नाशिकच्या मिठायांची चव सातासमुद्रापार

विवेक मराठी    11-Sep-2023   
Total Views |
नाशिक हे ठिकाण तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. कुंभमेळ्यासाठी, तसेच देवदर्शनासाठी अनेक जण नाशिकच्या पुण्यभूमीला भेट देतात. या पुण्यभू नाशिकला देवदर्शनासाठी आलेले भाविक आणि स्थानिक हे तेथील प्रसिद्ध असलेल्या मिठायांचेही चाहते आहेत. नाशिकच्या या खाद्यसंस्कृतीची चव चाखण्यासाठी सातासमुद्रापार असणारे लोक आतुरतेने वाट पाहत असतात.
nashik
 
नाशिकची जिलेबी परदेशात पोहोचवणारे बुधा हलवाई
 
पाकात मुरलेल्या जिलेबीइतकेच बुधा हलवाई आणि नाशिककरांचे घट्ट नाते आहे. अस्सल नाशिककर जिथे जिथे पोहोचला आहे, तेथे त्याच्याबरोबर बुधाकडची मधुर जिलेबी पोहोचली आहे. एवढेच नाही, तर नाशिकचे परदेशात पोहोचलेले आपल्या नातेवाइकांना जिलेबीची ऑर्डर ’शिप’ करायला सांगतात. त्याशिवाय त्यांचे सण-उत्सव सार्थकी लागत नाहीत. नाशिककरांचा सण बुधाकडे गेल्याशिवाय पूर्ण होत नाही. येथे सतत कढईतून गरमगरम जिलब्यांचा मधुर, केशरी डोंगर परातीत तयार होतो, खवय्यांनी फस्त केल्याने क्षणार्धात तो नाहीसाही होतो.
 
nashik 
 
व्यवसायाने हमाल असलेल्या मामाने चार वर्षांच्या पोरक्या झालेल्या भाच्याचा प्रेमाने सांभाळ केला. बुधा मोठा झाल्यावर त्याच्या आवडीनुसार त्याला ’गोड’ काम करण्याची संधी दिली. मामा कोंडाजी सोनवणे यांनी बुधाच्या हाती सोपवलेला अन्नपूर्णेचा वसा आज यशोशिखरावर पोहोचला आहे. अग्रवाल मिठाईच्या दुकानात तरुण बुधाने नोकरी करून अनुभव मिळवला. त्या जोरावर 1956 साली बुधा लक्ष्मण वाघ यांनी ’बुधा जिलेबी’ हे स्वतंत्र दुकान सुरू केले. त्या वेळी नाशिकमध्ये बगोबा सरवटे यांचे हनुमान जिलेबी व भगवंतराव यांच्याकडे केवळ सकाळी जिलेबी मिळायची. बुधा यांनी सकाळ व संध्याकाळ अशी दोन वेळा ताजी जिलेबी सुरू करून ग्राहकांना गोडी लावली. लवकरच या गोड व्यवसायाला 70 वर्षे पूर्ण होतील. वाघ यांच्या तीन पिढ्या या व्यवसायात आहेत, तशाच ग्राहकांच्या तीन पिढ्या गोड आस्वाद घेत आहेत. बुधाशेठ यांनी 50 वर्षांपूर्वी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. ग्राहकांच्या पसंतीची मिठाई करण्यास प्रारंभ केला. ‘मनोहर मिठाई’ या नावाने तिवंधा चौकात नवे दुकान सुरू झाले.
 
 
2006 साली बुधा यांचे निधन झाले. त्यांची मुले चंद्रकांत (राजू), वसंत, दिलीप या मुलांनी व्यवसायात आधुनिकता आणली. आता नाशिकमध्ये तिवंधा चौकातील मुख्य बुधा जिलेबी दुकान, शेजारीच मनोहर मिठाई यासह गंगापूर रोड, इंदिरानगर, खुटवडनगर येथे शाखा सुरू आहेत. पुढच्या पिढीतील ललित, हर्षल व छोटा नरसिंह व्यवसाय पुढे नेत आहेत. वसंत म्हणाले, “75 साली 4 रुपये किलो असणारी जिलेबी आज 240 रुपये दराने विकली जाते. श्रीखंड, गुलाबजाम, बासुंदी, पक्का पेढा, आंबा बर्फी, विविध प्रकारची बर्फी, खुरचंदवडी या मिठायांना कायम मागणी असते. जिलेबीबरोबर पापडी, फाफडा, शेव, सामोसा, अळूवडी, ड्राय सामोसा, कचोरी या पदार्थांना पसंती मिळते. पाडव्याला श्रीखंड, दसर्‍याला बासुंदी, गणपतीत माव्याचे, तळलेले व उकडीचे मोदक, दिवाळीत काजू कतली, मिक्स मिठाई, वेगवेगळी बर्फी, नारळीपौर्णिमेला खोबरा वडी यावर खवय्ये अक्षरश: तुटून पडतात. खास राजगीरा पिठाचे गुलाबजाम, मलाई बर्फी याशिवाय अनेकांचा उपवास पूर्ण होत नाही. आषाढी एकादशी, महाशिवरात्र या दिवशी बटाट्याच्या जिलेबीसाठी भाविक वाट बघत असतात.” सणासुदीला बुधा जिलेबी व मनोहर मिठाई दुकानांसमोर लांबलचक रांगा लागतात. या गोड गोड अधिक माहितीसाठी ललित वाघ यांच्याशी 9881264959 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
nashik 
 
 
यो मोदक सहस्रेण यजती..
 
श्रावण महिना आपल्याबरोबर सणांची रेलचेल घेऊन येतो. पाठोपाठ भाद्रपदात गौरी-गणपती आनंदाचा गोड ठेवा घेऊन येतात. बाप्पाला आवडणारे मोदक त्याचा प्रसाद म्हणून भाविकच फस्त करतात. 2016 साली नाशिकच्या धनश्री व भाग्यश्री रानडे या जावांनी 8 हजारांहून अधिक उकडीचे मोदक करण्याचा विक्रम केला आहे. 2000 साली 3 रुपयांना विकला जाणारा मोदक आता 20 रुपये नग दराने विक्री होतो. तळलेले मोदकही त्या करून देतात. पण त्यांची खासियत उकडीच्या मोदकांचीच!
 
 
उकडीचा मोदक म्हणजे अप्रतिम कलाकौशल्याचा सुबक, सुंदर नमुना! कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये केले जाणारे हे तांदळाच्या पिठात खोबर्‍याचे सारण भरून केले जाणारे मोदक अलीकडे इतर सर्व समाजातही आवडीने खाल्ले जातात. दापोलीच्या शोभना रानडे लग्न होऊन नाशिकला आल्या. त्यांनीच आपल्या सुनांना ही कला शिकवली. उत्तम सुगरण म्हणून नाशिकसह मुंबई-पुण्यापर्यंत रानडे जावांची ख्याती पसरली आहे. मोदकांसाठी खास इंद्रायणी तांदूळ वापरले जातात. गणेशोत्सवात दररोज रात्री मोदक बनवले जातात व दिवसा ऑर्डर्स पोहोचवल्या जातात. नोकरदार महिलांना, नवविवाहित युवतींना त्यांचा आधार वाटतो. नुकत्याच झालेल्या अधिक मासात धनश्री व भाग्यश्री यांनी 80 किलो तांदळाचे अनारसे ऑर्डर्स घेऊन बनवून दिले. ते थेट भारतातल्या व परदेशातल्या जावयांपर्यंत पोहोचले. लोकांच्या ऑर्डरनुसार 200 जणांचे साग्रसंगीत, रुचकर भोजन त्या सहजतेने बनवून देतात. थंडीच्या दिवसात त्यांच्या पौष्टिक लाडूंना खूप मागणी असते. डिंक, मेथी, आळीव व सुकामेव्याचे लाडू मोठ्या प्रमाणात खपतात.
 

Ganpati Naivedya Recipes 
 
दिवाळी फराळाला नवरात्रीत ऑर्डर्स यायला लागतात. दसर्‍यानंतर पदार्थांना सुरुवात होते. 8 प्रकारचे लाडू, मोतीचूर, चकली, करंजी, चार प्रकारचे चटकदार चिवडे, दोन प्रकारचे चिरोटे, गोड व खारे शंकरपाळे, याशिवाय मागणीनुसार वेगवेगळ्या मिठाया त्या दोघी तयार करून देतात. ‘जावा जावा उभा दावा’ असे म्हटले जाते. पण धनश्री व भाग्यश्री या मिठाईतील साखरेप्रमाणे एकमेकींच्या स्नेहात विरघळल्या आहेत. या व्यवसायात मोठी मेहनत आहे. वेळेचे काटेकोर नियोजन करावे लागते. “पतीचे व मुलांचे सहकार्य आणि ग्राहकांचा विश्वास, प्रेम या पायावरच समाधान मिळते” असे त्या दोघी आवर्जून सांगतात.
 
 
nashik
 
नाशिकमध्ये चक्क श्रीखंड स्टुडिओ
 
श्रीखंड हा सर्वाधिक लोकप्रिय गोड पदार्थांपैकी एक आहे. त्यामुळे पारंपरिक गोड पदार्थांत श्रीखंड आवडणार्‍यांची कमतरता नाही. श्रीखंड कोणत्याही खास प्रसंगी आवर्जून खाल्ले जाते. नाशिक शहरात राहणार्‍या अविनाश बाप्ते आणि मनोज बाप्ते या दोन भावांनी श्रीखंडाचे तब्बल 40 प्रकारचे फ्लेवर्स तयार केले आहेत. त्यांच्या या फ्लेवर्सना खवय्यांचा देखील चांगला प्रतिसाद मिळतो. त्यांनी नाशिकमध्ये ‘द श्रीखंड स्टुडिओ’ नावाचा स्टुडिओ सुरू केला आहे.
 
 
येथे या श्रीखंडाची किंमत 280 रुपये किलोपासून तर 600 रुपये किलोपर्यंत आहे. केशर राजभोग, अमेरिकन नट्स, चॉको आमंड, ब्राउनी, पंचरत्न नट्स, बटर स्कॉच, रजवाडी, नवरत्न नट्स, अफगाण ड्रायफ्रूट्स, मावा बदाम, केशर किंग, पान मसाला, ट्राफिक जॅम, काजू द्राक्ष, शाही अंजीर, पायनॅपल, शाही गुलकंद, पेरीपेरी, स्ट्रॉबेरी, ब्ल्यूबेरी, सीताफळ, मिक्स फ्रूट, क्लासिक इलायची, मँगो, मड चॉकलेट, काजूमलाई, चॉकलेट अँड कुकीज, जांभूळ, पेरू, ऑरेंज, लेमन, चॉकलेट अँड नट्स, कॉफी क्रंबल, ड्रायफ्रूट व्हॅनिला, चेरी, चिली, चॉकलेट बनाना, मँगो मस्तानी, केशर इलायची, फ्रूट फ्यूजन, केशर पिस्ता हे फ्लेवर्स द श्रीखंड स्टुडिओ येथे मिळतात. अधिक माहितीसाठी 9822240606 या क्रमांकावर अविनाश बाप्ते यांच्याशी संपर्क साधता येईल.
श्रीखंड स्टुडिओत तरुणवर्गाची पसंती फ्रोजन डेझर्टऐवजी विविध नैसर्गिक चवींच्या श्रीखंडाला वाढते आहे. अधिक महिन्यात बाप्ते बंधूंनी 33 चवींच्या श्रीखंडाचा कॉम्बो पॅक उपलब्ध करून दिला. त्याला चांगली मागणी मिळाल्याने गणपतीत 21 चवींचे श्रीखंड प्रत्येकी 50 ग्रॅमप्रमाणे पॅकमध्ये उपलब्ध होतील, तर नवरात्रीला वेगवेगळ्या 11 चवींचा पॅक मिळणार आहे. नाशिकच्या पारिजातनगर भागात श्रीखंड स्टुडिओचे मुख्य विक्री केंद्र असून पंचवटीत आणि पुणे, मुलुंड, ठाणे, कल्याण, छत्रपती संभाजीनगर येथे शाखा आहेत.
 
 
नाशिकमध्ये विविध मिठायांना पसंती
 
 
एकेकाळी नाशिकमध्ये पांडे मिठाईचा बोलबाला होता. पळसाच्या पानावर मिळणारे श्रीखंड, 50 ग्रॅम वजनाचा मन तृप्त करणारा गुलाबजाम, उपवासाला आवश्यक ठरणारी मलाई बर्फी, विविध प्रकारचे लाडू, लस्सी यांना वर्षभर मागणी असायची. भगवंतराव मिठाई दुकान मेनरोडवर मध्यवर्ती असल्याने खवय्यांची पावले सहज वळत. अग्रवाल, मंगेश मिठाई ही लोकप्रिय ठिकाणे काळाच्या ओघात बंद झाली. सध्या सागर स्वीट्स, अतुल डेअरी, पूर्णिमा स्वीट्स, गणेश स्वीट्स, गुप्ता मिष्टान्न याखेरीज अनेक दुकाने ग्राहकांच्या खास पसंतीची आहेत. चितळे एक्स्प्रेसदेखील जोरात आहे. प्रत्येकाची स्वतंत्र खासियत आहे. अलीकडे बंगाली मिठाई, ड्रायफ्रूट मिठाई यांना जास्त पसंती असते. मधुमेहींसाठी शुगर फ्री मिठाई अनेक ठिकाणी मिळते. घरगुती पद्धतीने ऑर्डरनुसार मिठाई तयार करून देण्याचा व्यवसायही जोरात आहे.
 
 
सणासुदीच्या दिवसांत अनेक मिठायांत पनीरचा वापर केला जातो. या काळात भेसळयुक्त पनीर विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे या मिठायांच्या सेवनामुळे जिवावर बेतण्याची शक्यता आहे. या गैरप्रकारावर काही वेळेस प्रशासन कारवाई करते. परंतु खरी गरज आहे ती, खात्रीच्या दुकानातूनच दर्जेदार मिठाई खरेदी करण्याची. मिठाई स्वस्त मिळते म्हणून कुठूनही मिठाई खरेदी करता कामा नये. सणासुदीच्या काळात असे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असल्याने सर्वांनी जागरूक राहिले पाहिजे.

संजय दामोदर देवधर

  • ज्येष्ठ पत्रकार, आणि आदिवासी वारली चित्रशैली अभ्यासक.

  • नाशिक येथे दैनिक गावकरीमध्ये 34 वर्षे कलाविभाग प्रमुख, वार्ताहर, कलासमीक्षक व उपसंपादक पदावर काम करून निवृत्त. सध्या फ्रिलान्स पत्रकारिता सुरु.

  • शैक्षणिक अर्हता - जी.डी.आर्ट ( ऍप्लाईड ) 1982 साली जे जे स्कुल ऑफ आर्ट येथून अव्वल श्रेणीत उत्तीर्ण.

  • अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांशी निकटचे संबंध व पदाधिकारी म्हणून कार्य. विविध स्पर्धांच्या परीक्षणाचा अनुभव.

  • संशोधनपर कार्य- आदिवासी वारली चित्रशैलीविषयी विशेष संशोधन. कार्यशाळांचे आयोजन करुन अनेकांना वारली कला शिकविण्याचा उपक्रम सुरु. आत्तापर्यंत ५ ते ७५ वयोगटातील हजारो कलाप्रेमींना वारली चित्रकलेचे मार्गदर्शन. परदेशी पर्यटक देखील येऊन वारली कलेचे धडे गिरवतात.

  • वारली चित्रकलेच्या प्रसार व प्रचारासाठी वारली चित्रसृष्टी हे पुस्तक लिहून प्रकाशित केले. त्याच्या चार आवृत्त्या लोकप्रिय झाल्या आहेत. Warli Art World या इंग्लिश पुस्तकाच्या दोन आवृत्ती परदेशातही पोहोचल्या आहेत. रसिक वाचकांचा या पुस्तकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.

  • चित्रसहल या आगळ्यावेगळ्या उपक्रमात आदिवासी पाड्यांवर शहरी कलाप्रेमींना नेऊन वारली जीवनशैली, त्यांची कला यांचे सुरेख दर्शन घडवले जाते. आतापर्यंत अनेकजण सहकुटुंब सहलीत सहभागी झाले.

  • विश्वविक्रम - ऑगस्ट 2018 मध्ये 1100 पेक्षा अधिक स्पर्धकांची ऑन द स्पॉट वारली चित्रस्पर्धा घेतली व दोन विश्वविक्रम प्रस्थापित केले. सर्वाधिक सहभागाबद्दल जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड तर चित्रांद्वारे सामाजिक संदेश दिल्याने वंडरबुक वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आले.

  • पत्रकारितेत विविध प्रकारचे पुरस्कार मिळाले आहेत. राज्य सरकारने सन 2019 मध्ये वारली कलेतील योगदानाबद्दल राज्यस्तरीय आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले.