पालकांसमोरची आव्हाने

विवेक मराठी    17-Jul-2023   
Total Views |
@नयना सहस्रबुद्धे
 
vivek 
आजच्या तरुणाईला हवी ती वस्तू सहजसाध्य होण्याचा काळही खूप कमी आणि सोशल मीडियाचा अतिवापर यामुळे त्यांची जीवनशैली गेल्या काही काळात खूपच बदलली आहे. त्यासाठी मुला-मुलींमध्ये योग्य-अयोग्य याचा बोध, व्यसनांचे धोके, तारतम्य, विवेक, संयम, बाह्य वैचारिक व धार्मिक आव्हानांचा सामना करायची तयारी, मानसिकता, वैचारिक बैठक, धैर्य, साहस व बल निर्माण करणे, आवश्यक तिथे त्यांना पाठिंबा देणे व सहकार्य करणे हे आजचे पालकत्व आहे. ‘विषवृक्षाची बीजे’ या लेखमालेचा दुसरा भाग.
आजच्या पालकांसमोर अनेक प्रकारची आव्हाने उभी आहेत. मुले शिक्षणासाठी कुटुंबाबाहेर जातात, तेव्हा बाह्य आक्रमणांना तोंड देण्यासाठी त्यांना सिद्ध करणे हे मोठे आव्हान आहे. सिगरेट, दारू, हुक्का, ड्रग्ज यासारखी व्यसने, मुक्त शरीरसंबंध, फोनवर-इंटरनेटवर पाहिला जाणारा कंटेंट या गोष्टींबद्दल मुलांशी चर्चा व्हायला हवी. हे बंडखोर वय नव्या गोष्टी अनुभवण्याचे, पालकांचे आदेश न मानण्याचे, प्रयोग करण्याचे असते. बाह्य गोष्टींमधले धोके व अभ्यासावरून, जीवनध्येयावरून हटणारे लक्ष याची काय किंमत मोजावी लागू शकते, हे मुलांना व मुलींना कळायला हवे. ते प्रेमाने व चर्चेच्या पातळीवर होणे महत्त्वाचे.
 
 
नुकतीच आकाश पोपळघट या मुलाची एक मुलाखत पाहिली. आकाश हा मराठवाड्यातल्या छोट्याशा गावातल्या सर्वसामान्य शेतकरी घरातला मुलगा. अमेरिकेत शिकतो आहे. त्याला ‘विश्वरत्न’सारखा पुरस्कार मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडमध्ये त्याने 88 सुवर्णपदके मिळवली आहेत. त्याच्यात असामान्य काय आहे? तो प्रचंड बुद्धिमान तर आहेच, त्याचबरोबर तो जमिनीवर पाय असलेला, ध्येयवादी तरुण आहे. त्याच्या मुलाखतीतली काही वाक्ये फार महत्त्वाची आहेत. ‘पालकांनी मुलांवर सक्ती करू नये, मुलांच्या मनाप्रमाणे अभ्यासक्रम निवडू द्यावा. विद्यार्थ्यांनीही ध्येयावर लक्ष द्यावे. संघर्ष, सातत्य आणि संयम यातूनच यश मिळेल. अभ्यास स्वत:साठी करायचा आहे. मुलांना पालकांनी संसाधने तर द्यायला हवीत, पण जबाबदारीची जाणीवही’!
 
 
मूलकेंद्री कुटुंब - पूर्वी घरे पुरुषकेंद्री होती, आज ती मूलकेंद्री झालेली दिसतात. कुटुंबात एक किंवा दोन मुले, मुलांना ग्राहक मानून ओसंडून वाहणारा बाजार, मुलांवरील प्रेम सिद्ध करण्यासाठी त्यांच्यावर होणारा वस्तूंचा भडिमार, पालकांकडे असलेला मर्यादित वेळ ही त्यामागची कारणमालिका आहे. कोणतीही व्यवस्था ‘केंद्री’ झाली की लंबक झुकतो, समतोल ढळतो. अन्य माणसांचे मत, अपेक्षा, निर्णयातला सहभाग, गरजा यांचा संकोच होतो.
 
