मैत्रिसंबंधांचे नवे अध्याय

विवेक मराठी    04-Jul-2023   
Total Views |
america
आधुनिक काळात देशातील सामान्यांपासून ते परदेशी राष्ट्राप्रमुखांपर्यंत सर्वांशी सख्य करू शकणारे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी. अमेरिका-भारत भेटीत दोन्ही देशांचे हितसंबंध लक्षात घेता अनेक गोष्टींवर चर्चा आणि धोरणांची निश्चिती झाली. एकंदर या भेटी अंतर्गत दोन्ही देशांसाठी अनेक सकारात्मक गोष्टी वास्तवात येणार आहेत. गेल्या 25 वर्षांत अमेरिका-भारत मैत्रिसंबंधाचा हा अध्याय अशाच सकारात्मक कार्याची फलश्रुती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची औपचारिक अमेरिका भेट होणार होणार.. म्हणून गेले काही दिवस गाजत होती. 20 जून 2023 रोजी त्यांचे न्यूयॉर्कला आगमन झाले, त्याच्या आधीपासून ते 23 जून रोजी त्यांनी इजिप्तला प्रस्थान ठेवले, तोपर्यंत अमेरिकन माध्यमे, राजकारणी, विचारवंत, विविध विषयांतील तज्ज्ञ, उद्योजक आणि अमेरिकेतील भारतीय अशा सर्वांकडूनच या भेटीसंदर्भात विविध प्रकारची मते मांडली गेल्याचे दिसले. आंतरजालावर या संदर्भात जेव्हा विशेष खणून माहिती शोधली, तेव्हा असे दिसून आले की या भेटीसंदर्भात माध्यम प्रसिद्धी 10,000च्या घरात आहे, तर समाजमाध्यमात - विशेषत: ट्विटरवर या संदर्भात सहज 10 लाखांपर्यंत असू शकेल, त्याव्यतिरिक्त समाजमाध्यमात चेवळखपणडअसारख्या हॅशटॅग्जना प्रसिद्धी मिळाली होती. वॉशिंग्टनला गेल्यापासून झालेले विविध कार्यक्रम आणि प्रसिद्धी लक्षात घेता मोदींच्या अमेरिका भेटीचे विश्लेषण करताना अनेक दृष्टीकोनांतून पाहावे लागेल.
 
 
स्वागत
 
संयुक्त राष्ट्र संघ न्यूयॉर्कमधील आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभांनंतर पंतप्रधानांनी काही अमेरिकन उद्योजकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यात त्यांची टेस्लाचे आणि ट्विटरचे प्रमुख एलॉन मस्कची भेट भारतात विशेषकरून गाजली. “मी मोदींचा चाहता आहे, ते त्यांच्या देशाचे भले कसे होईल तेच पाहतात” असे म्हणत असतानाच मस्क यांनी त्यांची सुप्रसिद्ध असलेली विद्युत गाडी - Tesla लवकरच भारतीय बाजारपेठेत येईल असे जाहीर केले. त्याच रात्री वॉशिंग्टनला राष्ट्रपती बायडेनच्या पत्नी जिल बायडेन यांच्याबरोबर त्यांनी शिक्षणसंदर्भातील एका कार्यक्रमात भाग घेतला. जिल बायडेन या स्वत: प्राध्यापिका आहेत आणि आजही त्या नॉर्दन व्हर्जिनिया कम्युनिटी कॉलेजमध्ये इंग्लिश शिकवतात. मोदींना नंतर जिल बायडेन यांनी अमेरिकेतील सुप्रसिद्ध असलेले अनेक संशोधनांचे केंद्रस्थान नॅशनल सायन्स फाउंडेशनची विशेष सफर घडवून आणली. अशा सफरी कधी अचानक घडत नसतात, तर आधीपासून ठरलेल्या असतात. आपण अशी आशा करू या की भारत सरकारसुद्धा अमेरिकन उच्च शिक्षणात तळागाळातील शैक्षणिक संस्थापर्यंत पोहोचून संशोधनास प्रोत्साहन देणारी नॅशनल सायन्स फाउंडेशनसारखी राष्ट्रीय संस्था तयार करण्याचा गांभीर्याने विचार करेल.
 
 
22 जूनचा दिवस मोदी-बायडेन भेटीसाठीचा आणि अमेरिका-भारत मैत्रीसाठीचा महत्त्वाचा दिवस होता. या दिवशी सकाळी व्हाइट हाउसच्या प्रांगणात अधिकृतपणे ज्याला ‘रेड कार्पेट वेलकम’ म्हणतात, तसे मोदींचे स्वागत झाले. स्वत: राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि जिल बायडेन हे मोदींच्या स्वागतासाठी उभे होते आणि दोघांनीही मोदींशी हस्तांदोलन करून नंतर हातात हात घेऊन समारंभस्थानी आणले. या कार्यक्रमासाठी अमेरिकेतील विविध राज्यांमधून तमाम अनिवासी भारतीय आले होते. मोदींच्या स्वागतासाठीचा जयघोष व्हाइट हाउसच्या प्रांगणात दुमदुमत होता. या दिवशी नंतर औपचारिक भेट, करार आणि भेटवस्तूंचे आदानप्रदान करण्याचा सोहळा पार पडला. बायडेन यांनी मोदींना अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितांच्या संग्रहाची प्रथमावृत्ती भेट दिली. मोदींनी बायडेनना Shree Purohit Swami आणि सुप्रसिद्ध आयरिश कवी WB Yeats यांनी 1937 साली लिहिलेलेThe Ten Principal Upanishads  ह्या पुस्तकाची प्रथमावृत्ती भेट दिली. त्याव्यतिरिक्त प्रयोगशाळेत पर्यावरण संवर्धन सांभाळून तयार केलेला 7.5 कॅरटचा हिरा मोदींनी जिल बायडेन यांना भेट दिला.
 
 
भेटीची फलश्रुती - आंतादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यंताया
 
राष्ट्रप्रमुखांच्या भेटीगाठी जेव्हा होतात, तेव्हा त्या वेळेस होणार्‍या अशा औपचारिकतेस प्रसिद्धी देत असताना त्या भेटीतले महत्त्वाचे मुद्दे जनतेसमोर येण्याचे राहून जातात. या भेटींची तयारी वर्ष-सहा महिने आधीपासून चालू झालेली असते. प्रत्यक्ष भेटीत फक्त शिक्कामोर्तब होते.
 
व्हाइट हाउसच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या अमेरिकन-भारत सरकारांच्या संयुक्त वक्तव्यात एकूण 58 मुद्दे आहेत. त्यांचा खाली दिलेला गोषवारा वाचल्यास समजू शकते की या भेटीत दोन्ही देशांसाठी अनेक सकारात्मक गोष्टी वास्तवात येणार आहेत -
 
Initiative on Critical and Emerging Technology (ICET) अंतर्गत भारताला महत्त्वाच्या तंत्रज्ञानाची माहिती होऊ शकणार आहे. एकमेकांवर दृढविश्वास असल्याशिवाय कुठलेही राष्ट्र हे करणार नाही. याव्यतिरिक्त तंत्रज्ञान देवाणघेवाण आणि त्या संदर्भातील व्यापार सुलभ केला जाणार आहे.
 
अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि भारतीय अंतराळ संस्था इस्रो यांच्यात अनेक करार झाले आहेत. भारतीय अंतराळवीरांना आता अंतराळात जाण्यासंबंधीचे प्रशिक्षण अमेरिकेत मिळणार आहे आणि संयुक्त प्रकल्पाच्या अंतर्गत भारतीय अंतराळवीर 2024मध्ये International Space Stationवर जाऊ शकणार आहेत. त्याव्यतिरिक्त यापुढे दोन्ही देश एकत्रितपणे मानवी उत्कर्षासाठी संयुक्तपणे अंतराळस्वारी आणि संशोधन करणार आहेत.
 
 
सध्याच्या काळात प्रत्येक तंत्रज्ञानासाठी सेमिकंडक्टरची नितांत गरज असते. हा भाग सध्या चीनमध्ये अधिक होत असल्याने, सर्वांना चीनवर अवलंबून राहावे लागत आहे. त्याला तोड म्हणून दोन अमेरिकन सेमिकंडक्टर्सच्या कंपन्या भारतात त्यांचे काम चालू करणार आहेत. एकूण 2.75 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक असलेला सेमिकंडक्टर्सचा Micron Technology Inc. उद्योग 5000 प्रत्यक्ष आणि 15000 सामाजिक रोजगारनिर्मिती करणार आहे. Applied Materials Inc. 40 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करून इंजीनियरिंग सेंटर चालू करणार आहे. आज भारतात या क्षेत्रात काम करू शकणार्‍या कुशल व्यक्तींची कमतरता लक्षात घेऊन Lam Research 60000 भारतीय इंजीनियर्सना प्रशिक्षण देऊन तयार करणार आहेत.
 
भारत आणि अमेरिका आता 5जी आणि 6जी तंत्रज्ञानावर एकत्रित काम करणार आहेत.
 
 
दोन्ही देशांतील खाजगी आणि सरकारी तज्ज्ञांच्या संयुक्त सहभागाने मूलभूत संशोधन (Quantum Information Science and Technology) केले जाणार आहे. त्याव्यतिरिक्त 35 विशेष प्रकल्पांवर संशोधन केले जाणार आहे. त्यासाठी अमेरिका मोठी गुंतवणूक करत आहे.
 
कृत्रिम बुद्धिमत्तेवर - अर्थात Artificial Intelligence (AI) वरदेखील दोन्ही देश आता एकत्रित संशोधन करणार आहेत.
 
 
अमेरिका आण्विक तंत्रज्ञान आणि त्यासंदर्भातदेखील भारतास मदत करणार आहे.
 
भारत अमेरिकेकडून अत्याधुनिक ड्रोन, तसेच अनेक प्रकारचे संरक्षण साहित्य घेणार आहे. अमेरिकन रोजगारनिर्मितीसाठी त्याचा फायदा होईल, तसेच भारतालाही केवळ रशियाच्या सध्याच्या काळात जुन्या झालेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे थांबवता येईल.
 
 
अमेरिकन नौदलाची जहाजे आता भारतात दुरुस्तीसाठी येऊ शकतील.
 
 
पर्यावरण संवर्धनासाठी हरित ऊर्जेसाठी दोन्ही राष्ट्रे पुढे येत आहेत. VSKEnergy ही भारतीय कंपनी अमेरिकेत सौर पॅनल्स तयार करण्यासाठी 1.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे, ज्याचा अमेरिकेस मोठा फायदा होणार असे समजले जात आहे.
ॠए कंपनीची जेट इंजिन्सही भारतात तयार केली जाणार आहेत.
 
 
अमेरिका भारतात अहमदाबाद आणि बंगळुरूमध्ये वकिलाती चालू करणार आहे, तर भारत सिअ‍ॅटलमध्ये वकिलात काढणार आहे.
 
 
एच1 बी व्हिसा असणार्‍या अमेरिकेतील भारतीय कर्मचार्‍यांना आता अमेरिकेतल्या अमेरिकेत स्टँप मिळू शकेल, जेणेकरून त्यांना भारतात येऊन परतणे सोपे जाऊ शकेल.
 
