‘राज‘घराण्यांवर माध्यमांची कृपादृष्टी...

विवेक मराठी    02-Aug-2023   
Total Views |
महाराष्ट्रामध्ये अनेक विषय दखल घेण्यासारखे असतात. सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात अनेक मुद्दे चर्चेला येत आहेत. अनेक विषयांवर सखोल चर्चा होत आहे. विविध पक्षांचे आमदार आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्नांकडे आपले लक्ष वेधत असतात. त्यातील अनेक विषय अत्यंत लक्षवेधी असतात. ते सर्वत्र पोहोचवले गेले पाहिजेत. पण त्यावर मिडियातून चर्चा होत नाही, त्यावर चांगली स्टोरी होत नाही, त्याला चांगले फूटेजही मिळत नाही. पण सध्या महाराष्ट्रातील तीन राजघराण्यांतील युवकांना, त्यांच्या सभा, त्यांच्या वक्तव्यांना, त्यांच्या खळ्ळकट्याकच्या राजकारणाला जरा जास्तच फूटेज दिले जात आहे. यामुळे काही माध्यमांनी त्यांना मोठे करण्याचा विडा उचला आहे का? असा प्रश्न पडतो.

political
 
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची मीडियाला जास्तच क्रेझ आहे. आदित्य ठाकरे काय करतात, कुठे जातात, त्यांच्या जाण्या-येण्याच्या ’दिशा’ कोणत्या.. आदीवर मीडियाचे संपूर्ण कव्हरेज असते. शिंदे गटाने शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर तर आदित्य ठाकरे यांना अधिकच कव्हरेज मिळू लागले आहे. विधानसभेतील भाषणे, इर्शाळवाडीवर ते कसे पोहोचले याची इत्थंभूत माहिती दिली जात होती. मुख्यमंत्री अधिवेशनाचे कामकाज सोडून तिथे गेले. पण आमदार असलेल्या आदित्य यांच्या भेटीला अधिक प्रसिद्धी मिळत होती. मिंधे, खोके अशी शेलक्या भाषेतील त्यांची रटाळ भाषणे लाइव्ह दाखवली जातात. मुंबई पालिकेवरील आदित्य ठाकरेंचा नॅनो मोर्चा विशाल दाखवला जात होता. त्यांच्या भाषणाच्या क्लिप्स आणि पालिकेत भ्रष्टाचार कसा सुरू आहे यांची माहिती दिली जात होती. पण ते आरोप किती तथ्यहीन आहेत, हे मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी पत्रकार परिषदेत दाखवले, त्याची मात्र एकाही माध्यमाने चांगली दखल घेतली नाही. गुरुवारी आदित्य ठाकरे यांचे आरे कारशेडसाठीच्या जंगलतोडीवरील भाषण मीडियातून गाजले, पण भाजपाचे आमदार अमित साटम यांचे गोरेगावमधील 500 झाडांच्या तोडीसंदर्भातील त्यांची पोलखोल करणारे भाषण मात्र फार कोणी दाखवले आले नाही. एकंदरच आदित्य ठाकरे यांना मोठे करण्याची जबाबदारी मीडियाने घेतलेली दिसते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
 
पवार घराण्यातील रोहित पवार यांना तर मीडियाने एवढे खांद्यावर घेतले आहे की, असा प्रश्न पडतो. त्यांच्या फुटकळ वाक्यांनाही मोठी प्रसिद्ध दिली जाते. कर्जत जामखेडा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर रोहित पवार हे मोठे राष्ट्रीय राजकीय नेते असल्यासारखेच सर्वच विषयांवर भाष्य करतात. अगदी जागतिक विषय, केंद्र सरकार अशा विषयांवर त्यांची प्रतिक्रिया तयार असते. पण त्यांचीच राजकीय भूमिका गोंधळलेली दिसते. कधी ते हिंदुत्ववादी, तर सेक्युलर असतात.. हे त्यांचे अगदी सोईने सुरू असते. मग त्यासाठी जगातील सर्वात मोठी भगवा ध्वज यात्रा काढतात, तर अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतात, तर कधी हिंदुत्वाच्या भूमिकेवर टीका करीत असतात. त्यांनी या बाबतीत अगदी शरद पवार यांच्या राजकारणाची री ओढली आहे, असे म्हणावे लागेल. काही दिवसांपूर्वी कर्जत जामखेडा मतदारसंघात एमआयडीसी यावी यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून आंदोलन केले. खरे तर या पुतळ्याखाली किंवा त्या बाजूला आंदोलन करू नये, असे विधेयक सभागृहात पारित आहे, तरीही मीडियाला साक्ष ठेवून स्टंटबाजीसाठी त्यांनी रेनकोट घालून पावसात भिजत आंदोलन केले. पण तेथे आंदोलन करणे चुकीचे आहे, असा प्रश्न मात्र त्यांना विचारला गेला नाही.
 

political
 
 
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बंडानंतर रोहित यांना तर मोकळे रान मिळाले आहे. त्यामुळे मीडियातूनही त्यांचा अधिकच उदो उदो केला जातो आहे. अगदी आवेशात येऊन बोलणार्‍या आव्हाडांनाही फारसे फूटेज मिळत नाही.
  
