मुलीला घडवताना

विषवृक्षाची बीजे भाग तीन

विवेक मराठी    27-Jul-2023   
Total Views |

While creating a girl
मुलीला काचेचे भांडे वगैरे मानून तिच्यावर बंधने घातली जातात. तिचे बाहेर जाणे-येणे नियंत्रित केले जाते. मुलग्यांना मात्र अशा विषयात फार ढील दिली जाते. आपण हळुवार वयातल्या मुलींना धोके व मुलामुलींना त्यांची जबाबदारी समजावून देतो आहेत का? मुलामुलींची मैत्री होते, जवळीक वाढते. त्यातून लग्नाचे फसवे वचन देऊन, आमिष दाखवून होणार्‍या मुलींच्या फसवणुकीबद्दल, जबाबदारी याबद्दल मोकळा संवाद आहे का?
मुलीसमोरची आव्हाने, सुरक्षेचे प्रश्न लक्षात घेता काही सूक्ष्म गोष्टींवर विचार करायला हवा. कोणते संस्कृतिक पोषण आपण तिला देतो आहोत?
 
 
‘तुम्ही मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव करता का?’ असा प्रश्न विचारला, तर आजचे सुजाण पालक नक्कीच चटपटीत उत्तर देतील - ‘नाही’! म्हणजे आम्ही मुलीला शिकवतो, नोकरी करू देतो, तिच्या मनाप्रमाणे तिने जोडीदार निवडला तर आमची हरकत नाही.. इ. इ.
 
 
कदाचित सूक्ष्मात शिरले, तर केले जाणारे फरक दिसू शकतील. मुलाला इंग्लिश माध्यम, मुलीला मराठी, व्यावसायिक कोर्स मुलाला, मुलीला कला, वाणिज्य शाखा, फारच झाले तर विज्ञान शाखा. नोकरी कर, पण रात्रपाळी नको. जोडीदार निवड, पण शक्यतो जातीतला! पालकांच्या अशा मतांवर, निर्णयावर शहरी-ग्रामीण, आर्थिक सधन वा निम्न, उपलब्धता, पियर प्रेशर्स असे अनेक बाह्य घटक परिणाम करत असतील. इथे गावाच्या, जातीच्या, संस्कृतीच्या अपेक्षा व्यक्त होत असतील. परंपरेने झालेले संस्कारच ते पुढे सरकवत असतील.
 
अटेन्शन इकॉनॉमी
 
वयात येणार्‍या मुलींची मानसिकता ‘सांगा, मी कशी दिसते?’ अशी असणे हे वयानुकूल आहे. त्यात आज सौंदर्यप्रसाधनांनी, त्यांच्या भुलवणार्‍या जाहिरातींनी व अनेक प्रलोभनांनी बाजार भरलेला आहे. भारतात प्रसाधन व्यवसाय दोन लाख कोटी रुपयांचा आहे. साठ लाख सलोन्स एकट्या भारतात आहेत. सौंदर्यवर्धन ही मानवाची आदिम प्रेरणा आहे. पण बाजार व्यवस्थेने त्याची अटेन्शन इकॉनॉमी बनवली आहे. अशा व्यापारी उत्पादनांमध्ये स्त्री सक्षमीकरण, स्त्री स्वातंत्र्य, समानता अशा संकल्पना बेमालूम कालवल्या जातात. त्याला आजची कुटुंबे, मुली बळी पडत आहेत का? केवळ प्रसाधने नव्हेत, सोशल मीडियावर सतत हजर असणे, सतत दिसत राहणे, लोकांनी दखल घेत राहणे असे अटेन्शन इकॉनॉमीचे अनेक प्रकार आहेत.
 
 
आपल्या संस्कृतीत सक्षमीकरणाची कल्पना गुणाधारित आहे, म्हणून मुलगी-स्त्री देवीस्वरूप मानली आहे. म्हणजे काय? ती केवळ एक कविकल्पना, डेकोरेटिव्ह कल्पना नाही. स्त्रीच्या अंगच्या श्री (prosperity), कीर्ती (fame), वाक् (speech), स्मृति (memory), मेधा (intelligence), धृति (firmness), क्षमा (forgiveness) या सद्गुणांमुळे तिच्यात ईशतत्त्व आहे असे मानलेले आहे (भगवद्गीता). तिला अशी घडवण्यासाठी आपण काही करतो का? व त्याचे मोजमाप करता येते का?
 
लग्न हीच तिच्या जीवनाची इतिकर्तव्यता?
 
आज मुली शिकून, नोकरी वगैरे करू लागल्या असल्या, तरीही मुलीचे लग्न हीच तिच्या जीवनाची इतिकर्तव्यता आहे, असे मानण्याबद्दल मात्र सार्वत्रिकता आढळते. जोडीला ‘मुलगी म्हणजे परक्याचे धन’, ‘कन्यादान म्हणजे श्रेष्ठ दान’, ‘मुली म्हणजे काचेचे भांडे’ वगैरे धारणा आहेतच. शिकवायचे तेही चांगला मुलगा पटकावण्यासाठी. आपली मुलगी त्या स्पर्धेत मागे नको पडायला, म्हणून मग आयासुद्धा वयात येणार्‍या मुलींवर अनेक प्रकारचे दबाव टाकतात, गोरेपणाची क्रीम्स, उंची वाढवण्याची औषधे, स्तनांचा आकार वाढावा म्हणून औषधे, फार टोकाला जाऊन कॉस्मेटिक सर्जरी इथपर्यंत पोहोचतात.
 
