कुलदीपकाची कलंकित वाणी

विवेक मराठी    11-Jul-2023   
Total Views |
चुलतभावाला घराच्या बाहेर काढून, माजी मुख्यमंत्र्यांना सभेत अपमानित करून, ज्येष्ठ सहकार्‍यांना अडगळीत टाकून पणती पेटत नाही, ऊर्जा निर्माण होत नाही आणि दिवेही लागत नाहीत. रोजच्या जीवनातील हे वास्तव आहे. कुलदीपकाने कलंक धुऊन दिवे लावावे, असे केले असता दाखविण्याइतके अस्तित्व शिल्लक राहील.
 
vivek
कुलदीपक उद्धव ठाकरे यांची नागपुरात सभा झाली. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी ते म्हणाले की, “ते एक कलंक आहेत.” दुपारच्या बातम्या ऐकत असताना हे वाक्य मी ऐकले आणि माझ्या मनात एक विषय तयार झाला.
 
 
उद्धव ठाकरे यांचा विदर्भाचा दौरा सुरू आहे. भाषण करण्याची त्यांची एक लकब आहे. एकाच भाषणात दोन हात किती वेळा बाजूला करतात, याची कुणीतरी मोजदाद केली पाहिजे. मी, माझे वडील बाळासाहेब ठाकरे, माझे कुटुंब, माझा मुलगा, माझी शिवसेना, मी हे करणार, मी ते करणार, मी असे केले, मी तसे केले.. हे त्यांच्या भाषणाचे विषय असतात. उद्धव यांच्या भाषणातील विषयाने मला अब्राहम लिंकन यांनी सांगितलेली एका बढाईखोर पाद्य्राची कथा आठवली.
 
 
एक पादरी चर्चमध्ये प्रवचनासाठी उभा राहिला. तो म्हणाला, “मी आज तुम्हाला प्रभू येशूचे दर्शन घडविणार आहे.” श्रद्धाळू शांत बसले. ते प्रवचन ऐकू लागले. पाद्य्राने विजार घातली होती आणि ती नाडीने बांधली होती. वर झगा घातला होता. त्याला गळ्याकडे एकच बटण होते.
 
 
पाद्री महोदयांचे प्रवचन चढत्या श्रेणीचे होत गेले. त्याच वेळी एक पाल त्याच्या विजारीत शिरली. त्याने पाय झटकून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नाडी थोडी सैल झाली. पाल तशीच पायातून वर सरकत गेली. ती कंबरेपर्यंत आल्यानंतर पाद्य्राने विजारीला मोठा झटका दिला. पाल काही पडली नाही, मात्र विजार खाली पडली. पाल अशीच सरकत सरकत खांद्यापर्यंत आली. तिला बाहेर काढण्यासाठी पाद्य्राने कॉलर धरून झग्याला झटका दिला, त्यामुळे झग्याचे बटण तुटले आणि तो झगाही खाली आला.
 
 
सर्व श्रद्धांळूसमोर पाद्री त्याच्या नैसर्गिक अवस्थेत उभा राहिला. पण तो प्रवचन थांबवायला काही तयार नव्हता. श्रद्धाळूंतून एक वयस्कर महिला उठली. ती म्हणाली, “पाद्रीबुवा, आम्हाला ख्रिस्ताचे दर्शन झाले, आता बस करा.”
 
 
कुलदीपक उद्धव ठाकरे यांची प्रथम मुख्यमंत्रिपदाची विजार गेली, नंतर पक्षाचे नाव असलेला झगा गेला. पाद्य्राच्या डोक्यावर टोपी नव्हती, पण उद्धव यांच्या डोक्यावर शिवधनुष्य होते, तेही गेले. ज्यांच्याशी सोयरीक केली, त्या शरदराव पवारांचे घर फुटले. तेच आता बेघर होऊन महाराष्ट्रात नवीन घर बांधायला निघाले आहेत. ठाकरे कुलदीपक उद्धवजी ज्या ज्या ठिकाणी सभा घेत आहेत, त्या त्या ठिकाणी अब्राहम लिंकनच्या गोष्टीतील पाद्य्राप्रमाणे त्यांची स्थिती दिसते आहे.
 
