स्वामी विवेकानंद आणि विविध पंथ - भाग 2

#विवेकानंद स्मृतिजागर

विवेक मराठी    26-Sep-2023   
Total Views |
इस्लामसारख्या कडव्या धर्माचे दुष्परिणाम सर्व जग आज भोगत आहे. तसेच हिंदूंना पाश्चात्त्यांचे अंधानुकरण न करता आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगण्याचा सल्ला स्वामीजींनी दिला. प्रेषित मुहंमद आणि इस्लाम पंथाविषयीचे स्वामीजींचे विचार आणि हिंदू धर्माविषयीचे स्वामीजींचे विचार याचा परामर्श आपण या लेखात घेणार आहोत.

swami vivekanand
 
स्वामीजींनी राजयोगातील समाधी अवस्थेबद्धल चर्चा करताना मुहंमदाचा उल्लेख केलेला आहे. समाधी अवस्थेला पोहोचणे म्हणजेच बुद्धीपलीकडच्या अवस्थेला पोहोचणे. अशा प्रकारे प्राप्त झालेले ज्ञान हे अतींद्रिय असते. समाधी अवस्था प्राप्त करण्यासाठीदेखील काही टप्पे असतात. एखादी व्यक्ती अचानक जर समाधी अवस्थेत गेली, तर त्या प्रकारे प्राप्त झालेल्या ज्ञानाबरोबरच विचारही भ्रामक होण्याचा धोका असतो. या भ्रामक विचारांच्या मोहात व्यक्ती अडकून पडते. मुहंमदाचे म्हणणे होते की गॅब्रिएल नावाचा देवदूत आला आणि हरक नावाच्या स्वर्गातल्या घोड्यावर बसवून तो मुहंमदाला स्वर्गात घेऊन गेला. स्वामीजी पुढे सांगतात की कुराण वाचले, तर तुमच्या लक्षात येईल की मुहंमदाने जशी आश्चर्यकारक सत्ये सांगितलीत, तशी बरीच भ्रमयुक्त विधानेही केली आहेत. त्याला स्फुरण होते हे खरे, पण तो त्या स्फुरणांवर जाऊन आदळला होता. कारण त्याने शास्त्रशुद्ध योगसाधना केलेली नव्हती. त्यामुळे त्या भरात आपल्या हातून काय घडतेय, याचे त्याला ज्ञान नव्हते. स्वामीजी पुढे सांगतात, ‘मुहंमदाच्या हातून जगाचे जे काही भले झाले, त्यापेक्षा त्याच्या धर्मवेडाने अपरिमित नुकसान झाले, याचा विचार करा. त्याच्या शिकवणीमुळे लक्षावधी लोकांच्या कत्तली झाल्या, अनेक माता आपल्या बछड्यांना मुकल्या, कोटी कोटी लोक जिवानिशी मारले गेले.’
 
लंडनमधील एका व्याख्यानात स्वामीजी मुहंमदाच्या अनुयायांविषयी बोलतात (समग्र वाङ्मय, खंड 2) - प्रत्येक माणूस उभा राहतो आणि म्हणतो, प्रेषित मुहंमद हाच एकमेव खरा. अशा माणसांना धर्म कशाशी खातात हे तरी कळले आहे काय? बाष्कळ बडबड म्हणजे धर्म नव्हे. ईश्वराचे सर्वत्र प्रकाशमय दर्शन होऊ शकते ही धारणाच मुसलमानांच्या मनात विकसित झालेली नाही. त्यामुळे त्यांच्यात धर्मांधता आणि कडवेपणा मोठ्या प्रमाणावर आहे. ज्या समाजाने स्वत:पलीकडे कधी पाहिले नाही, तो समाज अत्यंत दुष्ट आणि क्रूर बनतो. त्यामुळे अरेबियाच्या प्रेषिताच्या अनुयायांनी अमानुष क्रूरता दाखवत भयानक कत्तली करत रक्तपात घडवलेला आहे. जो कुराणावर विश्वास ठेवत नाही, त्याला काफर समजावे आणि त्याची कत्तल करावी आणि ही हत्या म्हणजे त्याच्यावर दया दाखवण्यासारखे आहे. जिथे सुंदर सुंदर पर्‍या असतात आणि सर्व सुखोपभोग असतात, अशा स्वर्गात जाण्यासाठी काफरांच्या कत्तली केल्या पाहिजेत. अशा भयाण धर्मवेडातून, आंधळ्या समजुतींमधून भीषण हत्याकांडे झालेली आहेत.
 
राष्ट्रीय स्वंयसेवक संघ ग्रंथ
संघ ग्रंथ नोंदणीसाठी


vivek

 
मुहंमद आणि इतर काही रिलिजियस नेत्यांची चरित्रे वाचली, तर हा धोका जाणवतो, तरीही त्यात सर्वांमध्ये काही स्फुरण होते. इथे स्वामीजी प्रामुख्याने अब्राहिमिक रिलिजन्सच्या नेत्यांविषयी, प्रेषितांविषयी बोलत आहेत. त्यांच्या धर्मपिसाटपणामुळे जगाचे फार मोठे नुकसान झालेले आहे. ज्यू धर्मांधांनीदेखील स्वत:ला कॅनन प्रदेशात प्रस्थापित करण्यासाठी तेथील स्थानिक कॅननाइट, तसेच फिलिस्तिन पेगन लोकांच्या हत्या केल्या. ख्रिस्ती धर्मांधांनी ज्यू लोकांच्या, तसेच प्रोटेस्टंट, कॅथलिक या संघर्षात एकमेकांच्या हत्या केल्या. मुसलमान धर्मांधांनीदेखील जगभरात जी दहशत माजवलेली आहे, ती जगजाहीर आहे. नुकतेच फ्रान्समध्ये झालेल्या संघर्षाचे, तसेच अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी स्थानिक अफगाणी मुसलमानांवर केलेले अत्याचार, भारताने तर मुसलमान धर्मांध अतिरेक्यांचे प्रचंड हल्ले सहन केलेले आहेत. काश्मीरमध्ये तर गेल्या 200-300 वर्षांत प्रचंड हिंदू लोक, काश्मिरी पंडित मारले गेलेत की त्याची गणतीच नाही. अशी खूप उदाहरणे आपल्याला देता येतील.
 

swami vivekanand 
एस.एन. धर लिखित स्वामी विवेकानंद समग्र चरित्र खंड 3 (पान क्र. 135)मध्ये उल्लेख आलेला आहे की नैनिताल येथील वास्तव्यात मोहम्मद सर्फराज हुसेन या सद्गृहस्थांशी स्वामीजींची भेट झालेली होती. ते मनातून अद्वैत वेदान्ती होते आणि स्वामीजींच्या अलौकिक आध्यात्मिक सामर्थ्याने भारावून गेलेले होते. ते म्हणाले होते की “स्वामीजी, भविष्यात जर कधी तुम्हाला अवतार म्हटले गेले, तर असे म्हणणार्‍यांच्यात मी मुसलमान पहिली व्यक्ती असेन.” पुढे हुसेन यांनी मुहम्मदानंद या नावाने स्वत:ला स्वामीजींचा शिष्य मानले. त्यांच्याशी 10 जून 1898 या काळात लिहिलेल्या पत्रोत्तरात स्वामीजींनी म्हटले होते की आपल्या मायभूमीच्या दृष्टीने विचार करता हिंदू धर्म आणि इस्लाम ह्यांचा समन्वय हेच एक आशास्थान होय. यात त्यांनी पुढे इस्लाममधील बंधुभावाचा उल्लेख केलेला आढळतो. पण हे पत्र ज्या पत्राला उत्तर म्हणून लिहिलेले आहे, ते हुसेन यांचे पत्र उपलब्ध नसल्याने ते त्यांनी नक्की कोणत्या संदर्भात म्हटले, याची संगती लागत नाही.
 
 
स्वामीजी आणि हिंदू धर्म
 
देशभरात परिव्राजक अवस्थेत फिरताना स्वामीजींनी आपल्या देशातील जनतेची स्थिती पाहिलेली होती. लागोपाठ काही शतके झालेल्या मुसलमानी आणि नंतरच्या ब्रिटिश आक्रमणाने देशातील जनतेची स्थिती वारंवार सहन कराव्या लागत असलेल्या गुलामगिरीमुळे फारच गंभीर झालेली होती, असे ते कित्येक वेळा नमूद करतात. यातच हिंदू धर्मातील जातिव्यवस्था, शिवाशिव या सगळ्याच्या अवडंबराने भरच टाकलेली होती. यावर स्वामीजींनी आपल्या देशात असताना कायमच ताशेरे ओढलेले आहेत. पण पाश्चात्त्य देशांत पाऊल टाकल्यावर त्यांना तेथील स्थिती पाहिल्यावर आपल्याकडील परिस्थितीमधील सकारात्मकतादेखील जाणवली. त्यामुळेच स्वामीजी कायम म्हणायचे की ‘भारतीयांनी पाश्चात्त्यांकडून भौतिक प्रगती कशी करायची हे शिकून घेतले पाहिजे आणि पाश्चात्त्य देशांना भारताने अध्यात्म शिकविले पाहिजे.’ उत्कृष्ट गोष्टी कायमच कुणाकडूनही शिकाव्यात, असे ते म्हणत. ‘दुसर्‍याचे अंधानुकरण करू नका, तर आपल्या हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगा. जेव्हा तुम्हाला तुमच्या पूर्वजांची लाज वाटू लागेल, तेव्हा तुमचा अंत जवळ आलेला आहे असे समजा. अंधानुकरणाने अधोगती होते. इंग्रजाळलेल्या उच्चवर्णीय भारतीयांनो, मला तुमची शरम वाटते’ असेही ताशेरे स्वामीजी हिंदूंवर ओढतात.
 
 
ब्राह्मण हा अध्यात्मप्रवण आणि संन्यस्त प्रवृत्तीचा आदर्श आहे. ज्याला ऐहिकाचा स्पर्श नाही आणि ज्याच्या ठिकाणी शुद्ध ज्ञान प्रकाशत आहे, तो ब्राह्मण अशी व्याख्या स्वामीजी देतात. ब्राह्मणत्व प्राप्त करणे हे हिंदू धर्माचे गंतव्य स्थान आहे. उच्च जातीत जन्माला आलेला असो की नीच जातीत, हे ब्राह्मणत्व प्राप्त करणे हे प्रत्येकाचे ध्येय आहे, असा आशय आपल्या हिंदू धर्मातील जातिव्यवस्था सांगते. नुसते जन्माने ब्राह्मण असून उपयोग नाही. ब्राह्मण ही एक प्रवृत्ती आणि मानसिकता आहे. हिंदू राष्ट्राने गेली कित्येक शतके गुलामगिरीत काढल्याने त्यांचे हे स्वत्व हरपले आहे. हिंदू राष्ट्राचे पुनरुत्थान करावयाचे असल्यास या राष्ट्राचा धर्म आरोग्यपूर्ण सुधारणांनी बदला. स्वामीजींनी जरी सामाजिक सुधारणा व्हाव्यात असे आवाहन केलेले असले, तरी विधवा विवाहाबाबत त्यांचे असेही मत होते की जर त्या विधवेची इच्छा असेल, तरच तिचा विवाह करावा, सरसकट सगळ्या विधवांना सामाजिक सुधारणेच्या नावाखाली तसे करण्यास भाग पाडू नये. स्वामीजींनी हिंदूंवर टीका करताना असेही मत मांडले की युरोपियन लोकांनी भगवद्गीतेचा संदेश अवलंबला आहे. उद्योगीपणा आणि त्यातून होत असलेली प्रगती हे रजोगुणाचे द्योतक आहे. युरोपातील लोकांनी श्रीकृष्णाचा संदेश पचवला आहे. पण आपल्या समाजात जी निष्क्रियता पसरलेली आहे, ती तमोगुणाचे द्योतक आहे. आपण श्रीकृष्णाचा संदेश आत्मसात केलेला नाही. निव्वळ पूजाअर्चनेने आणि धूपारत्यांनी प्रगती साधता येणार नाही. तळागाळातील माणसापर्यंत धर्म आणि शिक्षण पोहोचले पाहिजे.
 
 
स्वामीजींनी हिंदू धर्मावर केवळ टीकाच केली असे नव्हे, तर पाश्चात्त्य देशांत असताना त्यांनी हिंदू धर्मातील तत्त्वांची आणि भारतीय संस्कृतीची महती सांगणारी व्याख्यानेही दिली आहेत. आपली उपनिषदे ही ज्ञानाचा अक्षयकोश आहेत. उपनिषदांनी शक्तीची उपासना करण्याचा संदेश दिलेला आहे. विविध वंश, जाती, पंथ यांच्यातील दीनदुबळ्यांमध्ये उपनिषदांचा ललकार सामर्थ्य ओतेल आणि त्यांना मुक्त - निर्भय करेल. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वातंत्र्य हेच उपनिषदांचे प्राणसूत्र आहे. संस्कृत भाषा कठीण असली, तरी त्यातील साहित्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, तरच समाजात चैतन्य निर्माण होईल. संस्कृत ही देवभाषा आहे, त्यामुळे सारे राष्ट्र संस्कृतात पारंगत झाले, तर अध्यात्माची रत्ने सर्वांपर्यंत पोहोचतील, असे संस्कृतविषयी गौरवोद्गार स्वामीजींनी काढले आहेत. भारतीय स्त्री-पुरुषांना संदेश देताना ‘प्रबुद्ध भारत’मध्ये स्वामीजी सांगतात - हिंदुस्थान आणि हिंदू धर्म यांविषयी श्रद्धा बाळगा. सामर्थ्याची उपासना करा.
 
 
आकांक्षी आणि निर्भय बना. लक्षात ठेवा की जगाकडून हिंदुस्थानला अवश्यमेव थोडे काही घ्यायचे आहे, पण त्याच्या अनंतपटीने द्यायचे आहे. स्वामीजींची हिंदू धर्मावरील टीका ही एका आईने आपल्या मुलांना त्यांच्यातील सुधारणेसाठी रागवणे या अनुषंगाने घ्यावी. याचा अर्थ असा होत नाही की स्वामीजी हिंदुद्वेष्टे किंवा समाजवादी, कोणताही धर्म न पाळणारे होते. स्वामीजींच्या विविध विषयांसंदर्भातील विचारांविषयी आणखीही काही छोटे लेख होऊ शकतात. खरे तर स्वामीजींचे विचार लिहिण्यासाठी असे छोटे छोटे लेख कमीच पडतात. पण फूल न फुलाची पाकळी अशा अर्थाने हे लेखन घ्यावे, अशी विनंती.
 
 
लेखिका विवेकानंद साहित्याच्या अभ्यासक, विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्या आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य आहेत.

डॉ. अपर्णा लळिंगकर

 पी.एचडी - एज्युकेशन टेक्नॉलॉजी (ट्रीपल आय टी बंगलोर), एम. फिल. (केम्ब्रिज विद्यापीठ, इंग्लंड); एम. एस्सी - गणित (पुणे विद्यापीठ), बीएड; स्वतःची एज्युकेशन टेक्नॉलॉजीची कंन्सलटन्सी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य; एनसीईआरटीच्या अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक निर्मिती कमिटीच्या गणित विषयाच्या सदस्य (member of NSTC CAG mathematics); जी 20 सी 20 आंंतर्गत Diversity Inclusion Mutual Respect आणि वसुधैवकुटुंबकम या दोन कार्यगटांत काम; उच्च शिक्षणासाठी देशातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्त्यांचे संपादन; पोस्टडॉक्टोरेे संशोधनासाठी इस्त्रााली गव्हर्नमेंटच्या फेलोशिपवर वर्षभर इस्रायल मध्ये वास्तव्य; दोन वर्षे विवेकानंद केंद्राचे सेवाव्रती शिक्षिका म्हणून नॉर्थ ईस्टमधील अरूणाचल प्रदेश व आसाममधील शाळांमधे काम; ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, पुणे येथे चार वर्षे गणिताचे अध्यापन; विवेकानंद केंद्र पुणे येथे सह-सचिव म्हणून जबाबदारी त्याआंतर्गत युथ कॅम्प्स, व्याख्यानमाला यांचे आयोजनात सहभाग, स्वामी विवेकानंदांचे विचार आणि कार्य यांवर विविध ठिकाणी व्याख्याने देणे, कार्यशाळा घेणे; महाविद्यालयीन जीवनात संघाच्या कौशिक आश्रम या कार्यालयाच्या माध्यमातून बालसंस्कार वर्ग घेणे, त्यातूनच पर्वती दर्शन परिसरात वस्तीतील मुला-मुलींसाठी एक अभ्यासिका चालू केली होती. एज्युकेेन टेक्नॉलॉजी, स्वामी विवेकानंद, इस्त्रायल, एल जी बी टी क्यू सारखे विविध सामाजिक तसेच राजकीय विषयांवर साप्ताहिक विवेक, मासिके, दिवाळी अंक, समाजमाध्यमे यांत अभ्यासपूर्ण लेखन.