योगपर्व

विवेक मराठी    23-Jun-2023   
Total Views |
 
yoga
21 जून 2023 हे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे नववे वर्ष होते. यंदाच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा याच दरम्यान अमेरिका दौरा होता. 21 जूनला संयुक्त राष्ट्रसंघात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या विशेष कार्यक्रमाचे अतिथी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या कार्यक्रमास 180 देशांचे नागरिक उपस्थित होते, हादेखील एक योग होता. इतक्या देशांचे नागरिक एकत्र येण्याचा हा आजपर्यंतचा एकमेवाद्वितीय प्रसंग आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये हे नोंदले जाणार आहे, हे विशेष.
विपर्ययो मिथ्याज्ञानम् अतद्रूपप्रतिष्ठम् ॥1.8॥
 
- पतंजली योगसूत्र
 
 
पतंजली मुनींनी योगसूत्रात पाच प्रकारच्या वृत्तींमध्ये मानवी मन विभागले आहे. त्यातील एक आहे मिथ्या अथवा चुकीचे ज्ञान, जे चुकीच्या विचाराने आणि वास्तवास धरून नसलेल्या समजाने केले जाते. हिंदू संस्कृतीतून उगम झालेल्या योगसाधनेबद्दल आणि योगिक ज्ञानाबद्दलदेखील पाश्चात्त्य राष्ट्रांमध्ये आणि संस्कृतीमध्ये अनेक काळ असेच मिथ्या ज्ञान होते. योगसाधना म्हणजे चेटूक म्हणण्याच्या काही दशकांपूर्वीपर्यंत असलेल्या गैरसमजापासून ते योगसाधना म्हणजे एखादा फिटनेस कार्यक्रम आहे या आजही प्रचलित असलेल्या गैरसमजापर्यंत अनेक गैरसमज त्यात येतात.
  
 
मात्र पाश्चात्त्य जगतातील विचारवंतांना जसजसे योगाबद्दलचे आणि त्यातील विशिष्ट प्रकारचे ज्ञान आणि त्याचे शरीर-बुद्धी-मन (आत्मिक) फायदे समजू लागले, तेव्हापासून योगविद्येचे महत्त्व वाढू लागले. पण मग स्वार्थी लोक त्यावरून पैसे कसे करता येतील याचा विचार करू लागले. योगसाधनेचे क्लासेस घेऊन त्यावर शुल्क आकारण्यात सध्याच्या अर्थव्यवस्थेच्या काळात काही गैर नाही. पण त्याचेच पेटंट करणे आणि या परंपरागत चालत आलेल्या प्राचीन पद्धतीचा पूर्ण ताबा घेणे हा वाईट उद्देश होता. अमेरिकेत कशाचेही पेटंट घेण्याचा प्रयत्न होतो. जरी अमेरिकन पेटंट ऑफिसच्या म्हणण्यानुसार योगासनांचे कुठलेही पेटंट देण्यात आले नसले, तरी त्याला अनुषंगून असलेल्या अनेक गोष्टींची पेटंट्स देण्यात आली आहेत. त्याला अनुसरून 2013मध्ये Method and apparatus for yoga class imaging and streaming - थोडक्यात, व्हिडियोवर रेकॉर्डिंग करून योगविद्या शिकवण्याचे पेटंटही देण्यात आले आहे. असेच स्वत: तयार केलेली साधना आहे असे म्हणत बिक्रम चौधरी नामक व्यक्तीने ‘बिक्रम योगा’ म्हणून पेटंट घेण्याचा प्रयत्न केला. इतर कोणी प्राणिक हीलिंग असे नेहमीच्या वापरातील शब्द एकत्र करून ट्रेडमार्क करण्याचा प्रयत्न केला. कोणी याला Intellectual Property अर्थात बौद्धिक मालमत्ता करून घेण्याचा प्रयत्न करू लागले. अशा आर्थिक बाबीव्यतिरिक्त सांस्कृतिकदृष्ट्यादेखील योगसाधना ही भारतीयच नाही, मग असली तर त्याचा हिंदू संस्कृतीशी संबंध नाही असे म्हणणे चालू झाले.
 
