पायलटांचे विमान उडणार का?

विवेक मराठी    08-Jun-2023   
Total Views |
पायलट यांनी गेल्या तीन महिन्यांत त्यांनी तीन वेळा नवनवे प्रयोग केले. 11 एप्रिलला उपोषण केले, 11 मेला जन संघर्ष यात्रा काढली, त्यालाही तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. आता 11 जूनला अगदी मोठी भूमिका घेऊन ते नवीन पक्ष काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण खरेच पायलट एवढे धाडस करतील का? कारण त्यांनी या अगोदर बंड केले, पण थांडोबा झाले... गेली चार वर्षे त्यांची कुरकुर सुरू आहे. पण त्यांना काही काँग्रेसमधून बाहेर पडता आले नाही. त्यांच्याबरोबर बंड करणारे मध्य प्रदेशातील ज्योतिरादित्य सिंधिया आणि कॅप्टन अमरिंदर सिंग बाहेर पडले. पण पायलट यांचे विमान उडालेच नाही.  
congress
हिमाचल प्रदेशातील आणि कर्नाटकातील विजयामुळे काही दिवसांपूर्वी देशात काँग्रेसला अच्छे दिन येऊ लागले आहेत, असे भाकित तथाकथित राजकीय पंडित आणि पत्रकार करू लागले आहेत. राहुल गांधी तर अगदी पंतप्रधानपदीच बसल्याचे स्वप्नरंजन करीत आहेत. पण काँग्रेसची एका राज्यात सत्ता आली की, दुसर्‍या राज्यात काँग्रेसला ग्रहण लागते, हे 2014नंतरचे समीकरणच झाले आहे. आता असाच अनुभव राजस्थानमध्ये येत आहे, असे दिसते...
 
 
इंदिरा गांधी यांच्याकाळापासूनच प्रादेशिक नेतृत्व गांधी घराण्याच्या वर्चस्वाखाली राहावे याची काँग्रेस नेहमीच काळजी घेत असते. त्यामुळे प्रादेशिक पातळीवर काँग्रेसचा कोणताही नेता मोठा होऊन दिला नाही. पण आता राहुल गांधी यांच्या कार्यकाळात मात्र उलट घडत आहे. प्रादेशिक नेतृत्व हे शीर्षस्थ नेतृत्वापेक्षाही मोठे होत आहे. त्यांच्या विजयात केंद्रीय नेतृत्वाचा तितकासा प्रभाव नसल्याने त्यांच्या अटी, त्यांचे मान-अपमान सहन करावे लागत आहेत. पंजाबमध्ये व मध्य प्रदेशात शीर्षस्थ नेतृत्वाचा वाटा कमी असल्यानेे कॅप्टन अमरिंदर सिंग, ज्योतिरादित्य सिंधिया यांचे बंड निर्माण झाले. कदाचित काँग्रेसचे राजस्थानमधील युवा नेतृत्व सचिन पायलट आता याच वाटेने जात आहेत, असे दिसत आहे. तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी पायलट यांचे मतभेद आहेत. ते त्यांच्या विरोधात विविध आरोप करीत आहेत. त्यांना अडचणीत आणण्याचे काम करीत आहेत. कारण मुख्यमंत्रिपदी बसण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. राजकारणातील प्रत्येक व्यक्तीत ती असते. त्यात काही गैर नाही. पायलट यांच्या मते राजस्थानमध्ये भाजपाकडून सत्ता खेचून आणण्यासाठी मी मेहनत घेतली आहे, त्यामुळे मला त्या पदी बसवा, अशी त्यांची मागणी आहे. यासाठी गेल्या चार वर्षांत त्यांनी येनकेन प्रकारे प्रयत्न केले, अगदी समर्थकांना घेऊन बाहेर पडण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला. पण गेहलोत सरकारला धक्का बसला नाही.
 
काही दिवस थंड असणार्‍या पायलट यांनी गेल्या तीन महिन्यांत त्यांनी तीन वेळा नवनवे प्रयोग केले. 11 एप्रिलला उपोषण केले, 11 मेला जन संघर्ष यात्रा काढली, त्यालाही तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. आता 11 जूनला अगदी मोठी भूमिका घेऊन ते नवीन पक्ष काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण खरेच पायलट एवढे धाडस करतील का? कारण त्यांनी बंड केले, पण थांडोबा झाले... गेली चार वर्षे त्यांची कुरकुर सुरू आहे. पण त्यांना काही काँग्रेसमधून बाहेर पडता आले नाही. त्यांच्याबरोबर बंड करणारे मध्य प्रदेशातील ज्योतिरादित्य सिंधिया आणि कॅप्टन अमरिंदर सिंग बाहेर पडले. पण पायलट यांचे विमान उडालेच नाही. पुन्हा काँग्रेसच्या धावपट्टीवरच उभे राहिले. आता 11 तारखेला पुन्हा ते उडवण्याचे प्रयत्न करत आहेत, अशा प्रकारच्या बातम्या आहेत. पण खरेच पक्ष काढून ते गेहलोत यांना अडचणीत आणतील का? कारण अशोक गेहलोत यांची प्रदीर्घ राजकीय कारकिर्द आहे. केंद्रीय मंत्री, तीन वेळा राजस्थानचे मुख्यमंत्री यामुळे राजस्थानच्या राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. गांधी घराण्यातील कोणी अध्यक्ष होणार नाही असे जेव्हा काँग्रेसच्या वतीने जाहीर केले, तेव्हा सर्वात पहिलेे गेहलोतांचे नाव होते. पण राजस्थान त्यांना सोडायचे नव्हते. मुख्यमंत्रिपदासाठी त्यांनी समर्थकांच्या आडून, पक्षश्रेष्ठींना राजस्थान गमावण्याची भीती दाखवली. पक्षश्रेष्ठींनी नमते घेत गेहलोत यांना अभय दिले. त्यामुळे अशा मुरब्बी व राजस्थान काँग्रेसवर मजबूत पकड असलेल्या नेत्यांसमोर सचिन पायलट यांनी जरी वेगळा पक्ष स्थापन केला, तरी त्यांना काँग्रेस समर्थकांकडून तितकासा प्रतिसाद मिळेल असे दिसत नाही. या गृहकलहाचा फायदा घेऊन भाजपा पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.