 
याव्यतिरिक्त विविध धोरणांच्या संदर्भात एकत्र काम करण्याचा आधीपासून असलेला संकल्प अधिकच दृढ करण्यात आला आहे.
मोदी आणि बायडेन यांनी पत्रकारांसमोर भेटीचा वृत्तान्त मांडला आणि नंतर पत्रकारांच्या प्रत्येकी दोन प्रश्नांना उत्तरे दिली.
 
अमेरिकन प्रतिनिधी सभागृहातील मोदींचे भाषण
 
 
हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच जागतिक नेते आहेत, ज्यांना अमेरिकेत संयुक्त सभागृहात भाषण करण्यास दोनदा अथवा तीनदा बोलावले असेल. ब्रिटनचे चर्चिल, इस्रायलचे नेतान्याहू यांना तीनदा आमंत्रण मिळाले होते, तर मोदींच्या आधी केवळ इस्रायली पंतप्रधान यित्झॅक राबिन आणि नेल्सन मंडेला यांनाच दोनदा बोलावले होते. मोदींच्या या विशेष भाषणावर लिहायचे झाले, तर वेगळा लेख लिहावा लागेल. पण थोडक्यात सांगायचे झाले, तर दोन पक्षांत विभागलेल्या या सभागृहात मोदींनी मोठ्या कौशल्याने दोन्ही बाजूंचा मान राखत भाषण केले. तत्पूर्वी मोदींना दोन्ही पक्षांच्या सभासदांच्या चमूने विशेष आदराने सभागृहात आणले. साधारण एका तासाच्या त्यांच्या भाषणात 15 वेळा उभे राहून, तर एकूण 75 वेळा सभासदांनी टाळ्या वाजवल्या.
 
 
america
 
भाषण संपल्यावर अनेक सभासदांनी मोदींना थांबवून त्यांची स्वाक्षरी घेतली, त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतले. प्रेक्षागृहात या वेळेस अनेक भारतीय त्यांच्या अमेरिकन प्रतिनिधींच्या परवानगीमुळे येऊ शकले होते. त्यामुळे ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी सभागृह दुमदमून गेले होते. त्यानंतर व्हाइट हाउसमध्ये ठेवलेल्या मोदींसाठीच्या विशेष आणि शुद्ध शाकाहारी मेजवानीस अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. ह्या मेजवानीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पाश्चात्त्य पद्धतीनुसार अल्कोहोल असलेल्या वाइनने टोस्ट (स्वागत) करणेही मोदी अल्कोहोल घेत नाहीत म्हणून टाळले गेले.
 
भारतीयांशी संवाद साधल्याशिवाय मोदींची परदेशवारी कधीच पूर्ण होत नाही. या वेळीदेखील अनिवासी भारतीयांनी मोदींचे एक विशेष भाषण आयोजित केले होते.
 
 
कवित्व
 
आधुनिक काळात देशातील सामान्यांपासून ते परदेशी राष्ट्राप्रमुखांपर्यंत सर्वांशी सख्य करू शकणारे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व असलेले पंतप्रधान मोदी यांना त्यांचे आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचे विरोधक कधीच आपलेसे करू शकलेले नाहीत. मार्क्सवादी डावी विचारसरणी, हिंदू तत्त्वज्ञानवरील आकस आणि अनिवासी भारतीयांच्या कर्तृत्वामुळे असलेला द्वेष (खरे म्हणजे यात सर्वधर्मीय अनिवासी भारतीय येऊ शकतात), ह्या सर्वाचा एकत्रित परिणाम या भेटीच्या वेळेस दिसून आला. काही मोजकी डोकी निषेध करायला उभी होती. काही जणांनी डाव्या विचारांशी प्रामाणिक असलेल्या लोकप्रतिनिधींना सभागृहातील मोदींच्या भाषणावर बहिष्कार घालायला लावला. न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रीट जर्नल आणि इतर अनेक छापील माध्यमे तसेच प्रमुख दृक्-श्राव्य माध्यमे, समाजमाध्यमे या सर्वांनी मोदींची ही भेट काही अंशी स्तुती करत, तर बर्‍याच अंशी वास्तवाला धरून नसलेल्या बातम्यांचा वापर करत टीका (अथवा बदनामी) करत जनतेसमोर मांडली. यात सर्वात ठरवून मर्यादा सोडल्या असे म्हणावयास जागा असलेला प्रसंग म्हणजे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सीएनएनशी बोलताना वापरलेली भारत विभाजनाची भाषा आणि जीनांनी वापरलेली ‘मुसलमानी भारत - हिंदू भारत’ ही भाषा. ओबामांच्या असल्या भाषेचे पडसाद उठणे साहजिकच होते. ज्या राष्ट्राध्यक्षाने स्वत:च्या कारकिर्दीत सहा मुस्लीम राष्ट्रांवर 26000हून अधिक बाँबचा वर्षाव केला, त्यांनी मुसलमानांची खोटी काळजी दाखवणे थांबवावे, तीही जेव्हा Pew रिसर्चच्या सर्वेक्षणानुसार 98 टक्के भारतीय मुस्लीम समाज स्वत:ला धार्मिक स्वातंत्र्य असल्याचे नि:संशय मान्य करत असतो, तेव्हा.
 
