वारसा विसरलेले वारसदार

विवेक मराठी    21-Jun-2023   
Total Views |
सध्या महाराष्ट्रात सामाजिक राजकीय वातावरण ढवळून निघाले असून क्रूरकर्मा औरंगजेबाचे महिमामंडन करण्याची होड लागली आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार प्रकाश आंबेडकरही सहभागी झाले आहेत. दलित समाजावर अन्याय-अत्याचार करणार्‍यांमध्ये मुस्लीम समाजातील गुंडप्रवृत्तीच्या लोकांची संख्या जास्त आहे. त्याचप्रमाणे जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडले जाते आहे. या विषयावर प्रकाश आंबेडकर काही बोलत नाहीत. मात्र औरंगजेबाच्या कबरीला भेट देण्यात त्यांना आनंद वाटतो.

ambedkar
 
सध्या महाराष्ट्रात सामाजिक आणि राजकीय पटलावर खूप मोठी धामधूम सुरू आहे. एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्राची पावले पंढरपूरच्या दिशेने पडत आहेत. आषाढी वारीच्या निमित्ताने आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असताना पंढरीच्या विठोबाचे मंदिर ज्याने जमीनदोस्त केले, त्या औरंगजेबाचे महिमामंडन करण्याची होडही लागली आहे. काही दिवसांपूर्वी औरंगजेबाच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली, औरंगजेबामुळे कोल्हापुरात दंगल झाली, अशा क्रूरकर्मा औरंगजेबाच्या उदात्तीकरणात अनेक पक्ष आणि नेते गुंतले आहेत. नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी दोन स्थळांना भेट दिली, पैकी एक स्थळ होते भद्रा मारुती मंदिर आणि दुसरे स्थान होते खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर. दोन्ही ठिकाणी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. भद्रा मारुती येथे भेट दिल्यावर ते म्हणाले की “सर्वांच्या श्रद्धांचा आदर राखला पाहिजे.” खुलताबाद येथील भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “जयचंद कोण याचा शोध घेतला पाहिजे.” सध्या महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबाद येथे दिलेल्या भेटीमुळे उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. औरंगजेबामुळे महाराष्ट्रात सामाजिक वातावरण बिघडले असताना प्रकाश आंबेडकरांनी खुलताबादला भेट देऊन काय साध्य केले? आणि त्यांच्या या भेटीचा त्यांना राजकीय फायदा होईल का? असे प्रश्न उपस्थित केले जातो आहे. या भेटीदरम्यान ‘आपण शिवसेनेशी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याशी युती करत आहात, त्यांना ही भेट पसंत पडेल का?” असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता प्रकाश आंबेडकर यांनी प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मैत्रीचा दाखला दिला. दोन महापुरुषांच्या दोन नातवांनी आता उघडपणे औरंगजेबाचे गोडवे गायला सुरुवात केली आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या हिंदुत्वाची धुरा उद्धव ठाकरे सांभाळत आहेत असे प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांना सांगितले आहे, तर आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक वारसदार आहोत हे त्यांनी सांगितले आहे.
 
 
ambedkar
 
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वैचारिक वारशाचा आणि राजकीय वाटचालीचा परामर्श येथे घेण्याची आवश्यकता नाही. मागील साडेतीन वर्षांच्या कालावधीत उद्धव ठाकरे यांची वैचारिक कुवत आणि पूर्वजांचा वारसा यासंबंधी आपण अनुभव घेतला आहे. त्यामुळे त्याविषयी अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही. मात्र प्रकाश आंबेडकर जेव्हा औरंगजेबाच्या कबरीला भेट देतात, तेव्हा त्यांना मिळालेल्या देदीप्यमान वारशाचा त्यांना विसर पडलेला आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. प्रकाश आंबेडकर यांची राजकीय कारकिर्द लक्षात घेतली, तर ते खर्‍या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक वारसदार आहेत असे म्हणता येईल का? अगदी मागच्या पाच-सहा वर्षांचा जरी आढावा घेतला, तर त्यांनी स्वत:ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून कोसो दूर नेले आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी ओवेसींच्या एमआयएमशी युती केली. ओवेसी हे उघडपणे मुस्लीम तुष्टीकरणाचे राजकारण करतात. भारतीय संविधानावर ओवेसींचा विश्वास नाही. मुस्लीम महिलांच्या हितासाठी तयार केलेल्या कायद्याला त्यांनी विरोध केला होता. अशा ओवेसींच्या पक्षाशी प्रकाश आंबेडकरांनी युती केली. या युतीमुळे आपला राजकीय फायदा होईल, मराठवाड्यात एखाद्या खासदार निवडून येईल असे प्रकाश आंबेडकर यांना वाटले होते. प्रत्यक्षात मात्र या युतीचा ओवेसींच्या पक्षालाच फायदा झाला. याच लोकसभा निवडणुकीदरम्यान ओवेसींनी बुद्धविहारास जाण्यास नकार दिला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यास नकार दिला होता. या सर्व गोष्टींचा अनुभव घेऊनही प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा मुस्लीम लांगुलचालन करण्याचा प्रयत्न करत आहेत असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. प्रकाश आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे जसे प्रबोधनकार ठाकरे यांचे हिंदुत्व उद्धव ठाकरे पुढे नेत आहेत, तसे प्रकाश आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पालन करत आहेत का? मुस्लीम मतांसाठी प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला मुस्लीम आक्रमणाचा इतिहास प्रकाश आंबेडकर विसरलेले आहेत, असे म्हणता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लीम मानसिकतेची आणि मुसलमान आक्रमकांनी केलेल्या अत्याचाराची समीक्षा केली आहे, ते म्हणतात,
 

