टोमॅटो दरवाढीचे रहस्य

विवेक मराठी    21-Jul-2023   
Total Views |

Tomato price hike
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर संपूर्ण भारतात अचानक टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ग्राहकांचे अर्थकारण कोलमडले. टोमॅटो स्वस्त मिळण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना सुरू केल्या आहेत, तर दुसरीकडे टोमॅटो उत्पादक लक्षाधीश झाल्याच्या वावड्या उठल्या आहेत. वर्षभरातील टोमॅटो हंगामांचा विचार केला असता शेतकर्‍यांच्या हाती फारसे काही लागले नाही. यामागचे नेमके वास्तव समजावून सांगणारा हा लेख.
 
भारतामध्ये फळे व भाजीपाला यांचे स्वतंत्र स्थान आहे. देशात हजारो वर्षांपासून निरनिराळी पिके घेतली जात आहेत. फळे व भाजीपाला जंगलातून मिळत असे. कांदा, मिरची, लसूण यांची पूर्वापार लागवड होत आहे. टोमॅटो हे पूर्णपणे विलायती फळ आहे. इंग्रजांनी 1828मध्ये कोलकाता येथे सर्वप्रथम टोमॅटोची लागवड केली. त्यानंतर त्याचा प्रचार आणि प्रसार झाला. टोमॅटो हे दक्षिण अमेरिकेत जन्मलेले फळ आहे. अनेक वर्षे जगात कुठेही टोमॅटोचे फळ खाल्ले जात नव्हते, कारण हे फळ विषारी आहे, असा समज होता. नंतर अमेरिकन लोकांनी हे फळ खाऊन पाहिले व नंतर याची लागवड केली.
 
 
अलीकडेच भारताने टोमॅटो उत्पादनात उच्चांक गाठला आहे.नॅशनल हॉर्टिकल्चरल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या आकडेवारीनुसार, भारत हा चीननंतर जगातील दुसरा सर्वात मोठा टोमॅटो उत्पादक देश आहे. भारतात सुमारे 7.89 लाख हेक्टर क्षेत्रात टोमॅटो पीक घेतले जाते. त्याद्वारे टोमॅटोचे अंदाजे 1 कोटी 97 लाख टन उत्पादन घेतले जाते. देशाला सध्या प्रतिमहा अंदाजे 15 लाख टन टोमॅटोची गरज आहे. आंध्र प्रदेश हे देशातील टोमॅटोचे सर्वात मोठे उत्पादक राज्य आहे. महाराष्ट्र, तेलंगण, हरियाणा, मध्य प्रदेश, बिहार, तामिळनाडू, ओडिशा, गुजरात ही टोमॅटोची प्रमुख उत्पादक राज्ये आहेत.
 

Tomato price hike 
 
 जुन्नर तालुक्यातील पाचघर येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी तुकाराम गायकर
 
महाराष्ट्रात टोमॅटोचे 45 हजार हेक्टर क्षेत्र आहे. नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सांगली, लातूर, नागपूर हे टोमॅटो उत्पादक जिल्हे आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका हा ’टोमॅटो हब’ म्हणून ओळखला जातो, शिवाय नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी व निफाड तालुक्यांत टोमॅटोची दोन्ही हंगामांत लागवड होत असते. टोमॅटो पीक तिन्ही हंगामांत घेतले जाणारे पीक आहे. साधाणत: 60 ते 70 दिवसांचे हे पीक आहे. त्यामुळे बाजारपेठेतील मागणी आणि मिळणारा पैसा लक्षात घेऊन शेतकरी या पिकास पसंती देतात. यंदा कधी नव्हे ते टोमॅटोच्या दरवाढीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. एप्रिल-मे 2023 या काळात कवडीमोल दराने विकला जाणारा टोमॅटो जून 2023च्या दुसर्‍या आठवड्यापासून शंभरीवरून 160-180 रुपये प्रतिकिलो दराने विकला जाऊ लागला. नागपुरात 200 रुपये किलो दराने टोमॅटो विकला गेला. टोमॅटोचे गगनाला भिडलेले भाव ऐकून ग्राहकांची मोठी पंचाईत झाली. गृहिणीच्या ओठांवर एकच प्रश्न उभा राहिला - ‘एका टोमॅटोची किंमत किती असेल?’ पंचतारांकित हॉटेलपासून ते मॅकडोनाल्ड चालकापर्यंत प्रत्येकाचा चेहरा सॉसपेक्षा ‘लाल’ झाला. त्यामुळे अचानक स्फोट व्हावा तशा प्रसारमाध्यमांतून टोमॅटो दरवाढीच्या कहाण्या रंगत आहेत.
 