 
yoga
 
या सर्वाच्या विरोधात मोदी सरकारच्या आधीच्या सरकारनेदेखील आवाज उठवले होते, नाही असे नाही. जगभरातील विविध पेटंट ऑफिसेसना योगासनाची माहिती पाठवली गेली अथवा त्यावर प्रयत्न केले गेले. पण असे काहीतरी करण्याची गरज होती, ज्यामुळे जागतिक स्तरावर कायमस्वरूपी मोहर बसेल की योग ही प्राचीन भारतीय विद्या आहे आणि ती कायम प्रचलित असल्याने कोणीही हक्क सांगून तिचा सार्वजनिक वापर थांबवू शकणार नाही.
 
 
 
2014 साली मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ज्या अनेक गोष्टी तोपर्यंत कमी महत्त्वाच्या समजल्या जात होत्या, त्यावर मोदी सरकारचे लक्ष केंद्रित झाले. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट होती, ती म्हणजे केवळ आर्थिकच नव्हे, तर सांस्कृतिकदृष्ट्यासुद्धा बळाचा चांगल्या हेतूने जगभर वापर करणे. योगविद्या ही त्यातील महत्त्वाची सांस्कृतिक ठेव होती. सत्तेत आल्यापासून परराष्ट्र खात्याने आंतरराष्ट्रीय संबंधांना महत्त्व देऊन जुनी मैत्री दृढ केली आणि नवीन मैत्री वाढवली, त्याचाच एक महत्त्वाचा परिणाम 2015मध्ये दिसून आला.
 

yoga 
 
राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि धर्मकारण या सर्वांनी विभागलेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनात मोदीजींनी 21 जून रोजी अधिकृतपणे ‘आंतरराष्ट्रीय योग डे’ साजरा करावा असे सुचवले. नंतर 170 राष्ट्रांनी एकत्रित तसा प्रस्ताव मांडला आणि तो 11 डिसेंबर 2014ला अविरोध संमत केला गेला. संयुक्त राष्ट्र संघाच्या इतिहासातले हे एकमेव उदाहरण आहे, जेव्हा एखादा प्रस्ताव 90 दिवसांहून कमी वेळेत आणि तोदेखील सर्वसंमत झाला.
 
 
 
21 जून 2023 हे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे नववे वर्ष होते. अमेरिकेतील विशेषत: अनिवासी भारतीय नागरिक आणि वंशीयांसाठी विशेष महत्त्वाचे आणि उत्साहाचे होते. अर्थात त्याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिन ज्यांच्यामुळे चालू झाला आणि त्यामुळे गेल्या नऊ वर्षांत योगसाधनेचा जागतिक प्रचार झाला, ते पंतप्रधान मोदी या वेळी अमेरिकेन सरकारच्या औपचारिक निमंत्रणावरून अमेरिकेत असणार होते. मोदीजींची अमेरिकन भेट अधिकृतपणे 22 जूनला चालू होणार होती. पण त्या निमित्ताने ते 21 जूनला संयुक्त राष्ट्र संघात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या विशेष कार्यक्रमाचे अतिथी म्हणून उपस्थित राहू शकले. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यात यावी - संयुक्त राष्ट्र मुख्यालय जरी न्यूयॉर्कमध्ये असले, तरी त्या मुख्यालयाच्या सीमेत ते तत्त्वत: अमेरिका नसते, तर संयुक्त राष्ट्र म्हणून असते. तिथे त्यांचे कायदे, त्यांचे संबंध, अगदी त्याची सर्व काही स्वतंत्र यंत्रणा असते. थोडक्यात हा कार्यक्रम अमेरिकन सरकारचा नव्हता, तर जागतिक स्तरावरचा होता.
 

yoga 
 
असा प्रसंग दुर्मीळ असावा, जेव्हा एखाद्या राष्ट्रप्रमुखाच्या विशेष उपस्थितीमध्ये, नेतृत्वाखाली आणि अगदी उत्सवमूर्ती म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने कार्यक्रम केला असेल. यंदाच्या 20 प्रमुख राष्ट्रांच्या जी-20च्या कार्यक्रमांचे अध्यक्षपद भारताकडे आहे आणि भारताने त्यासाठी ‘वसुधैव कुटुंबकम’ची घोषणा दिली आहे. तीच घोषणा या वेळच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे ध्येयवाक्य ठेवण्यात आले होते. ते वास्तवात आणण्यासाठी म्हणून की काय, या कार्यक्रमास 180 देशांचे नागरिक उपस्थित होते, हादेखील एक योग होता! ते केवळ स्वत:च्या देशाचे प्रतिनिधित्व करत नव्हते, तर त्याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे जगातील सर्व विविधता एका कार्यक्रमाअंतर्गत आणत होते. त्यात कलाकार होते, राजकारणी होते, विविध धर्मांचे, वंशांचे, विविध स्तरातील नागरिक होते. इतक्या देशांचे नागरिक एकत्र येण्याचा हा आजपर्यंतचा एकमेवाद्वितीय प्रसंग आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये हे नोंदले जाणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे सध्याचे अध्यक्ष हंगेरीचे Csaba Korosi (कसबा कोरोसी), न्यूयॉर्कचे महापौर एरिक अ‍ॅडम, चित्रपट अभिनेते रिचर्ड गियर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. मोदींनी योगसाधनेचे महत्त्व सांगितलेच, त्याचबरोबर योगविद्या हे पेटंट, ट्रेडमार्क आदीपासून मुक्त आहे, हे स्पष्ट केले.
 
 
 
औपचारिक उद्घाटन आणि भाषणानंतर मोदी तमाम उपस्थित जनतेत मैदानात बसले आणि स्टेजवरून दिल्या गेलेल्या प्रात्यक्षिकानुसार त्यांनीदेखील सर्वांबरोबर आसने पूर्णपणे घातली. उपस्थित जनतेसाठी हा प्रसंग खूपच आनंदाचा आणि उत्साहाचा होता, हे विविध माध्यमांनी घेतलेल्या मुलाखतींवरून स्पष्ट होत होते.
 
 
पतंजलींनी ज्याप्रमाणे मिथ्या, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती अशा पाच वृत्तींमध्ये विभागणी केली आहे, त्यात शेवटची स्मृती आहे, तिचे सूत्रबद्ध वर्णन करताना ते म्हणतात,
 
अनुभूतविषयासंप्रमोष: स्मृति: ॥1.11॥
 
अर्थात, स्मृती ही अनुभवाधारित असते.
 
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने गेल्या नऊ वर्षांत योगसाधनेचे परंपरागत महत्त्व जगापुढे पोहोचण्याचा एक मार्ग खुला झाला. मोदींनी त्यांच्या भाषणात योगसाधना जीवनाचा अविभाज्य भाग आहे असे सांगितले. पण तो जागतिक स्तरावर अविभाज्य होण्यासाठी त्याचा योग्य पद्धतीने आणि स्वकृतीतून दिसणारा प्रचार होण्याची गरज आहे. मोदींच्या या अमेरिकन दौर्‍याच्या सुरुवातीपासून जे काही समर्थनार्थ लेख आणि कार्यक्रम झालेत, त्यावरून आज भारताबद्दल आस्था असलेल्या जागतिक स्तरावरील राजकीय, उद्योग, शिक्षण आदी नेतृत्वालाही प्रचंड विश्वास आला आहे. तो विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी आपण योग आणि कर्मयोग कसे आपापल्या जीवनात आत्मसात करतो, त्यावर नऊ वर्षांपूर्वी उगवलेले हे योगपर्व कसे वृद्धिंगत होईल, हे ठरणार आहे. भारताबद्दलचा जगाचा अनुभव जितका सकारात्मक होत राहील, तितकी सकारात्मक स्मृती तयार होऊन भारतीय संस्कृती एका आधुनिक रूपात जगभर दिसू लागेल.