दोन भावांचे मनोमिलन झाले तरी?

विवेक मराठी    05-Jul-2023   
Total Views |
सभेला लोकांची गर्दी होत असली, तरी लोक त्याकडे मनोरंजन म्हणून पाहत असतात. त्यात महाराष्ट्राच्या विकासाची व्हिजन नसते. त्यात फक्त बोलघेवडेपणा असतो. त्यातच दोन्ही भावांमध्ये आळस असल्याने प्रत्यक्ष मतदारांना भेटले जात नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्याची सत्ता आली, पण त्यांनी प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा फेसबुक लाइव्हवर जास्त भर दिला. तर राज ठाकरेंकडे नाशिक दिले, पण तेथील कारभार मुंबईत बसून पाहिला. आम्ही तुम्हाला भेटणार नाही, तुम्ही आम्हाला भेटायला या.. ही त्यांची आजवरची राजकारणातील भूमिका राहिली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात यांची जनतेशी नाळ जोडली जात नाही. कार्यकर्त्यांशी फारसा संबंध येत नाही.
 

mns
 
राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून आज जवळपास 16 वर्षे झाली, तरीही अजून एक चर्चा अधूनमधून डोक काढत असते, ती म्हणजे दोन भाऊ एकत्र येतील का? पण या दोन्ही नेत्यांनी खूप वेळा या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. दोन्ही भावांना यावर प्रश्न विचारला असता ते यावर उडवाउडवीचे उत्तर देतात. तरीही या चर्चेनंतर वृत्तपत्र इ. मीडियावर स्टोरी येते, सोशल मीडियावर मतप्रदर्शन होत असते. पण काही दिवसांनी दुसरी मोठी राजकीय घडामोडी झाली की या चर्चेला अर्धविराम मिळतो आणि पुन्हा दुसरी कुठली त्याला पूरक घटना घडली ही चर्चा डोके वर काढते. आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झाली आहे.
 
 
गेल्या वर्षी शिवसेनेमधून एकनाथ शिंदे व 40 आमदार बाहेर पडल्याने पक्षाचे नाव, चिन्ह गेले, त्यामुळे उबाठा सेनेची अवस्था दयनीय झाली आहे, तर 2014नंतर मनसे पक्ष अस्तित्वहीन होत चालेला आहे. यामुळे दोन्ही पक्षांना, भावांना आपले पक्ष वाढवायचे असतील, आपले राजकीय अस्तित्व टिकवायचे असेल तर एकत्र येणे गरजेचे आहे असे कार्यकर्त्यांना वाटत आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर आता महाविकास आघाडीही कोलमडली आहे. उबाठा सेनेच्या हिंदुत्ववादी, सावरकरवादी भूमिकेमुळे काँग्रेस पक्षाला तो नेहमीच अडचणीचा ठरतो. राहुल गांधी यांनासुद्धा उबाठा सेनेशी युती रुचत नाही. त्यामुळे अजूनही त्यांनाही प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली नाही. हे सर्व पाहता मराठी मते फुटू नयेत यासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावे असे दोन्ही पक्षांतील असंख्य कार्यकर्त्यांना वाटते. दोन दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे तीच भावना व्यक्त केली. पण राज ठाकरेंनी नेहमीप्रमाणेच त्याला केराची टोपली दाखवली असेल, असे दिसते.
 


mns 
 
टाळी का देत नाहीत?
 
2014च्या निवडणुकीत देशात भाजपाचे वारे वाहू लागले होते. मोदींच्या झंझावातापुढे सर्व प्रादेशिक पक्षांची व काँग्रेसची पिछेहाट होत होती. अशा वेळी राज ठाकरे हे तर पूर्वीपासूनच मोदींचे समर्थक होते. त्यामुळे गोपिनाथ मुंडेंनी भाजपा-सेना युतीमध्ये मनसेला घ्यावे असे मतप्रदर्शन केले. प्रयत्नही केले. पण दोघांनी अनुकूलता दाखवली नाही. त्याच वेळी ‘राज ठाकरे उद्धव ठाकरेंना टाळी देतील का?’ हा शब्दप्रयोग प्रचलित झाला. त्यानंतर 2014च्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपा युती तुटली. अशा वेळी मनसे-शिवसेना युती व्हावी अशी दोन्हीबाजूच्या कार्यकर्त्यांनी जोर धरला. पण शिवसेनेच्या बाजूने त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नसल्याने ही युती झाली नाही. (राज ठाकरे यांनी आपल्या अनेक मुलाखतींत हे स्पष्टही केले आहे.). त्याचबरोबर दोघांचे ध्येय, पक्षाचा अजेंडा, प्रादेशिक अस्मिता, हिंदुत्ववादी भूमिका आणि दोन भावांमधील वर्चस्ववादी भूमिका यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येण्यास अनेक अडचणी येत असतात.
 