 ‘मुलांची इच्छा पूर्ण करू’. त्याला वा तिला शिकूदे जे काय हवे ते, आम्ही लागतील ते कष्ट करू ही वृत्ती असते.
 मुलांना संधी मिळाव्यात, त्यांनी पुढे जावे, यशस्वी व्हावे ही प्रत्येक पालकाची इच्छा असते, ते स्वाभाविकही आहे. पण त्यापायी आपण कसे वागतो आहोत याकडेही काटेकोर लक्ष हवे. पालक शहरी असोत वा ग्रामीण, सधन असोत वा नसोत, भूमिका असते ‘मुलांची इच्छा पूर्ण करू’. त्याला वा तिला शिकूदे जे काय हवे ते, आम्ही लागतील ते कष्ट करू ही वृत्ती असते. अनेक शहरी नोकरदार पालकांकडे पैसा असतो, मुलांनाही चांगली शाळा, शिकवणी वर्ग यांची मदत असते. तसे ग्रामीण पालकांचे असेलच असे नाही.
 
पालकांची संतुलित भूमिका आज फार महत्त्वाची आहे. मात्र अनेक पालक भांबावलेले दिसतात. मुलांना स्वातंत्र्य द्यायचे तर किती? कोणती बंधने घालायची, कोणती नाही? आमची ऐपत आहे, फक्त मुलांनी अभ्यास करावा हे म्हणणे पुरेसे नाही. तुमची स्वप्ने मुलांवर लादू नका, पण त्यांना बेजबाबदार वागण्याची सूटही देऊ नका.
 
 सुसंवाद असला, नात्यात मोकळेपणा असला तर निदान एखादी चूक घडली तर मुले निदान व्यक्त होतील.
संवाद - संवाद हे महत्त्वाचे अस्त्र आहे. अनेक पालक-मुलांमध्ये सुसंवाद नसतो, मुलांना पालक म्हणजे त्यांना पैसे पुरवणारे यंत्र वाटते. आपण पैसे देतो म्हणजे मुलांनी 100% आपल्या आज्ञेत राहिले पाहिजे, असे काही पालकांना वाटते. मुले शिक्षणासाठी बाहेर जातात, वसतिगृहात राहतात. त्यांच्यावर नजर ठेवणे शक्य नसते. ते तर घरातही शक्य नसते. सुसंवाद असला, नात्यात मोकळेपणा असला तर निदान एखादी चूक घडली तर मुले निदान व्यक्त होतील. नात्यात विश्वास हवा, मुलांची चूक मान्य करून माफ करण्याचा उदरपणा पालकांकडे हवा, त्यातून बाहेर पडायचा मार्ग आई-बाबा दाखवतील ही खात्री हवी. त्यात पालकांचा अहंकार, घराण्याचा अभिमान, लोक काय म्हणतील याचे दडपण, शेजार्‍यांच्या किंवा नातेवाइकांच्या मुलांशी तुलना, क्षमता लक्षात न घेता मार्क मिळवण्याचा दुराग्रह नसावा. शिस्त म्हणजे योग्य मार्ग दाखवणार्‍या सीमारेषा! धाक म्हणजे भीती, अविश्वास आणि फसवण्याचा धोका. स्वातंत्र्य द्यायला हवे, पण सैल सोडता कामा नये. शिस्त हवी, पण अतिरिक्त धाक नसावा, त्यात संतुलन हवे.
 
 
आपण त्यांना स्वावलंबन शिकवतो का? त्यांना दिलेल्या पैशांच्या हिशोबाबद्दल, वेळेच्या विनियोगाबद्दल, मित्रसंगतीबद्दल आपण बोलतो का? बाहेरच्या आकर्षणांबद्दल, व्यसनांबद्दल, मुले-मुली मैत्रीबद्दल, त्यातल्या सीमारेषांबद्दल आपण बोलतो का? अबोध वयातील आकर्षणांना कसे हाताळायचे याबद्दल तरुणाईची स्पंदने समजून घेऊन त्यांना विधायक वळण देण्याबद्दल आपण बोलतो का? त्यांच्या सवयींवर, वर्तनावर, ते पाहत असलेल्या सिनेमा-मालिकांवर नजर असते का? त्यांच्याशी चर्चा होते का? यांची उत्तरे पालकांनी शोधणे महत्त्वाचे.
 
 
जीवनध्येय - आज तरुण वयाच्या मुलामुलींना जीवनध्येय द्यायला कुटुंबव्यवस्था व शिक्षणव्यवस्था कमी पडत आहे का? तरुणाईची स्पंदने, नवोन्मेष, धाडस, क्षमता समजून त्यांना विधायक वळण देण्याची गरज आहे. उत्तम मार्क, नोकरी, प्रमोशन, आर्थिक सुबत्ता हा यश मोजण्याचा एक रस्ता आहे. पण तो रस्ता तिथेच संपत नाही. त्या जोडीने उत्तम माणूस घडवणे, त्यांनी नेहमी समाजाभिमुख राहणे, समाज-देशविकासासाठी क्षमतांचा विधायक उपयोग करणे, विघातक विचारांपासून व वर्तनापासून दूर राहणे हेही तितकेच महत्त्वाचे. ही प्रेरणा त्यांच्या मनात जागवणे आणि टिकवणे हे आपलेच काम आहे. शिक्षण हे स्वत:साठी आहे, तो या वयातला प्रथम उद्देश आहे, असायला हवा. बाकी मजा, कॉलेजजीवन एन्जॉय करणे हा दुय्यम भाग आहे. मुलांना पैसे, वेळ, तारुण्य, ऊर्मी, मौजमजा, जबाबदारी यांची खरी किंमत कळायला हवी. हे वय मौजमजेपेक्षा भावी आयुष्याच्या पायाभरणीचे आहे, व्यक्ती म्हणून स्वत:ला घडवण्याचे आहे, हे मुलांवर बिंबवणे महत्त्वाचे.
 
 
मुलांना देत असलेले शिक्षण, त्यांचे घराबाहेर राहणे व तुमचे संस्कार, मूल्य, कुटुंबांच्या परंपरा यांचा मेळ घालायला हवा. त्यातली पारंपरिकता, जुनाटपणा टाकून मूल्य पुढे कशी संक्रमित होतील हे पाहणे, नव्या गोष्टी शिकणे हे आव्हान तुमच्यासाठी आहे. पालकत्वाच्या बदललेल्या आयामांना समजून घ्या. तुमच्या आई-वडिलांनी केलेले तुमचे संगोपन आणि पालकत्वाची नवी आव्हाने यात खूप फरक आहे. एखादी गोष्ट का करायची त्यामागचा तर्क, विज्ञान मुलांना पटले तर ती गोष्ट स्वीकारली जाईल. मी सांगतो किंवा सांगते म्हणून नवी पिढी ऐकत नाही हे नक्की. मुलगे व मुली शिक्षणासाठी घरापासून दूर, परदेशात जातात. त्यामुळे घर, नातेवाईक, नातेसंबंध, प्रेम, मूल्यव्यवस्था, देश, धर्म, संस्कृती यापासून ती तुटत तर नाहीत ना? यावर लक्ष ठेवा.
 
 मुलाची एमपीएससी करायची इच्छा म्हणून अगदी शेत विकूनही नऊ-दहा वर्षे मुलाला शहरात पैसे पाठवणारे पालक असतात. तुम्ही मला हवे ते शिकू दिले नाही म्हणून कोसणारी मुले असतात.
 हक्क - सध्या एकूण वातावरण अधिकार, हक्क यांचे आहे. तुमची मुलेही तसाच विचार करतील. पालकांची ऐपत आहे, मग मला ब्रँडेड कपडे, ही बाइक, इतका पॉकेटमनी मिळालाच पाहिजे. त्याबद्दल त्यांनी मला विचारता कामा नये. माझ्या फोनला हात लावता कामा नये. माझ्या खोलीत येता कामा नये. आज मुलांमध्ये असा ‘सेन्स ऑफ एंटायटलमेंट’चा व आपल्या ‘स्पेस’चा विचार फार तगडा झाला आहे. त्यांचा तसा स्वार्थी दृष्टीकोन होण्याला पालक जबाबदार नाहीत का? मुलाची एमपीएससी करायची इच्छा म्हणून अगदी शेत विकूनही नऊ-दहा वर्षे मुलाला शहरात पैसे पाठवणारे पालक असतात. तुम्ही मला हवे ते शिकू दिले नाही म्हणून कोसणारी मुले असतात. हक्क व सवलती योग्य प्रमाणात द्यायला हव्यात. आपल्या मनाप्रमाणे झाले नाही म्हणजे सगळे मार्ग संपले असे नसते. अपयश, नकार पचवायला शिकवायलाच हवे. मेहनत, सातत्य व सकारात्मक दृष्टीकोन असला तर यश मिळते. आर्थिक, कौटुंबिक परिस्थिती व मुलांची बौद्धिक क्षमता, उपलब्ध संसाधने यांचा मेळ घालावा लागतो, याचे दोन्ही पिढ्यांना भान हवे.
 
 
नातेसंबंध - “का रे, तू सुट्टीत घरी का येत नाहीस?” या माझ्या प्रश्नाला एका मुलाने उत्तर दिले, “कशाला यायचे? आई-बाबा कामावर जातात. मी घरी एकटाच असतो, मग घरी राहिले काय व हॉस्टेलवर राहिले काय?” इथे मुलाची आईवडिलांच्या सहवासाची भूक आणि नोकरीची अपरिहार्यता यात मेळ घातला जायला हवा. दुसर्‍या एका मुलीने सांगितले, “घरी कटकट फार असते. इतक्या वाजता ऊठ, अमुक वाजता झोप, हेच कर, तेच कर किंवा हे करू नकोस. त्यापेक्षा हॉस्टेल बरं!” कडक नियम लादून मुलांना कंट्रोल करणे हे आजच्या काळात जवळजवळ अशक्य आहे. मुलग्यांपेक्षा मुलींना पालक फार कंट्रोल करतात, बंधने घालतात, चौकश्या करतात आणि मुलांना सैल सोडतात, असेही दिसते. पालकांकडे नसलेली लवचीकता मुलांच्या खोटेपणात, बंडखोरीमध्ये बदलते. मुलांमध्ये जबाबदारीची जाणीव, आईबाबांच्या बाजूचा विचार करायची सवय, लवचीकता राखूनही शिस्तपालन अशी मूल्ये लहानपणापासून रुजवायला हवीत. मुलांचे मन वाचणे हे कौशल्य सुयोग्य पालकत्वाचे महत्त्वाचे लक्षण आहे. ते मुलांच्या जन्मापासूनच शिकावे लागते. शिकलेही जाते. लहान मूल शी-शू, भूक, कंटाळा, झोप सगळ्यासाठीच रडते. ते कशासाठी रडले हे आईबाबा ओळखायला शिकतात. तेच कौशल्य या तरुणाईच्या संवेदनशील दिवसातही दाखवायला हवे. पालकांच्या सपोर्ट ग्रूपमध्ये अशा दृश्य-अदृश्य आव्हानांवर चर्चा करून उपाय सापडू शकतील.
 
 
कायद्याची माहिती - मुले घराबाहेर जाताना त्यांना काही कायदेही समजावून द्यायला हवेत. खोलीच्या चार भिंतीतही काय पाहा, पाहू नका, काय फॉरवर्ड करू नका, सायबर गुन्हे कोणते, मुलींची छेडछाड, पोक्सो कायदा, आयटी कायदे याबद्दल माहीत हवे. जसे कॉलेजचे नियम माहीत हवेत, तसे सार्वजनिक ठिकाणी वागायचे नियम व संकेत मुलांना कळायला हवेत.
 
 
मैत्री - आज बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड असणे हे समाजसंमत झाले आहे. मैत्रीची भावना सुंदर आहे. मुलग्याच्याही वर्तनावर, मित्रसंगतीवर, मुलीबद्दलच्या भावना, अपेक्षा यावर डोळस लक्ष हवे. शरीर नात्यापर्यंत पोहोचण्यातले धोके, शारीरिक आजार व मानसिक पडझड, कराव्या लागणार्‍या तडजोडी, होऊ शकणारी फसवणूक, या नात्यात सांभाळायच्या मर्यादा आणि जबाबदारी मुलांच्या लक्षात आणून देणे हे पालक, शिक्षक, समुपदेशक सर्वांचे काम आहे. मुलांची मैत्री अमान्य असल्यास तुमचे मत सकारण, स्पष्टपणे मुलांना सांगा. स्वातंत्र्य किती व कुठले द्यायचे, बंधने कोणती व केव्हा घालायची याचे भान ठेवा. त्यांच्या शारीरिक, भावनिक सुरक्षेसाठी व योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांना सक्षम करायला हवे. तरुणाईचा वारू बेलगाम चौखूर उधळायचा नसेल, तर मुला-मुलींमध्ये योग्य-अयोग्य याचा बोध, व्यसनांचे धोके, तारतम्य, विवेक, संयम, बाह्य वैचारिक व धार्मिक आव्हानांचा सामना करायची तयारी, मानसिकता, वैचारिक बैठक, धैर्य, साहस व बल निर्माण करणे, आवश्यक तिथे त्यांना पाठिंबा देणे व सहकार्य करणे हे आजचे पालकत्व आहे.

नयना सहस्रबुध्दे

स्त्रीविषयक लेखनासाठी प्रसिध्द असणाऱ्या नयना सहस्रबुध्दे या भारतीय स्त्री शक्ती या संघटनेच्या संस्थापक सदस्य आहेत. भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या म्हणूनही त्या कार्यरत होत्या. नयना सहस्रबुध्दे या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारीपदावर कार्यरत होत्या. सध्या महिला बँकेत डेप्युटेशनवर रुजू झाल्या आहेत. साप्ताहिक विवेकमध्ये स्त्रीभान या सदरातून त्या स्त्रीविषयक लेखन करत आहेत.