विष्णुबुवा ब्रह्मचारींचे कृतिशील स्मरण

विवेक मराठी    29-Jul-2023   
Total Views |
हिंदू धर्मावर अन्य धर्मीयांनी केलेली आक्रमणे आणि हिंदू समाजांतील दोष यांमुळे हिंदू समाजाचा एकीकडे तेजोभंग आणि दुसरीकडे शक्तिपात होत असताना हिंदू समाजात जागृती आणि नवचैतन्य निर्माण करण्याचे महान कार्य ज्यांनी केले, त्यांत बिनीचे शिलेदार म्हणून विष्णू भिकाजी गोखले उर्फ विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा समावेश होतो. 20 जुलै 1825 रोजी रायगड जिल्ह्यातील शिरवळी येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या कार्याला उजाळा देणारा लेख.
vivek
विष्णुबुवांच्या आयुष्याचा काळ ब्रिटिश साम्राज्य भारतात पाय घट्ट रोवत चालल्याचा काळ होता, हे लक्षात येईल. 1871 साली विष्णुबुवा निवर्तले. त्यांना आयुष्य लाभले अवघे सेहेचाळीस वर्षांचे. मात्र त्या अल्पायुष्यातदेखील त्यांनी धार्मिक-सामाजिक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्या आयुष्याची सुरुवातीची काही वर्षे ही चारचौघे जगतील अशीच होती. घरची गरिबी, त्यात त्यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा विष्णुबुवा होते केवळ पाच वर्षांचे. तेव्हा चरितार्थासाठी त्यांना वयाच्या नवव्या वर्षांपासून काम करावे लागले. काही काळ महाडला एका किराणा मालाच्या दुकानात त्यांनी काम केले, तर नंतर साष्टी येथे सरकारी खात्यात नोकरी केली. मात्र लवकरच त्यांचा प्रवास सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे सुरू झाला. नोकरी करण्यापलीकडे जाऊन काही सामाजिक-धार्मिक कार्य करण्यासाठी आपला जन्म आहे, असा विष्णुबुवांना आत्मसाक्षात्कार झाला आणि त्यांनी स्वत:स त्या मार्गाला वाहून घेतले. कीर्तन-प्रवचनात ते सहभागी होत असतच आणि अनेक धार्मिक-पौराणिक ग्रंथाचा अभ्यास त्यांनी केला होता. मात्र त्यानंतर त्यांनी समाजाच्या दु:स्थितीचा अभ्यास केला आणि नोकरी सोडून नाशिकला सप्तशृंगीच्या डोंगरावर तपश्चर्या करत असताना त्यांना आपले ध्येय गवसले. धर्माच्या नावाखाली माजवण्यात आलेले स्तोम आणि दुसरीकडे ख्रिश्चन मिशनरींनी मांडलेला उच्छाद यातून हिंदू समाजाची जागृती करणे त्यांना निकडीचे वाटले आणि या जागृतीसाठी त्यांनी भ्रमण सुरू केले.
 
 
विष्णुबुवा नाशिकमार्गे पंढरपूरला आले. तेथे महादेवशास्त्री कोल्हटकर यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यांच्या विनंतीवरून विष्णुबुवा यांनी सांगली, मिरज, वाई, सातारा पुणे व अहमदनगर येथे व्याख्याने दिली. मग ते मुंबई येथे वास्तव्यास आले.
 
 
मुंबईमध्ये त्यांना ख्रिश्चन मिशनर्‍यांनी उभ्या केलेल्या धार्मिक आव्हानांची जाणीव झाली. केवळ राजसत्ता बळकावणे हा इंग्रजांचा हेतू नसून हिंदू धर्मावर आक्रमण करणे हाही आहे, हे त्यांच्या लक्षात आल्याने या आक्रमणाला आळा घालणे आत्यंतिक गरजेचे आहे, असा त्यांनी निर्धार केला. ख्रिश्चन मिशनर्‍यांनी हिंदू धर्मावर हल्ला करण्यासाठी आगळी पद्धत राबविली होती. हिंदूंच्या धार्मिक ग्रंथांमधील दोषस्थळे सोयीस्कररित्या शोधून काढून हिंदूंची दिशाभूल करण्याचे ते कुटिल कारस्थान विष्णुबुवांच्या लक्षात आले. त्याचा प्रतिवाद करण्यासाठी आणि धर्मातील सत्यप्रतिपादन करण्यासाठी विष्णुबुवांनी व्याख्याने द्यायला सुरुवात केली. सामान्य लोकांचे प्रबोधन करणे हा त्यामागील हेतू होता, तद्वत ख्रिश्चन मिशनरींनी उपस्थित केलेल्या आक्षेपांना सडेतोड उत्तरे देणे हाही होता. त्या एका अर्थाने धार्मिक वादविवादांना मोठा प्रतिसाद लाभायला लागला. विष्णुबुवांनी मुंबईतील समुद्रकिनारी आपली व्याख्याने देणे सुरू केले आणि त्यात सहभागी होण्यासाठी ख्रिश्चन मिशनरीही हजेरी लावत असत. त्या वादविवादांची वृत्ते तत्कालीन वृत्तपत्रांत प्रसिद्ध होतच, तसेच विष्णुबुवा आणि ख्रिस्ती उपदेशक यांच्यात मुंबईमध्ये झालेल्या धर्मविषयक वादविवादांची हकीकत रेव्हरंड जॉर्ज बोएन यांनी संपादित केलेल्या ‘समुद्रकिनारीचा वादविवाद’ या ग्रंथात आलेली आहे.
 
