कणखर ‘कोमल’

विवेक मराठी    21-Aug-2023   
Total Views |
@संजय देवधर। 9422272755
 
Komal Rajeev Aher 
थॅलेसेमियासारख्या दुर्धर आजारावर मात करून बी.ए.एम.एस.चा अभ्यासक्रम पूर्ण करून डॉक्टर झालेल्या नाशिकच्या या युवतीचे नाव आहे डॉ. कोमल राजीव आहेर. रुग्णसेवा सुरू ठेवूनच ती सध्या पुण्यातील डी.वाय. पाटील विद्यापीठातून हॉस्पिटल मॅनेजमेंट व हेल्थ केअर विषयात एम.बी.ए. करीत आहे. त्याच वेळी सिम्बायोसिस विद्यापीठातून इमर्जन्सी मेडिसिन या विषयाचा पदविका अभ्यासक्रम करीत आहे. डॉ. कोमल हिचा 25 वर्षांचा प्रवास जितका खडतर, संघर्षमय आहे, तितकाच इतरांसाठी प्रेरणादायकदेखील आहे.
25 वर्षांची एक युवती स्वत: एका दुर्धर विकाराची रुग्ण असताना, त्यावर निग्रहाने मात करून रुग्णसेवा करीत आहे. तिला जो विकार झालेला आहे, त्या थॅलेसेमिया या विकारात रुग्णाला सातत्याने रक्त घ्यावे लागते. कोमल केवळ सहा महिन्यांची असताना तिला हा विकार असल्याचे निदान झाले. मात्र तिच्या आईवडिलांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा, धाकट्या भावाने थोरला होऊन दिलेला आधार, तिची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्द या सार्‍याच्या बळावर ती बी.ए.एम.एस.चा अभ्यासक्रम पूर्ण करून डॉक्टर झाली. आलेल्या संकटाशी कठोरपणे सामना करणार्‍या नाशिकच्या या युवतीचे नाव आहे डॉ. कोमल राजीव आहेर. रुग्णसेवा सुरू ठेवूनच ती सध्या पुण्यातील डी.वाय.पाटील विद्यापीठातून हॉस्पिटल मॅनेजमेंट व हेल्थ केअर विषयात एम.बी.ए. करीत आहे. त्याच वेळी सिम्बायोसिस विद्यापीठातून इमर्जन्सी मेडिसिन या विषयाचा पदविका अभ्यासक्रम करीत आहे. डॉ. कोमल हिचा 25 वर्षांचा प्रवास जितका खडतर, संघर्षमय आहे, तितकाच इतरांसाठी प्रेरणादायकदेखील आहे. अगदी किरकोळ संकटाने खचून जाऊन, विपरीत निर्णय घेऊन स्वत:चे तसेच कुटुंबीयांचे आयुष्य उद्ध्वस्त करायला कारण ठरलेल्या दुर्दैवी व्यक्तींच्या घटना आपण आजूबाजूला बघतो. अशा वेळी काळोखातून प्रकाशाकडे वाटचाल करणार्‍या कोमलकडे बघितले, तर ती खरीखुरी आयडॉल ठरते! तिच्याकडूनच तिच्या या व्याधीविषयी जाणून घेतले.

Komal Rajeev Aher 
बीटा थॅलेसेमिया ही आनुवंशिक व्याधी असून, यात तांबड्या पेशीत असलेले हिमोग्लोबिन बाधित होते. हिमोग्लोबिन हे रक्तपेशींतील असे प्रथिन असते, ज्यामुळे प्राणवायू वाहून नेला जातो. बीटा थॅलेसेमिया या रक्तव्याधीत हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लागणारे रसायन आनुवंशिक जनुकाच्या प्रभावामुळे पुरेशा प्रमाणात तयार होत नाही. कोमलच्या बाबतीत ती सहा महिन्यांची असताना पालकांना काही शंका वाटली. त्यांनी डॉक्टरांना दाखवले. 25 वर्षांपूर्वी नाशिकमध्ये बव्हंशी वैद्यकीय तज्ज्ञदेखील या विकाराविषयी अनभिज्ञ होते. कोमलला मुंबईला न्यावे लागले, तेव्हा नेमके निदान झाले आणि सर्व कुटुंबीय हादरले. मात्र पालकांनी खंबीरपणे हे आव्हान स्वीकारले, ते संकटाला धीराने समोरे गेले. अर्थात त्यांच्यासाठी ते सोपे मुळीच नव्हते!
 
21 August, 2023 | 16:54
लवकर निदान होणे गरजेचे

थॅलेसेमिया हा एक प्रकाराचा रक्ताशी निगडित आजार आहे. याचे दोन प्रकार असतात. जन्म घेणार्‍या बाळाच्या आई-वडिलांच्या जीन्समध्ये किरकोळ (मायनर) थॅलेसेमिया असेल तर बाळाला जास्त प्रमाणातला (मेजर) थॅलेसेमिया होऊ शकतो. कोमलच्या बाबतीत नेमके हेच घडले. तिचे पालक दोघेही मायनर प्रकारचे वाहक आहेत. बाळाच्या आईवडिलांमध्ये कोणा एकालाच कमी प्रमाणातला थॅलेसमिया असल्यास बाळाच्या जिवाला काही धोका नसतो. हा एक असा विकार आहे, जो काही मुलांमध्ये जन्मापासूनच असतो. बाळ जन्मल्याच्या 3 महिन्यांनंतर त्याची लक्षणे दिसून येतात. तज्ज्ञ सांगतात की, या आजारामध्ये बाळाच्या अंगात रक्ताची सतत कमतरता निर्माण होऊ लागते. त्यामुळे बाहेरून रक्तपुरवठा करावा लागतो, शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता वाढते. वारंवार रक्त द्यावे लागल्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात लोहतत्त्व जमा होते. ते पुढच्या आयुष्यात हृदयासाठी प्राणघातक ठरू शकते.

Komal Rajeev Aher 
 
जनकल्याण रक्तपेढीचे
लक्षणीय सहकार्य

Komal Rajeev Aher


नाशिकच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचालित जनकल्याण रक्तपेढीने थॅलेसेमिया रुग्णांसाठी विनामूल्य रक्त देण्यासाठी गेल्या 17 वर्षांपासून स्वतंत्र विभागाची व्यवस्था केली आहे. 17 रुग्णांना दर 20 दिवसांनी रक्त देण्याची गरज असते. त्यासाठी 100 रक्तदाते ठरावीक काळाने रक्तदान करून ती आवश्यकता पूर्ण करतात. अगदी कोविड काळातही यंत्रणा सुरळीत होती. कोमलचा रक्तगट एबी पॉझिटिव्ह असून तो ओ निगेटिव्ह प्रमाणेच दुर्मीळ आहे. सुदैवाने तिला रक्तदाते मिळाले आहेत. या कामी जनकल्याण रक्तपेढीचे कार्यवाह शैलेश पंडित, प्रशासकीय अधिकारी विनय शौचे, डॉ. संगीता लोढा, प्रकल्प समिती सदस्य विद्या एकबोटे यांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत.
  