 
कधीकधी ते काचेचे भांडे वगैरे मानून तिच्यावर बंधने घातली जातात. तिचे बाहेर जाणे-येणे नियंत्रित केले जाते. मुलग्यांना मात्र अशा विषयात फार ढील दिली जाते. आपण हळुवार वयातल्या मुलींना धोके व मुलामुलींना त्यांची जबाबदारी समजावून देतो आहेत का? मुलामुलींची मैत्री होते, जवळीक वाढते. त्यातून लग्नाचे फसवे वचन देऊन, आमिष दाखवून होणार्‍या मुलींच्या फसवणुकीबद्दल, विवाहपूर्व शरीरसंबंध, त्यातले धोके, जबाबदारी याबद्दल मोकळा संवाद आहे का?
 
 
श्री (prosperity) - पतिपत्नीच्या प्राथमिक व पारंपरिक जबाबदार्‍या काय मानल्या आहेत? तर पुरुष पोशिंदा, बाहेर जाऊन कमावणे हे त्याचे मुख्य कर्तव्य! मुलेबाळे, पै-पाहुणे, सणवार या मुलीच्या जबाबदार्‍या! ग्रामीण भागात किंवा शहरी अल्प उत्पन्न गटातील काही घरात आजही मुलीचे लग्न, शिक्षण थांबवूनही केले जाते. अपुरे शिक्षण, त्यामुळे मुली पायावर उभ्या नसणे व त्यांचे आर्थिक स्वावलंबन नसणे हे स्वाभाविकच होते. मग लग्न हेच तिच्या ‘चरितार्थाचे साधन’ होऊन जाते. अगदी पत्नी नोकरी करत असली, तरी मुख्य उत्पन्न नवर्‍याचे, तिचे दुय्यम अशीच भावना दिसते. नोकरी करणार्‍या स्त्रीची बदली, प्रमोशन यांचे प्राधान्यक्रम ठरवताना तो सगळा भेदभाव ठळकपणे दिसतो.
 
 
लग्न व्यवहारात मुली-मुले व दोघांचेही पालक मुलीची दुय्यमता स्वीकारतात. समानतेचा आग्रह धरताना काही गोष्टी आतातरी आपण सैल करणार की नाही? आजही मुलगा उंचीने, वयाने जास्त हवा, त्याचे उत्पन्न जास्त हवे असते. आजही हुंडा दिला जातो, महागड्या भेटी देऊन खूश करायचा प्रयत्न असतो. मागण्या असतात. मान-अपमान असतात. याचा मथितार्थ काय? मुलगी दुय्यम, तिची मिळकत दुय्यम, करियर तर पुढची बात. जावई शोधताना अटी असतात - त्याचे घरदार असावे, चांगले शिक्षण नोकरी असावी. ते गैर नाही. पण मुलीची तशी समांतर योग्यता नसली, तरीही? मुलीने व तिच्या आईवडिलांनी निश्चय करायला हवा की मुलीकडेही पुरेशी योग्यता आणि मिळकतीची खात्री झाल्याशिवाय मुलीचे लग्न करणार नाही.
 
खरे स्वातंत्र्य
 
स्वातंत्र्याच्या कल्पनेबद्दल विनोबा भावे यांनी एक ठिकाणी म्हटले होते - ‘माझ्यावर कोणाची सत्ता असू नये, पण शक्य तर माझी इतरांवर सत्ता असावी, ही आजची स्वातंत्र्याची वृत्ती आहे. हा काही मोठासा गुण नाही, हा पशूंमध्येही आढळतो. आपलीही सत्ता दुसर्‍यावर असू नये असे ज्यांना वाटत असेल, ते स्वातंत्र्याचे खरे उपासक होय.’
 
मुलीला स्वतंत्र बनवत असताना तिला हेही संगितले पाहिजे की स्वातंत्र्य, समानता या गोष्टी निरपेक्ष नाहीत आणि निरंकुशही नाहीत. ते एक पॅकेज आहे. मुलीनेही मुलाचे व आपल्या व त्याच्या आईवडिलांचे तितकेच स्वातंत्र्य मानले पाहिजे. पालकांना आपल्याला काही सांगण्याचा, शिकवण्याचा अधिकार आहे, हे मुलांनी कधीही विसरता कामा नये.
 