मागील आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र नाशिक दौर्‍यावर होते. दौर्‍यावर असताना सिन्नर टोल नाक्यावर फॉक्सवॅगनच्या तांत्रिक अडचणीमुळे त्यांची गाडी थांबवावी लागली. थोड्या वेळा ते सुरळीत झाले. पण नंतर तेथे मनसेचे अतिउत्साही कार्यकर्ते आले, त्यांनी टोल नाका फोडला. 10 मिनिटे थांबले म्हणून जर कार्यकर्त्यांनी टोल नाका फोडला, तर याचे समर्थन करण्यासारखे काहीच नाही. पण युवा नेते अमित ठाकरे यांनी त्याचे समर्थन केले आहे. त्या कार्यकर्त्यांची दुसर्‍या दिवशी भेट घेतली. भाजपानेही सदर प्रकारावर सोशल मीडियावरून टीका केली. ‘काहीतरी निर्माण करायला शिका, नंतर फोडा’ अशी टीका केली. अमित ठाकरे हे राजकारणात नवे आहेत. अजूनही त्यांना चार शब्दही मराठीत बोलता येत नाही. राज ठाकरे यांचे पुत्र एवढीच त्यांची पुण्याई. अमित हे ना कलाकर, ना नकलाकार, ना ते उत्तम राजकीय युवा संघटक. असे असताना मीडियातून त्यांचा एवढा उदो उदो का? असा प्रश्न निर्माण होतो. त्यांनी असे कोणते काम केले आहे की ज्यातून त्यांची स्वत:ची ओळख निर्माण केली आहे? समुद्रकिनारे स्वच्छता हा त्यांचा उपक्रम वगळता एकही विधायक काम नाही. भविष्यात माहीम, दादर, प्रभादेवीचे आमदार म्हणून त्यांच्याकडे कार्यकर्ते पाहत असतात. पण त्या भागातही त्यांची अजूनही ओळख नाही. राज ठाकरे यांचा पुत्र म्हणून प्रसिद्धी दिली जाते. त्यातून माध्यमांना काही लाखात व्ह्यही मिळतात. पण आपण तोडफोड संस्कृतीचे उदात्तीकरण करत नाही ना? याचे भान इ. माध्यमांनी राखायला हवे.
 

political 
गेल्या वर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्यावर्षी एका सभेत जाहिर वक्तव्य केले होते की, ‘काही एचएमयू पत्रकार भाजपाविरोधात नॉरेटिव्ह सेट करीत आहेत.‘ याची प्रचिती आता दिसून येत असते. भाजपाच्या द्वेषापायी काही नेत्यांच्या वक्तव्यांना, त्यांच्या आंदोलनांना, कृतीला आणि आपल्या भाजपाच्या द्वेषाची बंदूक त्यांच्या खांद्यावर ठेवून त्यांना वारेमाप प्रसिद्धी दिली जाते आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासूनच हे प्रकार अधिकच जोमाने सुरू झाले होते. भाजपाचे महत्त्व कमी करावे असे माध्यमातील काही पत्रकारांना वाटत असते, पण ते उघड बोलू शकत नसले, तरी त्यांच्या कृतीतून ते अगदी ठळकपणे दिसून येत होते. कोणाच्यातरी द्वेषापायी माध्यमातून अतिरंजित प्रसिद्धी मिळेल, पण यामुळे आपण किती पंगू होतो, याचेही त्या राजकारण्यांना भान असले पाहिजे. 2006नंतर राज ठाकरे यांच्या पक्षाला माध्यमांनी अशीच वारेमाप प्रसिद्धी दिली. यामुळे राज ठाकरे यांचा पक्ष गावागावात पोहोचला खरा, पण संघटनात्मक बांधणी नसल्याने, 2014च्या मोदी लाटेत पक्षाचा पालापाचोळा झाला.
त्यामुळे या तिन्ही पक्षांचे भावी वारसदार म्हणून अमित ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांनी आता संघर्ष करून पक्ष वाढवला पाहिजे. फेसबुक लाइव्ह येऊन पक्ष वाढू शकत नाही. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रसिद्धीच्या सर्व यंत्रणा हाताशी असूनही ते कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत असतात, सर्वसमान्य कार्यकर्त्यांना आपलेसे करत आहेत. त्यांची लोकप्रियता नक्कीच स्वकर्तृत्वाची आहे. ती वडिलांच्या, आजोबांच्या, काकांच्या व माध्यमांच्या कृपादृष्टीने तयार झालेली नाही.