मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सव झुंजार लाडसावंगी

विवेक मराठी    08-Jul-2023
Total Views |
vivek
ले.क. (नि.) विनायक अभ्यंकर
। 9766049071
मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर, लाडसावंगी या तत्कालीन औरंगाबाद जहागिरीतील छोट्या खेड्याने दिलेल्या धाडसी लढ्याच्या स्मृती जागवणारा हा लेख...
अनेक - म्हणजे 565 छोट्या-मोठ्या संस्थानांमध्ये विभागलेल्या भारताची फाळणी करून ब्रिटिश निघून गेले.. संस्थानिकांना अभय देऊन की तुम्ही तुमचा निर्णय घेण्यास मुखत्यार आहात. तीन संस्थानांनी ही संधी साधून स्वतंत्र राहण्याचा अडेलतट्टू निर्णय घेऊन नवनिर्मित भारत सरकारसमोर आव्हान उभे केले. काश्मीरच्या हरिसिंह डोग्रा ह्या राजाने विलीनीकरणास नाहक विलंब लावल्याने आजही काश्मीरचा काही भाग ‘आझाद काश्मीर’ म्हणूून पाकिस्तानने बळकावून कब्जात ठेवला आहे. जुनागडच्या नबाबाने आपला टिकाव लागत नाही हे ओळखून पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला. तेथील दिवाण शहाबुद्दीन भुट्टोने (झुल्फिकार अली भुट्टोंचे वडील) जुनागड संस्थान भारतात विलीन करून तोही कराचीला पळून गेला. ही दोन संस्थाने उत्तर, पश्चिम सीमाप्रांतात होती. तिसरे संस्थान भारताच्या मध्य भागात - म्हणजे तत्कालीन मुंबई, म्हैसूर व मद्रास या इलाख्यांना खेटून होते. ह्या तिन्ही प्रांतांत मुस्लीम बांधवांची लोकसंख्या लक्षणीय होती. त्यातील ह्या संस्थानाने - निजाम स्टेटने - विलीन होण्यास नकार दिला. परिणामी मराठवाड्यातील रयतेला स्वातंत्र्योत्तर स्वराज्यासाठी रणसंग्राम करावा लागला. हेच हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे यथार्थ वर्णन. एका वर्षात दुसरा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे भाग्य मराठवाड्यामधील जनतेला लाभले, मगच खर्‍या अर्थाने आंध्र, कर्नाटक व मराठवाडा हा सीमेलगतचा सर्व मुलूख हिंदुस्तानात विलीन झाला. असा इतिहास असणारा हिंदुस्तान हा एकमेव देश असावा. आपल्या भूमीवर हल्ला करून जनतेला हालअपेष्टांमधून सोडवण्यासाठी सैन्याला मोहीम आखावी लागली आणि नंतर नागरिकांनी मोकळा श्वास घेतला, तो दिवस होता 17 सप्टेंबर 1948.
 हिंदुमहासभेच्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिलेदारांनी ‘भागानगरचा सत्याग्रह’ करून सैन्याला सर्वतोपरी साहाय्य केले
 प्रथम गोर्‍या कातडीशी आणि नंतर धर्मांध माकडांशी असा दुहेरी लढा मराठवाड्यातल्या जनतेने बंड करून मोडून काढला. म्हणूनच हे स्पष्ट करावेसे वाटते की हैदराबाद मुक्तिसंग्राम कुणा एका पक्षाची मिरासदारी नव्हती, तर समस्त हिंदू प्रजाजनांनी उत्स्फूर्तपणे केलेला तो उठाव होता, ज्याला 1857च्या स्वातंत्र्यसंग्रामाचा भक्कम पाया होता. पोलादी नेतृत्व सरदार पटेलांनी त्यात लक्ष घालून, ‘अ‍ॅक्शन’ घेऊन निजामाला वठणीवर आणले. हिंदुमहासभेच्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिलेदारांनी ‘भागानगरचा सत्याग्रह’ करून सैन्याला सर्वतोपरी साहाय्य केले, अन्यथा जर तुष्टीकरण करणार्‍या फाजील स्वप्नाळू अहिंसक नेत्याने त्यात हस्तक्षेप केला असता, तर हैदराबादचेही काश्मीर होऊन देशाच्या मध्यभागी धर्मसंकट उभे झाले असते.
 