 
 
 
अर्थात असल्या टीकेपासून आणि प्रचंड मानमरातब होऊन झालेल्या कौतुकाकडेदेखील मनाने लांब राहून मोदी अमेरिकन प्रवास हा भारतासाठी आणि अमेरिकेसाठीही फलदायक करण्याकडेच लक्ष ठेवून होते. मोदी अमेरिकेतून नंतर इजिप्तमध्ये जाऊन नंतर परत मातृभूमीकडे रवाना झाले, तरी राष्ट्राध्यक्ष बायडेनकडून मोदींच्या भेटीवरून आणि त्याच्या फलनिष्पत्तीवरून ट्वीट केली गेली.
 
 
 
अमेरिका आणि भारत यांचे राजकीय संबंध हे अटलजी पंतप्रधान असण्याच्या काळात आणि क्लिटंन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसर्‍या कार्यकालामध्ये आणि बुश यांच्या पहिल्या कार्यकालामध्ये प्रथम सुरळीत होऊ लागले होते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बुश आणि ओबामा यांच्याबरोबर संबंध प्रस्थापित करून ते आणखी एका वरच्या स्तरावर नेले. मोदींनी ओबामा, ट्रंप आणि आता बायडेन या तीन राष्ट्रपतींबरोबर संबंध प्रस्थापित केले आणि एका अर्थी सध्याच्या काळासंदर्भात पूर्णत्वास नेले.
 
 
एक काळ असा होता, जेव्हा पाश्चात्त्य देश आणि अमेरिका भारताशी मैत्री करणे सोडा, भारतास कमी लेखण्याव्यतिरिक्त काहीच विचार करू शकत नव्हते. इथल्या माध्यमात येणार्‍या त्या काळातील भारतातील बातम्या म्हणजे फक्त रस्त्यावर फिरणार्‍या गाई, उंट, हत्ती यांचा देश इतक्याच मर्यादित असायच्या, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. मोदींना तर 2002नंतर अख्ख्या जगाने वाळीत टाकले होते. जे कधीच कुठे पुराव्यानिशी सिद्ध होणार नाही, ते माध्यमांच्या आणि डाव्या विचारवंतांच्या उपयोगाने केले गेले आणि मोदींना खलनायक करण्याचे अथक प्रयत्न झाले. अशी माणसे असल्या बाहेरून होणार्‍या नकारात्मक हल्ल्यांकडे दुर्लक्ष करत आपले काम करत राहतात. त्याचा चांगला परिणाम होणार हे नक्की असते. गेल्या 25 वर्षांत अमेरिका-भारत मैत्रिसंबंधाचा हा अध्याय अशाच सकारात्मक कार्याची फलश्रुती आहे.