सार्वजनिक स्वच्छतेच्या चळवळीचे अग्रदूत

विवेक मराठी    25-Aug-2023   
Total Views |

vivek
डॉ. बिंदेश्वर पाठक यांचे दि. 15 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या रूपाने देशाला मिळालेला स्वच्छता दूत हरपला. स्वत:स समर्पित करणे म्हणजे काय याचे डॉ. पाठक हे ज्वलंत उदाहरण होते. त्यांना पद्मभूषण पुरस्कार, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. जागतिक स्तरावर त्यांच्या कार्याची नोंद घेतली गेली. मात्र ’सुलभ’ने सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टीने घडविलेले परिवर्तन, त्यातून साधलेली सामाजिक सुधारणा हीच डॉ. पाठक यांची खरी ओळख आहे.
सार्वजनिक अस्वच्छता, अनारोग्य आणि सामाजिक अनिष्ट रूढी यांपासून समाजाला मुक्त करण्याचे कार्य करण्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचले, ते डॉ. बिंदेश्वर पाठक यांचे स्वातंत्र्यदिनीच निधन व्हावे, हा विचित्र योगायोग म्हटला पाहिजे. स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांनी सकाळी ध्वजवंदन केले. त्या वेळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. पाठक यांनी गेली पन्नासेक वर्षे स्वत:स सार्वजनिक स्वच्छतेच्या कार्यात वाहून घेतले होते. शौचालय हा विषय सार्वजनिक चर्चेचा नव्हे आणि जेव्हा डॉ. पाठक यांनी हे कार्य सुरू केले, तेव्हा तर घरोघरी शौचालय असणे ही संकल्पनाच नव्हती. वास्तविक त्यामुळे उद्भवणार्‍या सार्वजनिक अस्वच्छतेमुळे अनारोग्य पसरत असे आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असे. पण त्याबद्दल ना जागृती होती, ना इच्छशक्ती. तथापि त्याहून या कार्याकडे डॉ. पाठक ओढले गेले ते त्यामागील सामाजिक समस्यांच्या वेदनेमुळे. मैला डोक्यावरून वाहून नेण्याचे काम विशिष्ट जातींशी निगडित करण्याची सामाजिक प्रथा पडलेली होती. ती मानवी प्रतिष्ठेला तडा देणारी आहे, याची डॉ. पाठक यांना जाणीव झाली आणि ती प्रथा संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने त्यांनी स्वत:स आपल्या निहित कार्यात झोकून दिले.
एखाद्या व्यक्तीच्या इच्छाशक्तीमुळे आणि त्यास कृतीची जोड दिल्याने समाजात किती बदल होऊ शकतो, याचे डॉ. पाठक हे मूर्तिमंत उदाहरण होते. दि. 2 एप्रिल 1943 रोजी बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील एका गावात एका सुखवस्तू कुटुंबात बिंदेश्वर पाठक यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा (आईचे वडील) पंडित जयनंदन झा हे गांधीवादी नेते होते आणि स्वातंत्र्यलढ्यात ते सहभागी झाले होते. पाठक यांचे वडील आयुर्वेदाचे डॉक्टर होते. खरे तर जातीय उतरंडीशी पाठक यांचा परिचय होण्याचे कारण नव्हते. तथापि संवेदनशील मन छोट्या छोट्या गोष्टीही टिपत असते. पाठक यांच्या बाबतीत तेच झाले. त्यांचे घर मोठे होते, त्यात शौचालय मात्र नव्हते. त्या वेळी ती पद्धतही नव्हती आणि घरातील महिलांना शौच-मुखमार्जनासाठी भल्या पहाटे घराबाहेर जावे लागे. शौचालय नसल्याने उघड्यावर शौच करणे हीच सर्वत्र रूढ पद्धत होती. पाठक यांच्या मनावर उमटलेला हा पहिला ओरखडा असावा. त्यांच्या लहानपणीची दुसरी आठवण कदाचित मनावर व्रण करणारी ठरली असावी. त्यांच्या घरी सफाई करायला रोज येणार्‍या एका दलित महिलेच्या साडीला लहानग्या बिंदेश्वर यांचा चुकून हात लागला, तेव्हा त्यांच्या आजीने त्यांना ’शुद्धीकरणा’साठी पंचगव्याचे सेवन करायला लावले. अशा घटनांची स्पंदने पाठक यांच्या मनात उमटत असली, तरी ते वय तसे अजाणतेपणाचे. त्या घटनांमधील विदारकता त्यांना बहुधा तरुणपणी समाजाचा अधिक परिचय झाल्यावर जाणवली असावी.
 

vivek 
 
1964 साली पाठक यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून समाजशास्त्र शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. कालांतराने त्यांनी पाटणा विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडीची पदवी प्राप्त केली. मात्र मध्यंतरीच्या काळात त्यांना सामाजिक दुष्ट रूढींचा परिचय घडला होता. काही काळ शिक्षक म्हणून आणि नंतर रांचीनजीकच्या वीज प्रकल्पात साहायक लेखापाल म्हणून त्यांनी काम केले. 1965 साली त्यांचा विवाह झाला. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्यांचे शिक्षण हे त्यांच्या श्वशुर घरी अभिमान वाटावा असेच होते. मात्र जेव्हा पाठक यांनी सार्वजनिक स्वच्छतेच्या कार्यास वाहून घेतले, तेव्हा मात्र पाठक यांना कुटुंबीय, सासरे यांची नाराजी ओढवून घ्यावी लागली होती. आपले जावई सार्वजनिक शौचालये बांधण्याची मोहीम राबवितात, हे सांगण्यास त्यांना संकोच वाटत असे. पाठक यांची त्या कार्यामागची तळमळ आणि समाजाविषयीचा कळवळा त्यांना बहुधा उमगला नसावा. तथापि डॉ. पाठक यांनी आपले कार्य निश्चित केले होते. त्याला चालना मिळाली ती महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षात.
 
 
 
1968 साली एका अभ्यासक्रमासाठी जाण्यासाठी रेल्वेतून प्रवास करीत असताना, हाजीपूर रेल्वे स्थानकात त्यांचा चुलत भाऊ आणि एका मित्र यांच्याशी पाठक यांची भेट झाली. बिहारच्या गांधी जन्मशताब्दी समारोह समितीमध्ये सचिवाची जागा रिक्त आहे आणि त्यासाठी प्रयत्न केला तर त्यांना नोकरीवजा काम मिळेल, अशी त्या दोघांनी पाठक यांना गळ घातली. पाठक यांनी तसे केले, त्यांना सचिवाचे काम मिळाले नाही, पण भाषांतरकाराचे काम मिळाले. तेही विनावेतन. 1969 साली त्या वेळच्या नावांनुसार ‘भंगी मुक्ती आघाडी’त त्यांची बदली झाली. त्यामुळे मैला वाहून नेणार्‍यांच्या वस्त्यांमध्ये जाऊन राहण्याची संधी पाठक यांना मिळाली. विशिष्ट जातीमुळे हे काम माथी आलेल्यांच्या गावी डॉ. पाठक गेले, त्यांच्या सवयी, सामाजिक बाबी जाणून घेतल्या. ते सगळे चित्र विदारक असेच होते. ते पाहून पाठक हादरून गेले. ते अनुभव एका अर्थाने डॉ. पाठक यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. तो केवळ क्षणिक उमाळा न राहता पाठक यांनी त्यास कृतीची जोड दिली, त्यातूनच ’सुलभ शौचालय’ची संकल्पना उभी राहिली.
 

vivek 
 
उघड्यावर शौच करणे, मैला डोक्यावर वाहून नेणे या सगळ्या प्रकारांना खीळ घालायची, तर खर्चीक सेप्टिक टँकना किफायतशीर पर्याय देणे गरजेचे होते. डॉ. पाठक यांनी दोन खड्ड्यांच्या शौचालयाचे तंत्रज्ञान विकसित केले. एकाच वेळी दोन खड्डे खणून त्यात मैला जमा होईल; एक खड्डा भरत आला की दुसरा खड्डा वापरायचा आणि तोवर पहिल्या खड्ड्यातील मैल्याचे विघटन होऊन त्याचे खतात रूपांतर होईल, अशी ही सगळी प्रक्रिया असणार होती. इंग्लिशमध्ये त्याला टू-पिट-पोअर-फ्लश टॉयलेट असे नाव आहे. अशा शौचालयात प्रत्येक वापरानंतर पाण्याची गरज सुमारे दीड लीटर असणार होती, तर सेप्टिक टँक पद्धतीत ती दहा-एक लीटर असे. शिवाय डॉ. पाठक यांनी सुचविलेल्या रचनेच्या शौचालयांच्या बांधकामासाठी स्थानिक उपलब्ध सामग्री पुरेशी होती. सर्वार्थाने हे तंत्रज्ञान ‘सुलभ’ असे असणार होते. सुमारे पन्नास हजारांचे कर्ज घेऊन डॉ. पाठक यांनी 1970 साली सुलभ स्वच्छ शौचालय संस्थेची स्थापना केली, सुलभ इंटरनॅशनल हे त्याचेच पुढचे रूप. घरोघरी शौचालये बांधण्याची मोहीम उघडण्यात आली. अर्थात अशा व्यवस्थेची ओळखच नसल्याने या मोहिमेला सुरुवातीस म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही मात्र नंतर जसजशी जागृती झाली, तसतसा त्यास प्रतिसाद मिळू लागला. स्वच्छता, आरोग्य यांच्याशी याचा थेट संबंध होताच, त्याचबरोबर मैला वाहून नेण्याचे काम करणार्‍यांना त्यातून मुक्त करणे हा व्यापक उद्देश होता. सुलभ शौचालये उभी राहू लागली, तसतसे मैला डोक्यावरून वाहून नेणे आवश्यक राहिले नाही. पण डॉ. पाठक यांचा दूरदर्शीपणा हा की मैला वाहून नेणार्‍या सफाई कामगारांच्या पुनर्वसनाचे काम तितकेच महत्त्वाचे आहे, याचे त्यांना भान होते.
 