 
टोमॅटोतील तेजी व मंदी
 
 
मागील तीन वर्षांपासून देशांतर्गत टोमॅटोचे क्षेत्र आणि उत्पादन यांचा आलेख लक्षात घेता दरात कधी तेजी, तर मंदी दिसून येते. 2021मध्ये 100 रुपये, तर 2020मध्ये एक किलो टोमॅटोचा दर 70-80 रुपये किलो होता. पण गेल्या दोन वर्षांत दरात प्रचंड घट निर्माण झाली. याखेरीज जानेवारी 2023 या काळात झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरात, राजस्थान आणि इतर काही भागातील टोमॅटो पिकाचे नुकसान झाले. हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये शेतकर्‍यांनी टोमॅटोऐवजी कडधान्यांना पसंती दिली. महाराष्ट्रालाही नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. या काळात कोणत्याही शेतमालाला भाव मिळाला नाही. एप्रिल-मे 2023मध्ये शेतकर्‍यावर टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली. टोमॅटोला दर मिळाला नाही. त्यामुळे नेमका कुठला निर्णय घ्यावा याबाबत शेतकरी संभ्रमात होते. शेतकर्‍यांनी लागवड थांबवली. तुटवड्याची तीव्रता नेमकी किती आहे याबाबत कुणालाच माहीत नव्हते. परिणामी जून महिन्यापासून टोमॅटो बाजाराच्या इतिहासात अभूतपर्व तेजीला प्रारंभ झाला आणि आजतागायत ती टिकून आहे. ज्या शेतकर्‍यांनी फेब्रुवारी-मार्चमध्ये टोमॅटोची लागवड केली, त्यांना किफायतशीर उत्पन्न मिळत आहे. प्रति क्रेट (20 किलो) 2,200 (बावीसशे) रुपये बाजार टिकून राहिल्याने शेतकर्‍यांच्या हातात चांगला पैसा आला आहे. जुन्नर तालुक्यात पाचघर येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी तुकाराम गायकर यांनी गेल्या महिन्यापासून 18 हजार टोमॅटो क्रेटच्या विक्रीतून दीड कोटी रुपयांहून अधिक उलाढाल केली.
 
 
 
टोमॅटोच्या वाढत्या दरांनी शेतकर्‍यांमध्ये परिवर्तन घडवून आणले आहे की नाही? यासाठी उत्पादन खर्चासह वेगवेगळ्या अंगांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. बाजारस्थितीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता शेतमाल अभ्यासक शिवाजी आवटे म्हणाले, “जून ते सप्टेंबर 2023 या काळात टोमॅटोचा बाजारभाव काय असेल याविषयी मी एक महिन्यापूर्वीच भाष्य केले होते. 2005पासून ते 2023पर्यंतचा टोमॅटो दराचा अभ्यास केला असता जून ते सप्टेंबर महिन्यात टोमॅटोला सर्वोच्च दर मिळतील असा अंदाज व्यक्त केला. त्याप्रमाणे जून महिन्यात परिणाम दिसून आले. टोमॅटोच्या बाजार इतिहासात देशभरात प्रथमच उच्चांकी दर मिळाला. टोमॅटो पुरवठा बर्‍यापैकी सुरळीत होण्यासाठी ग्राहकांना 15 ऑगस्टची वाट पाहावी लागणार आहे.”
 
 
या पार्श्वभूमीवर टोमॅटो दराची वाढती झळ ग्राहकांना बसू नये, यासाठी केंद्र सरकारने शेतमाल खरेदी संस्था अर्थात नाफेड आणि सहकारी संघांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये टोमॅटोचे दर कमी होण्यास मदत होणार आहे.
 
 
उत्पादन खर्चाचा मेळ
 
टोमॅटो उत्पादक मालामाल झाले की नाही? हा एक चिंतनाचा विषय आहे. कारण शेतमाल हा हंगामी असतो, नाशिवंतही असतो आणि तो अनेक ठिकाणी अनेक शेतकर्‍यांनी उत्पादित केलेला असतो, त्यामुळे त्याच्या निर्मिती प्रक्रियेपासून ते काढणीपर्यंतचा उत्पादन खर्च वेगवेगळा असतो. या संदर्भात टोमॅटो दरात सर्वाधिक चर्चेत असलेले जुन्नर तालुक्यातील पाचघर येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी तुकाराम गायकर सांगतात, “माझी 20 एकर शेती आहे. तीन मुले शेती करतात. 2005पासून मी टोमॅटोची शेती करतो. गेल्या तीन वर्षांपासून टोमॅटोचा फटका बसत आहे. गतवर्षापासून कृषी निविष्ठांच्या दरात प्रचंड वाढ होत आहे. यंदा 12 एकरांवर टोमॅटोची शेती केली. त्यासाठी 36 ते 38 लाख रुपयांचा उत्पादन खर्च आला. मागील महिनाभरापासून 18 हजार टोमॅटो क्रेटच्या विक्रीतून 1 कोटी तीस लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. टोमॅटो काढणीला दररोज 100 मजूर कामाला येतात. महिलांना 400 रुपये दर, पुरुषांना 550 रुपये हजेरी द्यावी लागत आहे. मालवाहतूक, तीन मुले, सुना व स्वत: मी दररोज शेतात राबतो याचा ताळमेळ बसविला, तर उत्पादन खर्चाची यादी वाढत जाते. त्यामुळे माध्यमांनी उत्पादन खर्चाकडे दुर्लक्ष करून एकूण उलाढालीवर लक्ष केंद्रित केले आहे. असे असले, तरी मागील तीन वर्षांची तूट भरून निघेल अशी आशा आहे.”
 
 
भारतातील ग्राहकांच्या मागणीचा आढावा घेतला असता टोमॅटोपासून तयार होणार्‍या उत्पादनांना मोठी मागणी आहे. राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांनी संघटित होऊन टोमॅटोची मूल्यवर्धित साखळी विकसित करून शाश्वत विकास घडवून आणावा.
 
Tomato price hike
 
 
‘सह्याद्री’चे टोमॅटोची एकात्मिक मूल्यसाखळी मॉडेल
टोमॅटोचे बाजारातील बंपर उत्पादन असो की तुटवड्याची स्थिती असो, या दोन्हीही स्थितीत शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही उपयुक्त ठरेल, असे एकात्मिक मॉडेल सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी प्रत्यक्षात राबवीत आहेत. 2016मध्ये टोमॅटोवरील प्रक्रियेस सुरुवात केली. त्यानंतरच्या मागील सहा वर्षांत सह्याद्री टोमॅटो उत्पादनातील व प्रक्रियेतील देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. ‘युनिलिव्हर’ या जागतिक कंपनीचे ‘किसान’ हे टोमॅटो केचप उत्पादन प्रसिद्ध आहे. भारतातील किसानचे तब्बल 50 टक्के उत्पादन सह्याद्री फार्म्सकडून तयार केले जात आहे.
 
‘सह्याद्री‘कडे अत्याधुनिक प्रक्रिया आणि साठवण सुविधा आहे, ज्यामध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि संयंत्रे आहेत. यात केचप, जॅम, स्क्वॅश आणि शीतपेयांसाठी उत्पादन लाइन आहेत. कंपनी करीत असलेल्या टोमॅटो खरेदीतील 80 टक्क्यांपेक्षा जास्त खरेदी कंपनीच्या नोंदणीकृत शेतकर्‍यांकडून आणि कंपनीच्या सदस्यांमार्फत होते. सह्याद्री कंपनीच्या नोंदणीकृत सदस्यांकडून, तसेच राज्यभरातील शेतकर्‍यांकडून टोमॅटो खरेदी केली जाते. एकूण सात किलो टोमॅटोपासून एक किलो टोमॅटो पेस्ट तयार होते. या पेस्टची टिकवणक्षमता दोन वर्षे इतकी आहे. त्यापासून सॉस व इतर उत्पादने बनवली जातात. दररोज एक हजार टन टोमॅटोवर प्रक्रिया केली जाते.
विलास शिंदे, संस्थापक
सह्याद्री फार्म, मोहाडी, नाशिक
 
 

विकास पांढरे

सध्या सा.विवेकमध्ये उपसंपादक, एम.ए.बीएड पर्यंतचे शिक्षण. वयाच्या १६ व्या वर्षापासून सोलापूर 'तरुण भारत' मध्ये वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ. पुढे दैनिक तरूण भारत, सुराज्य,पुढारीमध्ये वार्ताहर व उपसंपादक. कृषी,साहित्य, व वंचित समाजाविषयी सातत्याने लिखाण.