mns 
 
युतीचे परिणाम
 
या पक्षापेक्षा, दोन्ही भाऊ एकत्र येणार का? हा महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठा यक्षप्रश्न असल्यासारखे अनेकांना वाटत असते. पण आपण एकत्र यावे असे या दोन्ही भावांना वाटत नाही. आम्ही भाऊ म्हणून वेगळे आणि राजकारण वेगळे असेच त्यांनी ठेवले आहे. राज यांनी आपल्या अनेक भाषणांतून ‘परतीचे दोर कापून टाकले आहेत’ असे स्पष्ट केले. तरीही आपल्या राजकीय अस्तित्वासाठी एकत्र आले, तर महाराष्ट्राच्या राजकारणावर याचे नक्कीच परिणाम होतील. कारण ठाकरे कुटुंबीयाविषयी लोकांना काही अंशी प्रेम, सहानुभूती आहे. दोन भाऊ एकत्र येणार या माध्यमांवरील चर्चेलासुद्धा लाखांचे व्ह्यू मिळतात. त्यामुळे प्रत्यक्षात हे एकत्र आले तर मतपेटीमध्ये किती परिणाम करेल हे ठामपणे सांगता येत नसले, तरी मुंबई महानगरपालिकेत मात्र नक्कीच परिणाम होऊ शकतो. मराठी मतांचे धुव्रीकरण थांबून एकगठ्ठा मतदान होऊ शकते.
 
 
mns
 
दोघांची शक्ती आणि मर्यादा
 
राज आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांच्या सभानांही गर्दी होते. राज यांच्या सभा तर रेकार्ड ब्रेक असतात. पण सभेला लोकांची गर्दी होत असली, तरी लोक त्याकडे मनोरंजन म्हणून पाहत असतात. त्यात महाराष्ट्राच्या विकासाची व्हिजन नसते. त्यात फक्त बोलघेवडेपणा असतो. त्यातच दोन्ही भावांमध्ये आळस असल्याने प्रत्यक्ष मतदारांना भेटले जात नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्याची सत्ता आली, पण त्यांनी प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा फेसबुक लाइव्हवर जास्त भर दिला. तर राज ठाकरेंकडे नाशिक दिले, पण तेथील कारभार मुंबईत बसून पाहिला. आम्ही तुम्हाला भेटणार नाही, तुम्ही आम्हाला भेटायला या.. ही त्यांची आजवरची राजकारणातील भूमिका राहिली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात यांची जनतेशी नाळ जोडली जात नाही. कार्यकर्त्यांशी फारसा संबंध येत नाही. त्यामुळे रेकार्ड ब्रेक सभा होऊनही चांगल्या संख्येने आमदार, नगरसेवक निवडून येत नाही. या वेळी राजकीय अपरिहार्यता म्हणून एकत्र यावे लागलेच, तरी कार्यकर्त्यांमध्ये 16 वर्षांत आलेले वितुष्ट, दुभंगलेली मने, आरोप आणि उमेदवारांच्या जागावाटपातील पेच यामुळे दोघांचेच नुकसान होऊ शकते. दोघांचे कार्यकर्ते किती एकदिलाने काम करतील हाही प्रश्न आहे. जर एकत्र आले, तर उबाठा सेनेला याचा मोठा फायदा होऊ शकतो, कारण त्यांचे कार्यकर्ते थोड्याफार संख्येने विस्तारलेले आहेत. त्यामुळे राज यांच्या चेहर्‍याआडून, सभांआडून शिवसेनेला पुन्हा पाय रोवण्याची संधी मिळू शकते.
 
 
जनतेच्या चर्चेला ठाकरे बंधू किती गांभीर्याने घेऊन युतीसाठी अनुकूल होतात की आपले मानसन्मान जपत बडव्यांच्या मांदियाळीकडे दुर्लक्ष करून एकत्र येतात. हे पाहणे आगामी काळात औत्सुक्याचे ठरेल.