 
मेधा (intelligence) - समानतेच्या युगात मुलांकडून उंची वस्तू, महागड्या गिफ्ट घेणे, मुलाच्या खर्चाने मौजमजा करणे हे मुलींना अयोग्य वाटते का? स्वत:चा सन्मान टिकवायचा असेल, तर तारतम्याने मुलींना विचार करायला शिकवायलाच हवे. ध्यानात घ्या, फ्रेंडशिप डेला फूल देणे आणि घेणे हे प्रातिनिधिक असू शकते. पण सतत महागड्या भेटी देणे, घेणे, त्याची अपेक्षा ठेवणे हे निरपेक्ष, कोणत्याही हेतूशिवाय असेल का? याचा विचार करा. गोड गोड बोलणे खरे आहे का? आणि अंतस्थ हेतू वेगळा नाही ना? हे ओळखायला शिका. ते एक विशेष कसब आहे. मुलींना सिक्स्थ सेन्स वापरायची सवय लावायला हवी.
 

While creating a girl 
 
प्रेमातली जबाबदारी (Responsibility)
 
प्यार किया तो डरना कया? हे वाक्य सर्वांना पाठ असते; पण प्रेमात भीतीपेक्षा ते प्रेम निभावणे, प्रेमातली जबाबदारी निभावणे जास्त कठीण, म्हणून ते जबाबदारीचे व जोखमीचे असते. त्यातच मुलामुलीचे आणि दोन्ही कुटुंबांचे हित असते.
 
प्रेमात पडावे कसे? हे शिकवावे लागत नाही, पण बिघडलेल्या प्रेमसंबंधातून बाहेर कसे पडायचे, हेही मुलींना माहीत हवे. गरज पडल्यास आईवडिलांनीही तिला मदत करायला हवी. आजच्या काळात ‘ब्रेक अप’ हा शब्द नवा नाही, त्याचा बाऊही केला जात नाही. पण नात्यांचा गुंता वाटतो त्यापेक्षा चिवट असतो. अगदी पतंगाच्या मांजासारखा गळा कापू शकेल असा असतो. त्यामुळे एखादे नाते मैत्रीच्या किती पुढे जाऊ द्यायचे, वेळीच कधी थांबायचे याचा निर्णय घ्यायला मुलामुलींना सक्षम बनवणे ही पालकांची जबाबदारी आहे.
 
मोहजाल - इंटरनेट किंवा आंतरजाल हे मोहजाल होऊ शकते. जी गोष्ट तुम्ही चारचौघात करत नाही - म्हणजे कुटुंबमान्य नाही, समाजमान्य नाही, ती गोष्ट चार भिंतींच्या आतसुद्धा करायची नाही हा साधा नियम पाळला तर अनेक अप्रिय, अयोग्य कृत्य टाळता येतील. डाटा सीक्रसी - माहितीची गुप्तता आणि सुरक्षितता हा आजच्या जगण्यातला कळीचा मुद्दा आहे. प्रोफाइल, डेटिंग, चॅट साइट्स, व्हिडिओ गेम्स आणि त्यातली चॅलेंजेस, ग्रूप्स, फोटो किंवा कंटेंट शेअरिंग करताना काय धोके असू शकतात हे तिला माहीत हवे.
 
 
तारुण्य, हे वय हे नवे अनुभव घेण्याचे, आयुष्याची पायाभरणी करण्याचे! मुलांचा परंपरा तोडण्याचा, विद्रोह करण्याचा कल असू शकतो. आज मुलींमध्ये व स्त्रियांमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे. Substance abuse - - मादक पदार्थांचे सेवन याला स्त्री मुक्तीची जोड दिली जाते. पुरुषांचे, मुलांचे अनुकरण म्हणजे समानता, स्त्री स्वातंत्र्य असे भासवले जाते. या निसरड्या वाटांवर तिने सावरायला हवे.
 
 
धृति (firmness) - नकाराधिकार - एखादे नाते सुखकारक वाटत नसेल, तर ते नाकारण्याची हिम्मत मुलीमध्ये यायला हवी, तर तिच्याशी संवाद हवा, आत्मविश्वास हवा, समोरच्या व्यक्तीमध्येही तितका विश्वास हवा. म्हणजे अनावश्यक तडजोड करायची, ब्लॅकमेल होण्याची किंवा आयुष्य पणाला लावायची वेळ येणार नाही.
 
 
आणि नकाराधिकार राबवायचा, तर तिला योग्य-अयोग्य याचा पोच हवा, चूक, असत्य, वाईट ते नाकारायची हिम्मत हवी. प्रवाहपतित न होता पियर प्रेशरला विरोध करायची ताकद हवी. आणि चूक झाल्यास घरट्यात परत यायला क्षमा (forgiveness) जागा हवी.

नयना सहस्रबुध्दे

स्त्रीविषयक लेखनासाठी प्रसिध्द असणाऱ्या नयना सहस्रबुध्दे या भारतीय स्त्री शक्ती या संघटनेच्या संस्थापक सदस्य आहेत. भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या म्हणूनही त्या कार्यरत होत्या. नयना सहस्रबुध्दे या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारीपदावर कार्यरत होत्या. सध्या महिला बँकेत डेप्युटेशनवर रुजू झाल्या आहेत. साप्ताहिक विवेकमध्ये स्त्रीभान या सदरातून त्या स्त्रीविषयक लेखन करत आहेत.