कोमलचे वडील डॉ. राजीव आहेर नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात नियोजन समितीचे संचालक आहेत. ते म्हणतात की, “कोमल जिद्दीने डॉक्टर झाली. आज ती रुग्णसेवा तर करतेच, तसेच इतर थॅलेसेमिया रुग्णांचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशनदेखील करते, त्यांना धीर देते. नुकताच तिने पंचकर्म अभ्यासक्रम पूर्ण केला असून थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी ती त्याचा प्रयोगात्मक वापर करेल.” तिची आई संध्या आहेर या शिक्षिका असून, ‘स्माइल थॅलेसेमिया फाउंडेशन’च्या अध्यक्षा आहेत. 30 थॅलेसेमिया रुग्णांच्या पालकांना एकत्र आणून त्यांनी हे कार्य सुरू केले आहे. त्या म्हणतात की, “भारतात या विकाराने ग्रस्त असणार्‍या रुग्णांची संख्या दोन लाखांवर असून नाशिक जिल्ह्यात सुमारे 600 रुग्णांची नोंद आहे. शासनाने या रुग्णांना मोफत रक्त देण्याबाबत यापूर्वीच निर्देश देऊन परिपत्रक काढले असले, तरी त्याची काटेकोर अंमलबजावणी मात्र होत नाही. त्यामुळे रुग्णांच्या व त्यांच्या पालकांच्या अडचणी वाढतात. गरजू पालकांना त्यांच्याशी 9922623244 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.” कोमल म्हणते की, “मी जसजशी मोठी होत गेले, तसतशी मला आपण इतर मुलांपेक्षा वेगळ्या आहोत याची जाणीव होत गेली. दरमहा रक्त घेण्याचे दिव्य पार पाडताना शाळा, अभ्यास व इतर गोष्टीही सुरूच होत्या.” प्रारंभी सततच औषधांच्या मार्‍याने तिला त्याविषयी तिरस्कार वाटायला लागला.
 
लक्षणे समजून घ्यावीत
भारतात दर वर्षी दहा हजार मुलांमागे 8 मुले थॅलेसेमिया हा आजार घेऊन जन्माला येतात. भारतात या आजाराचे 2 कोटी रुग्ण असूनही या दुर्धर आजाराच्या प्रतिबंधाविषयी व या रुग्णांना उपलब्ध असलेल्या सुविधांविषयी सर्वसामान्यांमध्ये अनभिज्ञता आहे. सर्वसामान्य व्यक्तीच्या रक्तातील हिमोग्लोबिन व बीटा अशा दोन साखळ्या सम प्रमाणात असतात. थॅलॅसेमियात त्यांच्या प्रमाणात असंतुलन निर्माण होते. हिमोग्लोबिनमध्ये बीटा किंवा अल्फा यापैकी एकाच शृंखलेचे आधिक्य दिसून येते. त्यामुळे हिमोग्लोबिनचे आयुष्य कमी होते. रक्ताचा क्षय होतो. म्हणून अ‍ॅनिमिया होतो. थॅलेसेमियाची लक्षणे समजून घेतली पाहिजेत. हा विकार सौम्य ते तीव्र स्वरूपात दिसून येतो. सौम्य स्वरूपातील रुग्णांना फक्त शरीरावर जास्त ताण आल्यास अ‍ॅनिमिया होतो. तीव्र स्वरूपातील रुग्णांना 6 ते 18 महिन्यांत लक्षणे दिसून येतात. त्यात प्रामुख्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत जाणे, तसेच यकृत व प्लीहा (spleen) वाढत जाणे, हाडे ठिसूळ होणे ही लक्षणे दिसून येतात. हाडांमधील बदल चेहर्‍यावर दिसतात. कपाळाचे हाड पुढे येते. नाक चपटे होऊन दात पुढे येतात. निदान झाल्यानंतर लगेचच रक्त घेण्यास सुरुवात न केल्यास रुग्णाला मृत्यूही येऊ शकतो.
 
