राष्ट्रीय परिवर्तन क्षण

विवेक मराठी    29-Aug-2023   
Total Views |

moon rakshabndhan
 
फोटो सौजन्य : google
 
23 ऑगस्ट 2023 हा दिवस इस्रोच्या वैज्ञानिकांनी घडवून आणलेलले हे राष्ट्रीय परिवर्तन आहे. आहे. या एका क्षणाने शाळेतील मुलांप्रमाणे महाविद्यालयीन विद्यार्थीदेखील विज्ञानविद्युतभारित झालेला आहे. जिवंत राष्ट्रभावनेचा झरा प्रत्येकाच्या अंतकरणात प्रवाहित झालेला आहे. तोही आपल्या शक्ती आणि बुद्धीने एकविसावे शतक भारताचे शतक राहील, ही आकांक्षा पूर्ण करण्याच्या मनस्थितीत येत चाललेला आहे. 
राष्ट्राच्या जीवनातच असा एखादा क्षण येतो, जो भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यामध्ये सीमारेषा स्पष्ट करणारा असतो. 23 ऑगस्ट 2023 हा असा दिवस आहे. या दिवशी भारताने चंद्राच्या दक्षिण धु्रवावर विक्रम लँडर उतरविले. भारत हा दक्षिण धु्रवावर उतरणारा पहिलाच देश ठरला, हे विशेष. कुणाला असे वाटेल की, भविष्यकाळ आणि भूतकाळ याची सीमारेषा निश्चित करणारा हा क्षण कसा काय आहे? त्याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला 2014 साली न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केलेले व्यंगचित्र पाहावे लागेल.
 

cartoon isro 
 
या व्यंगचित्रात चंद्रावर गेलेले चार जण एका खोलीत बसलेले आहेत, त्याला ‘एलाइट क्लब’ असे नाव दिले आहे. त्याचा दरवाजा बंद आहे आणि दरवाजावर एक भारतीय खेडूत आपली गाय घेऊन उभा आहे आणि तो दरवाजा ठोठावतो आहे. या चार जणांच्या क्लबमध्ये त्याला प्रवेश नाही. 23 ऑगस्ट 2023ला गाय घेतलेल्या आणि खेड्यातील पोशाख घातलेल्या त्या भारतीय माणसाने दरवाजावर अशी लाथ मारली की, दरवाजा कोलमडून पडला. त्याच्या चार जणांच्या एलाइट कल्बमध्ये भारताने आपल्या सामर्थ्याने प्रवेश मिळविला.
 
इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांपुढे आणि तंत्रज्ञांपुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 26 ऑगस्ट रोजी भाषण झाले. ज्या ठिकाणी विक्रम लँडर सावकाश उतरले, त्या जागेचे त्यांनी नामकरण केले - तो बिंदू ‘शिवशक्ती बिंदू’ म्हणून ओळखला जाईल. शिवशक्ती म्हणजे काय, हे त्यांनी थोडक्यात सांगितले. विश्वाचे मंगल करण्याची शक्ती म्हणजे शिवशक्ती. आणि या शिवशक्तीला नारीशक्तीची जोड लागते. भारताने जगाला शिवशक्ती आणि नारीशक्ती यांचे दर्शन घडविले. भूतकाळ आणि भविष्यकाळ याची सीमारेषा ठरविणारा हा दिवस झाला.
 
आमची सर्व पिढी भूतकाळात वाढली. एखादी पदवी मिळविणे, चांगल्या आस्थापनात नोकरी मिळविणे किंवा छोटा-मोठा व्यवसाय करणे, एवढीच आमच्या तरुणपणी आमच्यासमोरची स्वप्ने होती. आमच्या डोळ्यासमोर कोणतेही राष्ट्रीय स्वप्न नव्हते. समाजवादी समाजरचना आम्हाला समजत नव्हती. कम्युनिझम आमच्या डोक्यावरून जात होता आणि भांडवलशाही म्हणजे नेमके काय, याचे फक्त शब्दज्ञान होत होते. पण ते जीवनात उतरवायचे कसे, हे सांगणारे कुणी नव्हते. शिक्षण झाले, नोकरी मिळाली की लग्न करायचे, संतती निर्माण करायची, चाळीत राहत असू तर फ्लॅटमध्ये जायचे आणि गावाकडे एखादे घर बांधायचे, ही आमच्या पिढीची स्वप्ने राहिली. दोन हजार चौदानंतर सर्वच बदलले. छोटी स्वप्न पाहू नका, मोठी स्वप्न पाहा, आपल्या दूरवरच्या भूतकाळातून प्रेरणा घ्या; एखादी गोष्ट होत नाही म्हणून रडत बसू नका, ती नव्याने कशी करता येईल, याचे चिंतन करा; अपयश ही यशाची पायरी आहे, प्रयत्न, चिकाटी, परिश्रम करा हे सांगणारा कुणीतरी उभा राहिला. असे सांगणारे यापूर्वी कुणी नव्हते असे नाही, पण त्याप्रमाणे जगणारा कुणी नव्हता.
 
जे सांगू तसे जगणारा एक माणूस उभा राहिला. परिश्रम म्हणजे काय? दिवसाचे अठरा तास परिश्रम करून त्याने आदर्श उभा केला. त्यामुळे सर्व क्षेत्रांतील सुप्त शक्ती जागी होत गेली. इस्रोच्या वैज्ञानिकांनी अशक्य ते शक्य करून दाखविले. चंद्राच्या कक्षेत यान पाठविणे हे कठीण. त्या यानातून विक्रम रोव्हरला चंद्रावर अलगद उतरविणे हे महाकठीण. विक्रम रोव्हरमधून तो लँडर बाहेर काढणे आणि त्याने फोटो घेऊन ते आपल्याला पाठविणे सारेच अद्भुत. वैज्ञानिक प्रगतीचा हा चमत्कार याचि देही याचि डोळा आपण पाहू शकलो.. केवढा अद्भुत क्षण आहे तो!
 
डोळ्यात प्राण आणून वाट पाहणे अशी आपल्याकडे म्हण आहे. ही म्हण म्हणजे काय, याचा 23 ऑगस्टला कोट्यवधी भारतीयांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. शेवटची 15-20 मिनिटे एखाद्या युगासारखी वाटली. ते कसे उतरेल, मध्येच काही गडबड होणार नाही ना, आणि गडबड होऊ नये म्हणून प्रत्येक जण मनातून ईश्वराची प्रार्थना करीत होता. जो कष्ट करतो, प्रयत्न करतो, त्याला परमेश्वर यश देतो, हे आपण 23 ऑगस्टला पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची मानसिकतादेखील अशीच भावुक होती. ते शरीराने दक्षिण अफ्रिकेत होते, परंतु मनाने इस्रोच्या वैज्ञानिकांबरोबर होते. शेवटचे क्षण ते पाहत होते आणि विक्रम लँडर चंद्राच्या भूमीवर अंगदाचे पाऊल ठेवून उभा राहिला, तेव्हा सर्व देशामध्ये चैतन्याची एक लहर निर्माण झाली.
 
ही चैतन्याची लहर सामान्य नव्हती. मी भारतीय आहे, आणि मी भारतीय म्हणून काहीही करू शकतो अशी आत्मविश्वासाची लहर होती. आम्ही एक देशवासी आहोत, इस्रोचे वैज्ञानिक आमचे वैज्ञानिक आहेत, त्यांनी केलेले परिश्रम आमचा गौरव वाढविणारे परिश्रम आहेत. सर्वांशी एक भावनिक नाते जोडले गेले, ते बंधुतेचे नाते आहे. रक्षाबंधनाच्या काही दिवस आधी वैज्ञानिकांनी अभूतपूर्व पराक्रम केला आणि पृथ्वी चंद्राला राखी बांधते, असे एका चित्रकाराला सुंदर कार्टून काढावेसे वाटले. ऑगस्ट 23चा दिवस सनातन, शाश्वत, चिरंतन भारत एका नव्या रूपात उभा राहण्याचा दिवस झाला. 23 ऑगस्टचा तो क्षण अनुभवण्यासाठी लाखो शाळकरी मुले शाळेत, घरात, जमली होती. पाच-सहा वर्षांपासून दहा-बारा वर्षांपर्यंतची मुले हा उद्याचा भारत आहे. हा उद्याचा भारत भूतकाळाची सगळी ओझी फेकून देऊन वैज्ञानिक आकांक्षाची झेप घेण्यासाठी अतिशय आनंदाने उभा राहिला आहे. या छोट्या मुलांच्या प्रतिक्रिया पाहत असताना ऊर भरून येत होता. वैज्ञानिक सिद्धान्त समजण्याचे त्यांचे वय नाही, अवकाश तंत्रज्ञान म्हणजे काय, हेदेखील त्यापैकी फार थोडे जण सांगू शकतात. परंतु आपल्याला भविष्य घडवायचे आहे आणि ते विज्ञानाच्या माध्यमातूनच घडेल ही राष्ट्रीय आकांक्षा, हे राष्ट्रीय स्वप्न त्यांच्या देहबोलीतून व्यक्त होत होते.
 
