युवराज संभाजी राजेंच्या ‘स्वराज्य’ला डाव्यांची रसद?

विवेक मराठी    12-Aug-2023   
Total Views |

 Yuvraj Sambhaji Raje
नुकताच शेतकरी कामगार पक्षाचा 76वा वर्धापन दिन साजरा झाला. या वेळी व्यासपीठावर युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले हे प्रमुख पाहुणे होते. त्यानंतर सांगोल्यात राजेंच्या स्वराज्य पक्षाची सभा झाली. या दोन्ही मेळाव्यात त्यांनी भाजपावर टीका केली. राज्य सरकारवर टीका केली. रायगड जिल्ह्यात तर शेकापच्या - म्हणजे डाव्यांच्या व्यासपीठावर संभाजी राजांना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. राजे त्यांनी कोणत्या व्यासपीठावर जावे व कुठे न जावे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण ज्यांचे वंशज, वारसदार म्हणून आपण आपली ओळख आहे. त्यामुळे भविष्यात डाव्यांच्या सोबतीने राजे आपल्या स्वराज पक्षाची वाढ करणार आहेत, याचेच विश्लेषण करणारा लेख..
 
रायगड जिल्ह्यातील शेकापच्या व्यासपीठावरून राजेंनी शेकापचे तोंड भरून कौतुक केले. ते म्हणाले, “शेकाप ज्या विचारांवर चालतो, ते विचार छत्रपती शिवराय, शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले यांनी दिलेले आहेत. बहुजनांचे समाजहित आणि डाव्या विचारांचा पगडा असणारा पक्ष आहे. म्हणजेच, पुरोगामी विचार जेथे आहेत, तेथे आम्ही येणारच. गेल्या 75 वर्षांपासून शेकापने ही परंपरा कायम ठेवली आहे.” हे व्यासपीठावरील गोडवे ठीक होते. पण असे विचार देणार्‍या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या 350व्या जयंतीच्या दिवशी रायगडावर का आले नाहीत? असा प्रश्न त्यांना विचारला नाही.
 
 
काल झालेल्या सांगोल्यातील सभेत संभाजीराजेंनी राज्य सरकारवर टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता टीका केली. एका राजकीय पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांना तो नक्कीच अधिकार आहे. पण पक्ष स्थापन होऊन जवळपास वर्ष झाले, पण राजेंचा पक्ष कुठे दिसला नाही. राज्यात कोणतेही मोठे आंदोलन किंवा गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काही ठोस कार्यक्रम नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार बाहेर पडताच युवराजांनी लगेच हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. पण ही हालचाल नक्की कोणाच्या आदेशाने सुरू आहे? डाव्या पक्षांच्या आणि शरद पवारांच्या आशीर्वादाने तर नाही ना? अशी शंका मात्र जनतेला यानिमित्ताने येऊ लागली आहे. रायगड जिल्ह्यातील सभा असो वा सांगोल्यातील सभा, या दोन्ही सभा डाव्यांच्या बालेकिल्ल्यात आहेत. सांगोला हा स्व. गणपत देशमुखांचा यांचा बालेकिल्ला, तर रायगड शेकापचा पाटील परिवाराचा आहे. एका ठिकाणी शेकापच्या व्यासपीठ तर दुसर्‍या ठिकाणी आपल्या पक्षाचे व्यासपीठ पण टीकेचा रोख सरकारवर आणि भाजपावरच दिसून येतो आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचा राजकीय इतिहास पाहता, राजेंचा स्वराज्य पक्षाची वाढ मोठ्या प्रमाणात आता होईल असे दिसत नाही. कारण राजेंना जनाधार असता तर तो पाचवर्षांच्या खासदारकीत दिसून आला असता. त्यामुळेच त्यांना पुन्हा कोणत्याही पक्षांनी टिकीट दिले नाही. युवराज संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीकडून 2009साली कोल्हापूरातून निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला होता. असे म्हटले जात की, राजेंना भाजपाने जरी जवळ करून राष्ट्रपती नियुक्त खासदारकी दिली, तरी राजे पवारांच्या जवळचेच राहिले. भाजपासाठी त्यांनी फारस काम केलेच नाही. पंतप्रधान मोदी वेळ देत नाहीत, अशी टीका केली. पण पंतप्रधान मोदींनी ज्या ज्या वेळी वेळ दिली, त्या वेळी आपण काय केले हे मात्र ते सांगत नाही. मराठा आरक्षणासाठी काय केले? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. भाजपाकडून राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभेची खासदारकी दिली. खासदारकी देताना फारशी बंधनेही घातली नाहीत. उलट भाजपाने छत्रपतींचा सन्मान म्हणून राज्यसभा दिली. त्याचा उपयोग करून राज्यात, देशात सामाजिक काम करू शकाल. पण आपण आपल्या राज्यसभेचा उपयोग किती केला, हा संशोधनाचा भाग आहे. राजेंच्या खासदारकीवरून शरद पवारांनी राजकारण केले. “पेशवे आता छत्रपतींना वस्त्र देऊ लागले’ अशी टीका करण्याची संधी साधली होती.
 
 Yuvraj Sambhaji Raje 
अखिल भारतीय असलेला शेतकरी कामगार पक्ष हा रायगड जिल्ह्यापुरता सीमित राहिला आहे. डाव्या आघाडीचा घटक पक्ष म्हणून शेतकरी कामगार शेखीने मिरवत असतो. नावात जरी शेतकरी असले, तरी शेतकर्‍यांसाठी काहीच केलेले नाही. सांगोल्यातून गणपत देशमुख यांच्या पराभवानंतर तेथे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. अशा उद्ध्वस्त होत असलेल्या डाव्या राज्यात जाऊन कोणाला मोठे करायचे आहे, कोणते राजकारण कारायचे आहे हे आगामी काळात पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
 
 
संभाजीराजे, आपण काय करावे काही नाही हा जरी वैयक्तिक भाग असला, तरी राजकारण्यांनी आपला वापर करून नये हीच महाराष्ट्रातील शिवप्रेमींची मागणी आहे. महाराजांचे वंशज भविष्यात लेनिन आणि माक्सवादी लोकांचा उदो उदो करीत असतील, तर ते योग्य नाही. आपण महाराजांचे विचार, त्यांचे गडकिल्ल्यांचे संवर्धन, शिवचरित्र सर्वत्र पोहोचेल यासाठी आपली शक्ती खर्च करावी. डाव्यांच्या व्यासपीठावर जाऊन ते होणार नाही. ते महाराजांवर लेख, पुस्तक किंवा व्याख्यान नक्कीच देतील पण त्यात आपल्याला अभिप्रेत इतिहास मांडतील, त्यातून ब्राह्मणद्वेषाची पेरणी करतील. हाच आजवरचा इतिहास राहिला आहे.
 

 Yuvraj Sambhaji Raje 
 
शरद पवारांसारख्या व्यक्ती जातीच्या राजकारणासाठी वापर करतील यापलीकडे तेही काही करू शकत नाही. त्यामुळे राजेंनी आपले ‘स्वराज्य‘ नक्की वाढवावे, पण त्यासाठी छत्रपतींचा आदर्श समोर ठेवून शून्यातून स्वराज्य निर्माण करावे. अशा व्यक्तींच्या सोबत राहून पक्षही वाढणार नाही. त्यामुळे आपण आपला वंश-कुळाचा आब राखावा, नसत्या राजकारणात पडून स्वत:ची बे्रअबू्र करू नये, हीच महाराष्ट्रातील जनतेची माफक अपेक्षा आहे.