बार्टी नक्की कोणासाठी?

विवेक मराठी    06-Jun-2023
Total Views |

barti
 महाराष्ट्रात सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. बार्टी हा त्यापैकी एक उपक्रम आहे. मात्र मागील काही दिवसांपासून बार्टीचे काम एकजातीय झाल्याचे आरोप सातत्याने केले जात आहेत. आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते आहे हा आरोप करणार्‍या जातींची संख्या खूप मोठी आहे. एकोणसाठ जातींच्या उत्थानासाठी काम करण्याचे लक्ष्य असणारी बार्टी एकजातीय का झाली? या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे, नाहीतर पुन्हा प्रश्न विचारला जाईल - बार्टी नक्की कोणासाठी?
महाराष्ट्रात समाजविकासासाठी अनेक संस्था काम करत असतात. विशेषत: अनुसूचित जाती आणि जमातींच्या विकासासाठी शासकीय व अशासकीय संस्था काम करताना दिसतात. अनुसूचित जातींसाठी काम करणार्‍या संस्थांमध्ये बार्टी या संस्थेच्या मोठा वाटा असून अनेक महत्त्वाचे विषय या संस्थेच्या माध्यमातून हाताळले जात असले, तरी या ना त्या कारणाने संस्था नेहमीच वादाच्या भोवर्‍यात सापडत असते. नुकतेच पुणे येथे बार्टीने नियुक्त केलेल्या समतादूताचा प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला. या प्रशिक्षण वर्गात एका वक्त्याने आपल्या सत्रादरम्यान समतादूतांना भजन म्हणायला सांगीतले. तो वक्ता स्वत: भजन म्हणत होता आणि उपस्थित सर्व जण त्याला टाळ्या वाजवत साथ देत होते. कदाचित सत्र चालू असताना प्रशिक्षणार्थींमध्ये चैतन्य निर्माण व्हावे, यासाठी वक्त्याने ही योजना केली असावी. मात्र या घटनेला धरून काही तथाकथित पत्रकारांनी आणि वृत्तपत्रांनी आपल्या लेखण्या पाजळत बार्टीच्या प्रशिक्षणावर मनूवादाचा शिक्का मारला. ते एवढेच करून थांबले नाहीत, तर संस्था पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चालते, बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या आहेत, मग तिथे भजन का केले? असाही प्रश्न उपस्थित करून बार्टीच्या महासंचालकाच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. या घटनेनंतर समाजात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचप्रमाणे आमच्याही मनात काही प्रश्न उपस्थित होत आहेत. आज ते प्रश्न समाजापुढे मांडत आहे.
 
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ही स्वायत्त संस्था आहे. तिचे कार्यक्षेत्र आणि कार्यकक्षा निश्चित आहेत. संशोधन, प्रशिक्षण, प्रबोधन या तीन गोष्टी प्रामुख्याने करायच्या आहेत. या संस्थेला महाराष्ट्रातील एकोणसाठ अनुसूचित जातींचा विचार करायचा आहे. स्वाभाविकपणे या एकोणसाठ जातींतील समतादूत प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले असतील, पण ते सर्व जण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा मानणारे असतीलच असे नाही. नवबौद्धांशिवाय अन्य जातींचे, बहुजन समाजातील समतादूत भजन करत नसतील काय? आणि जेव्हा बार्टीवर टीका करणारे बावीस प्रतिज्ञांचा दुजोरा देतात, तेव्हा बार्टी केवळ नवबौद्ध समाजासाठी काम करणार आहे असे त्यांना म्हणायचे आहे का? दुर्दैवाने आज तसे चित्र दिसत आहे. एकूण सर्व अनुसूचित जातींचा विचार आणि त्यानुसार धोरण असे चित्र बार्टीच्या संदर्भात आजतरी दिसून येत नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
 
 

barti
 
सन 1978मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर समता विचारपीठ या नावाने स्थापन करण्यात आलेल्या संस्थेचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था असे करण्यात आले. सन 2008मध्ये संस्था स्वायत झाली. 2013पासून संस्थेच्या माध्यमातून विविध महापुरुषांच्या नावाने फेलोशिप देण्यात येऊ लागल्या. आजवर शेकडो विद्यार्थी बार्टीच्या मदतीने परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेले आहे. असे असताना अनुसूचित जातींपैकी मातंग समाज ‘आम्हाला बार्टी नको, आर्टी हवी’ अशी मागणी का करतो? बार्टीमध्ये नवबौद्धोत्तर आधिकारी आला की त्यांच्याविरुद्ध आंदोलन का केले जाते? या प्रश्नांची उत्तरे कशी मिळतील? बार्टीचा आजवरचा इतिहास पाहता एका जातीला प्राधान्य दिले जाते आहे, किंवा आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते असे आरोप सातत्याने केले जातात. यामागे काय कारण असेल? वरिष्ठ अधिकारी आणि अन्य कर्मचारी यांच्या संघर्षातून काही वर्षांपूर्वी संस्थेच्या परिसरात वरिष्ठ अधिकार्‍यांची प्रेतयात्रा काढली गेली होती. हा वरिष्ठ अधिकारी नवबौद्ध नव्हता, हेच एकमेव कारण त्यामागे होते का? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार आहे? बार्टीचे काम प्रशिक्षण, संशोधन आणि प्रबोधन करण्याचे असेल, तर बार्टीच्या माध्यमातून अन्नदान कार्यक्रमाचे नियोजन का केले जाते? भीमा कोरेगाव येथे होणार्‍या कार्यक्रमासाठी विद्युत व्यवस्थेचा खर्च बार्टीने कशासाठी केला? भीमा कोरेगाव व महाड येथे बार्टीच्या वतीने अन्नदान कशासाठी केले जाते? बार्टीच्या जाहिराती विशिष्ट व्यक्तींना आणि वृत्तपत्रांना का दिल्या जातात? असे प्रश्न अलीकडच्या काळात सातत्याने विचारले जात आहेत. कारण यामागे एका जातीचे लांगूलचालन आहे आणि ते स्पष्टपणे लक्षात येत आहे. केवळ नवबौद्ध समाजाला खूश करण्यासाठी हे केले जाते, असा अन्य समाजगटाचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर बार्टीच्या विद्यमान महासंचालकांनी आणि अन्य अधिकारिवर्गाने विचार करायला हवा,असे आम्हाला वाटते.
 
 
 
महाराष्ट्रात सामाजिक वातावरण सतत अशांत ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने होत असतो. बार्टी या प्रयत्नाचा भाग होऊ नये अशी अपेक्षा या निमित्ताने करावी वाटते. आज महाराष्ट्रात महापुरुषांच्या जाती शोधल्या जातात आणि त्या महापुरुषांवर ती जात आपला अधिकार गाजवू लागते, जात, महापुरुषांच्या आधारे दबावगट निर्माण केले जातात. बार्टीच्या बाबतीत असे होते आहे का, याचा शोध बार्टीच्या विद्यमान महासंचालकांनी घ्यायला हवा. बार्टीचे अस्तित्व स्वायत्त असले, तरी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून तिला अर्थसाहाय्य देण्यात येते. सामाजिक न्यायची भूमिका काय आहे? जे उपेक्षित आहेत, वंचित आहेत त्यांना इतरांशी बरोबरी करण्यासाठी सक्षम करणे म्हणजे सामाजिक न्याय होय. मग एकोणसाठ अनुसूचित जातींचा विचार करताना प्राधान्यक्रम कसा असायला हवा? एकोणसाठ जातीतील नवबौद्ध, मातंग, चर्मकार, ढोर, वाल्मिकी हे समाज संख्येने मोठे आहेत. या पाच समाजांतही नवबौद्ध समाज संख्येने मोठा आहे. त्यामुळे नवबौद्ध समाजाला मिळणारे लाभही अधिक आहेत. नवबौद्ध समाज प्रगतीच्या मार्गावर आहे. त्यामुळे नवबौद्ध समाजबांधवांनी मोठ्या भावाची भूमिका घ्यायला हवी, असे आम्हाला वाटते. आज बार्टीच्या बाबतीत नवबौद्ध समाजावर जी टीका होते, ती मुळातच समजून घेतली पाहिजे. एकूण अनुसूचित जातीचा विकास हे आपले लक्ष्य असेल, तर समन्वयाचा आणि समान न्यायाचा अंगीकार केला पाहिजे, असे आम्हाला वाटते.
 
 
शासनाने एकोणसाठ अनुसूचित जातींचा विकास करण्यासाठी आवश्यक असणारे सर्वेक्षण करणे, त्याआधारे योजना तयार करणे आणि आवश्यक ते प्रशिक्षण व प्रबोधन करणे यासाठी बार्टीची स्थापना केली आहे. त्यामुळे वरील बिंदूंना समोर ठेवून काम केले पाहिजे, अशी सर्वसामान्य माणसांची अपेक्षा असेल तर त्यात काही वावगे नाही. विद्यमान महासंचालकांनी या गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला हवा. कदाचित त्यासाठी त्यांना बार्टीमधील प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करावा लागेल. ती व्यवस्था मोडून काढावी लागेल. अनुसूचित समाजातील शेवटच्या घटकांच्या उत्थानासाठी त्यांना ही भूमिका घ्यावी लागेल. त्याशिवाय बार्टी कोणाची या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही.