चेहरा समाजशास्त्रीय आणि ऐतिहासिक अभ्यास

विवेक मराठी    07-Jul-2023   
Total Views |
चेहरा हीच माणसाची ओळख असते. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ या उक्तीनुसार मनुष्य जेव्हा आपल्या मनाच्या अंतरंगात डोकावून पाहतो, तेव्हा आपण आजच्या युगात कितीही आधुनिक झालेलो असतो, तरी त्याला आपल्या पूर्वजांचा मूळचा सांस्कृतिक चेहरा अगदी स्पष्ट दिसतो. वसईतील सामवेदी ब्राह्मण ख्रिस्ती समाज हा आपली सांस्कृतिक ओळख आजच्या युगातही समर्थपणे टिकवून आहे. ती कशी, हेच या पुस्तकातून मांडण्यात आले आहे. पद्मश्री रमेश पतंगे यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. पुस्तकाचे महत्त्व आणि आशय स्पष्ट होण्यासाठी प्रस्तावना येथे देत आहोत.
vivek
 
सेवा विवेकच्या भालिवली प्रकल्पावर गेलो असता, प्रकल्प प्रमुख प्रदीप गुप्ता यांचे मित्र नेल्सन रिबेलो त्यांना भेटण्यास आले होते. प्रदीप गुप्ता यांनी माझा परिचय त्यांना करून दिला. माझी नुकतीच प्रकाशित झालेली संविधानावरची पुस्तके तिथे होती. प्रदीप यांनी नेल्सन यांना ती पुस्तके दिली. नेल्सन हे व्यावसायिक आहेत आणि यशस्वी व्यावसायिक चौकस असतो. आपल्यासमोर एक लेखक बसलेला आहे, हे त्यांच्या लक्षात आले आणि मग आमच्या गप्पा सुरू झाल्या.
 
 
या गप्पांतून मला धक्का देणार्‍या अनेक गोष्टी समोर येत गेल्या. नावावरून नेल्सन रिबेलो हे ख्रिश्चन आहेत, हे समजले होते, पण ते माझ्यासारखेच अस्खलित मराठीत बोलत होते. ते वसईचे ख्रिश्चन आहेत. वसईतील हिंदू ख्रिश्चन कसे झाले, याचा इतिहास मी य.न. केळकर यांच्या ‘वसईची मोहीम’ या पुस्तकात वाचला होता. केळकरांनी या पुस्तकात पोर्तुगीज अत्याचाराच्या भरपूर कथा दिलेल्या आहेत आणि त्या अंगावर काटा आणणार्‍या आहेत, म्हणून वसईतील ख्रिश्चन आहेत याचा अर्थ पोर्तुगीजांकडून ख्रिश्चन केले गेलेल्या समुदायातील ही व्यक्ती आहे, हे न सांगता मला समजले.
 
दीपक जेवणे लिखित ‘चेहरा’ हे पुस्तक विवेक प्रकाशनतर्फे

9 जुलैला भैयाजी जोशी यांच्या हस्ते प्रकाशित होत आहे. नालासोपारा येथे सकाळी 9.30 वाजता धनंजय टॉकीज हॉल येथे या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

नोंदणीसाठी संपर्क
9594961858
 
 नेल्सन यांनी सांगितले की, ते ‘सामवेदी ब्राह्मण ख्रिश्चन’ आहेत. सामवेदी ब्राह्मण ख्रिश्चन हे शब्द मला बुचकळ्यात टाकणारे ठरले. एक तर तो सामवेदी ब्राह्मण असला पाहिजे किंवा ख्रिश्चन असला पाहिजे. ख्रिश्चन समुदायात सामवेदी, कोकणस्थ, देशस्थ, यजुर्वेदी असले प्रकार सिद्धान्तत: नाहीत, हे मला माहीत होते. नेल्सन यांनी ‘आम्ही सामवेदी ब्राह्मण ख्रिश्चन आहोत’ म्हणजे काय आहोत, याची अनेक उदाहरणे दिली. या पुस्तकात आपण त्याचा विस्तार वाचणार आहोत. तेव्हा मला असे वाटले की, या सामवेदी ब्राह्मण ख्रिश्चनांविषयीचे एक पुस्तक तयार झाले पाहिजे. मी नेल्सन आणि प्रदीप यांना तसे सुचविले आणि त्या दोघांनी त्याला होकार दिला.
 
 
 
ख्रिश्चन धर्म, येशू ख्रिस्ताचे चरित्र आणि बायबल यांचे माझे वाचन झालेले होते. ब्रिटन, फ्रान्स, रशिया, अमेरिका या देशांच्या संविधानांचा इतिहास लिहिताना त्या त्या देशाचा इतिहास बारकाईने वाचावा लागला आणि या प्रत्येक देशात ख्रिश्चन चर्चने प्रजेवर जे घोर अन्याय-अत्याचार केले, त्याच्या कथा तिथल्याच इतिहासकारांनी दिलेल्या आहेत. गोव्यातील ख्रिस्तीकरणावर ‘गोवा इन्क्विझिशन’ या शीर्षकाचे अनंत प्रियोळकर यांचे एक पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी पोर्तुगीजांनी गोव्यातील हिंदू, ज्यू आणि मुसलमान यांच्यावर ख्रिश्चन धर्म लादण्यासाठी किती भयानक अत्याचार केले, याच्या कथा आहेत. भारताच्या ईशान्येकडील राज्यांत परदेशी ख्रिश्चन मिशनरी आणि चर्च संघटना फुटीरतावादी चळवळी कशा चालवितात, याचेही ज्ञान मला होते. मध्य प्रदेशातील ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या कारवायांचा शोध घेण्यासाठी तेव्हाच्या शासनाने न्या. नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमले होते, त्या कमिशनचा अहवालदेखील वाचला होता. या सर्व पार्श्वभूमीवर वसईतील सामवेदी ब्राह्मण ख्रिश्चन समुदाय हा अगदीच वेगळा वाटायला लागला आणि हे त्याचे वेगळेपण पुस्तकरूपाने सर्व लोकांपुढे आले पाहिजे, असे वाटले.
 
 
विवेकचे लेखक दीपक जेवणे यांच्याकडे हे पुस्तक लिखाणाचे काम देण्यात आले. पुस्तक लिहीत असताना कोणत्या पथ्यांचे पालन करायचे आहे, हे त्यांना वेळोवेळी समजावून सांगितले. देशातील अनेक चर्चच्या कारवाया राष्ट्रीय एकात्मतेला पोषक नसतात ही जशी माझी धारणा आहे, तशी दीपकचीही आहे, म्हणून पूर्वग्रहदूषित मनोभाव ठेवून पुस्तक लिहून चालणार नाही, ते सत्याला धरून होणार नाही. सामवेदी ब्राह्मण ख्रिश्चन समाज कसा जगला, कसा जगतो आहे, येथल्या मातीशी त्याने आपले नाते कसे कायम ठेवले आहे, उपासनापद्धती बदलली म्हणून आपले बापजादे बदलत नाहीत हे त्यांनी कसे लक्षात ठेवले आहे, आपले कुळाचार, परंपरा यांचे कसे जतन केले आहे याचाच फक्त शोध घ्यावा, अशी एक मर्यादा ठरविण्यात आली. या समाजाची बोलीभाषा, बोलीभाषेतील गीते, लोककथा, पारंपरिक पोशाख, ख्रिस्ती सण साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धती या सर्वांचा प्रत्यक्ष जाऊन शोध घ्यावा, अनेकांशी चर्चा करावी आणि मग लेखन करावे, असे ठरले.
 

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.