फिरकी फडणवीसांची, भंबेरी पवारांची

विवेक मराठी    07-Jul-2023   
Total Views |

pawar
पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग फसल्यानंतर, शरद पवारांनी महाविकास आघाडी स्थापन करून सरकार स्थापन केले. पवारांच्या गुगलीत फडणवीस फसले अशा प्रकारे चित्र रंगविले गेले. पण फडणवीस यांच्यासारख्या चतुर राजकारण्याने तेव्हा शांत राहणे पसंत केले. पुढे एकनाथ शिंदेंच्या साथीने शिवसेना फोडली, आता अजित पवारांच्या साथीने राष्ट्रवादी फोडली. थोडक्यात म्हणजे काकांनी जी गुगली टाकली, ती त्यांच्यावरच उलटली आहे.. नव्हे, फडणवीस नावाच्या फलंदाजाने त्यांना ती गुगली टाकायला भाग पाडले होते. फडणवीसांनी टाकलेल्या फिरकीवर मात्र पवारांची भंबेरी उडाली आहे, एवढे नक्की.
 
अनेक दिवसांपासून अपेक्षा आणि आशंका असलेली, तीन वर्षांपूर्वी केवळ एक झलक दिसलेली घटना अखेर प्रत्यक्षात आली. राष्ट्रवादीचे खंदे नेते आणि अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत त्या पक्षाचे स्वाभाविक वारसदार वाटणारे नेते अजित पवार यांनी काकांचे घर सोडले. साडेतीन वर्षांपूर्वी ज्या अचानकपणे अजितदादांनी देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून शपथ घेतली, तीच धडक त्यांनी आताही दाखविली. रविवारच्या आळसावलेल्या दुपारी त्यांनी राजकीय वर्तुळाला खडबडून जागे केले. गेले काही महिने केवळ उखाळ्या-पाखाळ्या, शेरेबाजी आणि टोलेबाजी यांच्या विळख्यात सापडलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला त्यांनी पुन्हा कृतीचे रूप दिले.
 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये अजित पवार यांना धरून राष्ट्रवादीच्या 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणाने रंजक वळण घेतले आहे. एकीकडे अजितदादा आणि त्यांचे सहकारी शरद पवारांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत, तर शरदरावांनी आपल्या पुतण्याविरुद्ध लढाईसाठी बेटकुळ्या दाखवायला सुरुवात केली आहे. त्यात खरा जोम किती आणि उसने अवसान किती, हे राजकारणाची थोडीफार समज असलेल्यांनाही कळून चुकते. याला कारण अजितदादांनी राजभवनात जाऊन शपथ घेतली, त्यानंतर काही तासांच्या आत शरदरावांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी “पक्षाचे चिन्ह बदलण्याने काहीही फरक पडत नाही, आपण अनेकदा वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढविली आहे” असे सांगून आपला पक्ष व चिन्ह हातातून गेल्याचे जणू मान्यच केले. दुसरीकडे फडणवीस यांच्या चतुर मार्गदर्शनाखाली आणि एकनाथ शिंदे यांनी घालून दिलेल्या मार्गावरून अजितदादांनी वाटचाल सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगत निवडणूक आयोगाकडे त्यांनी मागितलेली दाद, हे त्याचेच निदर्शक होय.
 
  शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांचा तारू ज्या पद्धतीने फडणवीस यांनी पैलतिरावर लावला, त्यानंतर देवेंद्र असतील तर आपणही तरून जाऊ, हा विश्वास अजितदादांना मिळाला.
जन्मापासूनच मुस्लीमधार्जिणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या काही वर्षांत जातीयवादी वळण घेतले. त्याला जोड मिळाली ती घराणेवादी (घराणेशाही नव्हे) राजकारणाची! या सर्व घडामोडींत अजितदादा घुसमटत होते, हे सगळ्या जगाला माहीत होते. मात्र ज्याचे बोट धरून राजकारणात पावले टाकली, त्या काकांबद्दल असलेला आदर आणि स्वतंत्र राजकारण करण्याबद्दल असलेली शंका यामुळे ते मुका मार सहन करत होते. आज त्यांना धैर्य होण्याचे कारण म्हणजे फडणवीस यांनी देऊ केलेला आधार. शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांचा तारू ज्या पद्धतीने फडणवीस यांनी पैलतिरावर लावला, त्यानंतर देवेंद्र असतील तर आपणही तरून जाऊ, हा विश्वास अजितदादांना मिळाला. त्यानंतर जे घडले, ते नाट्य अगदी भल्या भल्या पटकथाकारांनाही जमणारे नाही.
 
 
सुरुवात झाली फडणवीसांनी रिपब्लिक या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीने. या मुलाखतीत देवेंद्रांनी एक तथाकथित गौप्यस्फोट केला. तथाकथित यासाठी, की देवेंद्रांनी अनेकदा ही वाच्यता केलीय, ती म्हणजे ऑक्टोबर 2019मध्ये अजितदादांनी घेतलेली शपथ ही काकांच्या माहितीने, त्यांच्या आदेशावरूनच घेतली होती. स्वत: शरद पवारांनी या गोष्टीबद्दल अनेकदा कानावर हात ठेवले आहेत. अगदी ’लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या दुसर्‍या भागातही त्याचे खंडन केले आहे. मात्र देवेंद्रांनी टाकलेल्या या जाळ्यात काका अलगद अडकले. ’आपल्या सांगण्यावरूनच ती घटना घडली होती, फडणवीस यांची सत्तालोलुपता दाखवून देण्यासाठीच मी ते पाऊल उचलले होते’ असे त्यांनी सांगून टाकले. स्वत: पवारांनी याला गुगली असे नाव दिले. त्यांच्या ताटाखालच्या मांजरांनीही तीच री ओढली आणि गुगली-गुगली असा घोष सुरू केला. त्यावर मग देवेंद्रांनी खरा मुद्दा उचलला, तो हा की गुगली तर तुम्ही माझ्यासाठी टाकली होती, पण त्यात बळी घेतला तो तुमच्या पुतण्याचा.
 
pawar
 
यावर काकांकडे उत्तर नव्हते, कारण गोष्ट खरी होती. जरा आठवा ते तीन अस्वस्थ दिवस.. ऐंशी तासांचे सरकार! एकीकडे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादांशी हातमिळवणी केल्याबद्दल देवेंद्रांना चोहोकडून टीका व नाराजी सहन करावी लागत होती, तर भाजपासोबत गेले म्हणून अजितदादा सेक्युलरांच्या दृष्टीने खलनायक ठरले होते. देवेंद्रांनी आपल्या पुढच्या पावलांनी ती टीका अनाठायी असल्याचे दाखवून दिले, समर्थकांचा विश्वास पुन्हा जिंकला आणि नाराजीही दूर केली. मात्र अजितदादा जे दूर सारले गेले ते गेलेच. ते सरकार गेल्यानंतर ते यथावकाश राष्ट्रवादीत परतले, महाराष्ट्र विकास आघाडी नावाच्या विनोदी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. परंतु सेक्युलरांनी त्यांना मनाने कधी स्वीकारले नाही. आता पुढे आलेल्या माहितीनुसार, तो शपथविधी काकांच्या सांगण्यावरूनच झाला, परंतु नंतर अजितदादांना हतप्रभ करण्यासाठी, अपयशी करण्यासाठी तेच जंग जंग पछाडत होते. एक प्रकारे दोन्ही बाजूंनी बुद्धिबळ तेच खेळत होते. शेवटी अजितदादांना मानभंग सहन करून पक्षात परतावे लागले. मात्र कृष्णाकाठी पूर्वीचे कुंडल उरले नव्हते. असे म्हणतात की कावळ्यांमध्ये किंवा चिमण्यांमध्ये एखाद्या पक्ष्याला माणसाने स्पर्श केला, तर पुन्हा अन्य पक्ष्यांमध्ये गेल्यावर त्याला सर्व पक्षी मिळून चोचीने टोचून टोचून मारतात. अजितदादांची गत तशीच झाली होती. ते सरकारमध्ये होते, मात्र मनामध्ये नव्हते.
 
अजित पवार आणि त्यांचे सहकारी सत्तेत सहभागी घेताना ते वाटाघाटी एकनाथ शिंदे यांच्याशी करत नव्हते, तर देवेंद्र फडणवीस यांच्याशी करत होते.
त्या सर्व घडामोडींची आता काकांनी मखलाशी करत का होईना, दिलेली कबुली हा कडेलोटाचा क्षण ठरला. तेव्हा त्यांनी ठरविले, की झाले ते पुरे झाले आणि जी हातातोंडाशी आलेली संधी साडेतीन वर्षांपूर्वी हिरावली गेली, ती पुन्हा साधण्याचा निर्णय घेतला. या सर्व घडामोडींत दोन गोष्टी अतिशय सूचक आणि मनोरंजक होत्या. पहिली गोष्ट म्हणजे अजित पवार आणि त्यांचे सहकारी सत्तेत सहभागी घेताना ते वाटाघाटी एकनाथ शिंदे यांच्याशी करत नव्हते, तर देवेंद्र फडणवीस यांच्याशी करत होते. त्यामुळे शिंदे हे सरकारचे प्रमुख असले तरी सूत्रधार कोण, हे स्पष्ट झाले. अर्थात मुख्यमंत्री असल्यामुळे या आमदारांना खातेवाटप कुठे करायचे, हे एकनाथ शिंदे यांनाच ठरवायचे आहे.

pawar
 
दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवार यांची संपुष्टात आलेली विश्वासार्हता. भाजपा हा जातीयवादी पक्ष असल्याचा कांगावा करत शरद पवार गेली अनेक वर्षे राजकारण करत आहेत. त्याच जोरावर कधी ममता बॅनर्जी, तर कधी नितीश कुमार यांच्याशी सलगी करत आहेत. मात्र याच काळात ते भाजपाशीही सौदेबाजी करत होते आणि अगदी सत्तेत सामील होण्यापर्यंत आले होते, हे आता अजितदादांनीच उघड केले आहे.
 
त्यामुळे 2024मध्ये केंद्रात नरेंद्र मोदींना हटवायचे असेल तर विरोधकांची एकी झाली पाहिजे, असे सांगत त्यांनी सुरू केलेली धडपडही दुटप्पी असल्याचे स्वच्छ झाले आहे. आता विरोधक त्यांना आपल्यात घेतील का? हा प्रश्नच आहे. तसेही विश्वासार्हता हा पवारांचा नेहमीचाच कच्चा दुवा राहिला आहे. आतापर्यंत ज्येष्ठत्वाच्या नात्याने त्यांच्या या कमकुवत बाजूकडे फारसे कठोरपणे पाहिले जात नव्हते. मात्र आता 2024च्या तोंडावर, भाजपाविरोधी पक्षांसाठी लढाई जीवनमरणाची झाली असताना, त्यांच्या या उणिवेकडे दुर्लक्ष करणे त्यांच्या होतकरू सहकार्‍यांना परवडणारे नाही.

pawar 
 
हेच कारण आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि मविआच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिलेले असताना शरद पवारांची विश्वासार्हता पणाला लागली आहे, असे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. पक्ष सोडून कठोर कारवाई करणे हाच सहकार्‍यांचा विश्वास जिंकण्याचा एकमेव मार्ग आज पवारांसमोर उरला आहे. तसे केले, तर अजित पवार आणखी चवताळतील आणि अंधारातील आणखी अनेक रहस्ये बाहेर येतील, हीसुद्धा भीती त्यांना भेडसावत राहणार. त्यामुळेच काका आणि सुप्रिया सुळे यांनी अजितदादांबद्दल नरमाईचे धोरण घेतले आहे.
 
 
अर्थात त्यामुळे काँग्रेस नेते हैराण झाले आहेत. या संपूर्ण राजसंग्रामावर काँग्रेस नेते मौन बाळगून आहेत, त्याचे कारणही तेच आहे. यातील विसंगती ही की तीन कार्यकाळ राष्ट्रवादी काँग्रेससह सत्तासोबत करणार्‍या काँग्रेसला आपल्या सहकार्‍याबद्दल विश्वास वाटत नाही, मात्र 1966पासून 2019पर्यंत काँग्रेसला हाड-हाड करणार्‍या शिवसेनेचा वारसा सांगणार्‍या उद्धव ठाकरेंबाबत तिला जास्त विश्वास आहे! अजितदादांच्या धाडसानंतर सुप्रिया सुळे यांनी रात्री 12 वाजता बोलाविलेल्या पत्रकार परिषदेतही त्यांना हाच प्रश्न विचारण्यात आला होता, आणि आमची विश्वासार्हता आणखी वाढेल, असे बळेच उत्तर सुप्रियांना द्यावे लागले. अगदी राज ठाकरे यांनीही पहिली शंका उपस्थित केली ती शरद पवार यांच्यावरच. (त्यांचे तोंड दुधाने पोळलेले आहे, ते आता ताकही फुंकून पितील!)
 
आपण सर्व पातळ्यांवर पराभूत झालो आहोत, हे पवारांनाही कळून चुकले आहे. म्हणूनच पहिल्याच दिवशी ‘’आम्ही न्यायालयात न जाता लोकांमध्ये जाऊ” अशी भाषा त्यांना करावी लागली. लोकांना दाखवायला अजित पवार आणि इतर आठ जणांना अपात्र ठरविण्यासाठी याचिका दाखल करायचे सूतोवाच पवार गटाने केले आहे. मात्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अगोदरच शिवसेनेच्या आमदारांची याचिका आहे, हे लक्षात घेतले तर तिचा निर्णय काय लागेल, हे सांगणे न लगे. अशी ही कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असली, तरी त्यातून काही निष्पन्न होण्याची शक्यता नाही. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली, तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि ते महाविकास आघाडीचे नेते होते. मात्र त्यांना काहीही करता आले नाही. शरद पवार गटाची तर तेवढीही स्थिती नाही. थोडक्यात म्हणजे काकांनी जी गुगली टाकली, ती त्यांच्यावरच उलटली आहे.. नव्हे, फडणवीस नावाच्या फलंदाजाने त्यांना ती गुगली टाकायला भाग पाडले होते. फडणवीसांनी टाकलेल्या फिरकीवर मात्र पवारांची भंबेरी उडाली आहे, एवढे नक्की.

देविदास देशपांडे

पत्रकार आणि राजकीय विश्लेषक