हीसुद्धा माणसे आहेत

विवेक मराठी    16-Jun-2023   
Total Views |
नुकतीच परभणी जिल्ह्यात केवळ संशयावरून एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली. भटके विमुक्त समाजातील शिकलगार या नावाने ओळखल्या जाणार्‍या समाजातील तीन अल्पवयीन मुलांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी अवस्थेत आहेत. हल्ला करणारे मुस्लीम समाजाचे आहेत. या घटनेनंतर प्रशासन आणि तपास यंत्रणा सुस्त असल्याचे दिसून येते आहे. या घटनेचा योग्य तपास करून पीडित बांधवांना न्याय मिळाला पाहिजे.
 
vivek
 
संघटित समाज आपल्यावरील अन्याय-अत्याचाराचा जाब विचारतो, त्याचप्रमाणे आपल्या संघटित शक्तीच्या जोरावर आपले प्रश्न तडीस नेतो. मात्र जो समाज संघटित नाही, त्यांची नेहमीच परवड होत असते. भटके विमुक्त जातीजमातींची स्थिती अशी आहे. संघटित नसल्याने अन्य समाजगटांकडून होणार्‍या अन्यायाविरुद्ध त्यांना न्यायसुद्धा मागता येत नाही, याचे उदाहरण म्हणजे परभणी जिल्ह्यात घडलेले सामूहिक हत्याकांड. परभणीत राहणार्‍या शिकलगार या भटक्या समूहातील तीन अल्पवयीन मुले उखळद येथील समूहाच्या हल्ल्याची शिकार झाली. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासनाच्या आणि तपास यंत्रणांच्या भोंगळ कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
 
परभणी जिल्ह्यात घडलेली घटना पुढीलप्रमाणे आहे - 27 मे रोजी परभणीतील शिकलगार वस्तीत डुक्कर पकडण्यासाठी या असा निरोप आला. त्यानुसार वस्तीतील क्रिपालसिंग भोंड, गोरासिंग टाक, करुणसिंग टाक हे तिघे जण जाळी, दोरी आणि काठी घेऊन निघाले. उखळद या गावात त्या तिघांना अडवण्यात आले. हे तिघे चोर आहेत असे समजून त्यांना अडवले, मशिदीच्या ध्वनिक्षेपकावरून गावाला एकत्र येण्याच्या सूचना दिल्या गेल्या. हे तिघे जण चोरी करण्याच्या उद्देशाने आले आहेत असा संशय व्यक्त करण्यात आला आणि जमलेल्या लोकांनी मारहाण सुरू केली. तिघांच्या पगड्या काढून केस उपटले. डोळ्यात मिरची पावडर टाकली. जबर मारहाण करण्यात आली. अख्खा गाव काठ्या घेऊन या तिघांवर तुटून पडला. गावचा उपसरपंच या हल्ल्याला प्रोत्साहन देत होता. या हल्ल्यात चौदा वर्षांच्या क्रिपालसिंगचा मृत्यू झाला. अन्य दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना घडत असताना पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांसमोरही मारहाण सुरू होती. माणुसकी विसरलेला जमाव मारहाण करत असताना पोलीस हतबलपणे पाहत होते. शेवटी पोलिसांनी तिघांना दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी क्रिपालसिंगला मृत घोषित केले. हा सर्व घटनाक्रम पाहिला, तर लक्षात येईल की हा संघटितपणे केलेला खून आहे. केवळ संशयावरून केलेले हत्याकांड आहे. 27 तारखेला ही घटना घडली, तरी माध्यमांनी तिची दखल घेतली नव्हती. 30 मे रोजी भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्यकर्ते परभणीत पोहोचले आणि शिकलगार वस्तीत गेले, संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला आणि संबंधित तपास यंत्रणा व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले, तेव्हा माध्यमांनी या घटनेची दखल घेतली. भटके विमुक्त विकास परिषदेच्या प्रयत्नातून 8 जून रोजी राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे पथक पीडित कुटुंबीयांना भेटले. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगानेही या घटनेची दखल घेतली आहे. माणुसकीला काळिमा असणार्‍या या घटनेचा योग्य तपास करून पीडित बांधवांना न्याय मिळाला पाहिजे.