ambedkar 
 
‘बौद्ध धर्माच्या र्‍हासाचे मुख्य कारण म्हणजे, हिंदू पंडित सांगतात त्याप्रमाणे कुमारिल, आद्य शंकराचार्य इत्यादींनी बुद्धमताचा वाग्युद्धात केलेला पराभव हे नव्हे. कारण बुद्धाच्या शिकवणीच्या मध्यवर्ती सिद्धान्तावर - सामाजिक समता, जगातील दु:खपरिहारासाठी प्रत्येक व्यक्तीचे मन:परिवर्तन, नीतितत्त्वांची सामाजिक जीवनातील प्रतिष्ठापना, बुद्धिवाद इत्यादीवर - या दोन्ही पंडितांनी मुळीच आघात केलेला नाही. या दोघाही पंडितांनंतर बौद्ध धर्म भारतात कित्येक वर्षे समृद्धावस्थेत होता. बौद्ध धर्माच्या र्‍हासाचे मुख्य कारण म्हणजे ज्या भिन्न संस्कृतीच्या व भिन्न सांस्कृतिक पातळीच्या लोकांमध्ये त्याचा प्रचार झाला, त्यांच्या आचारांची व समजुतीची बौद्ध धर्मावर झालेली अनुचित प्रतिक्रिया. भारतातील बौद्ध धर्मावर झालेला सर्वात मोठा आघात म्हणजे इस्लामी आक्रमणाचा. भारताकडे वळताना मुसलमान आक्रमकांना जे परधर्मी लोक भेटले, ते बौद्धधर्मीयच होते. त्यांच्या भाषेत मूर्तीला ‘बुत्’ असे म्हणत. बुत्शिकन म्हणजे मूर्तिभंजक होणे हे त्यांच्या मते गाझीपणाचे लक्षण होते. हिंदूंपेक्षा बौद्धांवर चढविलेले त्यांचे हल्ले अधिक हिंस्र व विध्वंसक स्वरूपाचे होते. त्यांनी केलेल्या बौद्ध भिख्खूंच्या कत्तलीने 11व्या शतकापासून 13व्या शतकापर्यंतची इतिहासाची पाने रक्ताने रंगलेली आहेत. नालंदासारख्या जगविख्यात बौद्ध विद्यापीठाचा त्यांनी पूर्ण नाश केला.’ (खंड 18-3, पान 568.) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विशद केलेली मानसिकता आजही अनुभवता येते. अफगाणिस्तानमधील बुद्धमूर्ती तोफा लावून फोडणारे मुस्लीम होते आणि प्रकाश आंबेडकर ज्या औरंगजेबाच्या कबरीला भेट देऊन आले, तो औरंगजेबही याच मानसिकतेचा होता. त्यानेही मंदिर फोडली होती. आजही दलित बांधवांना छळाने, बळाने, प्रलोभन दाखवून धर्मांतरित केले जाते. इस्लाम कबूल केला नाही, तर जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी कोणता वारसा जपला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गाचे अनुसरण केले का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भद्रा मारुती मंदिर येथे भेट देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की सर्वांच्या श्रद्धांचा आदर राखला पाहिजे. औरंगजेब हा क्रूरकर्मा होता, त्यांनी हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त केली, हिंदूंवर अत्याचार केले, छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारले, तो हिंदुद्रोही होता, ही सर्व हिंदूंची श्रद्धा आहे. प्रकाश आंबेडकर तिचा आदर कधी करणार? हा आमचा प्रश्न आहे.
 
 
ambedkar
 
प्रकाश आंबेडकर यांची राजकीय कारकिर्द कोणतीही ठोस भूमिका न घेण्याची आहे. बर्‍याचदा त्यांनी हाती घेतलेले विषय अर्धवट सोडून दिले आहेत. एमआयएमचा अनुभव गाठीशी असताना जर पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर मुस्लीम समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांना एवढेच सांगणे आहे की आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपासून दूर जात आहात आणि स्वत:बरोबर समाजाची हानी करत आहात.

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001