64 घरांचा नवा राजारमेशबाबू प्रज्ञानंद

विवेक मराठी    25-Aug-2023
Total Views |
 Praggnanandhaa loses
 
@अनुजा देवस्थळी 
चेन्नईतील एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेला हा मुलगा त्याच्या खेळाने बुद्धिबळ विश्वात प्रसिद्ध झाला आहे. क्रमवारीत आपल्याहून अव्वल खेळाडूंना हरवणं, कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणं आणि त्या स्पर्धेतही पुन्हा ह्याच खेळाडूंशी होणारी स्पर्धा ह्यामुळे जगात अव्वल स्थानी पोहोचण्याचा प्रागचा मार्ग सोपा होऊ शकतो. प्रचंड मोठा अनुभव आज त्याच्याकडे जमा झाला आहे. त्याला भविष्यात याच जमापुंजीचा उपयोग होऊ शकतो, यात शंका नाही.
द्धिबळ हा खेळ भारतीयांना नवीन नाही. ह्या खेळाची सुरुवातच भारतातून झाली, असाही एक मतप्रवाह आहे. बैठ्या खेळांमध्ये आवडीने खेळला जाणारा एक खेळ म्हणून बुद्धिबळाची ओळख सर्वांनाच आहे. पण जेव्हा स्पर्धात्मक दृष्टीकोनातून ह्याच खेळाचा विचार केला जातो, तेव्हा अनेक वर्षं विश्वनाथन आनंद हे एकच नाव आपल्यासमोर येतं. 5 वेळा जगज्जेता, 2 वेळा विश्वचषकाचा मानकरी, जागतिक मानांकनात अग्रस्थानी पोहोचलेला, जागतिक बुद्धिबळ संघटनेत (FIDEमध्ये) महत्त्वाचं पद भूषविणारा विश्वनाथन आनंद 1988 साली ग्रँडमास्टर किताब मिळवून अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला होता. आनंदच्या खेळाने प्रेरित होऊन अनेक मुलं बुद्धिबळाकडे आकर्षित झाली. गेल्या 2 दशकांत तर ग्रँडमास्टर्सची संख्या झपाट्याने वाढलेली दिसते. आज भारतात एकूण 83 ग्रँडमास्टर्स आहेत. ह्याशिवाय आंतरराष्ट्रीय मास्टर (IM), महिला ग्रँडमास्टर (WGM) ह्यांचीही संख्या वाढत आहे. ह्यापैकी बहुतेक मुलं सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहे.
 
 
फिडे विश्वचषक 2023
 
बाकू, अझरबैजान ह्या ठिकाणी 30 जुलै ते 24 ऑगस्टदरम्यान बुद्धिबळ विश्वचषक खेळला जात आहे. भारतासाठी अत्यंत यशस्वी ठरलेली स्पर्धा असं ह्या स्पर्धेचं वर्णन करता येईल. उपांत्यपूर्व फेरीत म्हणजेच पहिल्या 8 खेळाडूंमध्ये 4 भारतीय खेळाडूंचा समावेश होता. हे चार खेळाडू होते डी. गुकेश, अर्जुन एरिगसी, रमेशबाबू प्रज्ञानंद आणि विदित गुजराथी. ही भारतीय बुद्धिबळ खेळाच्या इतिहासातली विशेष उल्लेखनीय घटना आहे. ह्याच उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात प्रज्ञानंद अर्जुनला पराभूत करून पुढच्या फेरीत दाखल झाला. गुकेश आणि विदित हे दोघे त्यांच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभूत झाले.
 
 
 
विश्वचषक उपांत्यफेरी
 
आपल्याच मित्राला - अर्जुन एरिगसीला पराभूत करून पहिल्या चारांमध्ये पोहोचलेल्या प्रज्ञानंदकडे आता समस्त क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून राहिलं होतं. ह्याच स्पर्धेत त्याने दुसर्‍या मानांकित हिकारू नाकामुराचा पराभव केला होता. आता लढत होती स्पर्धेतील तृतीय मानांकित फॅबियानो कारुआनाशी! क्लासिक बुद्धिबळाचे पहिले दोन डाव बरोबरीत सुटले, टायब्रेकची सुरुवातही बरोबरीनेच झाली. त्यानंतर मात्र दुसर्‍या मर्यादित वेळेच्या टायब्रेकमध्ये प्रज्ञानंदने फॅबियानोवर मात केली आणि त्यानंतरचा तिसरा टायब्रेक बरोबरीत सोडवून दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. 2002 आणि 2004 ह्या दोन्ही वर्षी विश्वनाथन आनंदने हे विजेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर एकही भारतीय खेळाडू तिथपर्यंत पोहोचू शकला नव्हता. 2023ने मात्र ही प्रतीक्षा संपवली. आता अंतिम फेरीत त्याच्यासमोर मोठं आव्हान असेल मॅग्नस कार्लसनचं. वर्तमानातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखला जाणारा मॅग्नस. मात्र आपल्या प्रज्ञानंदमध्येही कठीण आव्हानाला सामोरं जाण्याची ताकद आहे. हा सामना चुरशीचा व्हावा, हीच सर्व बुद्धिबळप्रेमींची इच्छा असेल.
 
 
 Praggnanandhaa loses
 
अंतिम फेरीत प्रवेश करतानाच प्रज्ञानंद कँडिडेट्स स्पर्धेसाठीही (candidate's tournament) पात्र ठरला. ह्या स्पर्धेतल्या पहिल्या तीन खेळाडूंना त्या स्पर्धेची पात्रता मिळणार होती. कँडिडेट्स स्पर्धेचा विजेता पुढे विश्वविजेतेपदाच्या लढतीसाठी पात्र ठरतो. ह्याआधी अशी पात्रता मिळवणारा, शिवाय विश्वविजेतेपदाचा मान मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू होता - विश्वनाथन आनंद. आनंद हा भारतीय बुद्धिबळातील ध्रुवतारा आहे. त्याचं स्थान कायमच अढळ राहील, मात्र आता त्याच्या पावलावर पाऊल टाकत मार्गक्रमण करणारी एक नवी पिढी तयार झाली आहे, हे खूप आनंददायक आहे.
 
प्रज्ञानंदची जडणघडण
 
चेन्नईतील एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेला हा मुलगा त्याच्या खेळाने बुद्धिबळ विश्वात प्रसिद्ध झाला आहे. प्रज्ञानंदची मोठी बहीण वैशाली हीदेखील महिला ग्रँडमास्टर आहे. वैशाली टीव्हीपासून दूर राहावी, ह्यासाठी तिच्या आईने तिला बुद्धिबळ आणि चित्रकला शिकायला पाठवलं. वैशाली बुद्धिबळ खेळण्यात रमून गेली आणि पाठोपाठ तिचा भाऊ प्रज्ञानंददेखील ह्या खेळाकडे ओढला गेला. बुद्धिबळ गुरुकुलात ही दोन्ही भावंडं ग्रँडमास्टर बी. रमेश ह्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेऊ लागली. दोघांनीही विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलं. स्थानिक पातळीवर सुरू झालेला हा प्रवास आज आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला आहे.
 
 
 Praggnanandhaa loses
 
मूर्ती लहान, कीर्ती महान
 
 
अगदी कमी वयातच ह्या मुलाने नवनवीन शिखरं पादाक्रांत करायला सुरुवात केली होती. त्याने दहाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय मास्टर आणि बाराव्या वर्षी ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला. 16व्या वर्षी तत्कालीन जगज्जेता मॅग्नस कार्लसनला पराभूत करत अशी कामगिरी करणारा तो सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला. तो दिवस सर्व भारतीयांसाठीही अविस्मरणीय ठरला. सगळीकडे कोविडचा प्रादुर्भाव वाढत होता, संपूर्ण जग ऑनलाइन सुरू होतं आणि त्यातच ह्या दोघांमध्ये झालेला तो सामना. एका जलद बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसन आणि प्राग एकमेकांसमोर आले होते. भारतात रात्रीचे 3 वाजले होते. प्राग जिंकला, त्याने प्रशिक्षकांना मेसेज केला आणि तो झोपी गेला. इतक्या मोठ्या खेळाडूला हरवल्यानंतरही तो शांतच होता. दुसर्‍या दिवशी ही बातमी देशभर पसरली. सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आणि प्रज्ञानंदला नवी ओळख मिळाली. त्यानंतर आणखी दोन वेळा त्याने मॅग्नसचा पराभव केला. आता विश्वचषकात पुन्हा एकदा हे दोघे समोर येत आहेत. प्रज्ञानंद ऐन वेळी कच खाणार्‍यांपैकी नाही. अर्जुनविरुद्ध पहिल्या क्लासिक डावात पराभूत झाल्यानंतरही उर्वरित डावांमध्ये त्याने बाजी पलटवली होती. उपांत्य फेरीत समोर असलेला फॅबियानो हा तुलनेने बराच अनुभवी खेळाडू होता. त्या अनुभवाचा फायदा उचलत त्याने प्रज्ञानंदवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला, मात्र प्राग त्याला पुरून उरला. हेच सगळे गुण त्याला खूप पुढे घेऊन जातील, ह्यात शंका नाही.
 
 
विश्वचषकादरम्यानच्या काही खास घटना
 
अर्जुन आणि प्रज्ञानंद यांची मैत्री हा मीडियाबरोबरच फिडेच्या क्रीडा समालोचकांचा औत्सुक्याचा आणि चर्चेचा विषय ठरला. दोघांमध्ये महत्त्वाचा सामना खेळला जाणार होता आणि आदल्या दिवशी हे दोघे एकत्र फिरत गप्पागोष्टी करत होते. प्रत्यक्ष सामना सुरू झाला आणि त्या दिवशीही पुन्हा तीच पुनरावृत्ती झाली. हे दोघे एकमेकांचे खास मित्र आहेत. इतक्या लहान वयात जेव्हा ही मुलं इतक्या मोठ्या पातळीवर खेळत असतात, त्या वेळी साहजिकच शाळेतले मित्र वगैरे संकल्पना त्यांच्या लेखी नसतातच. पूर्ण वेळ खेळ, खेळाचा सराव आणि खेळाचा विचार ह्यातच जात असतो. अर्जुन, प्रज्ञानंद, निहाल, गुकेश, विदित ह्या सगळ्यांमध्ये असलेल्या मैत्रीचं हेच मुख्य कारण आहे.
 
 
महत्त्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे प्रज्ञानंदच्या आईची उपस्थिती. दोन मुलं विश्वचषकात खेळत आहेत हे बघून त्या माउलीला नक्कीच कृतकृत्य झालं असेल. सामना सुरू असतानाची हुरहुर आणि जिंकल्यानंतरचे तिचे आनंदाश्रू फोटोग्राफरपासून लपले नाहीत. अगदी लहानपणापासून बहिणीला आणि त्याला स्वत:ला आईवडिलांकडून खेळण्यासाठी मिळालेलं प्रोत्साहन आणि सहकार्य याबद्दल प्रज्ञानंदने मुलाखतीत सांगितलंच होतं.
 
 
प्रशिक्षकांच्या भावना
 
चेन्नईतील एका गृहवसाहतीत ग्रँडमास्टर आर.बी. रमेश त्यांचं बुद्धिबळ गुरुकुल चालवतात. ह्या छोट्याशा जागेने शेकडो बुद्धिबळपटू घडवले आहेत.
 
 
एक प्रसंग इथे मुद्दाम नमूद करावासा वाटतो. प्रज्ञानंदने नाकामुराला हरवलं, हे कळताक्षणी बाजूलाच स्वत:चा सामना खेळत असलेला कार्लसन त्याच्याजवळ आला आणि खांद्यावर हात ठेवून काहीतरी म्हणाला. तो फोटो खूप व्हायरल झाला. कार्लसनने प्रागला त्याच्या प्रशिक्षकांबद्दल सांगितलं होतं. तो म्हणाला की “स्वीडनमध्ये त्याच्या अकादमीत तिथल्या मुलांना प्रशिक्षक रमेश ह्यांनी ‘"Be like Praagg'’ असं म्हटलं होतं.” मॅग्नसने प्रागचं अभिनंदन करत पुढे म्हटलं, ''we all want to be like you today.''
रमेश सरांनी त्यांच्या त्या वाक्याचा अर्थ सांगितला. ‘प्रागसारखे व्हा’ ह्याचा अर्थ प्रागचे गुण घ्या. एकाग्रता आणि चिकाटी शिका. इतर व्यवधानांपासून दूर राहा. हा मुलगा टीव्ही किंवा अन्य गेमिंग अ‍ॅप्सपासून दूर राहतो. इंटरनेटचा वापर करतो तो केवळ खेळ आणि खेळाशी संबंधित गोष्टींसाठी. आयुष्यात काही मिळवायचं असेल तर काहीतरी गमावण्याची तयारी ठेवावीच लागते. हे सगळे तरुण खेळाडू पाहिले की हेच जाणवतं. समवयस्क मुलं शाळा, कॉलेज आणि मजामस्तीमध्ये दंग असताना हे खेळाडू तासनतास सरावात गर्क असतात.
 
 
रमेश सरांच्या मते ही स्पर्धा प्रज्ञानंदसाठी खूप महत्त्वाची ठरली आहे. क्रमवारीत आपल्याहून अव्वल खेळाडूंना हरवणं, कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणं आणि त्या स्पर्धेतही पुन्हा ह्याच खेळाडूंशी होणारी स्पर्धा ह्यामुळे जगात अव्वल स्थानी पोहोचण्याचा प्रागचा मार्ग सोपा होऊ शकतो. प्रचंड मोठा अनुभव आज त्याच्याकडे जमा झाला आहे आणि भविष्यात त्याचा योग्य उपयोग केला जाईल ह्याबद्दल सरांच्या मनात कोणतीही शंका नाही. पुढच्या 2-4 वर्षांत ही स्वप्नपूर्ती होईल, असा विश्वासही बी. रमेश पुढे व्यक्त करतात.
 
 
पुढच्या महिन्यात आशियाई खेळ होणार आहेत, त्यातही आपले हे सगळे खेळाडू पुन्हा एकदा दिसतील.