काही घातक युती

विषवृक्षाची बीजे

विवेक मराठी    02-Sep-2023   
Total Views |
आजच्या घरांमध्ये दिसणार्‍या अनेक गोष्टी नव्या पिढीवर खोलवर परिणाम करत आहेत. कौटुंबिक वीण विसविशीत करत आहेत. अनेक गोष्टी पूर्णपणे बाद करता येणार नाहीत, पण त्या पॅकेजबरोबर येणार्‍या नकारात्मक गोष्टी कशा थोपवायच्या, त्यांची तीव्रता कशी कमी करायची याचा विचार केला नाही, तर समजातली मूल्यव्यवस्था कशी टिकेल? आपल्या घरातला दहा-बारा ते वीस-बावीस हा वयोगट आज यात वाहवत जातो, या सर्वाला बळी पडतो. उमलते, उत्साही वय व बाहेरून आदळणार्‍या या गोष्टी यात संतुलन साधताना व्यक्ती म्हणून जबाबदार, उन्नत, परिपूर्ण होण्याचे ध्येय मुलांसमोर ठेवायला हवे. विषवृक्षाची बीजे या लेखमालेचा पाचवा भाग.

vivek
 
ती’ हा शब्द उच्चारला की राजकीय पक्ष डोळ्यासमोर येतात. पण युती काही फक्त राजकारणातच होतात असे नाही. दोन किंवा तीन पदार्थांचे संयुग बनते, त्याचा गुणधर्म एकाच बनतो. दोन, तीन संकल्पनांचे एकत्रित येणे म्हणजे युती. त्यांचा गुणधर्म एकच असेल असे सांगता येत नाही. त्या मिश्रणातून योग्य व चांगला फॉर्म्युला तयार होईल की घातक, हे त्याच्या परिणामांवर ठरते. बरेचदा हे परिणाम संमिश्र होतात. चांगले व वाईट दोन्ही. त्या वेळी परिस्थिती कठीण होते. ‘धरले तर चावते, सोडले तर पळते’ अशी अवस्था होते. ‘हे’ योग्य की ‘ते’.. असा निवडीचा पर्यायच हातात राहत नाही. ‘या’बरोबर ‘ते’ स्वीकारावेच लागते. असे समाजाचे प्रवाहपतित होणे दु:खदायक आहे, म्हणून टप्प्याटप्प्यावर योग्य-अयोग्य, चांगले-वाईट याचा विचार करावा लागतो. आजची सधन घरे साधनसंपन्न आहेत, पण मूल्यसंपन्न आहेत का? तशी ती होऊ शकतील का? हा मोठा प्रश्न आहे.
 
अशी पहिली युती आहे जागतिकीकरण + संधी + साधनशुचितेचा लोप यांची.
 
गेल्या शतकाच्या सुरुवातीला औद्योगिकीकरणाने, तर शेवटच्या दशकात जगभर LPG - म्हणजे Liberalization-Privatization-Globalization -  या त्रिसूत्रीने प्रवेश केला. भारतानेही 1991मध्ये खाउजा - म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण या त्रिसूत्रीचा, मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. याने भारतीय नव्हे, तर जागतिक स्तरावर जगण्याचा पोत बदलला. नोकरी-व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या, जनआकांक्षा वाढल्या. या वावटळीत मूल्ये बदलली व बिघडलीही. औद्योगिकीकरणाने स्त्रिया-मुलींना घराबाहेर, उत्पादक काम दिले, कामगार बनवले. जागतिकीकरणाने तर प्रत्येक क्षेत्रावर परिणाम केला. उद्योगांची मालकी सरकारकडून खाजगी क्षेत्राकडे गेली. उद्योगांची संख्या वाढली, संधी वाढल्या. शिक्षण, तंत्रज्ञान, दूरसंचार, दळणवळण अशी अनेक क्षेत्रे खुली झाली. ग्राहकाला विविध वस्तूंचे व सेवांचे पर्याय उपलब्ध झाले. परमिट राज संपले.

 
खाजगी इंजीनियरिंग कॉलेज सुरू झाली. आयटी क्षेत्र बहरले. दूरसंचार व तंत्रज्ञान हे जगण्याचे नवे परिमाण झाले. याचा सर्वांना फायदा झाला. स्त्रियांनाही संधी उपलब्ध झाल्या. परदेश प्रवास, नोकरी, आर्थिक सुबत्ता, नेतृत्वविकास झाला, पण माणसे मशीन झाली. पैसा हा यशाचा मानदंड झालाच, तसेच यश मोजायचे एककही पैसा हेच झाले. यशस्वी, नंबर एक होण्याच्या शर्यतीत साधनशुचितेचा लोप झाला. एक अन्वरत स्पर्धा तयार झाली. त्याचे कुटुंबरचनेवर खोलवर परिणाम झाले. आजची ‘जनरेशन झेन’ ही त्या परिवेशात जन्मलेली पिढी आहे. त्यांचा यशाचा फॉर्म्युला 1-2-3-4-5-6 आहे. एक बायको किंवा नवरा, दोन मुले, तीन बेडरूमचा फ्लॅट, चारचाकी गाडी आणि आतातर पाचही नाही सहा आकडी पगार.. म्हणून आता जागतिकीकरण नको हा पर्यायच उरलेला नाही.
व्यवसायचे खाजगीकरण आणि पूर्वी ‘खाजगी’ असलेल्या कुटुंबाचे सरकारीकरण होताना दिसते आहे. सर्व सदस्यांची काळजी घेण्याची जबाबदारी कुटुंबाची होती. स्त्री सुरक्षा असो, वृद्धसेवा असो वा बालसंगोपान, आता या खाजगी बाबींमध्ये सरकारला लक्ष घालावे लागते. नियम करावे लागतात. पूरक, पर्यायी सेवा उपलब्ध करून द्याव्या लागतात.

 
अशी दुसरी युती आहे अधिक उत्पादन + जाहिरात + वस्तूकरण यांची

या जागतिकीकरणाचा पुढचा टप्पा आहे भरमसाठ उत्पादन, नैसर्गिक स्रोतांचा अपरिमित उपभोग व त्या वाढीव उत्पादनांसाठी ग्राहक शोध! नवनवे ग्राहक मिळवण्यासाठी जाहिरात, नव्या क्लृप्त्या. खरी गरज व कृत्रिम गरज यात फरक करता येत नाही. माणसांकडे पाहायचे ते बाजारपेठ म्हणून! यामुळे माणसांचे वस्तूकरण झाले आहे. तसे ते झाले किंवा होत आहे याचे भान येईपर्यंत उशीर होतो, वेळ निघून जाते. सौंदर्यस्पर्धा, खेळाडूंची बोली लावणार्‍या व्यापारी स्वरूपाच्या क्रीडास्पर्धा या अशा बाजारयंत्रणेचा परिपाक आहेत. जाहिरात व्यवसाय अनेकदा व्यावसायिक मूल्ये ओलांडताना दिसतो. जगाने विकासाचे प्रतिमान बदलले आहे.
उपभोग हे विकास मोजण्याचे प्रतिमान झाले की हाव आणि काहीही करून इच्छापूर्ती हा त्याचा परिणाम होणे हे अपरिहार्य झाले. त्याभोवती त्या मॉडेलला पूरक इकोसिस्टिम तयार होते. आपण नकळत त्याचा बळी होतो. पैसा - उपभोग - अधिक पैसा - अधिक उपभोग ही साखळी तयार होऊन त्याला पूरक उद्दिष्टे, ध्येय, धोरणे असे ते चक्र आहे.
अशी तिसरी युती आहे चित्रपट / ओटीटी + मनोरंजन + तकलादू जगणे यांची
 
भारत देश चौदा विद्यांचा, चौसष्ट कलांचा देश आहे. त्यात पासष्टाव्या कलेची भर पडली, ती कला म्हणजे चित्रपट! मनोरंजन क्षेत्राचा उदय, खाजगीकरणाच्या परिणामातून उपलब्ध अनेक चॅनल्स, अमर्याद वेळाचे प्रक्षेपण, बातम्यांचाही 24 तासांचा रतीब, पुन्हा स्पर्धा, त्यातून चटकदार कंटेंट देण्याची गळेकापू स्पर्धा. मग त्याच त्या तकलादू जगण्याचे चित्रण करणार्‍या मालिका, नफ्यातोट्याच्या गणितात बसवण्यासाठी हटके कंटेंट देण्याची सक्ती, तोडल्या जाणार्‍या सभ्यतेच्या मर्यादा हा या क्षेत्रातल्या स्पर्धेचा परिणाम आहे. सिनेमॅटिक लिबर्टीचे कवच त्यांच्या हाती आहे. टीआरपीची सबब आहे. लोकांना हे व असेच बघायला आवडते असे समाजावर थोपण्याचा उद्धटपणाही आहे.
 
अनेक नवे विषय, जागतिक कलाकृती या निमित्ताने पाहायला मिळतात, पण मनोरंजन व्यवसाय त्यांच्या व्यवसायाव्यतिरिक्त समाजधारणेसाठी जबाबदारीने वागताना दिसत नाही.
 
 
अशी चौथी युती आहे इंटरनेट + हिंसा व लैंगिकता + मूल्यहीनता यांची

इंटरनेट व जवळजवळ प्रत्येकाच्या हातात असलेले त्याचे स्वतंत्र गॅजेट ही सोयही आहे आणि उपद्रवही! शाळा, शिकवणी वर्ग, काम, बँक, मनोरंजन, खेळ सर्वांसाठी स्मार्ट फोन आता अपरिहार्य आहे. वाय फाय हवेच, फ्री डेटाचे गाजर आहेच. स्वत:च्या स्मार्ट फोनवर मुलगा/मुलगी काय बघते हे पालकांना समजत नाही. त्यातून कोणते मूल्यविचार संक्रमित होत आहेत हे कळत नाही. हिंसा, लैंगिकता, पोर्न किंवा उत्तान कंटेंट हे पैसे मिळवण्याचे साधन आहे. त्यात स्वत:ची व दुसर्‍याची अयोग्य चित्रे, व्हिडिओ विकायला संकोच वाटत नाही. जगायला पैसा लागतोच, पण आज इतकी प्रलोभने आहेत की त्यासाठी पैसा पुरवणे हे मोठे आव्हान आहे. आईवडिलांनी पैसा दिलाच पाहिजे हा मुलांचा हट्ट आहे. अनेक मुला-मुलींना तो त्यांचा अधिकारच वाटतो. Sense of Entitlement ही आजच्या पिढीची भावना आहे.
 
आजच्या घरांमध्ये दिसणार्‍या यातल्या अनेक गोष्टी नव्या पिढीवर खोलवर परिणाम करत आहेत. कौटुंबिक वीण विसविशीत करत आहेत. अनेक गोष्टी पूर्णपणे बाद करता येणार नाहीत, पण त्या पॅकेजबरोबर येणार्‍या नकारात्मक गोष्टी कशा थोपवायच्या, त्यांची तीव्रता कशी कमी करायची याचा विचार केला नाही, तर समजातली मूल्यव्यवस्था कशी टिकेल?
 
आपल्या घरातला दहा-बारा ते वीस-बावीस हा वयोगट आज यात वाहवत जातो, या सर्वाला बळी पडतो. उमलते, उत्साही वय व बाहेरून आदळणार्‍या या गोष्टी यात संतुलन साधताना व्यक्ती म्हणून जबाबदार, उन्नत, परिपूर्ण होण्याचे ध्येय मुलांसमोर ठेवायला हवे. असा वैयक्तिक विकास, प्रगती करत असताना पालकांचा, आजी-आजोबांचा, शिक्षकांचा विश्वासाचा हात त्यांना हवा आहे.
 
(स्त्रियांबाबतची वाढती गुन्हेगारी, तिची कारणे व उपाय यांची चर्चा करणारी, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्त्री शक्तीच्या उपाध्यक्ष नयना सहस्रबुद्धे लिखित लेखमाला विषवृक्षाची बीजे. आपल्या सूचना, अनुभव व उपाय यांचे स्वागत आहे.)

नयना सहस्रबुध्दे

स्त्रीविषयक लेखनासाठी प्रसिध्द असणाऱ्या नयना सहस्रबुध्दे या भारतीय स्त्री शक्ती या संघटनेच्या संस्थापक सदस्य आहेत. भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या म्हणूनही त्या कार्यरत होत्या. नयना सहस्रबुध्दे या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारीपदावर कार्यरत होत्या. सध्या महिला बँकेत डेप्युटेशनवर रुजू झाल्या आहेत. साप्ताहिक विवेकमध्ये स्त्रीभान या सदरातून त्या स्त्रीविषयक लेखन करत आहेत.