त्याचे नियमन, त्यांच्या धंदेवाईक बेलगामपणाला मर्यादा, नियमावली, तक्रार करण्याला जागा, ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नियमावली, नियामक बोर्ड यांचाही प्राथमिकतेने विचार करायला हवा. अनुकरण गुन्हे थोपवणे आपल्या हातात आहे.
 

vivek 
 
लैंगिकतेचा मुक्त व्यवहार - 20-21व्या शतकतल्या जागतिक अभिसरणातून, तंत्र व वैज्ञानिक प्रगतीतून, शरीरपोषणासंबंधी झालेल्या संशोधनातून व सेवनातून, रासायनिक खतांच्या वापरातून, उत्तेजक द्रव्य व दृश्य यांच्या भडिमारातून, औषध संशोधन-उत्पादन-जाहिरात व्यवसाय यांच्या युतीतून, देशोदेशींच्या वस्तूंच्या सहज उपलब्धतेतून, उपभोगवादी दृष्टीकोनातून, अपारंपरिक जगण्यातून, उत्पादन व कष्ट आणि पैसा व उपभोग यातल्या व्यस्त समीकरणातून मुलांची लैंगिकता बदलत गेली आहे. लवकर वयात येणे, माध्यमांमधून सतत आदळणारी लैंगिकता, कामुकता, उत्तेजना यांचा परिणाम आणि स्वत:च्या लैंगिक भावना, जाणिवा याबद्दल गोपनीयता, शास्त्रीय माहितीचा अभाव, कुमारवयातील मानसिक शारीरिक आंदोलने हाताळायला पालक व शिक्षक तोकडे पडणे, या वयातील मुलांसमोर असलेला जीवनध्येयाचा अभाव अशा अनेक कारणांनी युवकांना लैंगिकता व्यवस्थापनाचे प्रश्न भेडसावत आहेत. विवाहपूर्व व विवाहबाह्य लैंगिक संबंधांना नैतिकतेच्या दृष्टीकोनातून तपासले नाही, तरी मानवी भावभावना, मानसिक गुंतवणूक, अपेक्षा यांच्या अनुषंगाने तपासले, तर काय दिसते? शरीरसंबंध ही पशूंमध्ये असते तशी केवळ शारीर कृती नाही. वयाच्या तीन-चार वर्षांनंतर ज्या इंद्रियांचे, अवयवांचे खाजगीपण, हक्क तुम्ही जपलेले असते, त्यांचे इंद्रियसुख पशू पातळीहून मोलाचे नाही का? शरीरसंबंधाला सख्यभावाची, समत्वाची, समादराची जोड मिळाली, तर ते एका उंचीवर जाऊन पोहोचते. मग तिथे सात्त्विक कृतार्थतेची भावना येते, अनुभव मिळतो. मग क्षुल्लक स्पर्धा, अहंकार, त्रागा यांना थारा उरत नाही.
 
 
विषारी, विखारी नातेसंबंध ओळखायला शिकणे, समोरच्या व्यक्तीकडून येणारे नकारात्मक सिग्नल्स ओळखायला शिकणे, त्यावर उपलब्ध कायदेशीर संरक्षण, कृती करायचे मार्ग समजून घेणे हेही महत्त्वाचे.
 
 
भारतीय संस्कृतीशी नाळ तुटल्यामुळे गृहस्थाश्रमात लैंगिक परिपूर्तीला दिलेले महत्त्व व जबाबदार लैंगिक वर्तन यांवर पाश्चात्त्य व्यक्तिवादी व वैषयिक संस्कृतीचे आक्रमण झाले आहे. अंधानुकरणातून व पाश्चात्त्य प्रभावातून काही प्रश्न निर्माण होत आहेत. ‘माझा देह माझा अधिकार’सारख्या विचारसरणीतून दैहिक संबंध हे पशू पातळीवर, सत्तात्मक संबंधांवर आणून ठेवले आहेत. लैंगिक संबंधामध्येही दोघांचीही भावनिक गुंतवणूक असते, जोडीदाराकडून काही अपेक्षा असतात व त्यांची पूर्तता हाच या संबंधांचा आधार असतो. स्वातंत्र्य व स्वैर, स्त्रैण संबंध यात फरक करता यायला हवा. लैंगिक स्वातंत्र्याची कोणती किंमत मोजावी लागेल याचे भान ठेवायलाच हवे.
 
 
क्रौर्य व निर्ढावलेपण - डार्क वेबवर आणि वेबसिरीजमध्ये, सिनेमात उपलब्ध लैंगिक व हिंसक कंटेंट, तो पाहायला स्वस्तातले किंवा फुकट इंटरनेट, वैयक्तिक स्मार्ट गॅजेट, वाहिन्यांवरून होणारे अशा दुर्घटनांचे प्रसारण, बाईला भोगवस्तू दाखवण्याची होड या सगळ्यातून समाजाचे बधिरीकरण होत आहे. संवेदना हरवत आहेत. एकटेपण, जगण्याचा तीव्र संघर्ष, सामाजिक संकेतांना दिलेला फाटा, स्त्रीबद्दलची हीनतेची, अनादराची भावना, मर्दपणाच्या विपर्यस्त कल्पना, स्त्रीचा नकाराचा अधिकार डावलणे असे अनेक मुद्दे आहेत. नुसते वापरून फेकून द्यायचे नाही, तर जीवे मारायचे हे कुठून आले आहे? कुठे कुठे दुरुस्त्या करायला हव्यात? या प्रश्नांची उत्तरे सोपी नाहीत, सरधोपट नाहीत. प्रत्येक कारणावर आघात करायला हवा.
 
 
 
क्रौर्याच्या नवनव्या पातळ्या गाठल्या जात आहेत, हे समाजाच्या सज्जनशक्तीपुढे ठाकलेले आव्हान आहे. तातडीची कृती केली नाही, तर ही भीषण मालिका संपणारच नाही.
 
 
nayanas63@gmail.com

नयना सहस्रबुध्दे

स्त्रीविषयक लेखनासाठी प्रसिध्द असणाऱ्या नयना सहस्रबुध्दे या भारतीय स्त्री शक्ती या संघटनेच्या संस्थापक सदस्य आहेत. भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या म्हणूनही त्या कार्यरत होत्या. नयना सहस्रबुध्दे या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारीपदावर कार्यरत होत्या. सध्या महिला बँकेत डेप्युटेशनवर रुजू झाल्या आहेत. साप्ताहिक विवेकमध्ये स्त्रीभान या सदरातून त्या स्त्रीविषयक लेखन करत आहेत.