धर्मो रक्षति रक्षितःटेंपल कनेक्ट - अभिनव उपक्रम

विवेक मराठी    19-Aug-2023   
Total Views |
वाराणसी येथे दिनांक 22, 23, 24 जुलै 2023 रोजी ‘टेंपल कनेक्ट’ हा अभिनव उपक्रम पार पडला. अशा प्रकारचे हे पहिले आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलन झाले. देश-परदेशातील मंदिरांना जोडणारा एक साकव म्हणून टेंपल कनेक्ट काम पाहणार आहे. या माध्यमातून सामाजिक अभिसरणाचे कार्य व्हावे, हा या संमेलनामागील उद्देश आहे.
 
vivek

मंदिर - श्रद्धा, अनुभूती, भक्ती, शक्ती, शांती यांचा समुच्चय ज्या स्थळी होतो, असे पवित्र स्थान. चराचरात असलेल्या ईश्वरी अंशाच्या साकार-सगुण रूपाचे दर्शन ज्या स्थळी होते, ते मंदिर. ही सनातन भारताची ओळख आहे. हीच भारताची ओळख अधिक वृद्धिंगत व्हावी आणि वसुधैव कुटुंबकमची शिकवण जगाला देणारी ही देश-परदेशातील मंदिरे एकमेकांना जोडली जावीत, या उदात्त उद्देशाने दिनांक 22, 23, 24 जुलै 2023 रोजी वाराणसी येथे ‘टेंपल कनेक्ट’ हा स्तुत्य उपक्रम झाला.
  
 
मंदिर प्रशासन-व्यवस्थापनामध्ये सुधारणा व्हावी, इतर मंदिरांमधील स्तुत्य उपक्रमांसंबंधी माहितीची देवाणघेवाण व्हावी या हेतूने 32 देशांमधील 1098 प्रतिनिधी आणि 250हून अधिक प्रसिद्ध मंदिरांचे प्रशासक-व्यवस्थापक ‘टेंपल कनेक्ट’ या जगातील पहिल्यावहिल्या मेळाव्यात सहभागी झाले होते. 250हून अधिक मंदिरांतील प्रतिनिधींनी शीख, जैन, हिंदू आणि बौद्ध धर्माचे प्रतिनिधित्व केले. या संमेलनाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे कार्यक्रमाच्या उद्देशाला पाठिंबा व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. ’विकास भी, विरासत भी’ या त्यांच्या प्रोत्साहनपर शब्दांनी सहभागींचा उत्साह वाढला.
 

International Temples Convention - 2023 
 
 
वाराणसीतील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे पहिले आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलन आणि एक्स्पो 2023 (आयटीसीएक्स) पार पडले. या कार्यक्रमात 40 सत्रे होती, ज्यात 10 मुख्य भाषणे, 10 मंदिरांबद्दल तपशिलात माहिती आणि 15हून अधिक वैशिष्ट्यपूर्ण सत्रे आणि गटचर्चा यांचा समावेश होता.
 
 
International Temples Convention - 2023
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, आयटीसीएक्सचे व एक्स्पोचे अध्यक्ष प्रसाद लाड आणि गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच अश्विनी कुमार चौबे (केंद्रीय राज्यमंत्री - अन्न आणि सार्वजनिक वितरण), वाराणसीचे महापौर अशोक तिवारी, वाराणसीचे आमदार सौरभ श्रीवास्तव, टेंपल कनेक्टची संकल्पना मांडणारे गिरीश कुलकर्णी, डॉ. सुधांशू त्रिवेदी (भाजपा राष्ट्रीय प्रवक्ता आणि राज्यसभा सदस्य), सुनील वर्मा (सीईओ - काशी विश्वनाथ मंदिर), विशाल सिंग (अयोध्या नगरपालिका आयुक्त), मिलिंद परांडे (महासचिव, विश्व हिंदू परिषद), तसेच अन्य मान्यवरही संमेलनात उपस्थित होते.
 
 
रुद्रेश्वर देवस्थान (गोवा), सोमनाथ मंदिर (गुजरात), शनी शिंगणापूर (महाराष्ट्र) आणि शिर्डी साईबाबा मंदिर (महाराष्ट्र) यासह पश्चिमेकडील 100हून अधिक मंदिरांच्या विश्वस्त पदाधिकार्‍यांनी आणि काही मंदिरांच्या प्रतिनिधींनी आपल्या देवस्थानांची माहिती दिली. रोहन खौटे (पर्यटन मंत्री, गोवा) यांच्या उपस्थितीत सुनील अंचिपका (संचालक, गोवा पर्यटन), गोव्याचा मंदिर इतिहास याबद्दल माहिती सांगणार्‍या सावनी शेट्ये (पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि इतिहास जागृतीसाठी भूमीज हेरिटेज कन्सल्टन्सीच्या संस्थापक) यांची ‘प्लॅस्टिकमुक्त मंदिर इकोसिस्टिम’वर विशेष भाषणे झाली.
 
 
टेंपल कनेक्ट म्हणजे यात्रेकरूंना लाभ देण्यासाठी मंदिर व्यवस्थापन-प्रशासनात क्रांती घडवून आणणारी संकल्पना आहे. ही अभिनव संकल्पना कशी सुचली आणि त्यामागील उद्देश टेंपल कनेक्टचे आयटीसीएक्स व एकस्पोचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी विशद केले.
 
 
“मंदिर - भारतवर्षाचे सामाजिक साधन”
- सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

International Temples Convention - 2023

ज्याला धर्माचे पालन करायचे आहे, तो धर्मच राहिला नाही, तर? धर्मावर श्रद्धा राहिली नाही, तर धर्म कसा चालेल? धर्म नाही चालला तर मोक्षाकडे कोण पाहील? सगळे जण भौतिकवादात, उपभोगवादात अडकून जातील. जगातील बर्‍याच देशांची स्थिती अशी आहे. आपल्या भारत देशातही अशी स्थिती निर्माण करण्याचा काही विकृत शक्ती प्रयत्न करत आहेत. या कठीण परिस्थितीत संरक्षण करण्यासाठी श्रद्धा व निष्ठा टिकवणे हे महत्त्वाचे. ही श्रद्धा आणि निष्ठा जागृत ठेवण्याचे काम मंदिरे करतात, म्हणून सर्व मंदिरांना टेंपल कनेक्टच्या माध्यमातून आपल्या साधन-संसाधनांचा विनियोग करून भारतातील छोट्यातील छोट्या मंदिरांना सक्षम करण्याचे काम करावे लागेल..

 
ते पुढे म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलनात संपूर्ण जगातून 1250हून अधिक मंदिरांची नोंदणी झाली. 867 मंदिरांचे प्रतिनिधी या संमेलनात उपस्थित होते. 400 मंदिरांची आभासी उपस्थिती होती. हे जगातील पहिले मंदिर संमेलन आहे, मात्र यात जोडली गेली त्याहून अधिक मंदिरे कशी जोडली जातील, त्याचा विस्तार कसा होईल याचा पुढील काळात विचार केला जाईल. तसेच यापुढे जाऊन टेंपल फेडरेशन निर्मितीबाबत विचार चालू आहे. या अंतर्गत 1) प्रशासन, 2) सुरक्षा, 3) आपत्तिव्यवस्थापन, 4) जमाव व्यवस्थापन, 5) तांत्रिक बाबी, 6) निधी व्यवस्थापन - कर व्यवस्थापन, 7) लंगर - प्रसादालय, 8) यूथ कनेक्ट व 9) सर्वेक्षण यावर प्रामुख्याने काम केले जाईल.
 
 
हे व्यासपीठ सांस्कृतिक राष्ट्रवाद निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे. समाजातील सर्व वर्गांसहित विशेषत: युवा वर्गाच्या सशक्तीकरणाचे काम या माध्यमातून केले जाईल. सर्व मंदिरे, प्रणाली यांच्यामधील अंतर कमी करण्याचे काम टेंपल कनेक्टच्या माध्यमातून केले जाईल.
 


International Temples Convention - 2023 
 
भविष्यात टेंपल कनेक्टच्या माध्यमातून नवीन मंदिर निर्माणासाठीही प्रयत्नशील राहणार आहोत. सीटूसी - सामान्य माणसाचे दानपेटीतील पैशाच्या स्वरूपातील दान सामान्य माणसापर्यंत पोहोचायला हवे. त्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने वैद्यकीय सेवा, लंगर (अन्नछत्र), पुस्तक पेढी, सांस्कृतिक संरक्षण इत्यादी उपक्रम हाती घेतले पाहिजेत. शिवाय मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी मंदिर स्वच्छता आणि सुरक्षा यावर गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. निर्माल्याचा योग्य विनियोग, भक्तांनी चढविलेला प्रसाद त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणा, याशिवाय सुव्यवस्थापन प्रस्थापित होण्यासाठी आर्थिक गुंतागुंतीचेही विषय, जमिनीचे वादविवाद इत्यादी कायदेशीर बाबींवरही चर्चा-विनिमय करून मार्ग काढले जातील. तिरुपती बालाजी मंदिर 5700 छोट्या मंदिरांच्या पायाभूत सुविधांसाठी खर्च उचलणार आहे; प्रत्येक मोठ्या मंदिराने असा विचार केला, तर हिंदू संस्कृती वृद्धींगंत करण्यात मोठे योगदान राहील. हे टेंपल कनेक्ट संमेलन आंतरराष्ट्रीय स्तरावर तीन वर्षांतून एकदा करण्याचा मानस आहे आणि देशांतर्गत अशी छोटी छोटी संमेलन होत राहतील. यातून मिळणार्‍या सर्व माहितीच्या आधारे सर्व मंदिरांचे एक कॉफीटेबल बुक तयार केले जाईल. ई प्लॅटफॉमद्वारे हे पुस्तक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न राहणार आहे.
 
 
आपला धर्म आणि आपली धर्मस्थळे ही आपल्याला आपल्या जीवनाचा मार्ग दाखवितात. इतिहासकाळापासून अनेक अडचणींचा सामना करावा लागला, परंतु धर्माच्या आधारे आपण टिकून आहोत. आपल्या भारताचे वैशिष्ट्य विविधतेत एकता आणि शांतिपूर्ण व्यवहार (सहिष्णुता). याच बलस्थानावर आज भारत देश विकासाच्या प्रगतिपथावर आहे. या अशाच वळणावर आपला समाज-धर्म एकमेकांना जोडून भारतीय संस्कृतीला पुढे नेले, तर भारत विश्वगुरुपदापर्यंत नक्कीच पोहोचू शकेल.”
 

पूनम पवार

 सा. विवेकमध्ये उपसंपादक कार्यरत आणि विवेक व्यासपीठ अंतगर्त खास महिलांसाठी विवेकज्योती या उपक्रमाची जबाबदारी. रुईया कॉलेज मुंबई येथून (राज्याशात्र / मराठी साहित्य) पदवीधर. महिला आणि समाजातील विविध विषयांवरील लिखाणाची आवड.