‘पितांबरी अ‍ॅग्रो टूरिझम’ एक पथदर्शक प्रकल्प

विवेक मराठी    21-Jul-2023   
Total Views |

pitambari agro tourism
ग्रामीण भागात पर्यटनातून रोजगारनिर्मिती व्हावी, या उद्देशाने पितांबरी समूहाने साखळोली व तळवडे येथे कृषी पर्यटन केंद्र सुरू केले आहे. या ठिकाणी येणार्‍या पाहुण्यांना कृषी संस्कृतीचा निर्भेळ आनंद मिळतो. याखेरीज पर्यटनाबरोबर वर्षभर चालणार्‍या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणात कृषी पर्यटनाचा एक पथदर्शक प्रकल्प यशस्वी होताना दिसतो आहे.
 भारत हा खेड्यांचा देश आहे. देशाची नैसर्गिक समृद्धी खेड्यात वसली आहे. नद्या, नाले, झाडे, निसर्ग, धनधान्ये, औषधी वनस्पती, संस्कृती व परंपरा या खेड्यातच पाहायला मिळतात. शहरातील कठीण परिस्थितीमुळे दमछाक झालेल्या मनुष्याला थोडासा मोकळेपणा गावातच मिळतो. यातूनच ‘कृषी पर्यटन’ या अनोख्या संकल्पनेचा जन्म झाला.
 
 
pitambari agro tourism
 
रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गरम्य दापोली तालुक्यातील साखळोली गावात 2016 साली ‘पितांबरी अ‍ॅग्रो टूरिझम’ या प्रकल्पाअंतर्गत कृषी पर्यटनास सुरुवात झाली. या प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आम्ही राजापूर तालुक्यातील तळवडे येथे कृषी पर्यटन सुरू केले आहे. पारंपरिक पर्यटनापेक्षा पितांबरीचे कृषी पर्यटन काहीसे वेगळे आहे. हिरवाईची बाग, फुलोर्‍यावर आलेली पिके, भात शेती, औषधी वनस्पती, फळांनी लगडलेली झाडे याबरोबरच चांगले हवामान आणि पाहुण्यांच्या सुरक्षिततेची हमी देणारे उत्तम ठिकाण म्हणून ‘पितांबरी अ‍ॅग्रो टूरिझम’चा लौकिक वाढत आहे.
 
 
pitambari agro tourism
 
साखळोलीतील कृषी पर्यटन केंद्र 60 एकरांवर वसलेले आहे. या ठिकाणी ‘आयुर्तेज’ हे एक विस्तीर्ण आयुर्वेदिक उद्यान साकारण्यात आले आहे. या उद्यानात रुद्राक्ष, सर्पगंधा, ब्राह्मी, नोनी, गुंज आदी 550हून अधिक औषधी वनस्पती-वृक्षवेलींची लागवड करण्यात आली आहे. तुळशीचेच जवळपास 15 प्रकार येथे पाहायला मिळतात. सोनचाफ्याची 1500 फूलझाडे आणि चाहूबाजूंना दरवळत असलेला त्यांचा सुगंध मन प्रसन्न करतो. लहान मुलांसाठी ‘बटरफ्लाय गार्डन’ हे आकर्षण झाले आहे. भारतामध्ये बांबूच्या दोनशे जाती आहेत, यापैकी 32 जाती या केंद्रात पाहायला मिळतात. अवकाशातील ग्रह-तार्‍यांचे जवळून निरीक्षण करता यावे, यासाठी ‘गो टू कोलॅप्सिबल डॉबसोनियन सिनस्कॅन टेलिस्कोप’ ही दुर्बीण या ठिकाणी बसविण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना निसर्गाबरोबर आकाशदर्शनही अनुभवता येते. निवासव्यवस्था, गणपती मंदिर, स्वीमिंग पूल, रेन डान्स, फिश-स्पा, प्ले ग्राउंड, बैलगाडी सफर, खुली व्यायामशाळा, विविध साहसी क्रीडाप्रकार, व्हेज-नॉनव्हेज, मासे अशा विविध पदार्थांच्या उत्कृष्ट चवीची अनुभूती देणारे ‘रुचियाना रेस्टॉरंट’ अशा सर्व प्रकारच्या सुविधांमुळे येथे पर्यटकांचा ओढा वाढत आहे.
  
 
साखळोली (दापोली) कृषी पर्यटन केंद्रातील नियोजन
पहिला दिवस
 
सकाळी 11 वा. पर्यटकांचे आगमन
सकाळी 12 वा. तोंडओळख
दुपारी 1.30 वा. जेवण व विश्रांती
दुपारी 3.30 वा. बैलगाडीतून उद्यान व पार्क सफर
सायं. 6 वा. चहा व इन्डोअर गेम
रात्री 8.30 वा. जेवण व खेळ
 
दुसरा दिवस
 
सकाळी 8. वा. स्वीमिंग पूल, रेन डान्स
सकाळी 9.30 वा. नाश्ता
सकाळी 10.30 वा. देवभक्ती अगरबत्ती,
दीपशक्ती तेल कारखाना भेट
सकाळी 11. वा. किचन गार्डन वर्कशॉप
दुपारी 1.वा. जेवण
दुपारी 2.30 वा. घरी प्रस्थान
बुकिंगसाठी संपर्क :
 