 
मात्र ख्रिश्चन मिशनरींच्या हिंदू धर्मावर आक्रमण करण्याच्या इराद्यांना आव्हान देतानाच विष्णुबुवांना हिंदू समाजातील दोषांचीदेखील जाणीव होती. समाजातील जातिभेदांवर आधारित विषमतेचे ते विरोधक होते. त्यांचे विचार किती प्रागतिक होते, याची प्रचिती त्यांनी घेतलेल्या भूमिकांवरून लक्षात येईल. समाजातील अस्पृश्यता त्यांना मान्य नव्हती. पुनर्विवाह, प्रौढविवाह, घटस्फोट, शुद्धीकरण, मंदिर प्रवेश या सामाजिक प्रश्नासंबंधी त्यांचे विचार पुरोगामी होते. स्त्रीदास्यत्व नष्ट करण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली आणि स्त्रीशिक्षण हाच त्यासाठीचा मार्ग आहे अशी परखड भूमिका मांडली. विवाहासंबंधी स्त्रीला स्वातंत्र्य, विधवा झालेल्या स्त्रीला पुनर्विवाहाचा अधिकार आणि सती प्रथेवर बंदी या मतांचा त्यांनी पुरस्कार केला.
 
 
 
‘राज्यकारभार चालवणारे कामगार’ कधीही वंशपरंपरा नेमता कामा नयेत, असा इशारा देतानाच प्रजेतील कोणत्याही माणसाला स्वकर्तृत्वाने राजा होता येईल अशी परिस्थिती असली पाहिजे, असेही मत त्यांनी मांडले होते. न्यायाधीशाने समत्वाने न्याय देणे आवश्यक आहे आणि हा न्याय जातिभेदविरहित तत्त्वावरच आणि निष्पक्ष वृत्तीने दिलेला असावा, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. सैन्य, कारकुनी अशा सर्व क्षेत्रांत सर्व जातीजमातीच्या लोकांचा समावेश असायला पाहिजे, या मताचा त्यांनी पुरस्कार केला. कारखानदारीचेही ते पुरस्कर्ते होते. विष्णुबुवांचा काळ हा एकोणिसाव्या शतकातील होता, हे लक्षात घेतले तर त्यांच्या विचारांतील पुरोगामित्व अधिकच प्रकर्षाने जाणवेल. विष्णुबुवांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी या मतांचा केवळ व्याख्यानांतून किंवा मौखिक प्रसार न करता मौलिक असे ग्रंथलेखन केले. त्यामुळे त्यांच्या विचारांना अक्षरत्व लाभले. 1856मध्ये त्यांनी ‘भावार्थ सिंधू’ नावाचा ग्रंथ ओवीबद्ध केला. ‘वेदोक्त धर्मप्रकाश’ व ‘सुखदायक राज्यप्रकरणी निबंध’ या ग्रंथांत विष्णुबुवांच्या प्रागतिक विचारांचे प्रतिबिंब पडलेले आढळेल. आदर्श राज्यकल्पनेचे त्यांनी या ग्रंथात केलेले चित्रण म्हणजे स्वप्नरंजनात्मक आहे, असा आक्षेप त्या काळी घेण्यात आला होता, तरी विष्णुबुवांनी त्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करीत उलट या ग्रंथाचे इंग्लिशमध्ये भाषांतर करून घेतले. ‘चतु:श्लोकी श्रीभागवताचा मराठी भाषेत अर्थ’, ‘सहजस्थितीचा निबंध’, ‘वेदोक्त धर्माचा विचार’ व ‘ख्रिस्तीमत खंडन’ (शिकवणीचे सार), ‘सेतुबंधनी टीका’ या त्यांच्या ग्रंथांनी अनेक विषयांना हात घातला.
 
 
 
अशा या महान पण काहीशा उपेक्षित राहिलेल्या हिंदुत्ववादी सामाजिक व्यक्तिमत्त्वाची स्मृती कायम ठेवण्यासाठी गेल्या वर्षी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे ’विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र’ न्यासाची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक दिवंगत मोरोपंत पिंगळे यांची प्रेरणा या न्यासाच्या स्थापनेमागे आहे. विष्णुबुवांच्या साहित्याचे पुनर्मुद्रण, डिजिटायझेशन, विष्णुबुवांचे जीवन आणि कर्तृत्व यांच्याबद्दल संशोधन, भाषणे-व्याख्याने इत्यादी माध्यमांतून प्रबोधन, राज्यभरात या कार्यासाठी कार्यकर्ते विकसित करण्यासाठी प्रशिक्षण वर्ग अशा उद्दिष्टांना सुसंगत असे अनेक उपक्रम या न्यासाने सुरूही केले आहेत. त्यासाठी www.vishnubuvabrahmachari.com हे संकेतस्थळही सुरू केले आहे, जेणेकरून या कार्याला हातभार लावू इच्छिणार्‍यांना अथवा या उपक्रमांत सहभागी होण्यासाठी न्यासाशी संपर्क साधता येईल. (संपर्क - सुरेश गोखले 9579372797). विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे कर्तृत्व महान होते. त्यांची स्मृती कृतिशीलतेने जपण्याची धडपड हा न्यास करीत आहे. त्याची अवश्य दखल घेतली पाहिजे.

राहुल गोखले

विविध मराठी / इंग्लिश वृत्तपत्रांतून राजकीय, सामाजिक व आंतरराष्ट्रीय विषयांवर नियमित स्तंभलेखन
दैनिक / साप्ताहिक / मासिकांतून इंग्लिश पुस्तक परिचय सातत्याने प्रसिद्ध
'विज्ञानातील सरस आणि सुरस' पुस्तकाला राज्य सरकारचा र.धों. कर्वे पुरस्कार