रयतेचा राजा

विवेक मराठी    08-Jul-2023   
Total Views |
@रविराज पराडकर
 
देश-विदेशातील अनेक विद्वान इतिहास संशोधकांनी आपापल्या परीने उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांनी शिवचरित्राचे लेखन केले. काळाच्या ओघात हरवलेली शिवचरित्राशी संबंधित समकालीन कागदपत्रे शोधणे मोठे जिकिरीचे काम होते. अनेक संशोधकांनी हे आव्हान पेलून अनेक कागदपत्रे उजेडात आणली. ह्या कागदपत्रांतून शिवछत्रपतींच्या विचारांचे, स्वभावगुणांचे, नीतिमत्तेचे दर्शन घडणारे ते आहेत...
  

shivaji maharaj
प्रस्तावना

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक पर्वानिमित्त शिवशाहीचा वेध घेणारी ‘शिवकल्याण राजा’ ही लेखमाला सुरू करीत आहोत. शिवरायांचे चरित्र हे भारताच्या इतिहासातील एक अद्वितीय पर्व आहे. निसर्गत: मानवाकडे असलेल्या सद्गुणांचा व शक्तिबुद्धीचा वापर लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी किती सुयोग्य पद्धतीने केला जाऊ शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिवचरित्र. सतराव्या शतकातील परकीय जुलमी, धर्मांध सत्तेविरुद्ध लढा देत शिवरायांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी न्यायाचे व नीतिमत्तेचे हिंदवी स्वराज्य ज्या निष्ठेने जन्माला घातले, हिंदू संस्कृतीचे रक्षण करून तिची पुन:प्रतिष्ठापना केली, ती भारतीय इतिहासाच्या मध्ययुगीन कालखंडात घडलेली अत्यंत महत्त्वाची घटना आहे. साहस, पराक्रम, शौर्य, धैर्य, औदार्य, सहिष्णुता आणि सदयता अशा असंख्य गुणांबरोबरच निष्कलंक चारित्र्याचा राजा म्हणून शिवछत्रपतींचे नाव नि:संशय घेतले जाते. शिवचरित्राचे मर्म जाणण्यासाठी आपण ह्या लेखमालेचे चार भाग करीत आहोत. पत्ररूप शिवराय, शिवरायांची युद्धनीती, परकीयांच्या दृष्टीतून शिवाजी आणि शिवशाहीचे अंतरंग ह्या चार भागांद्वारे शिवचरित्राचा गाभा सर्वांना प्रेरणादायक ठरेल, हा विश्वास आहे.
 
‘स्वामी राज्यासनारूढ जाहले आसतां सर्वांची समाधानें केली’
 
: रामचंद्रपंत अमात्य, आज्ञापत्र
 
शिवछत्रपतींच्या महान गुणांचा आदर्श पुढील पिढ्यांसमोर राहावा, म्हणून देश-विदेशातील अनेक विद्वान इतिहास संशोधकांनी आपापल्या परीने उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांनी शिवचरित्राचे लेखन केले. काळाच्या ओघात हरवलेली शिवचरित्राशी संबंधित समकालीन कागदपत्रे शोधणे हे मोठे जिकिरीचे काम. परंतु जदुनाथ सरकार, राजवाडे, सरदेसाई, भावे, बेंद्रे, खरे अशा अनेक संशोधकांनी हे आव्हान पेलून अनेक कागदपत्रे उजेडात आणली. ह्या कागदपत्रांतून शिवछत्रपतींच्या विचारांचे, स्वभावगुणांचे, नीतिमत्तेचे घडणारे दर्शन समजून घेतले, तर आदर्श समाजजीवनासाठी - किंबहुना राष्ट्रनिर्मितीसाठी काय करता येईल, याचे सुयोग्य मार्गदर्शन प्राप्त होते. शिवाजी महाराजांच्या आजमितीस सापडलेल्या, प्रकाशित झालेल्या अशा काही महत्त्वपूर्ण पत्रांचा बोध करून घ्यायला हवा.
 
रयतेचे संरक्षण, प्रजेचे कल्याण हाच शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यनिर्मितीमागील महत्त्वाचा हेतू होता, हे अनेक पत्रांतून दिसून येतं.
 
