बांबू पार्क ते अगरबत्ती - पितांबरीच्या बांबू शेतीचा यशस्वी प्रयोग

विवेक मराठी    14-Sep-2023   
Total Views |
 
Successful Experiment of Bamboo Farming by Pitambari

पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली तर चांगले उत्पन्न मिळवता येते, याचे आणखी एक उदाहरण पितांबरी कंपनीने समोर आणले, ते म्हणजे शेतीत परिवर्तनाचे बीज रोवून ‘बांबूची शेती’ करण्याचा प्रयोग यशस्वी करून. आज चार-पाच नाही, तर तब्बल 32 प्रकारच्या बांबूंच्या प्रजातींचा समावेश असणारे दापोलीतील पितांबरीचे बांबू पार्क पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. तसेच बांबूच्या काडीपासून निर्मित ’पितांबरी देवभक्ती अगरबत्ती’च्या मोठ्या उद्योगाची उभारणी पितांबरीने केली आहे. त्यामुळे पितांबरीने बांबू पिकातून उत्पन्नाचा वेगळा दर्जा विकसित केल्याचे दिसून येते.

 
vivek
 
’बांबू’ ही एक बहुपयोगी वनउपज आहे. शेतकर्‍यासाठी हमखास आर्थिक उत्पादन देणारे हे पीक असल्यामुळे बांबूला ‘हिरवे सोने’ म्हणून ओळखले जाते. बांबू उत्पादनात भारत चीननंतरचा दुसर्‍या क्रमाकांचा देश आहे. आपला देश बांबू उत्पादनात अग्रेसर असला, तरी बांबू आधारित उद्योगांमध्ये खूपच मागे आहे. देशात अगरबत्ती बनविण्यासाठी लागणारा महत्त्वाचा कच्चा माल (उदा. बांबूची कांडी) व्हिएतनाम व चीन देशातून विकत घ्यावा लागतो. आपल्याला बाहेरील देशातून बांबू काडी आणावी लागत असल्याने त्याची जास्त किंमत मोजावी लागते. तीच बांबू काडी आपण आपल्या देशात तयार केली, तर ती आपल्याला कमी किंमतीत मिळू शकते, तसेच आपली गरज भागवून आपण त्या काडीची विक्रीदेखील करू शकतो. यातूनच बांबू शेतीची संकल्पना माझ्या मनात रुजली.
बांबू रोपे खरेदीसाठी व अधिक माहितीसाठी  संपर्क - 9867112714
राजापूर तालुक्यातील ताम्हाणे विभागाच्या अंतर्गत येणार्‍या अडवली गावामधील जमिनीवर बांबू शेती करण्याचे नियोजन केले. पुढील टप्प्यात बांबू लागवडीसाठी जमीन शोधणे, बांबू काडी बनविण्यासाठी बांबूची योग्य जात निवडणे या गोष्टी सुरू झाल्या. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून बांबू शेतीबद्दल आवश्यक सर्व माहिती घेतली आणि अडवली येथे 2018 साली सुमारे 20 एकर क्षेत्रावर आम्ही अगरबत्ती काडी बनविण्यासाठी लागणार्‍या ’टुलडा’ जातीच्या बांबूसह 6500 इतर बांबूंच्या झाडांची लागवड केली आहे. याखेरीज परतवली गावात बांबूच्या वेगवेगळ्या जातींची प्रायोगिक तत्त्वावर लागवड करण्यात आली आहे.
 
 
बांबू झाडांची लागवड करताना 10 x 12 फूट अंतरावर आखणी केली. त्यानुसार 1.5 x 1.5चे पाच फूट खोलीचे खड्डे खोदले. त्यामध्ये 5 किलो कंपोस्ट खत 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट घालून खड्डे भरून घेतले. एकरी 350 झाडे लावली. बांबूची लागवड केल्यावर पाणी व्यवस्थापन करताना ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला. सुरुवातीच्या दोन वर्षांपर्यंत तण नियंत्रण केले. एकदा बांबूची झाडे मोठी झाल्यावर बांबूमध्ये तण वाढले नाही. महत्त्वाचे म्हणजे बांबूला पाणी आणि खते यांचे प्रमाण फारच कमी लागते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती जास्त असल्याने पिकासाठी कीटकनाशकांचा शून्य वापर झाला. कोंब येण्याच्या सुरुवातीस दोन महिने (जुलै व ऑगस्ट) पीक संरक्षण केले. लागवड करून चौथ्या वर्षांपासून पहिली तोड केली. लागवडीतील सुमारे दोन हजार बांबूची रोपे चार वर्षांची झालेली आहेत. पहिल्या बांबू तोडणीस एका बांबू रोपातून सरासरी चार काठ्या मिळाल्या. अशा प्रकारे पुढील 30 ते 40 वर्षे उत्पादनाची हमी आहे.
 
 
त्याचप्रमाणे झाडांना आधार देण्यासाठी बांबूच्या काड्यांचा उपयोग होतो. तसेच कलमांना आधार देण्यासाठी 3 ते 5 फुटापर्यंत बांबूच्या काठ्या वापरल्या जातात. मागील वर्षी पितांबरी कंपनीने झाडांना आधार देण्यासाठी लागणार्‍या बांबूच्या काड्यांची सुमारे 2 लाखापर्यंत विक्री केली. बांबूच्या काड्यांची किंमत 1 फुटाला 1.5 रुपये आहे.
 


Successful Experiment of Bamboo Farming by Pitambari 
 
बांबू हे एक औद्योगिक पीक आहे, याचे भान ठेवून आम्ही पर्यायी कच्च्या मालाचा विचार करून तळवडे येथे 2019 साली बांबूपासून अगरबत्ती निर्मिती उद्योगाची उभारणी केली. या उद्योगामुळे जवळपास 50 ते 60 स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सध्या आम्ही सूगंधी व मसाला या दोन प्रकारांतून पितांबरी देवभक्ती अगरबत्तीची निर्मिती करीत आहोत. चंदन, गुलाब, मोगरा, चाफा इ. विविध सुगंधांतील अगरबत्त्या आम्ही बाजारात उपलब्ध केल्या असून आज पितांबरी ’देवभक्ती’ अगरबत्ती ब्रँडला देशभरातून मोठी मागणी आहे. त्यामुळे पितांबरी देवभक्तीचा सुगंध सर्वदूर पसरत आहे. याशिवाय या ठिकाणी बांबूपासून अगरबत्ती स्टँड, पेपरवेट, टेबल - खुर्ची, वॉल क्राफ्ट अशा विविध वस्तूंची निर्मिती केली जाते.
 
 
बांबू ही अत्यंत वेगाने वाढणारी आणि मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन अर्थात प्राणवायू उत्सर्जित करणारी गवतवर्गीय वनस्पती असून पर्यावरणाचे संतुलन राखण्यात तिचा अत्यंत मोलाचा वाटा आहे, ही बाब लक्षात घेऊन दापोलीतील साखळोली गावात असलेल्या पितांबरी अ‍ॅग्रो टूरिझम येथे 1 एकर क्षेत्रावर आम्ही 32 प्रकारच्या बांबू प्रजातींची लागवड केलेले ‘बांबू पार्क’सुद्धा साकारले आहे. यामध्ये माणगा, बल्कोवा, टुलडा, पिवळा बांबू, डोनॅक्स, मानवेल, हुकेरी, जी. व्हल्गॅरिस आदी बांबूंची लागवड केली असून हे बांबू पार्क पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. कोकण विभागात अनुकूल आणि उपयुक्त अशा 5 बांबू प्रजातींची नवीन लागवड तळवडे येथे करण्यात आली आहे. यामध्ये ओलिवरी, एस्पर, ग्रीन व्हल्गॅरिस, पलिदा, पॉलिमार्फा या बांबूंचा समावेश केला आहे. पितांबरीच्या दापोली व तळवडे येथील नर्सरीतून बहुगुणी बांबूच्या अस्सल, दर्जेदार आणि जातिवंत रोपांची विक्री केली जाते. शेतकरी, बागायतदार व इतर कोणीही या नर्सरीतून बांबू रोपे विकत घेऊ शकतात. सध्या ग्राहकांच्या मागणीनुसार तयार केलेली टुलडा आणि भीमा (बलकोव्हा) जातीच्या बांबूची दर्जेदार रोपे पितांबरी नर्सरीमध्ये विक्रीकरिता उपलब्ध आहेत. तसेच तालुका पातळीवरील पितांबरी नर्सरी फ्रँचायसीच्या माध्यमातूनही ही रोपे विकत घेता येऊ शकतील.
 
 
शेतकर्‍यांना बांबू शेतीसाठी मार्गदर्शन हवे असल्यास पितांबरी नर्सरीला ते केव्हाही भेट देऊ शकतात. पितांबरीच्या कृषी तज्ज्ञांकडून त्यांना मोफत मार्गदर्शन दिले जाईल. तसेच बांबू रोपांसहित फूलझाडे, फळझाडे, शोभिवंत झाडे, मसाला रोपे, मौल्यवान वनस्पती या अधिकृत मातृवृक्षांपासून निर्मित दर्जेदार जातिवंत रोपांच्या विक्रीतून वर्षभर उत्पन्न मिळविण्यासाठी पितांबरीची नर्सरी फ्रँचायसीदेखील घेऊ शकतात.
 
 
लेखक पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

रवींद्र प्रभुदेसाई

पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.ची सुरुवात 1989 मध्ये श्री रवींद्र प्रभुदेसाई आणि त्यांचे वडील स्वर्गीय श्री वामनराव प्रभुदेसाई यांनी लहान घरगुती व्यवसाय म्हणून केली होती. ती हळूहळू एक आघाडीची उत्पादन आणि विपणन कंपनी बनली आहे. होमकेअर डिव्हिजनमध्ये एफएमसीजी उत्पादनांसह सुरुवात करून, आता संस्थेकडे एकाच छताखाली 10 विभाग आहेत उदा; होमकेअर, हेल्थकेअर, अॅग्रीकेअर, फूडकेअर, सौर, धूप, परफ्युमरी, डिजीकेअर, कृषी पर्यटन आणि निर्यात विभाग.