 
त्यांनी त्या दृष्टीने बिहार सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या जनकल्याण विभागाला एक प्रस्ताव दिला आणि तो म्हणजे अशा ‘मुक्त’ झालेल्या सफाई कामगारांना वाहन चालक, टायपिंग, शॉर्टहँड, इलेक्ट्रिशियन, शिवणकाम असे कौशल्याधारित प्रशिक्षण देण्याचा. याची सुरुवात बिहारमध्ये झाली आणि नंतर महाराष्ट्र, राजस्थान अशा राज्यांत त्या योजनेची अंमलबजावणी झाली. मैला वाहून नेणार्‍यांचे पुनर्वसन करण्याची व्यवस्था झाली, तरी जातींच्या उतरंडीत त्यांना असणारे स्थान आणि पर्यायाने समाजाची त्यांच्याकडे पाहण्याची पूर्वग्रहदूषित दृष्टी यात बदल होणे तितकेच आवश्यक होते. त्यासाठीदेखील डॉ. पाठक यांनी पुढाकार घेतला. 1988 साली त्यांनी अशा मैला उचलून नेणार्‍या पूर्वाश्रमीच्या सफाई कामगारांच्या शंभर जणांच्या तुकडीसह राजस्थानातील नाथद्वार मंदिरात प्रवेश केला. तेथे पूजा केली. हे मोठे पाऊल होते. मुख्य म्हणजे कथित अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्याच्या पुढाकाराने सामाजिक अभिसरणातील एक अडथळा दूर झाला.
 
 
घरोघरी शौचालयांचा पुढचा टप्पा होता तो सार्वजनिक शौचालयांचा. त्यासाठी पाटणा महापालिकेकडून त्यांना निधी मिळाला, मात्र अशा सार्वजनिक शौचालयांची देखभाल आणि निगराणी मात्र ते वापरणार्‍यांच्या शुल्कातूनच व्हायला हवी अशी अट होती. पैसे देऊन सार्वजनिक शौचालयांचा वापर कोण करणार? अशी शंका व्यक्त करण्यात येत होती आणि ती सर्वार्थाने अस्थानी नव्हती. याचे कारण त्या वेळी समाजात तशी मानसिकता नव्हती. मात्र सुलभ शौचालये जागोजागी उभी राहू लागली आणि त्याचा वापर करणार्‍यांची संख्या वाढू लागली. त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे सुलभ शौचालय संकुले. तेथे केवळ स्वच्छतागृहेच नाहीत, तर न्हाणीघरेही होती. पहिले सार्वजनिक शौचालय 1973 साली सुरू झाले. गेल्या पन्नास वर्षांत ‘सुलभ’च्या माध्यमातून घराघरांत शौचालये बांधली गेल्याची संख्या तेरा लाखांपर्यंत पोहोचली आहे. 24 राज्यांत आणि 5 केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुमारे 1600 गावा-शहरांमध्ये ‘सुलभ’चे तीस लाख स्वयंसेवक सार्वजनिक स्वच्छतेच्या या महान कार्यात सहभागी आहेत. देशभरात दहा हजार सुलभ सार्वजनिक शौचालये आहेत आणि तितकीच स्वच्छतागृह संकुले आहेत. लक्षावधी लोक त्यांचा दररोज वापर करत असतात.
 
 
मैल्याच्या विघटनातून गंधमुक्त बायोगॅसनिर्मितीचेही तंत्रज्ञान डॉ. पाठक यांच्या नेतृत्वात विकसित झाले आणि त्यातून घरगुती वापराची ऊर्जानिर्मिती होऊ लागली. बायोगॅस प्रकल्पातील उपपदार्थ म्हणून खत वापरकर्त्यांना मिळू लागले. सार्वजनिक स्वच्छतेबद्दल समाजात जेव्हा अत्यंत उदासीनता होती, अशा काळात डॉ. पाठक यांनी जिद्दीने, मेहनतीने आणि कल्पकतेने एक चळवळ सुरू केली. त्या चळवळीचा परीघ कायम विस्तारत ठेवला. याचे कारण सामाजिक विषमता, जातिभेद यांना भिडण्याचा त्यांचा उद्देश होता. त्यामुळे एकीकडे सुलभ शौचालयांची चळवळ त्यांनी उभी केली, तेव्हाच दुसरीकडे पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याच निगुतीने आणि तळमळीने प्रयत्न केले. दिल्लीत अशा कथित अस्पृश्यांसाठी इंग्लिश माध्यमाची शाळा सुरू केली. त्यात निम्मे विद्यार्थी अन्यही असत, जेणेकरून सामाजिक अभिसरण व्हावे. मैला वाहून नेणार्‍या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी त्यांच्या कुटुंबांना समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी दत्तक घ्यावे, यासाठी डॉ. पाठक यांनी योजना सुरू केली आणि न्यायाधीश, वकील, पत्रकार इत्यादींनी पाच हजार कुटुंबे दत्तक घेतली. सुलभ सार्वजनिक शौचालये उभी राहिली, तेव्हा त्यांच्या देखभाल-निगराणीसाठी पूर्वाश्रमीच्या मैला वाहून नेणार्‍यांनीच ते काम केले तर ते विसंगत होईल, म्हणून डॉ. पाठक यांनी त्या कामात सर्व जातींच्या लोकांनी सामील व्हावे, असे आवाहन केले आणि त्याचा परिणाम दिसू लागला. सुलभ शौचालयांची निगराणी ठेवणार्‍यांत कोणत्याही विशिष्ट जातीचे लोक नसतात. हा मोठा सामाजिक बदल डॉ. पाठक यांनी घडवून आणला, असेच म्हटले पाहिजे. सफाई कामगार हे विशिष्ट जातीचेच हे समीकरण खोडून काढण्याचा प्रयत्न डॉ. पाठक यांनी सातत्याने केला. हे त्यांचे योगदान मोलाचे.
 
 
डॉ. पाठक हे प्रभावी वक्ते आणि उत्तम लेखक होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली, तेव्हा डॉ. पाठक त्यात आनंदाने सामील झाले. आयुष्यभर त्यांनी त्याच कार्यात स्वत:स झोकून दिले होते. मोदींवर त्यांनी ’मेकिंग ऑफ ए लेजंड’ हे पुस्तकही लिहिले होते. लंडनस्थित मादाम तुसाँ संग्रहालय पाहून आल्यावर डॉ. पाठक यांना आपणही एक वस्तुसंग्रहालय उभारावे अशी प्रेरणा मिळाली. दिल्लीत त्यांनी असे संग्रहालय सुरू केले. त्या संग्रहालयाचे नाव ’म्युझियम ऑफ टॉयलेट्स’. प्राचीन भारतापासून अगदी अलीकडेपर्यंत शौचकुंडांची रचना कशी विकसित होत गेली, त्याबरोबरच प्राचीन इजिप्त, रोम, जेरुसलेम इत्यादी ठिकाणी शौचकुंडे कशी होती, ती कशी विकसित होत गेली इत्यादींची माहिती वस्तू, चित्र या माध्यमांतून तेथे मिळते.
 
 
एखाद्या विषयाला स्वत:स समर्पित करणे म्हणजे काय, याचे डॉ. पाठक हे ज्वलंत उदाहरण, याचा प्रत्यय देणारी त्यांची आयुष्यभराची खटपट होती. त्यांना 1991 साली पद्मभूषण पुरस्कार मिळाला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यांच्या कार्याची नोंद जागतिक स्तरावर घेतली गेली. मात्र ’सुलभ’ने सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टीने घडविलेले परिवर्तन, त्यातून साधलेली सामाजिक सुधारणा हीच डॉ. पाठक यांची खरी ओळख. काही प्रसंग आणि अनुभव यांतून उत्पन्न केलेल्या प्रेरणेला स्थायी, संस्थात्मक स्वरूप देण्याची किमया डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी करून दाखविली. एकाच ध्येयाने ते गेली पाचेक दशके झपाटलेले होते. ती धडपड आणि तगमग आता शांत झाली.

राहुल गोखले

विविध मराठी / इंग्लिश वृत्तपत्रांतून राजकीय, सामाजिक व आंतरराष्ट्रीय विषयांवर नियमित स्तंभलेखन
दैनिक / साप्ताहिक / मासिकांतून इंग्लिश पुस्तक परिचय सातत्याने प्रसिद्ध
'विज्ञानातील सरस आणि सुरस' पुस्तकाला राज्य सरकारचा र.धों. कर्वे पुरस्कार