 
शिवरायांची अष्टकोनी राजमुद्रा असलेले दिनांक 28 जानेवारी 1646चे पत्र हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचे दिग्दर्शन करते. खेडेबारातील रांझे गावच्या बाबाजी भिकाजी गुजर या पाटलाने गावातील स्त्रीशी बदअंमल केला, म्हणून महाराजांनी त्याचे दोन्ही हात आणि पाय तोडण्याचे कठोर शासन केले. पाटलाचा चौरंगा केल्यानंतर त्याची जबाबदारी पेलवता यावी, म्हणून त्याचा नातेवाईक सोनजी बजाजी गुजर याला 200 होन शेरणी देऊन पाटीलकी दिली. ह्या पत्रात एका बाजूस स्त्रियांवरील अत्याचार कोणत्याही प्रकारे सहन केला जाणार नाही हे अधोरेखित होते, तर दुसरीकडे पांगळा पाटील व त्याचे कुटुंबीय यांचा उदरनिर्वाह चालावा, म्हणून त्याच्या भावंडास पाटीलकी देण्याचे औदार्य महाराज दाखवतात.
 

shivaji maharaj 
 
’रयतेचे गोमटे केले पाहिजे’ ही त्यांची कळकळ होती. शाहिस्तेखानाच्या स्वारीप्रसंगी रयतेला मोगली अत्याचाराचा त्रास होऊ नये, म्हणून दि. 23 ऑक्टोबर 1662ला रोहिडखोर्‍यातील देशमुख सर्जेराव जेधे ह्यांना लिहिलेल्या पत्रात महाराज लिहितात की, ‘मोगल प्रस्तुत तुमच्या तप्यात धावणीस येतात म्हणून जासुदांनी समाचार आणिला आहे. तरी तुम्ही रोखा मिळताच तमाम रयतेस घाटाखाले बाका जागा असेल तेथे पाठवणे, गनिमाचा उपद्रव होणार नाही अशा जागी पाठवणे. या कामी तुम्हापासून अंतर पडल्यास मोगल जे बंद धरून नेतील त्याचे पाप तुमच्या माथा बैसेल ऐसे समजोन गावच्या गाव हिंडोन, रात्रीचा दिवस करून लोकांची माणसे घाटाखाली पाठवणे.’ राज्यनिर्मितीसाठी शत्रूबरोबर लढणे क्रमप्राप्त आहे, पण त्या लढायांत प्रजेला सुरक्षित ठेवले पाहिजे हेच महाराजांचे उद्दिष्ट होते. त्यासाठी मोक्याची दुर्गम ठिकाणे शोधून त्यांनी किल्ले बांधले, जेणेकरून संकटकाळी रयतेला घाटांवर, किल्ल्यांवर नेऊन सुरक्षित ठेवता येईल. गनिमांनी घरे शेते जाळली तर ती पुन्हा साकारता येतील, पण रयतेचा एकही माणूस गेला तर पुन्हा मिळवता येणार नाही, किंबहुना ते पाप घडेल ही भावना महाराजांनी आपल्या अधिकार्‍यांमध्ये घडवली.
 
 
प्रजेला मोगलांचा त्रास होऊ नये ह्यासाठी महाराज किती सावधानता बाळगत, ह्याविषयी दि. 17 जुलै 1653चे आणखी एक पत्र आढळते. रया, चिंचवडच्या मोकादमाला लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणतात, ‘... एक भला जबाबदार माणूस मध्यस्थ घालून मोगलांचा जराही उपद्रव लागणार नाही अशी व्यवस्था करून मग सुखाने गावावर रहा. जर मोगलांचा पूर्ण कौल नसेल आणि मोगल गावाला उपद्रव देतील, माणसे कैद करून नेतील, तर गावावर राहाण्यास आमचा कौल नाही.’ मोगली सैन्याच्या येण्याजाण्यात रयतेची वाताहत होता कामा नये, या बाबतीत महाराज अतिदक्ष होते. शत्रूबरोबर होणार्‍या लढाया त्याच्याच मुलखात व्हाव्यात, आपल्या मुलखाची नासाडी नको, रयतेस तोशीस नको ह्याकडेच त्यांचा सर्वाधिक कटाक्ष होता.
 
 
मातीवर आणि मातीतील माणसांवर त्यांचे किती प्रेम होते व त्यांच्या सार्थ अभिमानासह त्यांच्या संरक्षणाबाबत ते किती जागरूक होते, ह्याची कितीतरी उदाहरणे पत्रातून मिळतात. मातृभूमीचे रक्षण हे माझे परमकर्तव्य आहे हे ठणकावून सांगताना त्यांनी औरंगजेबाच्या अधिकार्‍यांचा खोटेपणा उघडा पाडला आहे. इ.स. 1663मध्ये महाराजांचा फारसनवीस (फार्सी लेखनिक) नील प्रभू ह्याने फार्सीत महाराजांचे पत्र मोगली अधिकार्‍यांची कानउघडणी करते - ‘गेली तीन वर्षे बादशहाचे प्रसिद्ध सेनापती माझा मुलूख आणि किल्ले घेण्यासाठी येताहेत. माझा देश दुर्गम पर्वतरांगांनी, नद्यानाल्यांनी, ज्यात कल्पनेचा घोडाही नाचवता येणार नाही असा कठीण असताना तो जिंकण्याच्या वल्गना बादशाही सेनापती करतात. अशा खोट्या गोष्टी बादशहाला लिहिताना त्यांना लाज वाटत नाही. अफजलखान वध, शाहिस्तेखानाची फजिती माहीत असताना स्वत:ची प्रतिष्ठा राखण्यासाठी खोटे बोलता. मातृभूमीचे रक्षण माझे कर्तव्य आहे, परमेश्वरकृपेने इथे आक्रमण करणार्‍या कुणाचीही इच्छा फळास येणार नाही.’ देशप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि आत्मविश्वासाने भरलेले हे पत्र महाराजांचे व्यक्तित्व सहज उलगडून सांगते.
 

shivaji maharaj 
 
9 मे 1674ला चिपळूणच्या सेनाधिकार्‍यांना लिहिलेले महाराजांचे प्रसिद्ध पत्र म्हणजे तर प्रजारक्षणाचा, कल्याणकारी शासनाचा आणि स्वयंशिस्तीचा आदर्श वस्तुपाठच आहे - ‘.. तुम्ही मनास ऐसा दाणा, रतीब, गवत मागाल. असेल तोवर धुंदी करून चाराल, नाहिसे जाले म्हणजे मग पडत्या पावसात मिळणार नाही, उपास पडतील, घोडी मरावयास लागतील व विलातीस तसवीस देऊ लागाल. म्हणजे मोगल मुलकात आले त्याहून अधिक तुम्ही ऐसा तळतळाट होईल. रयतेस काडीचा आजार द्यावया गरज नाही. गवत, फाटे, भाजीपाले विकावयास येईल ते रास विकत आणावे, कोण्हावरी जुलुम करावयाची गरज नाही. कोण्ही आगट्या करतील, भलतेच जागा चुली करतील, कोण्ही तंबाकूला आगी घेतील. अविस्राच एखादा दगा होईल. एका खणास आगी लागली म्हणजे सारे खण जळोन जातील. मग काही कुणबियांच्या गर्दना मारल्या तर्‍ही काही खण कराया एक लाकूड मिळणार नाही. खासे खासे हमेशा फिरत जाऊन इंधने करिता, आगट्या जाळिता अगर रात्रीस दिवा घरात असेल, अविस्राच उंदीर वात नेईल ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. जितके खासे खासे आहा तितके हा रोखा तपशिले ऐकणे आणि हुशार राहणे.’ सैन्यासाठी आवश्यक घोड्यांच्या पागांची निगा राखली पाहिजे. छावणीकरिता सरकारातून दिलेले धान्यवैरण, लाकूड काटकसरीने वापरले पाहिजे. राजाची माणसे म्हणून लोकांना धाकदपटशा दाखवणे, लुबाडणे हे खपवून घेतले जाणार नाही. लोकांचे व राज्याचे नुकसान होऊ नये ह्यासाठी सेनाधिकार्‍यांनी सदैव जागरूक राहिले पाहिजे. शेतकर्‍यांनी कष्ट करून पिकवलेल्या धान्यास, भाजीपाल्यास हातही लावता कामा नये. आवश्यक ते सर्व काही बाजारातून विकत घ्यावे. आगीपासून लोकांच्या घरांचे, मालमत्तेचे, पिकांचे, पागांचे रक्षण करण्यासाठी काळजी बाळगलीच पाहिजे. आगीपासून जिवाच्या आणि मालमत्तेच्या संरक्षणाबाबत त्याही कालखंडात शिवाजी महाराज किती खोलवर विचार करतात, ते खरेच लक्षणीय आहे. मोगलाईच्या अन्यायाविरुद्ध आपण राज्य निर्माण केले, आपणही तसेच वागू लागलो तर स्वराज्यनिर्मितीचा हेतूच नष्ट होईल, हेच इथे महाराज निक्षून सांगतात.
 
 
 
22 जून 1676ला पवन मावळच्या देशमुख आणि कारकुनांना लिहिलेल्या पत्रात चिंचवड देवस्थानाला रयतेकडून दिल्या जाणार्‍या बटाईचा उल्लेख सापडतो - ‘श्री चिंचवड याकरिता तुम्ही रयत निसबतीने तांदूळ वगैरे खरेदी देत आला. आता रयतीस बटाई खेरीज सादिलवारी पटी वगैरे काही नाही. शिवाय महागाईपण झाली आहे. म्हणून रयतीपासून खरेदी घेत न जाणे. राजभागापैकी ठरावीक दराने द्यावे.’ रयतेला महागाईची झळ लागत असता बटाई (स्थानिक व्यवस्थेसाठी रयतेने भरायचा करभाग) आणि सादिलवारी कर माफ करीत चिंचवड देवस्थानातील पूजा, उत्सव, अन्नछत्रादी धर्मकार्ये राजभागातून केली जावी, जनसामान्यांवर त्याचा भार नको हा महाराजांचा आदेश आहे. राज्यासाठी लोकांकडून कर आवश्यकच, परंतु महागाईचा मार पाहता परिस्थितीनुसार तो आकारला जावा, प्रसंगी देवधर्मकार्यासाठीसुद्धा तो प्रजेला जाचक नसावा, हा वस्तुपाठ शिवरायांनी घालून दिला.
 