इस्रोच्या सर्व वैज्ञानिकांनी भारताची उगवती पिढी उत्तुंग स्वप्नाने भारावून टाकली आहे. प्रत्येक समाजाचे राष्ट्र छोटी छोटी स्वप्ने पाहून उभे राहू शकत नाही. अमेरिकेने 1969 साली चंद्रावर माणूस पाठविला. चंद्रावर माणूस पाठविण्याचे स्वप्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनडी यांनी अमेरिकन तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ यांच्यापुढे ठेवले होते. दहा वर्षांत त्यांनी ते यशस्वी करून दाखविले. इस्रोचे शास्त्रज्ञ 2004 साली अटल बिहारी वाजपेयी यांना भेटायला गेले होते. त्यांनी अटलजींना सांगतिले की, विक्रम साराभाई यांनी आमच्यापुढे जे लक्ष्य ठेवले, जी उद्दिष्टे ठेवली ती सर्व आम्ही पूर्ण केली. दळणवळण, शेती, वातावरणातील बदल वगैरे संदर्भात आम्ही अंतराळात उपग्रह पाठवून यश संपादन केले आहे. आता आपल्याला चंद्र आणि मंगळ यांचे वेध घेण्याची वेळ आलेली आहे.
 
अटलजी कवी होते, त्यांनी चांद्रमोहिमेचे नामकरण करून टाकले, ‘चंद्रयान’. इस्रोच्या वैज्ञानिकांनी चंद्रयान 1, चंद्रयान 2, चंद्रयान 3 या मोहिमा आखल्या आणि यशस्वी करून दाखविल्या. चंद्रयान-2मध्ये चंद्राचा शोध घेणारे उपयान यशस्वीपणे उतरविता आले नाही. यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. अपयशातून अधिक संशोधन होते आणि यशाचा मार्ग प्रशस्त होतो. इंग्लिशमध्ये म्हणतात की, "Try, Try, but don't cry' - म्हणजे प्रयत्न करीत राहा, रडत बसू नका. इस्रोने जी नवी पिढी प्रेरित केली आहे, ती प्रयत्न करून यश संपादन करणारी पिढी असणार आहे. आता रडत राहण्याचे दिवस संपले. मी हे करू शकत नाही, आमच्याकडे प्रगत तंत्रज्ञान नाही, आमच्याकडे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ नाहीत, ही वाक्ये आता इतिहासजमा झालेली आहेत. आम्ही जे ठरवू ते करून दाखवू, ही आत्मविश्वास निर्माण करणारी सीमारेषा आखली गेली आहे.
 
शाळेतील मुलांप्रमाणे महाविद्यालयीन विद्यार्थीदेखील विज्ञानविद्युतभारित झालेला आहे. जिवंत राष्ट्रभावनेचा झरा प्रत्येकाच्या अंतकरणात प्रवाहित झालेला आहे. तोही आपल्या शक्ती आणि बुद्धीने एकविसावे शतक भारताचे शतक राहील, ही आकांक्षा पूर्ण करण्याच्या मनस्थितीत येत चाललेला आहे. केशवसुतांच्या शब्दात सांगायचे तर,‘नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें!’ इस्रोच्या वैज्ञानिकांनी घडवून आणलेलले हे राष्ट्रीय परिवर्तन आहे.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.