 
ते देवेंद्र फडणवीस यांना ‘कलंकित’ म्हणाले. त्याबद्दल दु:ख किंवा वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खुद्द देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपापल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. त्याचा परिणाम उद्धव ठाकरे यांच्या पुढील भाषणांवर होण्याची शक्यता नाही. अब्राहम लिंकन यांचा पाद्री ज्याप्रमाणे ख्रिस्ताचे दर्शन घडविण्याच्या बढाईने झपाटलेला होता, तशी उद्धव ठाकरेंची अवस्था झाली आहे. त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळवायची आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला होता की, ‘’मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करीन.” कुलदीपकाने शब्दाचे पालन करायला पाहिजे ना?
 
 
पुन्हा एकदा सवयीप्रमाणे मला इसापची कथा आठवली. एक घोडा आणि गाढव यांच्यामध्ये तू मोठा की मी मोठा असा वाद सुरू झाला. अगोदर दोघांनी शर्यत लावण्याचे ठरविले. घोडा कुठच्या कुठे निघून गेला. 2014 सालीही तो पुढे गेला आणि 2019 सालीही तो पुढेच गेला. मग असे ठरले की दोघांत शक्तिमान कोण? गाढवाने अडीच वर्षे पाठीवर ओझे वाहिले आणि घोड्याने सहा वर्षे गाडी खेचली.
 
 
घोड्याशी कोणत्याही प्रकारे बरोबरी करता येत नसल्यामुळे इसापचे गाढव समोरच्या एका उकिरड्यावर गेले आणि पाय वर करून लोळू लागले. तेथून ते घोड्याला म्हणाले, “असे करण्याची तुझी हिम्मत आहे का?” त्यावर घोडा म्हणाला, “नाही बाबा, मी हे नाही करू शकत, तूच जिंकलास.”
 
 
कुलदीपकाच्या कलंकित वाणीशी सुगंधित वाणी प्रति‘सामना’ करू शकत नाही. तेव्हा आपण असे म्हटले पाहिजे की तुम्ही जिंकलात, आम्ही हरलो.
 
 
थोडेसे फिलॉसॉफिकल व्हायचे, तर हार-जीत या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. मात्र या दोन बाजू एकसारख्या नसतात. हरतो कोण? जो लबाडी करतो, वसुली करतो, पाठीत खंजीर खुपसतो, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हाच ज्याचा राजकीय कार्यक्रम असतो. हिंदू, हिंदुत्व या शब्दांचा वापर केवळ संघाने आणि विश्व हिंदू परिषदेने केलेल्या हिंदू जागृतीचा राजकीय लाभ उठविण्यासाठी करायचा असतो, ते जगायचे नसते.. असेेे विजयी होत नाहीत.
 
 
शकुनीडाव खेळून राज्य जिंकता येते, पण ते पचविता येत नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी एक वारसा दिला. कर्तृत्ववान पुत्राला त्या वारशात भर घालावी लागते. समर्थ रामदास स्वामी दासबोधात सांगतात की, ‘वडिलांची कीर्ती सांगे तो एक मूर्ख’.
आपण कुलदीपकाला मूर्ख कसे म्हणणार? उद्धव यांच्या म्हणण्याप्रमाणे देवेंद्र कलंक असतील, तर उद्धव यांनी कुलदीपक बनून आपल्या कर्तृत्वाचे दिवे लावावेत.
 
 
दिव्यासाठी निरंजन लागते - म्हणजे काही आकार लागतो, वात लागते, वातीत तेल असावे लागते, वात पेटविण्यासाठी अग्नीची गरज असते. आकार म्हणजे पक्ष, त्यातील तेल म्हणजे सुप्त ऊर्जा, वाती म्हणजे कार्यकर्ते आणि अग्नी म्हणजे प्रज्वलित ऊर्जा या सर्वांचे उत्तम मिश्रण झाले की दिवे पेटतात. चुलतभावाला घराच्या बाहेर काढून, माजी मुख्यमंत्र्यांना सभेत अपमानित करून, ज्येष्ठ सहकार्‍यांना अडगळीत टाकून पणती पेटत नाही, ऊर्जा निर्माण होत नाही आणि दिवेही लागत नाहीत. रोजच्या जीवनातील हे वास्तव आहे. कुलदीपकाने कलंक धुऊन दिवे लावावे, असे केले असता दाखविण्याइतके अस्तित्व शिल्लक राहील.
 
 

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.