 
प्रभावळीच्या रामाजी अनंत या सुभेदाराला दिनांक 5 सप्टेंबर 1676ला लिहिलेले पत्र म्हणजे तर राजसत्तेने पोटच्या पोराप्रमाणे प्रजेची काळजी कशी घेतली पाहिजे, ह्याचा सर्वोच्च मापदंड आहे. महाराज रामाजीला लिहितात, ‘इनामे इतबारे साहेब काम करावे याची तू क्रियाच केली आहेस तेणेप्रमाणे येका भाजीच्या देठास मन न दाखवता रास व दुरुस वर्तणे. मुलुकात बटाईचा तह चालला आहे. रयतेचा वाटा रयतीस पावे आणि राजभाग आपणास येईल ते करणे. रयतीवर काडीचे जाल व गैर केलीया साहेब तुजवर राजी नाहीत यैसे बरे समजणे. येन जिनसच उसूल घेऊन वेळचे वेळेस विकीत जाणे की माहाग विकेल आणि फायदा होये ते करीत जाणे रयतीस तवाना करावे आणि कीर्द करवावी. कुलंबी गोला करावे. ज्याला शेत करावयास कुवत आहे आणि त्याला जोतास बैल, नांगर, पोटात दाणे नाही त्याला रोख पैके हाती देऊन बैल घेवावे व पोटास दाणे द्यावे. जे सेत त्याच्याने करवेल तितके करवावे. नंतर त्यापासून पैके वाढीदिढी न करिता मुद्दलच तवानगी माफिक हळूहळू घ्यावे. या कलमास जरी दोन लाख लारीपावेतो खर्च करिसील आणि पडजमीन लावून दस्त जाजती करून देतील तरी साहेबा कबूल असतील.’ जो कष्ट करायची उमेद धरतो, पण मागील बाकी ज्याच्याने देववत नाही, मोडून निकामी झाला आहे त्याला बाकी माफ करावी. प्रजेच्या भाजीच्या देठाचाही मोह पडता नये, रयतेला रोखीने कर देता येत नसेल तर धान्याच्या, जिन्नसाच्या रूपात घ्यावा. तेच धान्य योग्य वेळी अधिक किमतीने विकून राज्याचा फायदा करावा. अधिकाधिक जमीन लागवडीखाली आणून शेतकर्‍यांना उत्तेजन द्यावे. ज्याच्याकडे कष्ट करण्याची इच्छा आहे, त्याला बैल, नांगर, बियाणे इ. कर्जाने द्यावीत. लोकांनी उमेद धरली पाहिजे, त्यासाठी दोन लाख खर्च झाले तरी चालेल. शेतकर्‍याने तग धरेपर्यंत पहिली काही वर्षे काहीही न घेता नंतर हळूहळू कर्जाचे मुद्दल फेडून घ्यावे, व्याज माफ केले तरी चालेल. बुडीत गेलेल्यास पुन्हा उभे केले पाहिजे. काहीही देण्याची ज्याची ऐपत नाही पण पुन्हा कष्ट करण्यास जो तयार आहे, त्याचे कर्जही माफ करावे.
 
 
प्रजेकडून कोणत्याही प्रकारे, वाट्टेल तसा कर गोळा करून राज्याचा खजिना भरणे हे स्वार्थी कृत्य राज्यकर्त्याकडून कधीही होता कामा नये. याउलट लोकांच्या कल्याणासाठीच, मातृभूमीच्या संरक्षणासाठीच राज्याचा खजिना खर्ची पडला पाहिजे, हा शिवरायांचा आग्रह होता. हे आपले राज्य आहे, ’स्वराज्य’ आहे, असे रयतेला वाटले, तरच प्रजा राजासम थोर होते, निष्ठावान होते. सतराव्या शतकात उदयास आलेले हिंदवी स्वराज्य हे खर्‍या अर्थाने तळागाळातील जनसामान्यांचे राज्य होते आणि शिवछत्रपती ’रयतेचा राजा’ हे विशेषण सार्थ करीत होते.
 
 
लेखक इतिहास अभ्यासक व भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांताचे उपाध्यक्ष आहेत.

रविराज पराडकर

 
रविराज पराडकर हे  इतिहास अभ्यासक व भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांताचे उपाध्यक्ष आहेत.