आणीबाणीतील आठवणी!

विवेक मराठी    20-Jun-2023
Total Views |
@प्रमिला गोखले
 
भूमिगत झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ओळखू नये व आपल्याला अटक करू नये म्हणून अनेकदा वेषांतर करावे लागत असे. वेषांतर करत असल्यामुळे हे कार्यकर्ते त्यांच्या परिचितांनादेखील चटकन ओळखू येत नसत. यासाठी दत्तोपंत ठेंगडी आमच्या घरी आले की मोठ्या आरशासमोर बसून आपले केस रंगवत असत. ते पाहून माझ्या लहान मुलींना फारच गंमत वाटत असे....आणीबाणीच्या कालखंडातील आठवणींना उजाळा देणारा लेख....
 
vivek 
हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष व साप्ताहिक विवेकचे माजी संपादक, ज्येष्ठ विचारवंत व लेखक रमेशजी पतंगे यांना दिल्ली येथे दि. 22 मार्च रोजी मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आल्याची बातमी मी दूरचित्रवाणीवर पाहिली आणि माझ्या मनात जुन्या आठवणींचा कल्लोळ माजला. 1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी पुकारली होती. जो जो आपल्या विचाराचा नाही अथवा आपल्यापेक्षा वेगळा विचार मांडतो, अशा सर्व व्यक्तींची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणून पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली होती. मुंबईतील संघाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते मिसा कायद्याखाली अटकेत टाकण्यात आले होते. संघाने या आणीबाणीच्या विरोधात लढण्याचा निश्चय केला. त्यासाठी आणीबाणीच्या विरोधात जनमत संघटित केले आणि मोठ्या प्रमाणात सत्याग्रह घडवून आणले. इंदिरा गांधींना कोणाचाच विरोध नाही अशी स्थिती राहिली नाही. संघाचे दुसर्‍या फळीतील अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले होते आणि सत्याग्रहींना तयार करणे, त्यांच्या तुकड्या बनवून त्यांना सत्याग्रहासाठी पाठविणे, निधी संकलन करणे, आपल्या स्वयंसेवकांचे मनोधैर्य कायम राखणे अशा प्रकारची विविध कामे हे कार्यकर्ते करीत होते.

रमेश पतंगे हेच बर्‍याचदा संघ अधिकार्‍यांना आमच्याकडे घेऊन येत असत. तसेच त्यांना भेटण्यासाठी अन्य व्यक्तींनाही घेऊन येत असत. याची सर्व व्यवस्था रमेशजी अगदी मन लावून बघत असत आणि त्याचा मला काही त्रास होऊ नये व मला कमीत कमी काम करावे लागेल याची ते आपणहोऊन दक्षता घेत असत.पद्मश्री रमेश पतंगेदेखील भूमिगत होऊन याच कामात व्यग्र होते. संघाचे बरेच वरिष्ठ अधिकारीही भूमिगत झाले होते. त्यांच्यासाठी सुरक्षित निवास शोधणे आणि त्यांच्या बैठकांची व्यवस्था करणे हे काम त्यांच्याकडे होते. त्यामुळे रमेश पतंगे यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि संघाचे वरिष्ठ अधिकारी राहण्यासाठी आमच्या घरी येतील अशी त्यांनी आम्हाला माहिती दिली. माझे पती केशव गोखले हे संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक होते. त्यामुळे या कामात फार मोठा धोका आहे हे त्यांना माहीत असूनही त्यांनी या कामासाठी होकार दिला. त्यानंतर संघाचे सरकार्यवाह माधवराव मुळ्ये, दत्तोपंत ठेंगडी हे आणि अन्य बरेच जण अंधेरी येथील टाटा कॉलनीतील आमच्या घरी भूमिगत होऊन राहण्यासाठी आले होते. रमेश पतंगे हेच बर्‍याचदा संघ अधिकार्‍यांना आमच्याकडे घेऊन येत असत. तसेच त्यांना भेटण्यासाठी अन्य व्यक्तींनाही घेऊन येत असत. याची सर्व व्यवस्था रमेशजी अगदी मन लावून बघत असत आणि त्याचा मला काही त्रास होऊ नये व मला कमीत कमी काम करावे लागेल याची ते आपणहोऊन दक्षता घेत असत. दूरचित्रवाणीवरची बातमी पाहिली आणि या महान व्यक्तिमत्त्वाला पुन्हा एकदा भेटण्याची इच्छा झाली. मी लगेच पुण्याच्या विवेक कार्यालयात दूरध्वनी लावला आणि रमेशजींचा भ्रमणध्वनी क्रमांक घेतला. मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी 18 एप्रिल रोजी माझ्याकडे येण्याचे कबूल केले आणि ते आलेसुद्धा! ह्या भेटीत आणीबाणीतील अनेक आठवणींना उजाळा मिळाला.
vivek 
गोखले दांपत्य
रमेशजींच्या वडिलांचे टेलरिंगचे दुकान होते. त्यामुळे रमेशजीसुद्धा शिलाई काम अगदी उत्तम पद्धतीने करायचे. रमेशजी आमच्या घरी निवासाला असताना माझ्या मुलींशी त्यांची गट्टी जमली होती. रमेशजींनी फावल्या वेळात माझ्या एका मुलीच्या कापडाची शिलाई अतिशय उत्तम रितीने करून दिली होती. माझी मुलगी एकदम खूश झाली. माधवराव मुळ्ये आमच्या घरात राहायला आले आणि ते आमच्या घरातील एक सदस्यच होऊन गेले. त्यांचे वय जास्त असल्यामुळे त्यांचे जेवण पथ्यपाण्याचे होते. फावल्या वेळात मी त्यांच्याशी गप्पा मारत असे. अशाच गप्पा मारताना त्यांनी आपल्या गावाचे नाव सांगितले, ते नाव होते ‘ओझरखोल’.. माझे माहेर, ते कोकणातले आणि माझे गाव संगमेश्वर! ते आमच्या गावाकडचेच निघाल्यामुळे तिथले बरेच जण त्यांना माहीत होते आणि त्यांच्या चांगल्या ओळखीचे होते. अशा जुन्या ओळखी निघाल्यामुळे आमच्या चांगल्याच गप्पा रंगल्या. त्याचप्रमाणे भारतीय मजदूर संघाचे प्रमुख कार्यकर्ते दत्तोपंत ठेंगडी हे अधूनमधून आमच्या घरी राहायला येत असत. ते विदर्भातले आणि माझे सासरही विदर्भातले. माझे सासू-सासरे हे नागपूरला राहत आणि सुट्टीच्या काळात ते आमच्या घरी राहायला येत. दत्तोपंत ठेंगडी आणि माझे सासू-सासरे एकत्र आले की, मग नागपूरकडचे विषय निघत आणि त्यांच्या गावाकडच्या गप्पा चांगल्याच रंगत. त्यामुळे त्यांचा आणि आमचासुद्धा वेळ खूप छान जात असे.
भूमिगत झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ओळखू नये व आपल्याला अटक करू नये म्हणून अनेकदा वेषांतर करावे लागत असे. वेषांतर करत असल्यामुळे हे कार्यकर्ते त्यांच्या परिचितांनादेखील चटकन ओळखू येत नसत. यासाठी दत्तोपंत ठेंगडी आमच्या घरी आले की मोठ्या आरशासमोर बसून आपले केस रंगवत असत. ते पाहून माझ्या लहान मुलींना फारच गंमत वाटत असे. त्या मला म्हणत, “आई, बघ ना, आम्ही मुलींनी मेकअप करण्याऐवजी हे एवढे मोठे आजोबा कसे मेकअप करताहेत ते बघ.” मग ते हसत आणि मग दत्तोपंतांनाही हसू आवरत नसे.

दत्तोपंत ठेंगडी आमच्या घरी आले की मोठ्या आरशासमोर बसून आपले केस रंगवत असत. ते पाहून माझ्या लहान मुलींना फारच गंमत वाटत असे. त्या मला म्हणत, “आई, बघ ना, आम्ही मुलींनी मेकअप करण्याऐवजी हे एवढे मोठे आजोबा कसे मेकअप करताहेत ते बघ.” मग ते हसत आणि मग दत्तोपंतांनाही हसू आवरत नसे.
एकदा आमच्यावर फार मोठे संकट आले होते. त्याचे झाले असे - कुणास ठाऊक, पण दत्तोपंत आमच्या घरी येणार आहेत अशी सी.आय.डी.च्या लोकांना एके दिवशी कुणकुण लागली आणि मग त्यांना अटक करण्यासाठी गुप्त पोलिसांनी आमच्या सोसायटीला गराडा घातला. मला त्याची काही माहिती नव्हती. माझ्या मुली शाळेत गेल्या होत्या. मी नेहमीप्रमाणे सायंकाळी मुलींना शाळेतून घरी घेऊन आले, त्याच वेळी एक गुप्त पोलीस माझ्या दारात स्तब्धपणे उभे राहिले आणि माझी चौकशी करू लागले, “तुमच्याकडे संघाचे अधिकारी आले आहेत का? ते कधी येणार आहेत?” अशा प्रश्नांची माझ्यावर सरबत्ती केली, तेव्हा “आमच्या घरी नातेवाइकांशिवाय कोणीच आले नाही आणि संघाच्या अधिकार्‍यांबद्दल मला काही माहीत नाही” असे मी त्यांना सांगितले. पण माझ्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसला नाही. त्यांनी माझ्या घराची झडती घेतली. सगळीकडे तपासून पाहिले, पण दत्तोपंत घरीच नव्हते, तर ते ह्यांना सापडणार कसे? दत्तोपंत आमच्याकडे राहायला येणार ही बातमी खरी असली, तरी योगायोगाने त्यांना काहीतरी काम निघाल्यामुळे त्यांना यायला बराच उशीर झाला. दत्तोपंत येण्यापूर्वी माझे पती कार्यालयातून घरी परतत असताना त्यांनाही पोलिसांनी सोसायटीच्या गेटवरच थांबवले आणि त्यांची चौकशी सुरू केली. “तुमच्या घरी दत्तोपंत कधी राहायला येणार आहे ते सांगा, खोटे बोललात तर आम्ही तुम्हाला पकडून नेऊ आणि तुरुंगात टाकू” अशी धमकी दिली. माझ्या यजमानांनी सरळ कानाला हात ठेवले व आपल्याला काहीच माहीत नाही अशीच भूमिका घेतली. माझे यजमान सोसायटीमध्ये सर्वपरिचित असल्यामुळे आणि काही सामाजिक कामे करीत असल्यामुळे एक भला सद्गृहस्थ अशीच त्यांची प्रतिमा होती, म्हणून अन्य लोकांकडे चौकशी करूनही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. शिवाय दत्तोपंत आमच्या घरी आलेच नव्हते. वारंवार चौकशी करून पोलीससुद्धा कंटाळले आणि आमच्या घरीही कोणीच आले नसल्यामुळे ते कंटाळून निघून गेले. मग रात्री अगदी उशिरा दत्तोपंत आपली बॅग घेऊन आमच्या दारात येऊन उभे राहिले आणि आम्ही त्यांना दारातच संध्याकाळी घडलेला वृत्तान्त सांगितला व बाहेर कोणी पोलीस असतील व त्यांच्या हातात सामान पाहून पोलिसांना संशय येईल, अशा विचाराने आम्ही सामान घरीच सोडून रिकाम्या हाताने बाहेर जाण्यास सांगितले. ते आपले सामान आमच्याकडे देऊन आल्यापावलीच परत गेले. त्यांना काही अटक झाली नाही व आमचा जीव भांड्यात पडला. दत्तोपंतांना त्यांचे सामान हवे होते. एक माणूस त्यांचा निरोप घेऊन आमच्या घरी आला व दत्तोपंतांचे सामान मागू लागला. मात्र आम्ही त्याला कोणतीच ओळख दाखविली नाही व सरळसरळ नकार दिला. त्यांनी माझ्या सांगण्यातला भाव ओळखला व तो हसून परत गेला. मग दुसर्‍या दिवशी तो दत्तोपंतांची चिठ्ठी घेऊन आला. मी दत्तोपंतांची महत्त्वाची कागदपत्रे डाळ-तांदळाच्या किराणा सामानाच्या डब्यांमध्ये लपून ठेवलेली होती, कारण ती पोलिसांच्या हाती लागणे धोकादायक होते. त्यामुळे चिठ्ठी घेऊन आलेल्या माणसाच्या हातून मी दत्तोपंतांना महत्त्वाची कागदपत्रे न पाठवता केवळ साधेसुधे सामान पाठविले. ते व्यवस्थित मिळाल्याची पोच त्यांच्याकडून आल्यानंतर आम्ही त्यांना त्यांची महत्त्वाची कागदपत्रे पाठवून दिली. अशा बर्‍याच आठवणी आहेत, परंतु कालमानानुसार त्या अगदी माझ्याही विस्मृतीत गेल्या आहेत. रमेशजींशी भेट झाल्यामुळे ह्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आणि मला अगदी कृतार्थ झाल्यासारखे वाटले!