शिकलगार समाज पहिल्या गटात समाविष्ट होतो. पंजाबातून आलेला हा समाज शीख पंथाशी नाळ जोडून आहे. विविध प्रकारची हत्यारे तयार करणे हे या समाजाचे उपजीविकेचे साधन आहे. तलवार, चाकू, बंदूक अशी हत्यारे तयार करून त्याची विक्री करणारा हा समाज फिरस्ता आहे. वेगवेगळ्या गावांत जाऊन तो आपल्या कौशल्याच्या जोरावर आपले पोट भरत असतो. हे समाजबांधव काटक, चपळ आणि धाडसी असतात. त्यांच्या या गुणामुळे डुक्कर पकडण्यासाठी त्यांना बोलावण्यात आले आणि ही घटना घडली. भटके विमुक्त म्हटला की तो चोर असणार ही मानसिकता समाजात रूढ झाली असून शिकलगार समाजाला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.
vivek
उखळद येथील हे हत्याकांड केवळ संशयावरून झाले की यामागे आणखी काही वेगळे कारण आहे, हे समाजासमोर आले पाहिजे. कारण हल्ला करणारा मुस्लीम समाज आणि शिकलगार समाज यांचे वैर असण्याचे कारण नाही. मग केवळ चोर असल्याचा संशय आल्याने मारहाण करण्याचे आणि त्यात एकाचा जीव घेण्याचे कृत्य करण्याची हिंमत का झाली? चोरीचा संशय आल्याने पोलिसांना बोलावून त्या तिघांना पोलिसांच्या ताब्यात का दिले नाही? मशिदीच्या ध्वनिक्षेपकावरून सूचना देऊन गावकर्‍यांना एकत्रित का केले? असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. मुस्लीम समाज संघटित समाज आहे. त्यामुळे कदाचित तपास यंत्रणावर दबाव निर्माण केला जाऊ शकतो. अशा वेळी असंघटित, उपेक्षित, वंचित समाजाला न्याय कसा मिळणार? हा आमचा प्रश्न आहे. भटके विमुक्त समाजाचा विचार करायचा तर या समाजाची तीन गटांत विभागणी करता येईल. पहिला गट हा कौशल्ये जपणारा आणि त्यांच्या आधारे आपली उपजीविका करणारा आहे. दुसरा गट हा धर्माच्या आधारावर आपली उपजीविका करणारा आहे. तर तिसरा गट हा अंगमेहनत करून मिळेल ते काम करत आपली उपजीविका करतो. शिकलगार समाज पहिल्या गटात समाविष्ट होतो. पंजाबातून आलेला हा समाज शीख पंथाशी नाळ जोडून आहे. विविध प्रकारची हत्यारे तयार करणे हे या समाजाचे उपजीविकेचे साधन आहे. तलवार, चाकू, बंदूक अशी हत्यारे तयार करून त्याची विक्री करणारा हा समाज फिरस्ता आहे. वेगवेगळ्या गावांत जाऊन तो आपल्या कौशल्याच्या जोरावर आपले पोट भरत असतो. हे समाजबांधव काटक, चपळ आणि धाडसी असतात. त्यांच्या या गुणामुळे डुक्कर पकडण्यासाठी त्यांना बोलावण्यात आले आणि ही घटना घडली. भटके विमुक्त म्हटला की तो चोर असणार ही मानसिकता समाजात रूढ झाली असून शिकलगार समाजाला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.

 
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण करणार्‍या वीरांचा वारसा भटके विमुक्त समाजाला लाभला आहे. मात्र इंग्रजांनी त्यांच्यावर चोर, दरोडेखोर असा शिक्का मारला आणि स्वातंत्र्योत्तर काळात आपण तो शिक्का न पुसता त्यांना गावकुसाबाहेर बाहेर ठेवले. आजही भटके विमुक्त समाज गावोगावी भटकंती करत आपले जीवन जगत आहे. या समाजाचा आजही सांगायला गाव नाही, राहायला घर नाही अशी त्यांची अवस्था आहे. शिक्षणापासून अनेक दशके वंचित राहिलेल्या भटके विमुक्त समाजातील पहिली पिढी आता शिकू लागली आहे. काही सामाजिक संघटनांच्या माध्यमातून भटके विमुक्त समाजाला थोडेफार स्थैर्य येऊ लागले आहे. मात्र समाजाचा या बांधवांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही, हेच उखळद येथील घटनेतून सिद्ध झाले आहे. भटके विमुक्त समाजसुद्धा माणसांनी तयार झाला आहे. तीसुद्धा माणसे आहेत, त्यांनासुद्धा आपल्यासारख्या भावभावना आहेत आणि आपल्यासारख्या गरजाही आहेत, आपल्यासारखीच उन्नतीची आस त्यांनाही आहे, तीसुद्धा माणसे आहेत, हे सर्वात प्रथम समजून घेणे गरजेचे आहे. उखळद येथील घटनेत मुस्लीम समाजाने माणुसकीला काळिमा फासला. अशा घटना अन्य ठिकाणीही होत असतात. हिंदू समाजाचा अविभाज्य भाग असणार्‍या भटके विमुक्त बांधवांवर हिंदू बांधव अन्याय-अत्याचार करत असतात, ही गोष्ट दुर्दैवी आहे. काही क्षणासाठी धर्म, समाज या गोष्टी बाजूला ठेवून विचार करायचा म्हटले, तर तीसुद्धा माणसे आहेत हे आपल्या लक्षात येईल आणि म्हणून माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे ही अपेक्षा व्यक्त करण्यास हरकत नसावी. उखळद येथील हत्याकांड दुर्दैवी आहे. एका अल्पवयीन मुलाचा हकनाक बळी गेला आहे. या घटनेचा तपास योग्य दिशेने करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी प्रशासनाने सामाजिक भावजागृती केली पाहिजे.
रवींद्र गोळे
। 9594961860

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001