पितांबरी अ‍ॅग्रो टूरिझम, दापोली
अजय महाजन (ठाणे ) - 8657307352
सचिन देवरुखकर - (दापोली) - 9969202256
पितांबरी अ‍ॅग्रो टूरिझम, राजापूर-तळवडे
प्रणव मुळ्ये - 9405558864
 
www.pitambari.com/agrotourism/overview
 
  
याखेरीज पर्यटनाबरोबर वर्षभर चालणार्‍या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. येथे बाजूलाच असलेल्या सुसज्ज कारखान्यात सुगंधी फूलझाडांच्या फुलांचा अर्क काढून त्यापासून ’देवभक्ती’ अगरबत्तीची निर्मिती केली जाते. याशिवाय सोनचाफ्यापासून अत्तर, गुलाबांपासून गुलकंद, शेंगदाण्यापासून दगडी घाण्यातून शुद्ध शेंगदाणा तेलदेखील तयार केले जाते. कृषी पर्यटनाला अन्य कृषिपूरक व्यवसायांची जोड देता आल्यामुळे 150हून अधिक स्थानिक लोकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झाला आहे.
 
 
pitambari agro tourism
 
महत्त्वाचे म्हणजे, या ठिकाणच्या केंद्रास दर वर्षी 3500 पर्यटक भेट देतात. येथे शालेय सहलीदेखील येतात. 400 मुलांसाठी एकदिवसीय सहलीची व्यवस्था येथे केली जाते. मुंबई व इतर जिल्ह्यांतून आलेल्या पर्यटकांकडे स्वत:चे वाहन नसल्यास पर्यटकांना खेड रेल्वे स्टेशनवरून ’पितांबरी अ‍ॅग्रो टूरिझम’मध्ये आणण्याची सोय केली जाते.
 
 
तळवडे येथे 10 एकरांवर अशाच स्वरूपाचे कृषी पर्यटन केंद्र आहे. या ठिकाणी मसाल्यांचे उद्यान उभारण्यात आले आहे. तसेच कोकणातील फळझाडांबरोबरच स्टार फू्रट, ड्रॅगन फू्रट, अ‍ॅवोकोडो, पेरू व पंधराशे प्रकारच्या नेंद्रान जातीच्या केळ्यांची लागवड केलेले ‘एक्झॉटिक फ्रूट गार्डन’ विकसित करण्यात आले आहे. ताम्हाणे गावात बांबू पार्कसुद्धा पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. सुमारे 5 एकरपासून 27 एकरपर्यंत बांबूंची लागवड, त्याशिवाय जमिनीच्या प्रकारानुसार रक्तचंदनाची, सागाची लागवड केलेलीही येथे पाहायला मिळेल. रिसॉर्टच्या परिसरात गोशाळासुद्धा आहे. या गोशाळेतील देशी गीर गायी दूध कसे देतात किंवा गायीचे दूध कसे काढायचे हे मुलांना दाखविले जाते. या ठिकाणी चिर्‍याचे व आधुनिक सुविधांनी युक्त प्रशस्त कॉटेजेस, स्वीमिंग पूल, ध्यानमंदिर, प्ले गार्डन, गवती हिरवळ, इंटरनेट सुविधा, पार्किंग सुविधा, कोकणी चवीचे स्वादिष्ट जेवण, स्वागताला शहाळ्याचे पाणी, कोकम सरबत देण्याची पद्धत आहे. पितांबरी रुचियाना गूळ पावडरचा कारखाना येथे असून गूळ कसा तयार करतात हेदेखील पाहण्याची संधी मिळते. एकूणच या दोन्ही ठिकाणी शहरी वातावरणापासून दूर, खरा निसर्ग अनुभवता येतो. कृषी पर्यटनाबरोबर शेतीपूरक नानाविध प्रयोगांचा जवळून परिचय करून घेता येत असल्यामुळे या ठिकाणी येणार्‍या पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत आहे. हा प्रयोग आमच्यासाठी नवी उमेद देणारा आहे.

या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादांचे स्वागत असून आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी व अधिक माहितीसाठी । 9867112714 या क्रमांकावर संपर्क साधावा. 
 
 

रवींद्र प्रभुदेसाई

पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.ची सुरुवात 1989 मध्ये श्री रवींद्र प्रभुदेसाई आणि त्यांचे वडील स्वर्गीय श्री वामनराव प्रभुदेसाई यांनी लहान घरगुती व्यवसाय म्हणून केली होती. ती हळूहळू एक आघाडीची उत्पादन आणि विपणन कंपनी बनली आहे. होमकेअर डिव्हिजनमध्ये एफएमसीजी उत्पादनांसह सुरुवात करून, आता संस्थेकडे एकाच छताखाली 10 विभाग आहेत उदा; होमकेअर, हेल्थकेअर, अॅग्रीकेअर, फूडकेअर, सौर, धूप, परफ्युमरी, डिजीकेअर, कृषी पर्यटन आणि निर्यात विभाग.