 
हैदराबाद मुक्तिसंग्रामात संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी रयतेने जे बंड करून स्वातंत्र्य मिळवले, त्याला तोड नाही. अत्यंत विषम प्रतिकूल परिस्थितीमध्ये खेड्यापाड्यातील अडाणी व अशिक्षित जनतेने दिलेल्या लढ्याने हे सिद्ध झाले की स्वातंत्र्याच्या जाज्वल्य ऊर्मीने माणूस पेटून उठला, तर हिमालयालासुद्धा नेस्तनाबूत करू शकतो. हिंदुस्तानाचे विभाजन होताच निजामाच्या अघोषित रझाकारी सैन्याने आझाद हैदराबादची वल्गना करून ‘असुनी खास मालक घरचा’ अशा हिंदू प्रजाजनांस छळण्यास प्रारंभ केला. स्वतंत्र हिंदुस्तानचा प्यारा तिरंगा न स्वीकारता त्याची अवहेलना करताच जनता पेटून उठली आणि मराठवाड्यात 2 सप्टेंबर 1947 हा ‘राष्ट्रध्वज दिन’ पाळण्यात येऊन हिंदू समाजाने रझाकारांचे - रझाकार कसले, तत्कालीन अतिरेकीच - आव्हान स्वीकारून त्याचा बिमोड केला. ह्या रणसंग्रामात तत्कालीन ‘औरंगाबाद सुभा’ अग्रेसर होता. ‘हैदराबादसुद्धा पाकिस्तानला मिळाले पाहिजे’ ही महंमद अली जीनांची मागणी होती.
लाडसावंगी हे तत्कालीन औरंगाबाद जहागिरीमधील एक टुमदार, छोटेखानी, मुळात शांत वृत्तीचे खेडेगाव. या ‘कस्ब्यातील’ लोकांनी 4 ऑगस्ट 1947 ह्या दिनी एक सभा घेऊन हिंदुस्तानाबरोबरच आपणही स्वतंत्र होणार म्हणून निजामविरोधी चळवळ गतिमान करण्याचा ठराव ग्रामसभेत संमत केला. तेथील पोलीस, तहसीलदार व मुसलमान यांना ही गोष्ट सहन न होऊन त्यांनी ‘चोराच्या उलट्या बोंबा ’ ह्या न्यायाने ‘मुस्लिमांचे जीवित धोक्यात आहे, अशी बोंब मारून बदनापूरच्या इन्स्पेक्टरला निरोप पाठवला. त्याप्रमाणे 8 ऑगस्ट 1947ला इन्स्पेक्टर 32 शस्त्रसज्ज पोलीस फौजफाट्यासकट सकाळी 9 वाजता लाडसावंगीत दाखल झाला. त्यांनी संपूर्ण गावाला वेढा दिला. ह्या शस्त्रसज्ज टोळीमध्ये फक्त 5 पोलीस खरे पगारी पोलीस होते, बाकी सर्व खाकी वर्दीमधील भाडोत्री रझाकार पठाण व नॅशनल मुस्लीम गार्डचे अतिरेकी होते.
पोलीस इन्स्पेक्टर इस्माइल खानने गावातील पोलीस पाटील, माली पाटील, डॉक्टर व एक प्रतिष्ठित व्यक्ती यांना चौकीवर बोलावून घेतले. हे सर्व चौकीवर हजर होताच इन्स्पेक्टरने माली पाटलाला यथेच्छ बडवून पायर्‍यांवर ढकलून खाली पाडले, त्यांचे दात पडले. इतर सर्वांनाही बेदम मारहाण करून अटक करून चौकीवर अन्नपाण्याशिवाय डांबून ठेवले. त्यानंतर खर्‍या पगारी 5 पोलिसांना सैदापूर कस्ब्यात पाठवून तेथील प्रसिद्ध हिंदू कार्यकर्ते मा. शेषराव पाटील यांना चौकीवर आणण्यास पाठवले. शेषरावांना चौकीवर आणताना वाटेत मारण्यास सुरुवात करताच शेषरावांनी एका शिपायाची बंदूक हिसकावून घेताच इतर शिपायांनी झोडण्यास सुरुवात करून इस्माइलला ह्याचा ’इत्तला’ करताच त्याने शेषराव ह्या स्वयंसेवकांस काळे-निळे होईपर्यंत झोडपले.
 
सैदापूरमध्ये ही खबर वणव्यासारखी धडकताच सैदापूरची क्रुद्ध जनता मिळेल ते शस्त्र हातात घेऊन लाडसावंगीच्या चौकीवर धावून आली, तेव्हा इन्स्पेक्टरने शेषरावांना बॉनेटच्या (संगिनीच्या) टोकावर उभे करून जमावास हातातील शस्त्रे फेकून देण्यास सांगितले. शेषरावांना जबरी करताच जमावाने शस्त्रे फेकून दिली, तेव्हा 105 जणांना पकडून मारझोड करून अटक करण्यात आली. अन्नपाण्याशिवाय त्यांचा अनन्वित छळ सुरू झाला.
 
जवळील परिसरात, कसब्यात या घटनेचे पडसाद उमटून पोलिसांच्या क्रूर, दर्दनाक कृत्याची खबरबात ऐकून 500 हिंदू जणांचा समूह लाडसावंगीच्या ठाण्यावर चालून आला. चौकीवर काय चालले आहे ह्याचा अंदाज घेण्यासाठी एक ‘स्वयंसेवक’ सरसावताच त्यास मकबूल हसन ह्या रझाकाराने तलवारीने कापून काढले व ताम्रपटाची अपेक्षा न ठेवणारा तो अज्ञात स्वातंत्र्यसैनिक धारातीर्थी पडला. स्वयंसेवकच तो!
 
500 खेडुतांचा हा स्वातंत्र्यप्रेमी जमाव चालून येताच, परिस्थिती आटोक्याबाहेर जात आहे हे पाहून इन्स्पेक्टरने पोलिसांना अंदाधुंद गोळीबार, ओपन फायरचा आदेश दिला की, अटकेमध्ये गोळी घालण्यात येईल. तेव्हा प्रसंगाचे गांभीर्य ध्यानात घेऊन समूहाची पांगापांग झाली, पण सूडाची भावना मात्र पेटलेली होती. 9 ऑगस्ट रोजी पठाणी रझाकारांची ताजी कुमक येऊन असाहाय्य जनतेची लुबाडणूक करताच, स्वातंत्र्यप्रेमी तालुकदार व ‘मोहनमीम’ पोलीस गफ्फूर मोहसीनने अटकेतल्या सर्व जमावाला सोडण्याचे फर्मान सोडताच अजेय खेडूत जनतेने चौकीवर तिरंगा चढवून निजामी परचम उतरवला आणि लाडसावंगीने स्वातंत्र्य घोषित केले.
 
लेखक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत.