शरद पवार यांची घरवापसी होईल का?

विवेक मराठी    12-Jul-2023   
Total Views |
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था उबाठा सेनेसारखी झाली आहे. अजित पवारांनी पक्षावरच दावा ठोकला आहे. त्यांच्याकडे असलेले 41 आमदार आणि 2 खासदार यामुळे शिंदे गटाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे नाव, चिन्ह अजित पवार यांच्याकडेच जाण्याची जास्त शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यापुढील निवडणुकांमध्ये पवार गटाला फारसे यश न मिळाल्यास पक्षाचे उरलेसुरले कार्यकर्तेही पक्षाला रामराम ठोकू शकतात. अशा पार्श्वभूमीवर पक्ष फक्त नावापुरता उरण्याची शक्यता आहे. अशा वेळी राष्ट्रवादीची मातृसंस्था असलेल्या काँग्रेस पक्षात पवार गटाचे खरेच विलीनीकरण होऊ शकते काय? त्याबाबत होणार्‍या चर्चेत किती तथ्य आहे? याचे विश्लेषण करणारा लेख.

congress
 
विलासराव देशमुख यांनी 2009 साली एका मुलाखतीत “शरद पवार यांचा काँग्रेस सोडण्याचा मूळ मुद्दा आता गौण झाला आहे.. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांची विचारधारा समान आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा” असे मतप्रदर्शन केले. यावरून प्रचंड गदारोळ झाला. पण नंतर वातावरण शांत झाले. 2019च्या निवडणुकीअगोदर पवार आणि राहुल गांधी यांची भेट झाली. त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार का? राष्ट्रवादी काँग्रेस आता काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणार अशा वावड्या उठल्या होत्या. पण तसे झाले नाही. तेव्हा ते सत्यात उतरले नाही. पण कदाचित अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार गटावर ही वेळ येईल का? या शंकेस वाव आहे. कारण अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांना स्वप्नातही वाटले नसेल एवढ्या मोठ्या प्रमाणात पक्ष फुटला आहे. अगोदरच साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष अशी ख्याती असलेल्या राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले
congressआहेत. 40पेक्षा जास्त आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. ही यादी वाढूही शकते. त्यामुळे आता पवार गटात फक्त शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हेच पक्षातील मुख्य नेते राहिले आहेत. शरद पवारांचे वय पाहता त्यांचा करिश्मा किती दिवस चालणार, हा प्रश्न पक्षासमोर आहे. तर सुप्रिया सुळे यांना अजूनही पक्षात तेवढी ओळख नाही, जयंत पवार हे इस्लामपूरपुरते, तर आव्हाडांच्याच मतदारसंघातीलच लढाई सुरक्षित नाही. पार्टीला मर्यादा आली आहे. पक्षावर अजितदादांची किती पकड होती, याची प्रचिती आली. सत्तेचा लाभ असला, तरी कार्यकर्त्यांना अजित पवार यांच्याकडे भविष्य सुरक्षित वाटते. राष्ट्रवादीच्या भाषेत सांगायचे, तर त्यांची भाकरी करपणार नाही. त्यामुळेच मोठ्या संख्येने आमदार व कार्यकर्ते अजित पवारांसोबत गेले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आता शरद पवार जरी सोबत असले तरी पक्षाची झालेली पडझड पाहता पुन्हा नव्याने संघटना बांधावी लागेल. पण पक्षाची पहिली परीक्षा जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत असेल, त्यामध्ये जर निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले तर पक्ष वाढेल, कार्यकर्त्यांनाही बळ प्राप्त होईल, नाहीतर पक्षाची वाढ खुंटत जाईल, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
 

congress
 
पवारांसाठी काँग्रेसचा परदेशी मुद्दा कालबाह्य
 
24 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधी परदेशी वंशाच्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व देण्यास विरोध केला होता. काँग्रेसचे नेतृत्व परदेशी नागरिकाकडे देऊ नये अशी मागणी केली. यासाठी शरद पवार यांच्यासह त्यांचे सहकारी पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी पक्षांतर्गत बंडखोरी करत थेट सोनिया गांधींनाच आव्हान दिले होते. शरद पवार यांनी पुढे 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसशी युती करताच हा मुद्दाच गौण झाला. त्यामुळे तो मुद्दाच आता राहिलेला नाही.
 
 
congress
काँग्रेस आणि पवार यांची विचारधारा
 
दोघांमध्ये ’काँग्रेस‘ हे नाव कॉमन होते. तर विचारधारा, दोघांचा अजेंडा, दोघांचा मतदार समान असल्याने काँग्रेसमधील अनेकांनी काँग्रेसची साथ सोडली आणि पवारांना साथ दिली. आता पक्षाचे अस्तित्व धोक्यात आहे, किमान सोबत असलेल्या मंडळींना निवडून आणण्याची ताकद पवार वगळता इतर कोणाहीमध्ये नाही, त्यातच चिन्ह, पक्षाचे नावही सोबत नसण्याची जास्त शक्यता आहे, अशा स्थितीत निवडणूकांना समोरे जाणे सोपे नाही. त्यामुळे पवार गटाला काँग्रेसच्या चिन्ह हे आशा स्थान असेल असे आजतरी दिसते. आजची राजकीय स्थिती पाहता सुप्रिया सुळे यांचा बारामती मतदारसंघही सुरक्षित नाही, हे असे दिसते. त्या जागी पार्थ पवार यांना उभे केले जाईल अशी चर्चा आहे, तेथे मोठी चुरशीची लढाई होईल असे दिसते. इतरही ठिकाणी त्यांचा प्रचारही आक्रमक असेल. त्यामुळे ज्याप्रमाणे शिवसेनेने 1984 साली भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती, हेच आता

congressपवार गटाबाबत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकंदरीतच शरद पवार काँग्रेसमध्ये समील झाल्याची ती पहिली पायरी ठरू शकते. यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न निश्चितच केले जातील असेही दिसते आणि पवारांची राजकीय अपरिहार्यता याला मंजुरी देऊ शकते. आजतरी पवारांना फक्त बारामतीमधून आपल्या मुलीला सुरक्षित करणे हेच प्रथम कर्तव्य असेल. आजवर तिच्या भविष्यासाठी करत असलेल्या राजकीय उलथापालथीत पुतण्या नाराज झाला. आता तिलाच जर उभारी देऊ शकलो नाही, तर.. हीच विवंचना पवारांना काँग्रेसच्या चरणी लोटांगण घालायला लावेल असे दिसते. असे झाले, तर धुरंधर राजकारणी, चाणक्य, योद्धा या पदव्या घेऊन उभ्या आयुष्यात गौरवलेल्या शरद पवारांना आपल्या आपला पक्ष विसर्जित करताना किती दु:ख होईल.. दुसर्‍या भाषेत सांगण्याची गरज नाही. या आज जरी जर-तरच्या गोष्टी असल्या, तरी भविष्यात राजकारणात काही होऊ शकते. कधी न वाटणार्‍या आघाडी आणि युती गेल्या चार वर्षांत महाराष्ट्राने पाहिल्या आहेत. त्यामुळे उद्या शिवसेना आणि राष्ट्रवादीने कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवली आणि उबाठा आणि पवार गटाने पंजाच्या चिन्हावर निवडणूक लढवली, तर आश्चर्य वाटायला नको!