Komal Rajeev Aher
थॅलेसेमिया झालेला रुग्ण वरपांगी सर्वसामान्यांप्रमाणेच दिसतो. मात्र या काहीशा वेगळ्या आजाराबद्दल कळल्यावर लोकांनी विचारलेल्या प्रश्नांनी व नजरांनी कोमल बेजार व्हायची. अगदी छोट्या श्रमांनीही थकून जायची. सतत इंजेक्शनच्या सुया टोचून घेतल्याने वेदना व्हायच्या. एकटेपणा वाटायचा, नैराश्य यायचे. त्यातूनही ती प्रयत्नपूर्वक बाहेर पडली. आता ती ड्रायव्हिंग, पर्यटन हे आपले छंद जोपासते. त्यात रमते. या रुग्णांच्या शारीरिक उपचारांबरोबरच त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दलही दक्षता घ्यावी लागते. आपल्याला उत्तम पालक, कुटुंबीय, नातेवाईक मिळाल्याबद्दल कोमल स्वत:ला भाग्यवान समजते. धाकटा भाऊ तेजस तिचा जणू मोठा भाऊ झाला आणि पाठीशी भक्कमपणे उभा राहिला. आता तो एम.बी.बी.एस.च्या दुसर्‍या वर्षात शिकत आहे. मित्रमैत्रिणी तिला कायम साथ देतात. रक्त बदलण्याची शृंखला सतत 20 दिवसांनी सुरू असते. एक पूर्ण दिवस त्या प्रक्रियेत जातो, तेव्हा कोणी ना कोणी तिच्यासमवेत असतातच. या विकाराच्या संदर्भात ती कळकळीचे आवाहन करते की, ज्यांना शक्य आहे त्यांनी नियमित रक्तदान करावे, कारण तेच या विकारग्रस्तांसाठी जीवनदान आहे. दुसरे म्हणजे लग्न जुळवण्यासाठी कुंडली बघण्यापेक्षा वधुवरांची थॅलेसेमिया चाचणी करून घ्यावी. त्याने संभाव्य धोका टाळता येतो.
ज्येष्ठ पत्रकार, नाशिक

संजय दामोदर देवधर

  • ज्येष्ठ पत्रकार, आणि आदिवासी वारली चित्रशैली अभ्यासक.

  • नाशिक येथे दैनिक गावकरीमध्ये 34 वर्षे कलाविभाग प्रमुख, वार्ताहर, कलासमीक्षक व उपसंपादक पदावर काम करून निवृत्त. सध्या फ्रिलान्स पत्रकारिता सुरु.

  • शैक्षणिक अर्हता - जी.डी.आर्ट ( ऍप्लाईड ) 1982 साली जे जे स्कुल ऑफ आर्ट येथून अव्वल श्रेणीत उत्तीर्ण.

  • अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांशी निकटचे संबंध व पदाधिकारी म्हणून कार्य. विविध स्पर्धांच्या परीक्षणाचा अनुभव.

  • संशोधनपर कार्य- आदिवासी वारली चित्रशैलीविषयी विशेष संशोधन. कार्यशाळांचे आयोजन करुन अनेकांना वारली कला शिकविण्याचा उपक्रम सुरु. आत्तापर्यंत ५ ते ७५ वयोगटातील हजारो कलाप्रेमींना वारली चित्रकलेचे मार्गदर्शन. परदेशी पर्यटक देखील येऊन वारली कलेचे धडे गिरवतात.

  • वारली चित्रकलेच्या प्रसार व प्रचारासाठी वारली चित्रसृष्टी हे पुस्तक लिहून प्रकाशित केले. त्याच्या चार आवृत्त्या लोकप्रिय झाल्या आहेत. Warli Art World या इंग्लिश पुस्तकाच्या दोन आवृत्ती परदेशातही पोहोचल्या आहेत. रसिक वाचकांचा या पुस्तकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.

  • चित्रसहल या आगळ्यावेगळ्या उपक्रमात आदिवासी पाड्यांवर शहरी कलाप्रेमींना नेऊन वारली जीवनशैली, त्यांची कला यांचे सुरेख दर्शन घडवले जाते. आतापर्यंत अनेकजण सहकुटुंब सहलीत सहभागी झाले.

  • विश्वविक्रम - ऑगस्ट 2018 मध्ये 1100 पेक्षा अधिक स्पर्धकांची ऑन द स्पॉट वारली चित्रस्पर्धा घेतली व दोन विश्वविक्रम प्रस्थापित केले. सर्वाधिक सहभागाबद्दल जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड तर चित्रांद्वारे सामाजिक संदेश दिल्याने वंडरबुक वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आले.

  • पत्रकारितेत विविध प्रकारचे पुरस्कार मिळाले आहेत. राज्य सरकारने सन 2019 मध्ये वारली कलेतील योगदानाबद्दल राज्यस्तरीय आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले.